Friday, December 31, 2010

'साहित्य संमेलनाध्यक्षपद दोन वर्षांचे करण्यास हरकत नाही'

संमेलनाध्यक्ष म्हणून एक वर्ष कमी पडतं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारे ठराव प्रत्यक्षात आणणंही अध्यक्षांना शक्य होत नाही, या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष आणि प्रख्यात समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी मात्र समाधानी आहेत. धोरणात्मक भूमिका आणि दिशादर्शन ही अध्यक्षाची प्राथमिक जबाबदारी असल्यामुळे हा कालावधी अपुरा नाही, असे ते सांगतात. मात्र, त्याचवेळी ‘संमेलनाचा कालावधी एकाऐवजी दोन वर्षांचा असावा,' असं मत कुसुमाग्रजांनी व्यक्त केलं होतं, तो धागा पकडून ‘असे प्रयोग करायला काहीच हरकत नाही,' असं स्पष्ट करण्यास द. भि. विसरत नाहीत!

‘लोकमत ऑनलाइन'शी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मराठी संस्कृतीचा उभा-आडवा छेद घेता आल्याचे समाधान व्यक्त करताना, ‘गावागावांतील सामान्य माणसांनी, शेतकèयांनी, कष्टकèयांनी आणि छोट्या खेड्यांमधील शाळा-वाचनालयांनी मराठी साहित्य आजवर सांभाळले आहे. शहरांतील उच्चभ्रूंच्या नव्हे, तर या सर्वसामान्य माणसांच्या खांद्यावर मराठी साहित्य दिमाखात-सुरक्षितपणे उभं आहे,' असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

मराठी साहित्यसंस्कृती-वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम बड्या शहरांच्या तुलनेत गावोगावची वाचनालये मोठ्या तळमळीने करत आहेत, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी या वाचनालयांचा गौरव केला. .

साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभराचा काळ आपल्याला खूप काही शिकवणारा होता. या काळात राज्यात आणि राज्याबाहेरही फिरलो... तेथील वाचनसंस्कृतीचा, साहित्यसंस्कृतीचा आढावा घेता आला. संमेलनाध्यक्ष म्हणून संमेलनाचे केवळ तीन दिवसच जबाबदारी राहते असे नाही, तर या काळात निर्माण होणारी ऊर्जा वर्षभर साहित्यप्रेमी समाजाला व्यापून असते, असे ते म्हणाले.

मराठी भाषेत निर्माण होणारं साहित्य दर्जेदार तर आहेच, पण ते समाजाभिमुखही आहे. या साहित्यात वैश्विक जाणिवा व्यक्त झालेल्या दिसून येतात. निबंधासारख्या वैचारिक साहित्याची देणगी मराठी साहित्याने दिली आहे. त्यामुळेच अनेक नवनवे लेखक- कवी उत्साहाने पुढे येत आहेत. आसाराम लोमटे, अनुराधा पाटील अशी निवडक नावे येथे घेता येतील, असे त्यांनी सांगितले.

एकीकडे ग्रामीण भागात वाचनसंस्कृती जोर धरत असताना मुंबई, पुणे, नागपूरसारख्या बड्या शहरांत मात्र बदलती जीवनशैली, इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि रुपवाणी (आकाशवाणी, दूरचित्रवाणी) यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. रुपवाणीसारखी माध्यमं केवळ करमणुकीचं साधन म्हणूनच काम करतात. वाचनाने होते तशी बौद्धिक देवाणघेवाण या माध्यमातून होताना दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्य समाजाभिमुख असलं तरी आता समाजाने साहित्याभिमुख होणं गरजेचं आहे, असं आग्रही मत त्यांनी मांडलं.

मराठी साहित्यक्षेत्रातील एक मुख्य प्रवाह म्हणजे कविता. पण कवितेचा दर्जा गेल्या काही काळात घसरलेला वाटतो का, या प्रश्नावर, पूर्वीही सामान्य कविता लिहिल्या जायच्या. आजही लिहिल्या जातात. पण सकस साहित्य हे काळाच्या निकषावर पुरून उरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात दरवर्षी होणा-या वादांच्या पाश्वर्भूमीवर त्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी विचारलं असता, लोकशाहीत निवडणुकीला पर्याय नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, अखिल भारतीय साहित्य संमेलन हा साहित्यिकांचा मेळावा नव्हे तर मराठी समाजाचा एक सणच आहे. त्यामुळे त्याची निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, पारदर्शक असावी. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटींच्या घरात असताना, मतदार मात्र अवघे ७०० असे चित्र दिसते. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे. विशेषतः बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिक मराठी संस्कृतीच्या सरहद्दीचे संरक्षण करत आहेत. त्यामुळे येथील मंडळींना संमेलनाच्या निवड प्रक्रियेत योग्य स्थान मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या भागातील मराठी भाषिकांकडे अन्य भाषांचेही ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करता यावी यासाठी चर्चा, परिसंवादांना त्यांना निमंत्रित करावं, तेथील मराठी विभागांना राज्य सरकारनं आर्थिक मदत पुरवावी, असे ते म्हणाले. विशेषतः साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्यिक मंडळी हरण्याच्या भीतीने उतरत नाहीत. त्यांनी ही मनोभूमिका सोडून द्यावी, असे आवाहन कुलकर्णी यांनी या वेळी केले.

मराठीत एकाच वेळी अनेक साहित्य संमेलने भरताना दिसतात. ही संमेलने मराठी भाषेसाठी पूरक आहेत. ती व्हावीतच आणि त्या संमेलनांचं, प्रवाहांचं प्रतिनिधित्व करणा-यांचीही योग्य दखल घेतली जावी, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत सॅन होजे आणि दुबई येथे विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की, या संमेलनांना विश्व साहित्य संमेलन म्हणणं योग्य ठरणार नाही. त्या ऐवजी देशांतर संमेलन म्हणणं योग्य ठरेल. कारण या संमेलनात संमेलन होणारा देश आणि महाराष्ट्रातील काही निवडक मंडळी उपस्थित असतात. त्यामुळे या संमेलनांना दोन-तीनशे साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा, असंच रूप आलेलं दिसतं.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या चोरांचे संमेलन या लेखाचा उल्लेख करून या पुढे कधी गुन्हेगारांचे संमेलन जरी आयोजित करण्यात आले तरी त्याला पाठिंबाच द्यायला हवा. कारण त्यातूनच त्या गुन्हेगारातील माणूस जागा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Thursday, October 7, 2010

भविष्याची गरज

गेल्या काही वर्षामध्ये बाइक्सची वेगवेगळी मॉडेल्स ग्राहकांना आकृष्ट करत आहेत. आजकाल सीएनजी, एलपीजीसारख्या पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर दुचाकी वाहनांसाठी कसा करता येईल, यावर प्रयोग होत आहेत. चार्जिगची सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्यास बॅटरीवर चालणाऱ्या बाइक्सही लोकप्रिय होतील..

धूमचित्रपटाने भारतातील प्रेक्षकांना मोटारसायकलींच्या एका वेगळ्या विश्वाची ओळख करून दिली. दुचाकी म्हणजे केवळ प्रवासाचं साधन इतकीच त्यांची ओळख होती. पण,मोठमोठी वाहनं जाणार नाहीत, अशा ठिकाणी वेगात जाण्याची तिची खुबी पाहून या वाहनाच्या प्रेमात सगळं जग पडलं आहे. गेल्या काही काळात तर बाइक्सच्या वेगवेगळ्या श्रेणी ग्राहकांना आकृष्ट करू लागल्या आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने होत असताना, इथल्या तरुण ग्राहकांच्या हातात मोठय़ा प्रमाणावर पैसा खुळखुळू लागला आहे. त्यांना आकृष्ट करण्यासाठी देशातल्या अनेक दुचाकी बनवणा-या कंपन्यांसह चारचाकी किंवा मोठय़ा वाहनांच्या उत्पादक कंपन्यांनाही दुचाकीची ही वाढती बाजारपेठ खुणावू लागली आहे. या बाजारपेठेच्या वाढीचा वेग इतका आहे की गेल्या वर्षीच्या जागतिक मंदीच्या काळातही- सर्व उत्पादनांचा विक्रीचा आलेख घसरलेला असताना, ही बाजारपेठ मात्र दमदार वाटचाल करत होती.

एकीकडे पेट्रोलसारख्या इंधनाची टंचाई आणखी काही काळात भासणार असल्याचे इशारे दिले जात असताना, काही दुचाकी उत्पादकांनी थेट विजेवर चालणाऱ्या दुचाकी बाजारात आणल्या आहेत. सध्या या वाहनांची क्षमता कमी असली तरी भविष्यात त्यांच्या चार्जिगची सोय सर्वत्र उपलब्ध होऊ लागल्यावरच त्यांचा वापर वाढणार, हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर पर्यावरणस्नेही सीएनजी, एलपीजीसारख्या इंधनांचा वापर दुचाकी वाहनांसाठी कसा करता येईल, याचीही चाचपणी केली जाऊ लागली आहे.

