Showing posts with label सामाजिक. Show all posts
Showing posts with label सामाजिक. Show all posts

Tuesday, February 15, 2011

अलिप्तता कितपत शक्य?

इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या तीन दशकांच्या राजवटीला कंटाळून तेथील जनतेने सुरू केलेल्या उठावानानंतर मुबारक यांना पद सोडावे लागले. गंमत म्हणजे सरकारविरोधी उठावात जनतेची मुस्कटदाबी करण्याचे काम करणा-या इजिप्तमधील लष्करानेच या उठावाला अप्रत्यक्ष रूपात का होईना पाठिंबा दिल्याने इजिप्तमधील येत्या काळातील घडामोडी नक्कीच रंगतदार ठरणार यात संशय नाही.
दुस-या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर अमेरिका आणि रशिया यांना मानणारे दोन गट तयार झालेले असताना, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इजिप्ततचे तत्कालीन अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर यांच्या पुढाकाराने आलिप्त राष्ट्र चळवळ सुरू करण्यात आली होती. भारताचा एक चांगला सहकारी म्हणूनच इजिप्तची ओळख कायम राहिली आहे. त्यामुळे इजिप्तला राष्ट्रकुलातून वगळण्यासाठी झालेल्या लढ्यात १९५६मध्ये भारताने इजिप्तला पाठिंबा दिला होता. अमेरिकेच्या पुढाकाराने अरब राष्ट्रांतून वेगळा भूभाग काढून इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण अरब राष्ट्रांत निर्माण झालेल्या असंतोषाची परिणती १९६७च्या अरब-इस्रायल यांच्यातील लढ्यात झाली. त्यावेळीही भारताने इजिप्तची बाजू घेतली.
आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेला इजिप्त केवळ पश्चिम आशियाच नव्हे जागतिक स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक घडामोडींत नेहमीच मोलाची भूमिका बजावत आलेला आहे. त्यामुळेच तेथील सध्याच्या घडामोडींमध्ये सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारताने सध्या तरी हा इजिप्तचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून हात झटकले आहेत.
भारताशी नेहमीच सौहार्दाचे संबंध असलेल्या इजिप्तमध्ये अनेक भारतीय कंपन्यांचे प्रकल्प सध्या कार्यान्वीत आहेत. मात्र, सध्याच्या अशांततेमुळे काही प्रकल्प बंद करण्याची वेळ या कंपन्यांवर आली आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय समुदायाशी होणारा व्यापार प्रामुख्याने सुएझ कालव्यातून होतो. हा व्यापार जवळपास ४० अब्ज डॉलरच्या घरात आहे. त्यामुळे हा व्यापार धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर भारताचे इजिप्तशी व्यापारी संबंधही चांगले आहेत. इजिप्त तसा मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्पादक देश नसला तरी तेथील घडामोडींचा परिणाम लगतच्या अरब राष्ट्रांवरही होताना दिसतोय. त्यामुळेच दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या दिशेने जात आहेत. त्याचा परिणाम भारतावर होणार, हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. कारण भारतात पेट्रोलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीशी सुसंगत केल्याचा परिणाम म्हणून गेल्या महिन्यातच पेट्रोलच्या किमती दोनदा वाढल्यात आणि इजिप्तमधला हा पेच कायम राहिल्यास भारतातही पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांच्या घरात जाण्याची भीती वर्तवली जातेय. डिझेल, गॅसच्या किमती अद्यापही सरकारच्या नियंत्रणात असल्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या वाढत राहिल्यास सरकारलाही त्यात वाढ करणे भागच पडेल आणि त्याचा परिणाम म्हणून एकंदरच महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे.
ट्युनिशियात सुरू झालेल्या या क्रांतीचे लोण इजिप्तमध्ये पसरले आणि तेथून पुढे ते संपूर्ण अरब राष्ट्रांत, पश्चिम आशियात पसरताना दिसत आहे. ही राष्ट्रे प्रामुख्याने मुस्लिमबहुल आहेत. इजिप्तला लागूनच इस्रायलसारखा अरब राष्ट्रांचा कट्टर शत्रू आहे. इस्रायलला पोसणारा देश अमेरिका आहे, हे जगजाहीर आहे. पण इजिप्तमधील तिढा वाढला आणि त्या प्रक्षोभातून इस्रायलविरोधात वणवा पेटला तर ते अमेरिकेसाठी घातक ठरेल, यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने आता इजिप्तमधील प्रक्षोप शमवण्याचे काम सुरू झाले आहे.
इजिप्तमधील सध्याच्या जनप्रक्षोभाचा परिणाम भारतासह अन्य देशांवर सामाजिक, राजकीय अंगाने काय होतो, हे पाहणेही उद्बोधक ठरेल. इजिप्तमध्ये झाली त्याप्रमाणे भारतातही क्रांतीही व्हायला हवी, असे मत अनेक उत्साही मंडळी व्यक्त करत आहेत. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, महागाई आणि विशेष म्हणजे पोलिसी दडपशाही तिथे होत होती. त्या विरोधात जनतेने हे बंड पुकारले. भारतात कितीही नाकारले तरी अशाच प्रकारचे जनतेला बंड करायला उद्युक्त करणारे वातावरण दिसत आहे. पण भारत आणि इजिप्तमधला सर्वात मोठा फरक म्हणजे इथे लोकशाही मार्गाने हे बंड पुकारले जाते. थोडक्यात काय तर निवडणूक घेऊन आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी राज्यघटनेने देशवासीयांना दिलेली आहे. इजिप्तमधील बंडाळीला सर्वात मोठे कारण ठरल्या ते सोशल नेटवर्किंग साइट्स. भारतातही गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटरवर अशाच प्रकारचे संदेश फिरताना दिसत आहेत. अरब राष्ट्रांची संघटना अरब लीगचे मुख्यालय इजिप्तची राजधानी कैरोमध्येच आहे. त्याचा पदसिद्ध प्रमुखही इजिप्तचाच नेता असतो. एकीकडे सर्व अरब देश इस्रायलवर खार खात असताना इजिप्तनेच पुढाकार घेऊन इस्रायलशी १९८९मध्ये सामंजस्य करार केला. त्यांच्याशी धोरणात्मक संबंध प्रस्थापित केले. पण आता अरब देशांत या क्रांतीच्या या फोफावलेल्या वणव्याला जगभरातील मुस्लिम समुदायाची पाठिंबा मिळताना दिसत आहे. मुस्लिम ब्रदरहूडसारख्या संघटनेवर आज इजिप्तमध्ये बंदी असली तर बहुसंख्य मुस्लिम देशांत या संघटनेबद्दल सहानुभूती आहे. इजिप्तमध्येही सरकारकडून जनतेला जे मिळत नाही, ते या संघटनेकडून सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले जाते. इजिप्तचे भावी अध्यक्ष म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते, ते मोहम्मद अलबदाई हे देखील मुस्लिम ब्रदरहूडचे काही अंशी सहानुभूतीदार आहेत.

