Friday, December 31, 2010

'साहित्य संमेलनाध्यक्षपद दोन वर्षांचे करण्यास हरकत नाही'

संमेलनाध्यक्ष म्हणून एक वर्ष कमी पडतं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारे ठराव प्रत्यक्षात आणणंही अध्यक्षांना शक्य होत नाही, या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष आणि प्रख्यात समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी मात्र समाधानी आहेत. धोरणात्मक भूमिका आणि दिशादर्शन ही अध्यक्षाची प्राथमिक जबाबदारी असल्यामुळे हा कालावधी अपुरा नाही, असे ते सांगतात. मात्र, त्याचवेळी ‘संमेलनाचा कालावधी एकाऐवजी दोन वर्षांचा असावा,' असं मत कुसुमाग्रजांनी व्यक्त केलं होतं, तो धागा पकडून ‘असे प्रयोग करायला काहीच हरकत नाही,' असं स्पष्ट करण्यास द. भि. विसरत नाहीत!

‘लोकमत ऑनलाइन'शी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मराठी संस्कृतीचा उभा-आडवा छेद घेता आल्याचे समाधान व्यक्त करताना, ‘गावागावांतील सामान्य माणसांनी, शेतकèयांनी, कष्टकèयांनी आणि छोट्या खेड्यांमधील शाळा-वाचनालयांनी मराठी साहित्य आजवर सांभाळले आहे. शहरांतील उच्चभ्रूंच्या नव्हे, तर या सर्वसामान्य माणसांच्या खांद्यावर मराठी साहित्य दिमाखात-सुरक्षितपणे उभं आहे,' असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

मराठी साहित्यसंस्कृती-वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम बड्या शहरांच्या तुलनेत गावोगावची वाचनालये मोठ्या तळमळीने करत आहेत, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी या वाचनालयांचा गौरव केला. .

साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभराचा काळ आपल्याला खूप काही शिकवणारा होता. या काळात राज्यात आणि राज्याबाहेरही फिरलो... तेथील वाचनसंस्कृतीचा, साहित्यसंस्कृतीचा आढावा घेता आला. संमेलनाध्यक्ष म्हणून संमेलनाचे केवळ तीन दिवसच जबाबदारी राहते असे नाही, तर या काळात निर्माण होणारी ऊर्जा वर्षभर साहित्यप्रेमी समाजाला व्यापून असते, असे ते म्हणाले.

मराठी भाषेत निर्माण होणारं साहित्य दर्जेदार तर आहेच, पण ते समाजाभिमुखही आहे. या साहित्यात वैश्विक जाणिवा व्यक्त झालेल्या दिसून येतात. निबंधासारख्या वैचारिक साहित्याची देणगी मराठी साहित्याने दिली आहे. त्यामुळेच अनेक नवनवे लेखक- कवी उत्साहाने पुढे येत आहेत. आसाराम लोमटे, अनुराधा पाटील अशी निवडक नावे येथे घेता येतील, असे त्यांनी सांगितले.

एकीकडे ग्रामीण भागात वाचनसंस्कृती जोर धरत असताना मुंबई, पुणे, नागपूरसारख्या बड्या शहरांत मात्र बदलती जीवनशैली, इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि रुपवाणी (आकाशवाणी, दूरचित्रवाणी) यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. रुपवाणीसारखी माध्यमं केवळ करमणुकीचं साधन म्हणूनच काम करतात. वाचनाने होते तशी बौद्धिक देवाणघेवाण या माध्यमातून होताना दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्य समाजाभिमुख असलं तरी आता समाजाने साहित्याभिमुख होणं गरजेचं आहे, असं आग्रही मत त्यांनी मांडलं.

मराठी साहित्यक्षेत्रातील एक मुख्य प्रवाह म्हणजे कविता. पण कवितेचा दर्जा गेल्या काही काळात घसरलेला वाटतो का, या प्रश्नावर, पूर्वीही सामान्य कविता लिहिल्या जायच्या. आजही लिहिल्या जातात. पण सकस साहित्य हे काळाच्या निकषावर पुरून उरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात दरवर्षी होणा-या वादांच्या पाश्वर्भूमीवर त्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी विचारलं असता, लोकशाहीत निवडणुकीला पर्याय नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, अखिल भारतीय साहित्य संमेलन हा साहित्यिकांचा मेळावा नव्हे तर मराठी समाजाचा एक सणच आहे. त्यामुळे त्याची निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, पारदर्शक असावी. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटींच्या घरात असताना, मतदार मात्र अवघे ७०० असे चित्र दिसते. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे. विशेषतः बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिक मराठी संस्कृतीच्या सरहद्दीचे संरक्षण करत आहेत. त्यामुळे येथील मंडळींना संमेलनाच्या निवड प्रक्रियेत योग्य स्थान मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या भागातील मराठी भाषिकांकडे अन्य भाषांचेही ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करता यावी यासाठी चर्चा, परिसंवादांना त्यांना निमंत्रित करावं, तेथील मराठी विभागांना राज्य सरकारनं आर्थिक मदत पुरवावी, असे ते म्हणाले. विशेषतः साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्यिक मंडळी हरण्याच्या भीतीने उतरत नाहीत. त्यांनी ही मनोभूमिका सोडून द्यावी, असे आवाहन कुलकर्णी यांनी या वेळी केले.

मराठीत एकाच वेळी अनेक साहित्य संमेलने भरताना दिसतात. ही संमेलने मराठी भाषेसाठी पूरक आहेत. ती व्हावीतच आणि त्या संमेलनांचं, प्रवाहांचं प्रतिनिधित्व करणा-यांचीही योग्य दखल घेतली जावी, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत सॅन होजे आणि दुबई येथे विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की, या संमेलनांना विश्व साहित्य संमेलन म्हणणं योग्य ठरणार नाही. त्या ऐवजी देशांतर संमेलन म्हणणं योग्य ठरेल. कारण या संमेलनात संमेलन होणारा देश आणि महाराष्ट्रातील काही निवडक मंडळी उपस्थित असतात. त्यामुळे या संमेलनांना दोन-तीनशे साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा, असंच रूप आलेलं दिसतं.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या चोरांचे संमेलन या लेखाचा उल्लेख करून या पुढे कधी गुन्हेगारांचे संमेलन जरी आयोजित करण्यात आले तरी त्याला पाठिंबाच द्यायला हवा. कारण त्यातूनच त्या गुन्हेगारातील माणूस जागा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.