थ्री इडियट्सचित्रपटातील रांचो अर्थात फुनसुक वांगडूने स्कूटरच्या इंजिनाचा वापर करून दैनंदिन गरजेची अनेक उपकरणे चालवली होती. पण हे केवळ सिनेमापुरतेच मर्यादित नाही. ग्रामीण भागातही असे अनेक फुनसुक वांगडू आहेत, ज्यांनी त्यांच्या दुचाकींचा वापर अशा उपकरणांसाठी केला आहे. त्यामुळे या वाहनाला नाक मुरडण्यापेक्षा त्याचे उपयोग, त्याचे फायदे पाहणं ही काळाची गरज आहे. कारण लांबचलचक वाहतूक कोंडीत बडीबडी वाहनं अडकून पडलेली असताना हेच वाहन त्यातून लीलया बाहेर पडतं. पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर केला आणि दुचाकींसाठी वेगळ्या लेन ठेवल्या तर नक्कीच हवामानबदलाच्या संकटावर काही अंशी तरी मात करता येणं शक्य होईल. (पर्यावरणाबरोबरच स्वत:च्या शरीराच्या संवर्धनात साध्या सायकलींना पर्याय नाही, हे मात्र तितकंच खरं आहे.)

गेल्या तीन महिन्यांच्या काळात आपण या दुचाकी वाहनांच्या विविध प्रकारांची, त्यांच्या उपयोगीतेची, त्यांच्यावरून केल्या जाणा-या सफरींची तसंच त्यांच्या सफरींबाबत चर्चा केली. पुरेशी काळजी घेतली, बाइक्सची योग्य देखभाल केली तर सर्वाचंच बाइझिंग आनंददायी ठरेल.

Saturday, October 2, 2010

बाइकसंगे उडा

घरोघरची मातृदैवतं ‘गाडी उडवणं कमी कर जरा’ असा सल्ला देतात, त्यातलं लाक्षणिक अर्थाचं हे ‘उडवणं’ नाही की बाइकला काही पंख लावून उडण्याचीही ही स्पर्धा नाही.. उंच टेकाडावरून बाइकसह हवेत स्वत:ला भिरकावून देण्याची ही स्पर्धा आहे!

मोटरसायकलवरच्या खेळांमध्ये धोकादायक रस्त्यांवर वा-याच्या वेगाने धावण्याच्या स्पर्धासह चिखलातून तोल सावरत मार्ग शोधणे किंवा अगदी गंमत म्हणून रानावनातून भटकण्याच्या स्पर्धाचाही- म्हणजेच ऑफरोडिंगचा समावेश होतो. पण या भागात आपण अगदी हवेत उड्डाण करण्याच्या स्पर्धाची माहिती घेत आहोत. घरोघरची मातृदैवतं गाडी उडवणं कमी कर जराअसा सल्ला देतात, त्यातलं लाक्षणिक अर्थाचं हे उडवणंनाही की बाइकला काही पंख लावून उडण्याचीही ही स्पर्धा नाही.. उंच टेकाडावरून बाइकसह हवेत स्वत:ला भिरकावून देण्याची ही स्पर्धा आहे!

फ्रीस्टाइल मोटोक्रॉस किंवा एफएमएक्स नावानं ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेत एकेक स्पर्धक येऊन आपले बाइकवरचं संतुलन दाखवून समोरच्या पंचांसह जनतेकडून कौल आजमावतो.

बिग एअर आणि फ्री स्टाइल मोटोक्रॉस अशा दोन प्रकारांत ही स्पर्धा होते. त्यातल्या बिग एअर प्रकारात प्रत्येक स्पर्धकाला दोन जंप मारण्याची संधी दिली जाते. सुमारे 18 मीटर (60 फूट) लांबीच्या रॅम्पवरून हे स्पर्धक हवेत झेप घेतात. त्यात त्या स्पर्धकाच्या उडीतील नावीन्य, त्याचे कौशल्य, अवकाशात किती वेळ राहिला याच्या आधारे स्पर्धकाला 100 पैकी गुण दिले जातात.

फ्रीस्टाइल मोटोक्रॉस ही स्पर्धा या प्रकारातील जुनी स्पर्धा. त्यात सुमारे दोन हेक्टरच्या परिसरात तयार केलेल्या ट्रॅकवर 90 सेकंद ते 14 मिनिटांच्या कालावधीत विविध स्पर्धाप्रकार करून दाखवावे लागतात. त्यात विविध लांबीच्या उडय़ा घेण्यासह वेगवेगळ्या कठीण वळणांवरून त्यांना गाडी चालवावी लागते. या स्पर्धेतही पंचांचे एक पॅनेल असते आणि तेही 100 गुणांच्या आधारे स्पर्धकाला त्याचे कौशल्य पाहून गुणदान करतात.
  • बॅकलिफ्ट

या स्पर्धाप्रकारातील सर्वात अवघड भाग मानला जातो. त्यात गाडीच्या मागच्या सीटवर बसून किंवा उभे राहून विविध कौशल्याचे प्रकार केले जातात. तेही गाडी हवेत असताना. मात्र हा खेळ अत्यंत धोकादायक आहे.. त्यात स्पर्धकांच्या जिवावर बेतल्याचेही प्रकार घडले आहेतं.

Thursday, September 23, 2010

है दम?


बाइक चालवण्याचे गट्स कुणाकडे कसे असावेत, हे त्याची ‘परिस्थिती’ ठरवते.. ग्रामीण भारतातल्या रगेल गडय़ांप्रमाणे बाइक हाकणं शहरातल्या बाइकस्वार सेल्समनना शक्य होणार नाही आणि युरोपातल्या निर्धोक रस्त्यांवरून एरवी बाइक चालवणारे सारेच जण ‘ट्रेल रायडिंग’ किंवा ‘एंडय़ूरो’सारख्या खेळांमध्ये, बाइक आणि हातपाय धड ठेवू शकणार नाहीत.. आपल्या नेहमीच्या गट्सपेक्षा वेगळे गट्स या स्पर्धासाठी हवेच..

बाइक्स चालवायला गट्स लागतात, हे आता पुन्हा नव्यानं सांगायला नकोच. पुण्यातल्या बेशिस्त ट्रॅफिकमध्ये मुंबईकरानं किंवा मुंबईतल्या गर्दीतल्या पण शिस्तबद्ध (खरोखर आहे हो!) ट्रॅफिकमध्ये पुणेकरानं व्यवस्थित गाडी चालवून दाखवावी, हादेखील गट्सचाच एक भाग होईल!

हल्ली चांगल्या रस्त्यावर गाडी चालवणं धोकादायक ठरत असताना, अनेक वल्ली सरळधोपट रस्त्यांचा मार्ग सोडून, ‘चुकीच्यामार्गाने गाडी चालवणं पसंत करतात. मोटोक्रॉसशर्यत तर आपल्याला माहीत आहेच, पण त्यापेक्षाही अनेक अचाट प्रकार मोटारसायकलींवर करणारे आहेत. भारतात हे फॅड नसलं तरी युरोपात, अमेरिकेत अशा वेडय़ांपैकी सर्वाधिक वेडा कोण, हे ठरवणाऱ्या स्पर्धाही नियमित आयोजित केल्या जातात.

म्हणजे, केवळ चिखलातून गाडी चालवणं, या चिखलातून आपल्याला पायी चालणं शक्य होणार नाही, असा हा चिखल असतो. त्यातही वेळ पाळायची. गाडी हवेत भिरकावून द्यायची. पण त्या वेळी आपणही गाडीवर असायलाच हवं. म्हणजे सीटवर बसलेलो नसलो तरी चालेल, पण गाडीसोबत चालकानं असणं आवश्यक. कुठल्यातरी एखाद्या शोधमोहिमेवर निघाल्याप्रमाणे गटागटाने ट्रेल राइडकरायच्या. असं आणखी बरंच काही या अचाट स्पर्धा प्रकारांत मोडतं. म्हणजे केवळ प्रवासासाठी वापरली जाणारी दुचाकी आणखी कशाकशासाठी वापरली जाते ते कळून येईल. (गावाकडे गुरांच्या चाऱ्याचे मोठमोठे भारे, जळणाच्या मोळ्या, अख्ख्या महिन्याचा बाजारहाट एकाच मोटारसायकलवरून आणला जातो. त्यातच गाडीवर डबलसीट प्रवास करणं जणू गुन्हाच असं समजून गाडीवर किमान तिघांना नेलं जातं.) असो हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच की, आपल्याकडेही बाइकस्वार कमी कसरती करत नाहीत. मुंबईतल्या खड्डेभरल्या रस्त्यांवरून बाइक चालवणंसुद्धा, त्या चिखलांच्या रस्त्यांवरून गाडी चालवण्याच्या स्पर्धेइतकंच कठीण असतं.