इजिप्तमधील घडामोडींची काश्मीरशीही सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून ही चळवळ मुस्लिम देशांत पसरण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेली निदर्शने आणि इजिप्तमधील आताची निदर्शने दोन्ही सरकारविरोधातील रोष व्यक्त करणारी आहेत, असे म्हटले जाते. पण दोन्ही ठिकाणची राजकीय, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे काश्मीरमधील फुटिरतावादी लगेचच पेटून उठतील, असे समजणे चुकीचे असले तरी नेहमीच आलिप्ततावादी भूमिका घेणा-या भारताला सध्या ठाम भूमिका घेणे भाग पडणार आहे.

Sunday, September 19, 2010

घराच्या स्वप्नाची लढाई

श्रमजीवी मुंबईकराला परवडणा-या दरात मजबूत बांधकाम असलेले घर देण्याचा प्रयत्न नागरी परिषदेने यशस्वीपणे पार पाडला आहे

मुंबईकरांच्या वाढत्या लोकसंख्येची घरांची मागणी पूर्ण होईल, अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत. जनतेला रास्त दरात घरे मिळवून देण्यासाठी स्थापन झालेल्या म्हाडाने अनेक वर्षानंतर यंदा साडेतीन हजार घरांची सोडत काढली. त्यातील घरे देण्याची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. खासगी विकासक किंवा बिल्डर यांच्याकडे जाऊन घर खरेदी करणे सर्वसामान्य मुंबईकराला परवडणारे नाही.

