Showing posts with label बाइझिंग. Show all posts
Showing posts with label बाइझिंग. Show all posts

Thursday, October 7, 2010

भविष्याची गरज

गेल्या काही वर्षामध्ये बाइक्सची वेगवेगळी मॉडेल्स ग्राहकांना आकृष्ट करत आहेत. आजकाल सीएनजी, एलपीजीसारख्या पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर दुचाकी वाहनांसाठी कसा करता येईल, यावर प्रयोग होत आहेत. चार्जिगची सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्यास बॅटरीवर चालणाऱ्या बाइक्सही लोकप्रिय होतील..

धूमचित्रपटाने भारतातील प्रेक्षकांना मोटारसायकलींच्या एका वेगळ्या विश्वाची ओळख करून दिली. दुचाकी म्हणजे केवळ प्रवासाचं साधन इतकीच त्यांची ओळख होती. पण,मोठमोठी वाहनं जाणार नाहीत, अशा ठिकाणी वेगात जाण्याची तिची खुबी पाहून या वाहनाच्या प्रेमात सगळं जग पडलं आहे. गेल्या काही काळात तर बाइक्सच्या वेगवेगळ्या श्रेणी ग्राहकांना आकृष्ट करू लागल्या आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने होत असताना, इथल्या तरुण ग्राहकांच्या हातात मोठय़ा प्रमाणावर पैसा खुळखुळू लागला आहे. त्यांना आकृष्ट करण्यासाठी देशातल्या अनेक दुचाकी बनवणा-या कंपन्यांसह चारचाकी किंवा मोठय़ा वाहनांच्या उत्पादक कंपन्यांनाही दुचाकीची ही वाढती बाजारपेठ खुणावू लागली आहे. या बाजारपेठेच्या वाढीचा वेग इतका आहे की गेल्या वर्षीच्या जागतिक मंदीच्या काळातही- सर्व उत्पादनांचा विक्रीचा आलेख घसरलेला असताना, ही बाजारपेठ मात्र दमदार वाटचाल करत होती.

एकीकडे पेट्रोलसारख्या इंधनाची टंचाई आणखी काही काळात भासणार असल्याचे इशारे दिले जात असताना, काही दुचाकी उत्पादकांनी थेट विजेवर चालणाऱ्या दुचाकी बाजारात आणल्या आहेत. सध्या या वाहनांची क्षमता कमी असली तरी भविष्यात त्यांच्या चार्जिगची सोय सर्वत्र उपलब्ध होऊ लागल्यावरच त्यांचा वापर वाढणार, हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर पर्यावरणस्नेही सीएनजी, एलपीजीसारख्या इंधनांचा वापर दुचाकी वाहनांसाठी कसा करता येईल, याचीही चाचपणी केली जाऊ लागली आहे.

थ्री इडियट्सचित्रपटातील रांचो अर्थात फुनसुक वांगडूने स्कूटरच्या इंजिनाचा वापर करून दैनंदिन गरजेची अनेक उपकरणे चालवली होती. पण हे केवळ सिनेमापुरतेच मर्यादित नाही. ग्रामीण भागातही असे अनेक फुनसुक वांगडू आहेत, ज्यांनी त्यांच्या दुचाकींचा वापर अशा उपकरणांसाठी केला आहे. त्यामुळे या वाहनाला नाक मुरडण्यापेक्षा त्याचे उपयोग, त्याचे फायदे पाहणं ही काळाची गरज आहे. कारण लांबचलचक वाहतूक कोंडीत बडीबडी वाहनं अडकून पडलेली असताना हेच वाहन त्यातून लीलया बाहेर पडतं. पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर केला आणि दुचाकींसाठी वेगळ्या लेन ठेवल्या तर नक्कीच हवामानबदलाच्या संकटावर काही अंशी तरी मात करता येणं शक्य होईल. (पर्यावरणाबरोबरच स्वत:च्या शरीराच्या संवर्धनात साध्या सायकलींना पर्याय नाही, हे मात्र तितकंच खरं आहे.)

गेल्या तीन महिन्यांच्या काळात आपण या दुचाकी वाहनांच्या विविध प्रकारांची, त्यांच्या उपयोगीतेची, त्यांच्यावरून केल्या जाणा-या सफरींची तसंच त्यांच्या सफरींबाबत चर्चा केली. पुरेशी काळजी घेतली, बाइक्सची योग्य देखभाल केली तर सर्वाचंच बाइझिंग आनंददायी ठरेल.

Saturday, October 2, 2010

बाइकसंगे उडा

घरोघरची मातृदैवतं ‘गाडी उडवणं कमी कर जरा’ असा सल्ला देतात, त्यातलं लाक्षणिक अर्थाचं हे ‘उडवणं’ नाही की बाइकला काही पंख लावून उडण्याचीही ही स्पर्धा नाही.. उंच टेकाडावरून बाइकसह हवेत स्वत:ला भिरकावून देण्याची ही स्पर्धा आहे!