परदेशात मात्र, अशा खड्डय़ांच्या, वाईट रस्त्यांच्या, ट्रॅफिकच्या सोयीसरकारनं करून दिलेल्या नसल्यानं त्यांना नाइलाजानं आपलं कौशल्य अशा स्पर्धामधून दाखवावं लागतं. त्यातला एक प्रकार म्हणजे, ट्रेल रायडिंग. यात गटाने किंवा वैयक्तिकरीत्या सहभागी होता येतं. सुरुवातीला घोडय़ांवरून आपल्याला हव्या त्या लक्ष्यापर्यंत जाण्याचा हा खेळ खेळला जायचा. पण आता घोडय़ांव्यतिरिक्त बाइक्स, सायकली अशा- रानावनातून धावू शकणाऱ्या-वाहनांनी हा खेळ खेळला जातो. या खेळात अनेक अडथळे असतात. ते पार करत पुढे लक्ष्यापर्यंत सरकायचं असतं. यात तुम्ही किती वेगाने गाडी चालवायची, याचं काही बंधन नसतं. रस्त्यात येणारे अडथळे, नदी, नाले ओलांडताना, समोरच्या निसर्गाचा, सोबत्यांचा सहभाग यांचा आनंद घ्यायचा असतो. पण ही स्पर्धा चाकोरीबद्ध मार्गाने होणारी नसल्याने स्पर्धकांना त्यातील धोके आधीच सांगितलेले असतात. स्पर्धेदरम्यान अनेक इव्हेंटही होतात. पण या स्पर्धेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, यासकट अनेक आरोप होत असतात. तर, रानात गेल्यामुळेच आमची पर्यावरणनिष्ठा वाढते, असं उत्तर बाइकवाल्यांकडे तयार असतं!

एंडय़ूरो हादेखील असाच एक साहसी मोटारसायकल स्पर्धेचा प्रकार. हीदेखील नेहमीच्या रस्त्याबाहेरची - ऑफरोडस्पर्धा मानली जाते. मात्र, या स्पर्धेसाठीचे नियम फार कठोर असतात. ही स्पर्धा दोन प्रकारे होते. एकात नेहमीप्रमाणे ठरल्या वेळेत अंतर कापायचं असतं, तर दुसरा प्रकार म्हणजे या अंतरावर ठरवून दिलेल्या टप्प्यांवर ठरलेल्याच मार्गावरून ठरलेल्या वेळेत पोहोचत हे टप्पे पार करायचे असतात. ठरलेल्या वेळेत ठरलेल्या टप्प्यावर स्पर्धक आला नाही तर त्याला दंड होतो. थोडक्यात, हा प्रकार म्हणजे नेहमीची स्पर्धा न मानता वेळ पाळण्याची स्पर्धा म्हणता येईल. या स्पर्धेची सुरुवात गटागटाने होते. त्याला रोम्हणतात. प्रत्येक रोची निघण्याची वेळ ठरलेली असते. त्यानुसार त्याला पुढचं सर्व वेळापत्रक पाळावं लागतं. या स्पर्धकांना मार्गात अनेक अडथळे उभारलेले असतात. काही त्यांना ठाऊक असतात, काहींची त्यांना कल्पना नसते. त्यातही या स्पर्धकांना एक स्पेशल टेस्टद्यावी लागते. त्यात स्पर्धक मोटारसायकलवरून नव्हे तर चालत हा टप्पा पार करतात. या स्पर्धेत स्पर्धकाच्या शारीरिक आणि मानसिक कौशल्याचा कस लागतो.

Marathi Online News

Wednesday, September 22, 2010

स्ट्रेस मॅनेजमेंट!


सक्काळी सक्काळी बोरिवलीहून मुंबईला जाण्यासाठी आनंदात निघालो. पण विसरूनच गेलो, मालाड पार केलं तरी गोरेगाव, अंधेरी आहेच ना! अंधेरीच्या ट्रॅफिक जॅममुळे भर दिवसा डोळ्यांसमोर ‘अंधेरी’ आल्याशिवाय राहत नाही. या वाहतूक कोंडीमुळे होणा-या उद्वेगाला सध्या तरी कोणाकडेच उत्तर नाही. राज्य सरकारनं जनतेला ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चे धडे देण्यासाठी केलेली उपाययोजना असा बोध घेऊन गप्प बसणंच योग्य, असं वाहनचालक म्हणतात

मालाडचा उड्डाणपूल खुला झाला. व्वा! ही बातमीच इतकी भन्नाट आहे की आमच्या काही मित्रांनी हा आनंद चक्कसाजराकेला. एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या नावाने दोन थेंबही उडवले. व्वा, क्या बात है। बोरिवली, कांदिवली,मालाडला राहणाऱ्यांच्या मुखी हेच एक वाक्य होतं. पण, हाय रे कर्मा, हे काय?

सक्काळी सक्काळी बोरिवलीहून मुंबईला जाण्यासाठी आनंदात निघालो. पण विसरूनच गेलो, मालाड पार केलं तरी गोरेगाव,अंधेरी आहेच ना! अंधेरीच्या ट्रॅफिक जॅममुळे भर दिवसा डोळ्यांसमोर अंधेरीआल्याशिवाय राहत नाही. या वाहतूक कोंडीमुळे होणा-या उद्वेगाला सध्या तरी कोणाकडेच उत्तर नाही. राज्य सरकारनं जनतेला स्ट्रेस मॅनेजमेंटचे धडे देण्यासाठी केलेली उपाययोजना असा बोध घेऊन गप्प बसणंच योग्य, असं वाहनचालक म्हणतात.

राज्य सरकारनं मोठय़ा उत्साहात मुंबईतल्या रस्त्यांवर उड्डाणपूल बांधले. ट्रॅफिक वेगानं व्हायला हवी. सर्वसामान्यांना, सॉरी चुकलो, आपल्या मंत्र्यासंत्र्यांना भुर्रकन आपल्या ताफ्यासह निघून जाता यावं, हा त्यामागचा उदात्त हेतू होता. उड्डाणपूल बांधताना आजूबाजूच्या लोकांचं दूरवर विस्थापन केलं. मस्त झोकात झालं हे काम. सुरुवातीला गाडय़ा वेगात जायच्या. उड्डाणपुलावरून वेगात जाताना खाली ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाडय़ांना वाकुल्या दाखवताना मजा वाटायची. पण काय माहीत पुढे हेच ट्रॅफिक आपल्याही गळ्याशी येणार आहे.

००

गेल्या काही काळात विशेषत: पश्चिम द्रुतगती महामार्गावरचे हे उड्डाणपूल तोकडे पडत असल्याचं दिसून येतंय. मुंबईकडे येताना, गोरेगावचा आरे रोडवरच्या उड्डाणपुलाजवळ नेहमीच गाडय़ांची रांग असते. आरे कॉलनीत किंवा गोरेगाव स्थानकाकडे जाणाऱ्या गाडय़ांची रांग मागे दिंडोशीच्या उड्डाणपुलापर्यंत आलेली असते. संध्याकाळच्या वेळी उलटय़ा दिशेला तर ही वाहतूक अगदी जोगेश्वरी ओलांडून अंधेरीकडे गेलेली असते. हा दोन किलोमीटरचा प्रवास तुमचा अर्धा-पाऊण तास घेऊन संपतो. (या वाहतूक कोंडीचं प्रहारने वृत्तही दिलं आहे. वाहतूक पोलिसांनी ही आमच्या आवाक्याबाहेरची वाहतूक कोंडी असल्याचं सांगून हात वर केले आहेत.) असो!

मुंबईकडे जाताना ही वाहतूक कोंडी सध्या तरी काही प्रमाणात सुसह्य आहे. पण वाट लागते ती अंधेरीकडे जाताना. इस्माइल युसुफ कॉलेज ओलांडलं की, छातीत धडधड व्हायला सुरुवात होते. समोर हळूहळू धावणा-या गाडय़ा दिसू लागतात. आपल्याही गाडीचा वेग नकळत कमी झालेला असतो. आपण कधी या वाहतूक कोंडीत पोहोचलो ते कळतही नाही इतक्यावेगातआपण पुढे सरकलेलो असतो.

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेच्या कामामुळे अंधेरीच्या उड्डाणपुलाखाली प्रचंड कोंडी असते. ही कोंडी जोगेश्वरीपर्यंत पोहोचलेली असते. त्यातच मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा लोंढा या कोंडीला येऊन मिळतो. पण या कोंडीतल्या वाहनांनी अगदी दुसरी लेनही व्यापलेली असल्यानं, मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा त्यात अडकून पडतात. त्यात काँट्रॅक्टर कृपेनं या उड्डाणपुलाच्या दोन्ही दिशांना प्रचंड खड्डे पडले असून त्यात वाहतुकीचा वेग आणखी मंदावतो. गंमत म्हणजे दर दोन दिवसांनी हे खड्डे बुजवण्याचं काम इमानेइतबारे चाललेलं असतं. (काँट्रॅक्टरची आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कार्यतत्परता पाहा!) पण त्यांची तरी काय चूक? वाहनंच एवढी आहेत की हे खड्डे पुन्हा होतात. प्रचंड आकाराची खडी, डांबर, पेव्हर ब्लॉक, चिखल,माती, सिमेंट अशा सर्व साधनांचा वापर केल्यानं या खड्डय़ांना एक प्रेक्षणीय रूप आलं आहे. नव्याको-या कारचं सस्पेन्शन खराब झालं नाही तर हवं ते हरायला आपण तयार आहोत. बाइकस्वारांचं तर काही बोलायलाच नको. सर्कसमध्ये करतात त्यापेक्षा धोकादायक कसरती अंधेरीचा पूल दोन्ही ठिकाणी उतरताना त्यांना कराव्या लागतात. गावाकडचे कच्चे रस्तेही इतके सुंदर खड्डेमय नसतात. त्यामुळे एमएमआरडीए, काँट्रॅक्टर या सर्वाचंच कौतुक करावं तेवढं कमी आहे.