असे असले तरी श्रमजीवी मुंबईकराला परवडणा-या दरात मजबूत बांधकाम असलेले घर देण्याचा प्रयत्न नागरी परिषदेने यशस्वीपणे पार पाडला आहे. म्हाडाच्या घरांपेक्षा भक्कम आणि किमतीत कमी असणारी ही घरे दिंडोशीजवळच्या डोंगराळ भागात नागरी निवारा परिषदेने उभारली. तब्बल सहा हजार घरांचा हा प्रकल्प ना नफा ना तोटातत्त्वावर परिषदेने राबवला. मात्र, हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी संघटनेच्या प्रयत्नांत अनेक अडथळे आले. १९८१ मध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया थेट २००७ मध्ये थांबली ती सहा हजार कुटुंबांना मालकीहक्काचे घरे देऊनच! या घरांसाठी १९८१ मध्ये जमीन मागितली होती. मात्र, ती देण्यासाठी सरकारी स्तरावरून सतत आडकाठी होत राहिली. त्यामुळे मृणाल गोरे, प. बा. सामंत, वसंत शिराली,प्रा. रमेश जोशी, सोहनसिंग कोहली, कमल देसाई यांना थेट उपोषणाचे हत्यार उपसावे लागले. सात दिवस हे उपोषण सुरू होते. शेवटी तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांना यात हस्तक्षेप करून नागरी निवारा परिषदेला जमीन देण्यासंदर्भात सरकारला सांगावे लागले. ही जमीन प्रत्यक्षात सरकारने दिली १९९२ मध्ये. या जमिनीवर वन रुम किचनची पाच हजार ८८ तर टू रुम किचनची एक हजार ६४ घरे बांधण्यात आली. मार्च २००६ पर्यंत हा प्रकल्प पूर्णही झाला.

त्यानंतर नागरी निवारा परिषदेने आंदोलन सुरू केले ते कमाल जमीन धारणा कायदा रद्द करू नये, यासाठी! गोरगरीबांना घरे मिळावीत, यासाठी सरकारने १९७६ रोजी केलेल्या या कायद्याचा सरकारने नंतरच्या काळात वापरच केला नाही. त्यामुळे या कायद्याचा वापर करून गोरगरीबांना घरे देता येतील, या उद्देशाने सरकारने ही जमीन ताब्यात घ्यावी, यासाठी नागरी निवारा परिषदेने कोर्टाचे दार ठोठावले. सरकारनेही २००७ सालापर्यंत १७ हजार एकर जमीन ताब्यात घेण्याचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात दाखल केले होते. मात्र, नंतर सरकारने २००७ मध्ये हा कायदाच रद्द केला. दरम्यानच्या काळात नागरी निवारा परिषदेने मोठे जनआंदोलन उभारत सरकारची ही जमीन रास्त भावात सर्वसामान्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी सदस्यांना त्यांच्याच नावे प्रत्येकी १० हजार रुपये बँकेत जमा करण्यास सांगितले. तब्बल १ लाख १४ हजार जणांनी या मोहिमेत सहभाग घेतला.

मात्र, आपण सदस्यता नोंदवली, आता आपली जबाबदारी संपली,असे मानून यातील बहुसंख्य सदस्यांनी या चळवळीकडे पाठ फिरवली. हा कायदा रद्द व्हावा किंवा सरकारकडून रास्त भावात जमीन मिळवून त्यावर सहकारी तत्त्वावर घरबांधणी करावी, यासाठी आजघडीला नागरी निवारा परिषदेचे काही पदाधिकारी आणि सदस्य वगळता बहुसंख्य मंडळी मात्र गप्पच आहेत. यातील बहुतांश पांढरपेशे आहेत. त्यामुळे रस्त्यावर उतरून चळवळी करणे हे आपले काम नाही, अशीच त्यांची धारणा झाली आहे. चळवळ पुढे रेटण्यासाठी होणा-या सभांनाही या मंडळींची उपस्थिती अगदी कमी असते, अशी खंत या आंदोलनातील एक अग्रणी वसंत शिराली यांनी व्यक्त केली. जनतेसाठीच सुरू झालेले हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी जनतेनेही प्रयत्न करायला हवेत, असे त्यांचे मत आहे.