मोटरसायकलवरच्या खेळांमध्ये धोकादायक रस्त्यांवर वा-याच्या वेगाने धावण्याच्या स्पर्धासह चिखलातून तोल सावरत मार्ग शोधणे किंवा अगदी गंमत म्हणून रानावनातून भटकण्याच्या स्पर्धाचाही- म्हणजेच ऑफरोडिंगचा समावेश होतो. पण या भागात आपण अगदी हवेत उड्डाण करण्याच्या स्पर्धाची माहिती घेत आहोत. घरोघरची मातृदैवतं गाडी उडवणं कमी कर जराअसा सल्ला देतात, त्यातलं लाक्षणिक अर्थाचं हे उडवणंनाही की बाइकला काही पंख लावून उडण्याचीही ही स्पर्धा नाही.. उंच टेकाडावरून बाइकसह हवेत स्वत:ला भिरकावून देण्याची ही स्पर्धा आहे!

फ्रीस्टाइल मोटोक्रॉस किंवा एफएमएक्स नावानं ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेत एकेक स्पर्धक येऊन आपले बाइकवरचं संतुलन दाखवून समोरच्या पंचांसह जनतेकडून कौल आजमावतो.

बिग एअर आणि फ्री स्टाइल मोटोक्रॉस अशा दोन प्रकारांत ही स्पर्धा होते. त्यातल्या बिग एअर प्रकारात प्रत्येक स्पर्धकाला दोन जंप मारण्याची संधी दिली जाते. सुमारे 18 मीटर (60 फूट) लांबीच्या रॅम्पवरून हे स्पर्धक हवेत झेप घेतात. त्यात त्या स्पर्धकाच्या उडीतील नावीन्य, त्याचे कौशल्य, अवकाशात किती वेळ राहिला याच्या आधारे स्पर्धकाला 100 पैकी गुण दिले जातात.

फ्रीस्टाइल मोटोक्रॉस ही स्पर्धा या प्रकारातील जुनी स्पर्धा. त्यात सुमारे दोन हेक्टरच्या परिसरात तयार केलेल्या ट्रॅकवर 90 सेकंद ते 14 मिनिटांच्या कालावधीत विविध स्पर्धाप्रकार करून दाखवावे लागतात. त्यात विविध लांबीच्या उडय़ा घेण्यासह वेगवेगळ्या कठीण वळणांवरून त्यांना गाडी चालवावी लागते. या स्पर्धेतही पंचांचे एक पॅनेल असते आणि तेही 100 गुणांच्या आधारे स्पर्धकाला त्याचे कौशल्य पाहून गुणदान करतात.
  • बॅकलिफ्ट

या स्पर्धाप्रकारातील सर्वात अवघड भाग मानला जातो. त्यात गाडीच्या मागच्या सीटवर बसून किंवा उभे राहून विविध कौशल्याचे प्रकार केले जातात. तेही गाडी हवेत असताना. मात्र हा खेळ अत्यंत धोकादायक आहे.. त्यात स्पर्धकांच्या जिवावर बेतल्याचेही प्रकार घडले आहेतं.

Thursday, September 16, 2010

ऑफरोड


काहीतरी वेगळं करून दाखवणा-या मंडळींना नाकासमोर चालणारी मंडळी वेडं म्हणतात मात्र हे वेडच त्यांची पॅशन असते. सरळ, गुळगुळीत रस्ता सोडून ऑफरोड बाईक चालवणाऱ्यांच्या स्पर्धा नियमित घेतल्या जातात.याचं प्रमाण पश्चिमेकडील देशांत जास्त आहे.भारतातही त्याची सुरुवात झाली आहे. या स्पर्धासाठीचे ट्रॅक, स्पर्धकांसमोरची आव्हानं पाहताना काळजाचा ठोका चुकतो.

काही जणांना कायमच जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवायचं असतं. आपणही आपल्या आजूबाजूला अशी मंडळी नेहमी बघत असतो. या मंडळींना नाकासमोरचालणारी मंडळी विक्षिप्त किंवा वेडे वगैरे म्हणतात. पण हे वेडच त्यांची पॅशन असते. नाहीतर साधे, सरळ, गुळगुळीत रस्ते सोडून चिखलात भरधाव बाइक्स चालवणारे जन्माला आले असते का? परदेशात अशा प्रकारे रस्ता सोडूनबाइक चालवणा-यांच्या स्पर्धा नियमित घेतल्या जातात आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो. या स्पर्धासाठीचे ट्रॅक, स्पर्धकांसमोरची आव्हानं इतकी अचंबित की विविध क्रीडावाहिन्यांवर या स्पर्धा पाहत असतानाही काळजाचा ठोका चुकतो.