००

त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तुमचा तास मोडत असला तरी अजिबात उद्वेग होऊ देऊ नका. ही तुमच्या सहनशीलतेची परिसीमा पाहण्यासाठी राज्य सरकारने केलेली सोय आहे. येणारा काळ आणखी खडतर असेल, त्याची तयारी आतापासूनच व्हावी, हाच सरकारचा या मागचा उद्देश आहे, हा बोध तुम्ही घ्यावा.

Sunday, September 19, 2010

थ्री कप्स ऑफ टी

पाकिस्तानातील सर्वात उंच आणि जगातील दुस-या क्रमांकाचं शिखर के टू सर करण्यात ग्रेग मॉर्टेनसन आणि पत्रकार डेव्हिड रेलिन अपयशी ठरले. मात्र बंदुकीऐवजी लेखणीच्या माध्यमातून शांतता कशी प्रस्थापित करता येऊ शकते, याचा धडा त्यांनी घालून दिला. ही मोहीम अयशस्वी ठरल्यानंतर मॉर्टेनसन पाकिस्तानच्या डोंगराळ भागात उतरला. तिथल्या एका गावातील जनतेने त्याची देखभाल केली. त्याच वेळी त्याला त्या गावात एकही शाळा नसल्याचं भीषण वास्तव जाणवलं. हे वास्तव बदलण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली आणि त्यासाठी त्याने कसून प्रयत्न केले. युद्धाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पाकिस्तानच्या वायव्येकडील आणि अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात मॉर्टेनसनने तब्बल ५५ शाळा उभारल्या.

आयबीएमच्या टाइपरायटवरच्या की-बोर्डवरील कळा इतक्या जवळ जवळ होत्या की, आपण काय टाइप करतोय, हेही ग्रेग मॉर्टेनसनला कळत नव्हतं. प्रिय विंफ्रे, मला तुमच्या कार्यक्रमाचं कौतुक वाटतं. जनतेची काळजी घेणा-यांपैकी तुम्ही एक आहात, याबाबत मला विश्वास वाटतो. पाकिस्तानात हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कोरफे या लहानशा खेडय़ात मला शाळा सुरू करायची आहे. या भागातील मुलांसाठी एकही शाळा नाही, हे वास्तव आहे.

यापुढे काय लिहायचं, हे त्याला सुचत नव्हतं. पैशांची मागणी कशी करायची, हा त्याच्यासमोरचा प्रश्न होता. तरीही त्याने सुरुवात केलीच. जगातील दुस-या क्रमांकाचं के टू शिखर सर करताना काही पाकिस्तानी रहिवाशांची भेट झाली. त्यांनी मला या शाळेसाठी १२ हजार डॉलर्स खर्च येईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे यात तुमचाही काही सहभाग असेल तर तो माझ्यासाठी आशीर्वादच ठरेल, असं त्याने पत्रात नमूद केलं.मात्र नंतर पत्रातील स्पेलिंगची चूक लक्षात आली आणि त्याने ते पत्र तिथेच फाडून टाकलं.

त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या एका वैद्यकीय केंद्रात रात्रपाळीवर असताना त्याने हे पत्र पुन्हा लिहिलं आणि सहा जणांना पाठवण्यासाठी तयार केलं. यात ख्यातनाम टीव्ही सूत्रसंचालक ओप्राह विंफ्रे, सीएनएन वाहिनीचे निवेदक आणि अभिनेत्री सुसान सॅरेंडन वगैरेंचा समावेश होता. या सहा जणांना त्याने घरी परतताना हे पत्र पाठवलं. मात्र आपलं लक्ष्य पाच हजार जणांना पत्र पाठवण्याचं आहे, याची त्याला आठवण झाली आणि तो अस्वस्थ झाला.

शाळा उभारायची, त्यासाठी निधी गोळा करायचा, त्याची सुरुवात स्वत:पासून करायची म्हणून त्याने आपल्या भाडय़ाच्या घराचाही त्याग करून स्वत:च्या ब्यूक कारमध्येच संसार थाटायचा निर्णय घेतला. रात्री दमूनभागून आल्यानंतर गाडी निर्जन जागी उभी करून त्यातच मागील सीटवर झोप काढायची व त्याच वेळी पुढील योजना ठरवायची, असा दिनक्रम बनला.

या काळात मॉर्टेनसनने शेकडो पत्रं लिहून काढली. प्रत्येक अमेरिकन सिनेटरला त्याने हे पत्र लिहिलं. आतापर्यंत कधीही न वाचलेली पॉप संस्कृतीची नियतकालिकं वाचून त्यातील नावं शोधण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने अमेरिकेतील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावं शोधून काढली. मी काय करतोय हे मलाच कळत नाही,’ अशी त्याची प्रतिक्रिया होती. मॉर्टेनसन म्हणतो, ‘या काळात अमेरिकेतील जवळपास सर्वच बडय़ा मंडळींची यादी तयार केली होती. या प्रत्येकाला पत्र पाठवलं. त्या वेळी मी ३६ वर्षाचा होतो आणि मला संगणकाचं काहीही ज्ञान नव्हतं.

एका दिवशी त्याला त्याच्या नेहमीच्या कृष्णा कॉपी केंद्राचं दार बंद दिसलं आणि पत्र टाइप करण्यासाठी मोठा प्रश्नच त्याच्यासमोर उभा राहिला. नजीकच्या लेझर कॉपी केंद्रावर तो गेला. त्याचा मालक किश्वर सईद याने त्याला संगणक विकत घेण्याचा सल्ला दिला. संगणक कशासाठी हवा, ते कळल्यानंतर मात्र मूळच्या पाकिस्तानी असलेल्या सईदने मॉर्टेनसनला संगणकाचे धडे दिले. सईद म्हणतो, ‘ग्रेग करत असलेलं काम मोठं होतं. माझ्या गावातही शाळा नव्हती.

लवकरच मॉर्टेनसनने संगणकाचं जुजबी ज्ञान मिळवलं आणि त्याचं काम पहिल्यापेक्षा किती तरी प्रचंड वेगात होऊ लागलं. सईदनेही त्याला आणखी काही सेलिब्रिटींची यादी दिली. या सर्वाना मेल पाठवण्यास त्याने सुरुवात केली. पाकिस्तानातील मुलांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणा-या मला एका पाकिस्तानी व्यक्तीने संगणक साक्षर केलं, असं हृदगत मॉर्टेनसनने नंतर व्यक्त केलं. ही पत्रं पाठवल्यानंतर त्याने १६ बडय़ा व्यक्तींकडे पाकिस्तानातील कोरफे गावात शाळा उभारण्यासाठी मदतीसाठी याचना करणारे अर्ज पाठवले.

या कामात त्याला त्याच्या आईने जेरेन मॉर्टेनसन यांनीही मदत केली. पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर त्यांना एका शाळेत मुख्याध्यापकाची नोकरी मिळाली होती. तेथे त्यांनी ग्रेगने तयार केलेल्या पाकिस्तानातील गावांच्या स्लाईड्स दाखवल्या. आपल्यासारखी मुलं तिथे शाळेत जात नाहीत. गोठवणा-या थंडीत उघडय़ावरच शिक्षकांशिवायच शिकतात, हे पाहून त्यांच्या शाळेतील चिमुरडय़ांना आश्चर्य वाटलं.

या मुलांनीच नंतर पेन्स फॉर पाकिस्तानही मोहीम सुरू केल्याचं जेरेन यांनी मुलाला ग्रेगला सांगितलं. या मुलांनी तब्बल ६२३४५ पेन्स जमा केली. त्याचा ६२४ डॉलर्सचा धनादेश त्यांनी जेरेनला पाठवला आणि त्यांना ग्रेगच्या मोहिमेसाठी हा जणू शुभ संकेतच वाटला.

त्यानंतर त्याने पाठवलेल्या ५८० पत्रांपैकी एका पत्राला टॉम ब्रोकॉ यांनी उत्तर पाठवलं. फुटबॉलपटू म्हणून ग्रेग आणि ते दोघं विद्यापीठात एकत्र खेळले होते. त्यांनी १०० डॉलर्सची मदत ग्रेगला पाठवून सुयश चिंतलं. त्याच वेळी ग्रेगने आर्थिक मदतीसाठी पाठवलेले १६ अर्ज फेटाळल्याचंही ऐकावं लागलं.