मैदाने वाचवा...

मुंबईत काही मंडळी ‘मैदान बचाव समिती’च्या नावाने गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत काम करत आहेत. मुंबईतील मैदाने वाचावीत, त्यांच्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी ही मंडळी झटत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मैदाने अतिक्रमणांपासून वाचवली आहेत.

गेल्या काही वर्षात निसर्गचक्र बदलल्याचे आपल्या ध्यानात येत आहे. ग्रामीण भागावर त्याचा अधिक परिणाम होतो, त्याचे आपल्याला काय, असा उलटा प्रश्न विचारून निसर्गाच्या प्रकोपाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती मुंबई, पुण्यासारख्या बडय़ा शहरांत राहणा-यांमध्ये दिसून येते. मात्र, या मंडळींच्या हे लक्षात येत नाही की, अगदी थोडा जरी पाऊस पडला तरी मुंबईसारखे शहर लुळेपांगळे होते. सर्व व्यवहार थंडावतात. काही मंडळी यालाही प्रतिवाद करताना, मुंबईतील सांडपाणी व्यवस्थेवर खापर फोडतील. पण डोळसपणे पाहणारे फारच कमी आहेत.

काही मंडळी मैदान बचाव समितीच्या नावाने गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत काम करत आहेत. मुंबईतील मैदाने वाचावीत,त्यांच्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी ही मंडळी झटत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मैदाने अतिक्रमणांपासून वाचवली आहेत.

मुंबई शहराची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास आहे. आणि मैदाने आहेत अवघी ८६५. या शहराला विस्तारासाठी आधीच जागा नाही. त्यामुळे लोकवस्ती अतिशय दाटीवाटीची आहे. त्यातच वाहनांच्या प्रचंड संख्येने शहरातील प्रदूषण वाढलेले आहे. लोकांना मोकळा श्वास घेण्याची सोय उरलेली नाही, असे असताना मुंबईतील मैदाने शहराच्या फुफ्फुसाप्रमाणे काम करतात. मात्र, आता सरकारी पातळीवरून आणि काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली या मैदानांचाच गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी मैदानांचे आरक्षण रद्द केल्याच्या बातम्या येत असतातच. मात्र, आहे त्या मैदानात वेगवेगळ्या प्रकारे अतिक्रमण करून त्या मैदानाचे स्वरूपच बदलले जात आहे. वास्तविक पाहता मैदान मातीचेच असायला हवे. त्यावर मुक्तपणे खेळता यायला हवे. आता या मैदानांच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली पेव्हर ब्लॉक बसवले जातात,मैदानात जागोजागी ग्रेनाइटचे, संगमरवराचे बाक बसवले जातात. यात मैदानाचे क्षेत्रफळ कमी होते. त्याचबरोबर कधी-कधी मैदानात व्यायामशाळा, बालवाडीसाठी जागा मिळवली जाते. त्यानंतर हळूहळू ही मंडळी हातपाय पसरायला सुरुवात करतात,आणि मैदान त्याला बळी पडते. मैदानांना अशा प्रकारच्या अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी ही समिती काम करते.

दुसरा धोका आपण २६ जुलैच्या पावसानंतर अनुभवला आहेच. मुंबईतील मैदाने कमी झाल्यामुळे किंवा मैदानातील मातीच नष्ट झाल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या निच-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईत हल्ली अगदी तुरळक पाऊस पडला तरी पूरस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर नेहमीपेक्षा अधिक प्रखर उन्हाळा किंवा न जाणवणारा हिवाळा अशी परिस्थिती सध्या मुंबईत निर्माण होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी मैदानांचे मूळ रूप कायम ठेवावे, यासाठी ही समिती भांडत आहे. मुंबईतील सध्या १,८८६ महापालिका आणि तीन हजार खासगी शाळांमध्ये सुमारे पावणे आठ लाख विद्यार्थी शिकत आहेत. त्यांचा बौद्धिक विकास होत असताना शारीरिक विकासासाठी आवश्यक अशा मैदानांचे प्रमाण कमी होत आहे. भविष्यात मैदाने नष्ट झाली तर या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, हा धोका टाळण्यासाठी समितीने अनेक आंदोलने केली आहेत, आणि त्याला यशही मिळाले आहे. समितीच्या आकडेवारीनुसार मुंबई शहरात उद्याने,मनोरंजनासाठीच्या बागा, खेळांची मैदाने, पार्क अशी मिळून अवघी २३४ ठिकाणे आहेत. पश्चिम उपनगरात त्यांची संख्या ४३३ आणि पूर्व उपनगरांत १९८ आहे. त्यामुळे आहेत ती मैदाने नष्ट करण्यापेक्षा मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करून अधिक मैदाने निर्माण व्हावी, अशी भूमिका समितीने घेतल्याचे समितीचे भास्कर सावंत सांगतात. समितीने आतापर्यंत वेळोवेळी आंदोलने करून माटुंग्याचे दडकर मैदान, विक्रोळीचे संभाजी मैदान, कुर्ला येथील गांधी मैदान वाचवले आहे. मलबार हिल येथील एस. एम. जोशी मैदानासाठी सध्या मैदान बचाव समिती लढत आहे.

Saturday, September 11, 2010

काय होणार रिपब्लिकन पक्षाचे?