त्यानंतरही मॉर्टेनसनचे प्रयत्न सुरूच होते. एके दिवशी कामावर असताना त्याचा सहकारी टॉम वॉन याने एक कागदाचा चिटोरा त्याच्याकडे दिला. त्याच्यावर नाव लिहिलेल्या माणसाने ग्रेगच्या प्रयत्नांबद्दल वाचलं होतं व त्याबाबत वॉनकडे विचारणा केली होती. तो भौतिकशास्त्रज्ञ होता, तसंच तो गिर्यारोहकही होता. डॉ. जेन होर्नी हे त्याचं नाव. या व्यक्तीबद्दल लायब्ररीत बसल्या बसल्या मिळालेली माहिती वाचून ग्रेगलाही आश्चर्य वाटलं. एव्हरेस्टसह अनेक शिखरांवर चढाया केलेल्या या मनस्वी माणसाने अनेक नोक-या सोडल्या होत्या. मात्र त्याच्या बुद्धिमत्तेची कदर म्हणून अनेक कंपन्यांमध्ये तो उच्चपदावर होता. एके दिवशी त्यानेच ग्रेगला स्वत: दूरध्वनी करून त्याच्या या मोहिमेची माहिती जाणून घेतली. त्याबद्दल खातरजमा केली आणि थेट मदतच पाठवून दिली. मात्र हा धनादेश स्वीकारण्यासाठीही ग्रेगकडे स्वत:चा अधिकृत पत्ता नव्हता. हा धनादेश त्याने कसा तरी मिळवला. त्याने आपली लाडकी ब्यूक कार ५०० डॉलरला विकून ग्रेग आपल्या जीवनाच्या एका नव्या टप्प्याचा प्रवास करण्यासाठी विमानतळावर पोहोचला.

आपल्या उद्दिष्टस्थळी जाऊन त्याने गावक-यांशी बोलायला सुरुवात केली. शाळेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य आणलं आहे. माझं वचन मी पूर्ण करणारच. लवकरच कामाला आपण सुरुवात करू.त्याने हा विश्वास व्यक्त केला. पण गावक-यांनी सांगितलं, ‘कोरफेगावात शाळा बांधण्याआधी तिथल्या नदीवर पूल बांधणं गरजेचं आहे. हे ऐकलं आणि त्याच्या डोक्यात पुन्हा विचारचक्र सुरू झालं..

काश्मिरी लेखन'कळा'

‘काश्मीर-द मिस्टरी’ नावाचे एक पुस्तक मात्र काश्मीरमधील सध्याची समस्या, बंडखोरी, तणाव या सर्वापासून फटकून काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करते. काश्मीरची समृद्ध परंपरा, जीवनपद्धती यांचा लेखाजोखा मांडणारे हे सचित्र पुस्तक एखाद्या दस्तऐवजाइतकाच मोलाचा ठेवा आहे.

जगातील सर्वात अस्वस्थ प्रदेशांच्या यादीत गेल्या दोन दशकांपासून काश्मीरचा समावेश झाला आहे. काश्मीरसंबंधीचं वृत्त नाही, असा एखादाही दिवस या काळात भारतीय, तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचा गेला नसेल. धरतीवरचं नंदनवन अशी ख्याती असलेल्या या भागातील नागरिक अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर तेथे शांतता नांदू लागल्याचे दावे केले जात असले तरी कुठून दहशतवादी हल्ला होईल,कधी पाकिस्तान चढाई करेल, दहशतवादी लपल्याच्या संशयावरून भारतीय सैन्य कधी घराची झडती घेईल, याचा नेम नाही. इतकी बिकट परिस्थिती असतानाही तेथील निसर्गसौंदर्याची भुरळ पडलेले जगभरातील पर्यटक जम्मू-काश्मीरला भेट द्यायला येतच असतात. मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध धर्माची पाळेमुळे रुजलेल्या या प्रांताची अभ्यासकांनाही कायम ओढ लागलेली दिसून येईल. त्यामुळेच की काय, काश्मीरमधील परिस्थितीचे वर्णन चित्रपटांमधून येते, तसेच ते कथा-कादंब-यांतूनही कायम येत असते.

मनोज जोशी यांचे लॉस्ट रिबेलियन हे पुस्तकही काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीचे चपखल वर्णन करणारे पुस्तक आहे. फुटिरतावादाची चळवळ सुरू झाल्यानंतर १९८९ सालापासून आतापर्यंत तेथे सुमारे २० हजार बळी गेले आहेत. या पुस्तकात जोशी यांनी काश्मीरमधील बंडखोरांचा तपशीलात जाऊन अभ्यास केलेला दिसतो. भारतातील स्थैर्य कायम राहू नये, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या पाकिस्तानच्या पाठिंब्यावर या चळवळीने कसे हिंसक वळण घेतले. सुरुवातीचीआझादीची चळवळ नंतर जिहादी कशी झाली, याचे त्यांनी या पुस्तकात वर्णन केले आहे. या संपूर्ण प्रकरणातील अमेरिकेची स्वार्थी भूमिका उघड करतानाच, दाबून टाकलेल्या अनेक प्रकरणांचाही पर्दाफाश केला आहे.

ही बंडखोरी निपटून काढण्यासाठी सरकारी पातळीवरून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा कसा उलटा परिणाम होतो आहे, हे सांगून त्यांनी काश्मीरमधील जनतेच्या दु:खाला एक प्रकारे वाचा फोडली आहे.

काश्मीर-द मिस्टरी नावाचे एक पुस्तक मात्र काश्मीरमधील सध्याची समस्या, बंडखोरी, तणाव या सर्वापासून फटकून काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करते. काश्मीरची समृद्ध परंपरा, जीवनपद्धती यांचा लेखाजोखा मांडणारे हे सचित्र पुस्तक एखाद्या दस्तऐवजाइतकाच मोलाचा ठेवा आहे. बुद्धिवंतांचा प्रदेश म्हणून ख्यात असलेल्या या भागाचे अलौकिक निसर्गसौंदर्य,तेथील थंडी, निळी हिमशिखरे, आकाशाला गवसणी घालणारी वृक्षराजी, पुष्पाच्छादित पर्वतशिखरे, लाकडी घरे.. यांची छायाचित्रे मनाला भावतात. मॅट ब्रँडन (छायाचित्रे) आणि मरियम रेशी यांचे हे पुस्तक संग्राह्य असेच आहे.

ख्यातनाम पत्रकार डेव्हिड देवदास यांच्या लेखणीतून उतरलेले इन सर्च ऑफ फ्यूचर हे पुस्तकदेखील काश्मीरमधील सध्याच्या समस्येवर काहीअंशी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते.

या पुस्तकात दोन सर्वसामान्य काश्मिरींच्या जीवनातील घडलेले बदल अधोरेखित करत काश्मीरमधील नंतरच्या काळात घडलेल्या घडामोडींची सांगड घातली आहे. १९३१ ते २००७ या काळात काश्मीरमध्ये घडलेले सामाजिक, राजकीय बदल टिपताना तेथील अंतर्गत कलह, विस्थापन, बंडखोरी या सर्वाचाच धांडोळा घेण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील काश्मीरशी संबंधित नेते, कार्यकर्ते, विचारवंत यांच्या मुलाखतींचाही आधार घेऊन वास्तव परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे.

अंतराळ-ज्ञानाच्या खजिन्याची लूट!

जॉर्ज, अ‍ॅनी आणि इमेट या चिमुरड्यांनी थेट मंगळ, टायटन ग्रहावर स्वारी करून अवकाशातील खजिना लुटला.. त्याची गोष्ट रंगून सांगताना शाळकरी मुलांपासून त्यांच्या आजी-आजोबांपर्यंत सा-यांना अंतराळाची ‘खरीखुरी’ माहिती स्टीफन हॉकिंग आणि ल्युसी हॉकिंग यांनी दिली आहे.

मंगळावरील वातावरण कसे आहे..शनीचा सर्वात मोठा उपग्रह टायटनवर मानव वस्ती करू शकतो का..आपल्या सौरमालेशिवाय इतर सौरमालांमध्ये जीवन असू शकते का.. या प्रश्नांचा शोध शतकानुशतके मानव घेत आला आहे. त्यासाठी गेल्या काही दशकांत तर विविध अवकाश मोहिमाही राबवल्या आहेत. मात्र, या अवकाश मोहिमांच्या बातम्या आणि त्याबाबतच्या जुजबी माहितीशिवाय सर्वसामान्यांना अंतराळाची फारशी माहिती नाही. मात्र, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि त्यांची कन्या ल्युसी हॉकिंग यांनी त्यांच्या जॉर्जस कॉस्मिक ट्रेजर हंटया पुस्तकातून आपल्याला ज्ञात-अज्ञात अंतराळाची अत्यंत साध्या-सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे. जगभरातील सध्याच्या बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक आहे.

मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेला रोबोटचा पृथ्वीशी अचानक संपर्क तुटतो. त्याच्याकडून असंबद्ध असे संदेश येऊ लागतात. त्याचवेळी अमेरिकेतील अंतराळ संशोधन केंद्रात काम करणा-या एरिक या शास्त्रज्ञाच्या सुपर कॉम्प्युटरवर येणारे परग्रहावरील मानवाचे संदेश.. त्यातच पृथ्वीचा विनाश करणारी धमकीही.. या सर्व गोष्टींचा छडा लागवण्यसाठी या शास्त्रज्ञाची मुलगी अ‍ॅनी, तिचा मित्र जॉर्ज आणि इमेट थेट अंतराळात जाण्याची मोहीम आखतात..पुढे काय होते, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे.

अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइमयासारखे प्रचंड गाजलेले पुस्तक लिहिलेल्या स्टीफन हॉकिंग यांनी जॉर्जस कॉस्मिक ट्रेझर हंटहे खास मुलांसाठी लिहिलेले पुस्तक आहे. मात्र, कोणत्याही वयोगटाला हे पुस्तक नक्कीच आवडेल. अत्यंत सोप्या भाषेत दिलेली अंतराळाची माहिती वाचता वाचता जॉर्ज आणि अ‍ॅनीसोबत आपणही कधी मंगळावर, तेथून टायटनवर जातो, हेच कळत नाही.

पुस्तक काल्पनिक आहे. मात्र, त्यातील सर्व संदर्भ वैज्ञानिकच आहेत. उदाहरणार्थ मंगळावरील वादळे, तेथील जमीन, मंगळ ग्रह पृथ्वीवरून आपल्याला लाल का दिसतो, हे सर्व खुद्द जॉर्ज आणि अ‍ॅनी अनुभवतात.

अज्ञात स्थळी लपवलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी खेळला जाणारा ट्रेझर हंट’- खजिन्याची लूट हा युरोपातील आवडता खेळ. या खेळाचे वैशिष्टय़ म्हणजे हा खजिना शोधण्यासाठी तुम्हाला काही क्ल्यूदिलेले असतात. एखादा संदर्भ सापडला की त्याच्या आधारे दुसरा संदर्भ शोधायचा.. मग तिसरा.. आणि मग शेवटी खजिना सापडतो, असे या खेळाचे स्वरूप. अ‍ॅनीच्या वडिलांच्या कॉसमॉसया सुपरकॉम्प्युटरवर अशाच प्रकारचे काही सांकेतिक संदेश येतात. हा संकेतांची उकल करताना अनेक धक्कादायक गोष्टी अ‍ॅनी आणि जॉर्जच्या ध्यानात येऊ लागतात. कोट्यावधींचा खर्च करून मंगळावर पाठवलेला रोबोहोमोरनादुरुस्त झाल्याने तिच्या वडिलांच्या भवितव्यावरच परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाले असताना हे दोघे आणि त्यांचा मित्र इमेट याच्यासह कॉसमॉसच्या मदतीने थेट मंगळावर जाण्याचे निश्चित करतात.

मात्र, मंगळावर जाणे हे कुठेही फिरायला जाण्याइतके सोपे नसल्याचे ध्यानात आल्याने फ्लोरिडातील अंतराळयान प्रक्षेपण केंद्रातून अंतराळयानाचे प्रक्षेपण होत असतानाची वेळ निवडतात. या दोघांचा ब्रिलियंटआणि अ‍ॅनीच्या दृष्टीने बावळट मित्र इमेटला घेतल्याशिवाय ही कादंबरी पूर्ण होणारच नाही. कारण हे दोघे प्रत्यक्ष अंतराळात असताना हा पठ्ठा त्यांच्या मोहिमेचे पृथ्वीवरून सूत्रसंचालन करतो!या कादंबरीत सर्व काही आहे. बालकांमधील राग, लोभ, द्वेष या सर्व भावना यातही आहेत. पण त्याचवेळी एकमेकांबद्दल असणारा जिव्हाळाही त्यात आहे. जॉर्ज आणि अ‍ॅनी पृथ्वीपासून ४१ दशलक्ष प्रकाशवर्ष दूर जातात, आणि त्याचवेळी कॉसमॉसहट्टीपणाने काम करायला नकार देतो. त्यावेळी झालेली इमेटची अवस्था, पृथ्वीपेक्षा अधिक गुरुत्वाकर्षण असलेल्या ग्रहावर स्वत:चेच वजन पेलवताना अ‍ॅनीची बिकट अवस्था झाल्यानंतर तिला सांभाळणारा जॉर्ज, त्याच ग्रहावर नंतर अ‍ॅनीचे वडील एरिक यांची झालेली एंट्री’, पृथ्वीवर इमेट भांबावलेला असताना जॉर्जला शोधत आलेल्या त्याच्या आजीने इमेटला आपल्या मित्रांना कोणालाही न सांगता अंतराळात पाठवल्याबद्दल न रागावता, त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करून, ‘कॉसमॉसनक्कीच दुरुस्त करशील,असा दिलेला दिलासा, एरिकचा शत्रू डॉक्टर रिपरचे उपद्व्याप हे सर्व मनाला भिडते. स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाने अगदी लहान मुलांच्या भावविश्वात शिरून हे पुस्तक लिहिले आहे. मात्र, या कादंबरीतील रहस्य समजून घेण्यासाठी ती वाचणेच गरजेचे आहे. * जॉर्जस् कॉस्मिक ट्रेझर हंट डॉ. स्टीफन आणि ल्यूसी हॉकिंगप्रकाशक- रँडम हाउस चिल्ड्रन्स बुक्सपाने- ३०० + १६ रंगीत चित्रांची पानेकिंमत- स्ट्रॅण्ड बुक स्टॉलमध्ये ३०० रुपयांत.

उत्तरांचा पाया ठिसूळच

दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना ठार करण्यासाठी आयबी आणि ब्राह्मणत्त्वाचा पुरस्कार करणा-या (सनातनी) संघटनांनी ही घटना घडवल्याचा दावा मुश्रीफ करतात. पण त्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यांचे हे पुस्तक उभे आहे ते घटनेच्या काळात विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारावर.

दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना ठार करण्यासाठी आयबी आणि ब्राह्मणत्त्वाचा पुरस्कार करणा-या (सनातनी) संघटनांनी ही घटना घडवल्याचा दावा मुश्रीफ करतात. पण त्यासाठी त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नाहीत. त्यांचे हे पुस्तक उभे आहे ते घटनेच्या काळात विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये आलेल्या बातम्यांच्या आधारावर. त्यामुळे हा पायाच ठिसूळ होतो. अशा प्रकारच्या हल्ल्याचे वार्ताकन करण्याची ही पहिलीच वेळ असल्याने उत्साहाच्या भरात अनेकांनी चुकीच्या, दिशाभूल करणा-या बातम्या दिल्या होत्या. त्या नंतर खोट्या ठरल्या. त्यामुळे त्यांची विश्वसनीयता कितपत मानावी, हा प्रश्न उरतोच. गिरगाव चौपाटीजवळची चकमक बनावट होती असे मानले तर त्यात तुकाराम ओंबळेंना जीव कसा गमवावा लागला, हा प्रश्नही आहेच.

राज्याचे पोलिस महानिरीक्षकपद भूषवलेल्या अधिका-याने अशा प्रकारे केवळ बातम्यांवर आधारित स्वत:चे निष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे, हा प्रश्न उरतोच.

करकरे यांच्यासह अशोक कामटे, विजय साळसकर हे अधिकारीही २६/११ च्या हल्ल्यात शहीद झाले होते. पण त्यांना तिथे बोलावलेच कोणी, हा प्रश्न अनुत्तरितच आहे. कामटे यांच्या पत्नी विनिता कामटे यांनी त्यांच्या पुस्तकातूनही हाच प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे व्हू किल्ड करकरे हे पुस्तक बातम्यांवर आधारित असल्याने विश्वसनीयतेसमोर प्रश्नचिन्ह लागत असले तरी करकरे त्या वेळी तेथे कसे गेले, हा प्रश्न उपस्थित होतोच. करकरे शहीद झाले त्याच दिवशी अनेक वृत्तपत्रांतून त्यांच्याबाबत आलेली वृत्ते आणि करकरेंचे वीरमरण यांची संगती लावण्याचा प्रयत्नही झाला होता. करकरे ज्या प्रकरणाचा तपास करत होते, त्या प्रकरणाच्या किती बातम्या नंतरच्या काळात वाचल्या हे आठवून पाहिले तरी काहीतरीघडले असावे, असा संशय उपस्थित होतोच.

हू किल्ड करकरे

लेखक- एस. एम. मुश्रीफ (माजी पोलिस महानिरीक्षक, महाराष्ट्र)

प्रकाशक- फारोस मीडिया अँड पब्लिशिंग प्रा. लि. नवी दिल्ली

पाने- ३१९, किंमत - ३०० रु. (बुकस्ट्रीटवर २०० रु.)

मुंबईवर २६ नोव्हेंबर २००९ रोजी झालेल्या हल्ल्याला एक वर्ष उलटत असताना या हल्ल्याबद्दलची जी पुस्तके चर्चेत आली,त्यापैकी एक हू किल्ड करकरे. या पुस्तकातील मते आणि तथाकथित निष्कर्ष पटणारे नाहीत, असाच सूर अनेकांनी लावला आहे. एवढे काय आहे या पुस्तकात, की त्यावर बंदी आणण्याच्या मागणीपर्यंत काहीजणांची मजल जावी? हे पुस्तक टाकाऊ ठरवायचे की त्याचे महत्त्व अनाठायी वाढवायचे, हे ठरवण्याचा हक्क प्रहार बुकमार्कचे वाचक म्हणून तुम्हालाही आहेच..

अनुत्तरित प्रश्नांची उकल करण्याचा अपयशी प्रयत्न

१९ नोव्हेंबर २००९ रोजी आयबीला (गुप्तचर विभाग) मिळालेली माहिती ते गिरगाव चौपाटीवर २६ नोव्हेंबरच्या रात्री झालेल्या चकमकीच्या काळातील घटना तर्कसुसंगत पद्धतीने मांडल्या तर पुढीलप्रमाणे घटनाक्रम उलगडत जातो.

१ - मुंबईच्या किना-यावर रबरी बोटींतून १० नव्हे तर आठ पाकिस्तानी दहशतवादी आले होते.

२ - आठपैकी सहा जण बधवार पार्कजवळच्या भाई चिंदरकर मच्छिमार कॉलनीजवळ उतरले तर उरलेले दोघे तिच बोट घेऊन ओबेरॉयच्या दिशेने गेले.

३ - बधवार पार्कजवळ उतरलेल्या सहा जणांनी हॉटेल ताजमहल, कॅफे लिओपोल्ड आणि नरिमन हाऊसमध्ये हिंसाचार घडवला तर उरलेल्या दोघांनी हॉटेल ट्रायडंट आणि ओबेरॉयमध्ये रक्तपात घडवला.

४ - सीएसटी, कामा रुग्णालय आणि रंगभवनची गल्ली येथे रक्तपात घडवणारे दहशतवादी पाकिस्तानातून आलेले नव्हते तर इथलेच स्थानिक होते.

- सीएसटी, कामा रुग्णालय आणि रंगभवनच्या गल्लीत झालेला हिंसाचार हा देशभरात दहशतवादी कारवायांचा कट रचणाऱ्या ब्राह्मणी विचारसरणीने आणि आयबीमधील त्यांच्या हिंतचिंतकांनी योजनाबद्ध रीतीने घडवून आणला. या मंडळींची कट उघड करणा-या करकरेंचा खातमा करणे, हा या मंडळींचा मुख्य उद्देश होता.

पुढे उल्लेख केलेल्या घटनांवरून हा उद्देश स्पष्ट होईल.

१ - हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एटीएसने (दहशतवादविरोधी पथक) हिंदुत्वावाद्यांचा (ब्राह्मणी) दहशतवाद उघडा पाडला होता व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेसह अनेक बाह्मणी संघटनांच्या आघाडीच्या ब्राह्मणी नेत्यांना अटक करण्यापासून अगदी काही अंतरावर ते होते. त्यामुळे ब्राह्मणवर्गात आणि या घटकांना पाठिशी घालणा-या आयबीमध्ये मोठे काळजीचे वातावरण होते. या म्होरक्यांना वाचवण्यासाठी आयबीतील ब्राह्मणवादी मंडळी विविध गोपनीय ऑपरेशनच्यापर्यायांचा विचार करत होते. त्यातच काही दहशतवादी भारतात प्रवेश करणार असल्याची गोपनीय माहिती अमेरिका आणि रॉकडून मिळाल्यानंतर त्यांना ही आयतीच संधी चालून आली.

२ - या गोपनीय माहितीबाबत मुंबई पोलिस किंवा नौदलाच्या पश्चिम विभागाला जागरूक करण्याऐवजी त्यांनी महाराष्ट्रातील आपल्या म्होरक्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. कोणत्याही कारवाईबाबत आम्ही इशारा केला की दहशतवाद्यांच्या कारवाईच्या वेळी पूर्ण सज्जतेने आपली कारवाई पार पाडा, असे आयबीतील ब्राह्मणी अधिकाऱ्यांनी बजावले.

३ - महाराष्ट्रातील ब्राह्मणी मंडळींनी सहा ते आठ तरुणांची आधीच निवड करून त्यांना नागपूर आणि पुणे येथील तळांवर प्रशिक्षण दिले होते.

इ या युवकांचे प्रत्येकी दोन अशा गटांमध्ये विभाजन करण्यात आले होते. त्यांना काही कडव्या ब्राह्मणी नेत्यांनी आणि आयबीतील सेवेत असलेल्या तसेच काही निवृत्त अधिका-यांनी प्रत्येक गटाची भूमिका ठरवून दिली होती. त्याचबरोबर त्यांना कशा प्रकारे काम करायचे आहे हे प्रत्यक्ष नकाशावरही समजावून सांगितले होते.

५ - दहशतवादी भारतात येण्याची शक्यता वर्तवल्याच्या काही दिवस आधीपासून या युवकांना सज्ज राहण्यास सांगितले होते.

६ - मुंबईच्या किना-यांवर दहशतवादी उतरताच या युवकांनाही तात्काळ आपली कामगिरी करण्यास बजावले होते. त्यासाठी त्यांनी इशारा होताच सीएसटी स्थानक, कामा रुग्णालय आणि एसबी कार्यालय या आधीच निश्चित केलेल्या ठिकाणांजवळ हल्ला चढवावा, असे सांगण्यात आले होते.

७ - ताज, ओबेरॉय, नरिमन हाऊस या ठिकाणांजवळ पाकिस्तानी दहशतवादी पोहोचल्याचे निश्चित होताच, या युवकांना त्यांची मोहीम फत्ते पाडण्यासाठी दुसरा इशारा केला जाणार होता.

८ - त्यासाठी या मंडळींना विशेष मोबाइल फोन देण्यात आले होते. या मोबाइल फोनमधील सिम कार्ड ही प्रामुख्याने सातारा जिल्ह्यातून मिळवली होती. या मोबाइल फोनशिवाय अन्य फोन किंवा सिम कार्ड वापरण्याची त्यांना परवानगी नव्हती.

९ - सुरुवातीला सीएसटीत गोळीबार सुरू झाला व त्यानंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कामा रुग्णालयात गोळीबार सुरू झाला. सीएसटीची कामगिरी पार पाडून तेथील टोळी टाइम्स ऑफ इंडियाच्या शेजारच्या गल्लीतून पुढे सरकण्यास सांगितले होते. तिच्यावर अन्य टोळ्यांसाठी बॅकअपची जबाबदारी होती.

१० - हेमंत करकरे हल्ल्याच्या कोणत्याही ठिकाणी पोहोचताच त्यांना कामा रुग्णालयाजवळ बोलावण्याची योजना आयबीच्या संबंधित अधिका-यांनी तयार केली होती.

११ - हे अधिकारी नजरेच्या टप्प्यात येताच, गोळीबार करून त्यांचे ध्यान आकर्षित करण्याची जबाबदारी एसबी कार्यालय,रंगभवन येथील टोळीवर होती.

१२ - हेमंत करकरे त्यांच्या रेंजमध्ये येताच या एसबी कार्यालय, रंगभवनच्या टोळीने जबाबदारी पार पाडली.

१३ - आपली कारवाई पूर्ण झाल्याचा संकेत त्यांनी देताच त्यांना तात्काळ त्यांच्या ठरलेल्या जागी सुरक्षितपणे निघून जाण्यास सांगितले गेले.

१४ - मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने आयबीने त्यांच्या स्टॉकमधील दोन दहशतवाद्यांना स्कोडा गाडीतून चकमकीसाठी संबंधित ठिकाणी नेले. मात्र, त्यातील एकाला जिवंत ठेवण्याची काळजी घेतली.

या सर्व घटना ठरलेल्या नियोजनाप्रमाणे घडल्या. पण, युद्धात किंवा कुठेही आखलेली योजना प्रत्यक्ष कारवाई यांच्यात काहीतरी अंतर राहतेच त्याप्रमाणे त्यांनीही काही मोठ्या चुका केल्या.

अ - सीएसटीतील दोन जणांमध्ये अनेक वर्षापासून मुस्लिम विद्वेषाचे विष पाजले जात होते. त्यामुळे हे दोघे जण मुस्लिमांविरोधातील राग गोळीबाराच्या वेळी विसरू शकले नाहीत. जिहादी मुस्लिम म्हणून काम करण्यासाठी त्यांना दिलेली शिकवण ते विसरून गेले व मुस्लिम पद्धतीची टोपी घातलेल्या व दाढीधारी मुस्लिम पुरुष, मुले, बुरखाधारी महिलांच्या दिशेने बेछूट गोळीबार केला.

ब - रेल्वे स्थानकात हा संहार करून झालेल्या टोळीला कामा रुग्णालयाकडे जाणे शक्य झाले नाही. भुयारी मार्ग आणि टाइम्सच्या इमारतीजवळच्या पोलिसांनी त्यांचा मार्ग बंद केला होता. त्यामुळे त्यांना मस्जिद बंदर स्थानकाच्या दिशेकडून बाहेर पडावे लागले.

क - गिरगाव चौपाटीजवळजवळच्या पोलिसांनी उत्साहाच्या भरात किंवा समन्वयाच्या अभावाने स्कोडातील दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले. त्यामुळे आयबीला शेवटच्या क्षणाला तिसरा दहशतवादी स्टॉकमधून काढावा लागला.