महाराष्ट्रातील कोणत्याच पक्षाचे राजकारण रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) या पक्षाकडे दुर्लक्ष करून पूर्ण होऊच शकत नाही. रिपब्लिकन पक्षाची ही ताकत राजकारणाच्या मुख्य प्रवाहातील अन्य पक्षांनी ओळखली असली तरी खुद्द रिपब्लिकन नेत्यांना आपल्यातील या शक्तीची जाणीव झालेली दिसत नाही..महाराष्ट्रातील कोणत्याच पक्षाचे राजकारण रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) या पक्षाकडे दुर्लक्ष करून पूर्ण होऊच शकत नाही. रिपब्लिकन पक्षाची ही ताकत राजकारणाच्या मुख्य प्रवाहातील अन्य पक्षांनी ओळखली असली तरी खुद्द रिपब्लिकन नेत्यांना आपल्यातील या शक्तीची जाणीव झालेली दिसत नाही.. आजघडीला रिपब्लिकन पक्षाचे तब्बल ४४ गट-तट अस्तित्वात आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी यातील अनेक गटांनी डावे, समाजवादी यांना एकत्र आणून‘रिडालोस’ नावाची एक मोळी बांधण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयोग फसला.आताचा रिपब्लिकन पक्ष हा पूर्वाश्रमीच्या दलित पँथरची राजकीय आवृत्ती किंवा आवृत्त्या आहेत, असे दिसते.. महाराष्ट्राच्या प्रत्यक्ष राजकारणात नसूनही ७०च्या दशकाच्या सुरुवातीस समाजात एखाद्या वादळासारखा घोंघावणारी दलित पँथर ही संघटना आधीच्या रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीच्या राजकारणाला कंटाळून स्थापन झाली होती; पण पुढे तीही फुटली आणि आज महाराष्ट्राच्या राजकीय बाजारपेठेतील सध्याच्या रिपब्लिकन पक्षात, पूर्वाश्रमीचे अनेक ‘पँथर’ राजकीय सौदेबाजीत गुंतलेले दिसू लागले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष आणि आजचा रिपब्लिकन पक्ष यांचा (केवळ नामसाधम्र्य सोडले तर) तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशन हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष निवडणुकीच्या राजकारणात फारसा यशस्वी ठरला नाही. भविष्याची फार आधीपासून चाहूल असणाऱ्या बाबासाहेबांनी त्यामुळे सर्व समाजगटांना, वंचितांना सोबत घेऊन जाता येईल, अशा पक्षाची संकल्पना मांडली होती. पण त्यांच्या हयातीत हे साध्य झाले नाही. बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात दीन-दलित, वंचितांच्या उद्धारासाठी बौद्ध धम्म आणि रिपब्लिकन पक्ष हे धार्मिक व राजकीय शक्ती म्हणून उभे करायचे होते. शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशनपेक्षा व्यापक दृष्टिकोन असणारा रिपब्लिकन पक्ष असावा, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. पण येथेही बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या सर्वहारा वर्गाऐवजी रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा जातीच्या चौकटीत अडकला. केवळ अनुसूचित जातीतील महारांचा पक्ष म्हणून त्याची ओळख प्रस्थापित झाली. रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष असावा, ही बाबासाहेबांची इच्छा मात्र, त्या वेळी पूर्ण झाली. बाबासाहेबांच्या दलितोद्धाराच्या चळवळीत त्यांना उत्तरेकडील राज्यांचेही मोठे योगदान होते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रातील महार तर उत्तरेकडील विखुरलेल्या चांभार किंवा ‘चमार’ समाजाने आपला पक्ष म्हणून स्वीकारले.सुरुवातीच्या रिपब्लिकन पक्षावर ब-याच मोठय़ा प्रमाणात मार्क्‍सवादी विचारसरणीचा पगडा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष राजकारणाला सुरुवात केली तो काळही पहिल्या महायुद्धाच्या नंतरचा किंवा रशियन राज्यक्रांतीदरम्यानचा होता. त्यामुळे त्यांनाही या विचारांनी प्रभावित केले असावे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनांत समाजवादी तसेच मार्क्‍सवाद्यांचाही सहभाग लाभला. दादासाहेब गायकवाडांनी वनजमिनी तसेच सामूहिक जमिनी मागासवर्गीयांना कसण्यासाठी मिळाव्यात, यासाठी १९५६ व १९६५ मध्ये यशस्वी आंदोलन केले.