(एस. एम. मुश्रीफ यांच्या हू किल्ड करकरे पुस्तकातील काही भागाचा स्वैरानुवाद)

शिळांपासून शाळांकडे...


थ्री कप्स ऑफ टी’मध्ये ग्रेग मॉर्टेनसन या ध्येयवेडय़ा माणसानं त्याला आश्रय देणा-या कोरफे गावातील रहिवाशांना शाळा बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण केलं पण या पुस्तकात त्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीर (या पुस्तकात त्याचा उल्लेख आझाद काश्मीर), पाकिस्तानचा दुर्गम भाग, अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील भागात मुलींसाठी शाळा उभारण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचा उल्लेख आहे.

अमेरिकेतला एक हौशी गिर्यारोहक हिमालयात गिरीभ्रमणासाठी येतो.. त्याची मोहीम फसते.. पाकिस्तानातल्या एका गावात त्याला आसरा मिळतो.. आणि तिथल्या ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी या भागात शाळा सुरू करण्याचे वचन देतो आणि ते पाळतोही.. ही कथा आपण ग्रेग मॉर्टेनसनच्या थ्री कप्स ऑफ टी मुळे ठाऊक झालीच आहे. या पुस्तकानं विक्रीचे अनेक आकडे मोडले. बेस्टसेलर ठरलेल्या या पुस्तकानं केवळ एक इतकंच साध्य केलं असं नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या भागातील शिक्षणाच्या समस्येवरही प्रकाशझोत टाकला.

याच पुस्तकाचा पुढील भाग म्हणजे स्टोन्स इन्टू स्कूल्स हे पुस्तक! थ्री कप्स ऑफ टीमध्ये ग्रेग मॉर्टेनसन या ध्येयवेडय़ा माणसानं त्याला आश्रय देणा-या कोरफे गावातील रहिवाशांना शाळा बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण केलं पण या पुस्तकात त्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीर (या पुस्तकात त्याचा उल्लेख आझाद काश्मीर), पाकिस्तानचा दुर्गम भाग,अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील भागात मुलींसाठी शाळा उभारण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचा उल्लेख आहे. त्याने स्थापन केलेल्या सेंट्रल एशिया इन्स्टिटय़ूट (सीएआय) या संस्थेच्या माध्यमातून त्याने या भागात तब्बल 130 शाळा उभारल्या. यातल्या बहुतांश शाळा मुलींच्या आहेत.

मुळात पाकिस्तानचा डोंगराळ भाग आणि अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील भागात तालिबानींचं मोठं वर्चस्व आहे. संपूर्ण पाकिस्तानातही परिस्थिती वेगळी आहे, असे आपण म्हणू शकणार नाही. त्यातच पाकिस्तान, अफगाणिस्तानातल्या तालिबान्यांचं वर्चस्व मोडून काढून तिथं शाळा सुरू करणं, तेही मुलींसाठी हे एकप्रकारे जिवावरचं संकट होतं. पण मॉर्टेनसन यांनी स्थानिकांच्या मनात स्वत:बद्दल एक जागा निर्माण केली होती. त्यांच्या संस्कृतीशी समरस होऊन आपण कुणी वेगळे आहोत, हे कधी जाणवूच दिलं नाही. म्हणूनच तिथले टोळीवाले त्यांचा माग काढत येतात. त्यांच्या कोरफे आणि अन्य गावांतल्या शाळांची ओळख पाकिस्तान, अफगाणिस्तानात पसरल्यानं, हे टोळीवाले थेट त्यांना आपल्या गावातही अशी शाळा सुरू करण्याचं निमंत्रण देतात, हे विस्मयकारक आहे.

उल्लेखनीय म्हणजे, काश्मीर खो-याला 2005 मध्ये प्रलयंकारी भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी तर झालीच पण वित्तहानीही मोठी झाली होती. या भूकंपानं मॉर्टेनसन यांनी बांधलेल्या शाळांचंही नुकसान झालं,पण त्यांनी तिथं तंबू उभारून शाळा चालवल्या.

याच पुस्तकातल्या काही भागाचा स्वैरानुवाद सोबत आहे..
  • स्टोन्स इन्टू स्कूल्स- प्रमोटिंग पीस विथ बुक्स, नॉट बाँब्स, इन अफगाणिस्तान अँड पाकिस्तान
  • लेखक- ग्रेग मॉर्टेनसन (सोबत माइक ब्रायन)
  • पाने- 420
  • प्रकाशन : पेंग्विन इंडिया
  • किंमत : 399 (बुकस्ट्रीटवर 150 पर्यंत)

पुढचा दीड महिना मी, सर्फराज आणि आमच्या सहका-यांची नीलम खो-याच्या दिशेनं वाटचाल सुरू होती. रस्ता प्रचंड खडतर होता. यातला काही प्रवास गाढवावर बसून तर बहुतांश प्रवास पायीच करावा लागत होता. काही शेवया आणि तसंच काहीतरी खाऊन आणि आयोडिनच्या गोळ्या घालून नदीचं पाणी पिऊन आमचा प्रवास सुरू होता. प्रवासाचा शीण इतका होता की मला आणि सर्फराजला वेदनाशामक गोळ्या आणि चहावरच दिवस काढावा लागत होता. या भागात भूकंपानं झालेल्या हानीची तशी सुरुवातीला कल्पना येत नव्हती.

भूकंप होऊन दोन महिने उलटून गेले तरी अद्यापही कित्येक हजार लोक बेपत्ता होते. त्यांची काहीच माहिती मिळत नव्हती. त्यातच शोधपथकांना सतत नवनव्या ठिकाणी मृतदेह सापडत होते. येथील लोकांनी आता छावण्यांमध्ये आश्रय घेतला होता. आम्हालाही अशाच एका छावणीत आश्रय घ्यावा लागला. या छावण्यांना मिळणारी मदत कमी झाली की तिथं आलेल्यांची वाटचाल पुन्हा पुढच्या छावणीकडं व्हायची. या छावण्यांमध्ये आलेल्यांना आम्हीही ते कुठल्या गावाचे, त्यांचं किती नुकसान झालंय, मुलं कशी आहेत, गावातल्या शाळा वाचल्यात का, हे प्रश्न विचारायचो, पण शेवटच्या प्रश्नाला प्रत्येकाकडून नकारार्थीच उत्तर यायचं. नीलम खो-याच्या वरच्या भागातल्या 50 ते 60 गावांत एकही शाळा उरली नव्हती. यातल्या प्रत्येक शाळेत 150 ते 160 विद्यार्थी होते, त्यातले बरेचसे विद्यार्थी भूकंपात मरण पावले होते. या शाळांच्या दुरवस्थेसाठी कंत्राटदारांनी केलेलं कामच जबाबदार होतं. भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीनं या शाळा कोसळल्या होत्या. त्यातच ही गावं अत्यंत दुर्गम भागात असल्यानं तिथं अन्न पुरवण्यासाठी किंवा इतर मदत देण्यासाठी सरकारी संस्था आणि सेवाभावी संस्थांची उपस्थितीही नगण्यच होती. पाकिस्तानी सैन्यानं काही ठिकाणी तंबू उभारून त्यात शाळा सुरू करण्यास सांगितलं. मात्र, ते अत्यंत अपुरं होतं.

अशा वातावरणात शिकवण्यासाठी कोणीला तरी शोधणं, शिकवण्यासाठी लागणारं साहित्य जमा करणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पगाराची तजवीज करणं महत्त्वाचं होतं. आम्ही ज्या भागात आता लक्ष केंद्रित केलं होतं, त्या ठिकाणी सर्फराज चालवत असलेल्या भागातील तंबूशाळांत काहीतरी जिवंतपणा दिसून येत होता. संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारीत आम्ही त्या भागातील सर्व तंबूशाळांना भेट दिली. या भागात दोघे-तिघे समर्पण वृत्तीनं काम करणाऱ्या शिक्षकांचा आम्हाला शोध घ्यायचा होता. काही शाळांमध्ये तर एकेका वर्गात 100 पेक्षा अधिक विद्यार्थी होते. त्या ठिकाणी तीन-चार तासांची वेगवेगळी दोन सत्रे भरवण्यास सुरुवात केली. त्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक असे हे सत्र होते. यात वरच्या वर्गातले विद्यार्थी खालच्या वर्गाना शिकवण्यासाठी तयार झाले होते. यातल्या काही शाळांत तर दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी होते.

या काळात पुनर्बाधणीच्या कामालाही वेग येत होता. पण या शाळांच्या कामाकडेही लक्ष देण्यासाठी आमच्यातला प्रत्येक जण शाळांना भेट देत होता. तिथं मदत पुरवत होता. त्यांना पगार मिळतो की नाही हे पाहात होता. तिथं कोणतीही सरकारी मदत पुरवली जात नसतानाही त्यांना केवळ आमच्या संस्थेचाच आधार होता. आमच्या या प्रयत्नांमुळे स्थानिकांमध्येही आमच्याबद्दल विश्वासाचं वातावरण तयार होऊ लागलं होतं.