रिपब्लिकन पक्षाची स्थापना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ऑक्टोबर १९५७ मध्ये झाली. त्यानंतर १९७५ सालापर्यंत या पक्षाची देशभरात विविध ठिकाणी सात अधिवेशने झाली. या पक्षाचे बी. के. गायकवाड, बी. सी. कांबळे, दिघे, जी. के. माने, हरिहरराव सोनुले, दत्ता कट्टी, एन. शिवराज, के. यू. परमार, बी. डी. खोब्रागडे यांसारखे नेते १९५७ मध्ये संसदेवर निवडून गेले होते. या संघटनेची सुरुवातीची दोन वर्षे सुवर्णकाळ म्हणून गणली जातात. पण ६०च्या दशकात काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर या पक्षाचे जणू अस्तित्वच नष्ट झाले. दरम्यानच्या काळात आंबेडकरी विचारांनी भारून उठलेल्यांनी त्यांचा विद्रोह साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला व दलित साहित्य नावाचा भारतीय साहित्यक्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवणारा साहित्यप्रकार जन्मास आला.पण केवळ साहित्यातून क्रांती होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर ‘ब्राह्मणांच्या बोळात आम्हाला कोनाडा नको तर आम्हाला या जमिनीवरच राज्य करायचे आहे. विजेच्या कल्लोळाप्रमाणे आमची क्रांती चमकेल,’ अशी घोषणा देत दलित पँथरचा जन्म झाला. मुंबईतल्या झोपडपट्टीत जन्माला आलेली ही संघटना काही काळातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली व जातीयवादी गावगुंडांना या काळात पळता भुई थोडी झाली. काँग्रेसचा पराभव करणे आणि रस्त्यावरील लढाईत शिवसेनेला नामोहरम करणे, ही या संघटनेची ध्येयधोरणे होती. उल्लेखनीय बाब म्हणजे याच काळात नक्षलवादी चळवळीचाही उदय होत होता. त्यामुळे या दोन्ही संघटना विद्रोहाचे प्रतीक बनून समोर येत होत्या. जातीसंघर्षाचा लढा वर्गसंघर्षात तर परावर्तीत होणार नाही, अशी भीती त्या वेळी उजव्या विचारसरणीच्या तर आशा डाव्या विचारसरणीच्या पत्रकारांनी त्या वेळी व्यक्त केली होती. दलित पँथरने केवळ महाराष्ट्रातील राजकारण बदलले असे नाही तर देशभरातच तिची प्रतिक्रिया उमटू लागली होती. दलित आणि हिंदूंमध्ये कर्नाटकात जोरदार संघर्ष पेटला. त्यातून १९७४ मध्ये राजव्यापी दलित संघर्ष समितीची स्थापना झाली. बिहार आणि आंध्र प्रदेशात दलित तरुणांच्या या लढय़ाला नक्षलवादी चळवळीचाही पाठिंबा लाभत होता.दलित पँथरची चळवळ जोर धरतेय ना धरतेय तोच तिच्यात पुन्हा एकदा फूट पडली. आंबेडकरवादी (बौद्ध धम्मवादी)आणि मार्क्‍सवादी असे दोन गट पडले. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित दलितांच्या उद्धाराचे लक्ष्य साध्य करण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. त्याच काळात पँथरवर हिंसाचाराचे आरोपही झाले. पँथरमधील सहभागी तरुण बहुतांशी झोपडपट्टीतील होते. मार्क्‍सवादी जाहीरनाम्याच्या धर्तीवर दलित पँथरचा जाहीरनामा त्यांना मान्य नव्हता. ‘आमच्या बहिणींच्या अंगावर हात टाकणा-यांचे हात उखडून टाकायला हवेत,’ हा त्यांचा रोकडा सवाल होता. आर्थिक-सामाजिक कार्यक्रम देण्यात ही संघटना अपयशी ठरली. बाबासाहेब आंबेडकरांना मात्र दलितांची समग्र प्रगती अपेक्षित होती.त्यानंतरही बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्ष स्थापन करण्यासाठी उत्तर प्रदेशात कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाच्या रूपात प्रयत्न सुरू केले. ‘जाती तोडो-समाज जोडो’ अशी घोषणा देत ही संघटना उभी राहिली. या संघटनेने आतापर्यंत तीन वेळा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवली असून या वेळी तर कोणत्याही आघाडीविना मायावती यशस्वीपणे उत्तर प्रदेशचा कारभार चालवत आहेत. यातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे सुरुवातीच्या काळातील निवडणूक चिन्ह हत्ती आज बहुजन समाज पक्षाकडे आहे. आंबेडकरांनंतरच्या दलित चळवळीचा आढावा घेत असताना प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाला वगळून चालणार नाही. पँथरच्या मुशीतून तयार झाले नसले तरी त्यांचा दृष्टिकोन व्यापक होता. त्यातूनच त्यांची भारिप-बहुजन महासंघ ही संघटना उदयाला आली.या सर्व घटना घडत असतानाच, रिपब्लिकन पक्ष मात्र, स्वत:चे अस्तित्व हरवून बसला होता. पक्षाचे आमदार, खासदार प्रस्थापित पक्षांच्या पाठिंब्यावर निवडून येत होते व त्या बदल्यात या नेत्यांनी संपूर्ण समाजाला या पक्षांच्या दावणीला बांधून ठेवले. त्यातच बाबासाहेबांना अपेक्षित सर्व जातीधर्माना सोबत घेऊन चालणारा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात अपयश आल्याचे ढळढळीत सत्य समोर आहे व रिपब्लिकन पक्ष आजही आपल्या अस्तित्वाच्या शोधात अंधारात भरकटताना दिसतो आहे.

Thursday, July 22, 2010

भोतमांगेंना न्याय मिळेल?

नितीन सावंत
खैरलांजी प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असं राज्य सरकारनं सांगितलं आहे. पण मुळात पुरावेच तकलादू असतील (म्हणजे तसे केले असतील) तर सर्वोच्च न्यायालयातही दाद मागून काय फायदा होणार, या प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकत नाही.माणुसकीला काळीमा फासणा-या खैरलांजी हत्याकांडातल्या सहा आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचानिर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं या आठवड्यात जाहीर केला. सत्र न्यायालयानं या प्रकरणातल्या सहा आरोपींनीफाशीची तर दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा दिली होती. या प्रकरणातल्या तीन आरोपींना न्यायालयानं मुक्त केलं होतं. जगदीशमांडलेकर, रामू धांडे, सकरू बिंजेवार, शत्रुघ्न धांडे, विश्वनाथ धांडे, प्रभा मांडलेकर यांची फाशीची शिक्षा रद्द झाली असून गोपालबिंजेवार आणि शिशुपाल धांडे यांची जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवण्यात आली आहे.उच्च न्यायालयाच्या या निकालानंतर राज्यभरात दलित समाजात संतापाची प्रचंड लाट उसळली असून सरकारनं या खटल्याची योग्यरीतीनं हाताळणी न केल्यानंच या दोषींची फाशीची शिक्षा टळली असा आरोप सध्या केला जात आहे. दलित समाजात हा असंतोषइतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्याची कधीही ठिणगी पडू शकते आणि 2006च्या नोव्हेंबर-डिसेंबरमधल्या घटनांची पुनरावृत्ती होऊशकते.विदर्भातल्या भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजी गावातल्या भय्यालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका, मुले सुधीर आणिरोशन यांची 29 सप्टेंबर 2006 रोजी निर्णृण हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडातून भोतमांगे थोडक्यात बचावले. उल्लेखनीयबाब म्हणजे इतकं मोठं नृशंस हत्याकांड होऊनही त्याची खबर आपल्या इथल्या पुरोगामी माध्यमांना तब्बल तीन ते चार दिवसांनीलागली. बरं हे प्रकरण उघड झाल्यावरही इथल्या उजव्या विचारसरणीच्या पक्षांसह समाजाला शहाणपणा शिकवण्याचा मक्ता स्वतःकडेघेतलेल्यांनी हे तर जमिनीच्या वादातून झालं. त्याचा जाती-पातीशी संबंध काय, अशी शहाजोग भूमिका घेतली. पण हे हत्याकांडजातीयवादी मानसिकतेतूनच झाल्याचे पुरावे समोर आल्यावर या सर्वांची बोलती बंद झाली. पण, खेदाची बाब म्हणजे सुरेखा, प्रियंकायांचे मृतदेह विवस्त्रावस्थेत सापडले होते, पण ते पाण्यात फेकून दिल्याने त्यांच्यावर अत्याचार झाला की नाही, हे सिद्ध करू शकणारेपुरावे मात्र वाहून गेले होते.या अमानुष घटनेनंतरही सरकारला जाग आली नव्हती. शेवटी मोठ्या प्रमाणावर राज्यात आणि देशभरात निदर्शनं झाल्यावरसरकारला या प्रकरणी कारवाई करण्याची इच्छा झाली. तत्कालीन बोलघेवडे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांनीघाईगडबडीत उज्ज्वल निकम यांची या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली. उल्लेखनीय बाब म्हणजे त्यांची नेमणूकव्हावी, अशी मागणी कोणत्याही दलित संघटनेनं केली नव्हती, अशी माहिती आता समोर येत आहे. या प्रकरणातील एक साक्षीदारमुकेश पुसम याने भोतमांगे कुटुंबीयांना मारहाण होत असताना जातीवाचक शिविगाळ होत असल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर ज्याठिकाणी या लोकांना मारहाण झाली तेथील रक्ताचे नमुने घेण्यातही तपास यंत्रणांना अपयश आल्याचे सत्र न्यायालयाच्या निदर्शनासआणून दिलं होतं. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासकामात सुरुवातीपासून हलगर्जी झाल्याचं निदर्शनास आलं होतं. भोतमांगे यांचेनातेवाईक सिद्धार्थ गजभिये यांच्या एका प्रकरणात सुरेखा व प्रियंका यांनी साक्ष दिल्याचा राग मनात धरून हे हत्याकांड झाल्याचादावा करण्यात आला. पण इतक्या क्षुल्लक कारणावरून चौघांची हत्या करणं, मनाला तरी पटत नाही. बरं सुधीर आणि रोशन या दोघाभावंडांपैकी एकजण अंध होता. त्याची हत्या करण्यामागचं कारण काय? तर महारांना आपल्या गावात थारा द्यायचा नाही, हीआतापर्यंतची मानसिकताच त्यामागे असणार हे स्पष्ट आहे. पण, न्यायालयानं हे कलमच सर्व आरोपींवरून काढून टाकलं. सरकारनंहा खटला योग्य रीतीनं लढवला नाही, असं मत त्यामुळे तयार झालं आहे.या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असं राज्य सरकारनं सांगितलं आहे. पण मुळात पुरावेच तकलादू असतील(म्हणजे तसे केले असतील) तर सर्वोच्च न्यायालयातही दाद मागून काय फायदा होणार, या प्रश्नाचं उत्तर काही मिळू शकत नाही.