बाइक्सचा वापर दैनंदिन व्यवहारात करण्यासह विविध क्रीडा प्रकारांसाठी नियमित करण्याचं प्रमाण पश्चिमेकडील देशांत जास्त आहे. सतत नाविण्याच्या शोधात असणा-या या देशांमध्ये मोटोक्रॉसचीस्पर्धा तर प्रचंड लोकप्रिय आहे. मोटारसायकल आणि सायकलींची क्रॉस कंट्री स्पर्धा या दोन स्पर्धाचा मेळ साधून हा शब्द तयार करण्यात आला आहे. बाइकच्या नियमित शर्यतींपेक्षा ही स्पर्धा पूर्णत: वेगळी असते. ही स्पर्धा पूर्णत: नैसर्गिक ट्रॅकवर किंवा त्यासाठी खास तयार केलेल्या चिखल, मातीच्या ट्रॅकवर घेतली जाते. त्यात काही अंतरावर उंचवटे तयार केलेले असतात. चिखलातून जाताना गाडी घसरण्याची भीती असते. त्यामुळे संतुलन साधत, गाडीचा कमाल वेग अजिबात कमी न करता ठरवून दिलेलं अंतर पूर्ण करायचं असतं. शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा म्हणून मोटोक्रॉसकडे पाहिलं जातं.

या स्पर्धेसाठी दणकट इंजिनाच्या पण कमी वजनाच्या बाइक्स लागतात. प्रचंड धक्के सहन करावे लागत असल्याने या गाड्यांचं सस्पेंशनही मजबूत ठेवावं लागतं. ब्रिटनमधील बीएसए कंपनी अशा प्रकारच्या मोटारसायकल बनवण्यात दुस-या महायुद्धाच्या काळात आघाडीवर होती. वास्तविक पाहता 1924 पासून अशा स्पर्धाना औपचारिक सुरुवात झाली असली तरी दुस-या महायुद्धानंतर त्यांना लोकप्रियता मिळू लागली. बीएसए कंपनीच्या मोटारसायकल या स्पर्धामध्ये निर्विवाद वर्चस्व राखून होत्या. 1952 मध्ये एफआयएमने युरोपियन विजेतेपद स्पर्धा घेण्यात आली. 1957 मध्ये या स्पर्धेला जागतिक दर्जाची स्पर्धा म्हणून मान्यता देण्यात आली. ग्रँड प्रिक्स म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेसाठी 450 सीसी, 250सीसीच्या गाडय़ांसह खुल्या वर्गातही ही स्पर्धा घेतली जाते. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी 16 फे-या घेतल्यानंतर तिची अंतिम फेरी होते. अंतिम फेरीची स्पर्धा 35 मिनिटांची असते. त्या शिवाय स्पर्धकाला दोन लॅप्स पूर्ण करायचे असतात.

या स्पर्धेशिवाय एएमए मोटोक्रॉस चँपियनशिपहीदेखील स्पर्धा प्रसिद्ध आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला या स्पर्धेच्या प्राथमिक फे-यांना सुरुवात होते व अंतिम फेरी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत होते. या स्पर्धेच्याही 12 फे-या होतात व त्यातून अंतिम फेरीसाठीचे स्पर्धक निवडले जातात. 250 मोटोक्रॉस क्लास व 450 मोटोक्रॉस क्लास या दोन श्रेणींत ही स्पर्धा होते.

मोटोक्रॉस दे नेशन’ (मोटोक्रॉस ऑफ नेशन्स) ही स्पर्धा सर्व मोटोक्रॉस स्पर्धाचे हंगाम संपल्यानंतर वर्षअखेरीस होते. त्यात प्रत्येक देशाच्या तीन स्पर्धकांना सहभाग घेता येतो. या स्पर्धेचे ठिकाण दरवर्षी बदलते राहिलेले असले तरी बेल्जियम,अमेरिका, ब्रिटन या देशांचं या स्पर्धेवर ब-यापैकी वर्चस्व राहिलं आहे.
  • भारतातही सुरुवात

या स्पर्धेची लोकप्रियता भारतातही गेल्या काही काळात वाढू लागली असली तरी त्यासाठीचे खास ट्रॅक काही आपल्याकडे उपलब्ध नाहीत. स्टेडियममध्येच कृत्रिमरीत्या हे ट्रॅक तयार केले जातात. या स्पर्धेकडे देशातली तरुणाई हळूहळू वळू लागली असून स्पर्धेच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीवरूनच त्याचा अंदाज येतो. सध्या तरी होंडा, सुझुकी आणि यामाहा या तीन बडय़ा कंपन्या भारतात या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तरीही प्रामुख्याने काही खासगी क्लब्जमार्फतच या स्पर्धेला चालना मिळते. पुण्यात दरवर्षी होणारी गल्फ डर्ट ट्रॅकवरची स्पर्धा तशी सर्वाच्याच परिचयाची असली तरी हैदराबाद,बडोदे, अहमदाबाद या ठिकाणीही आता या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. वीर पटेल या बडोद्याच्या युवकाने दोन वर्षापूर्वी इराणमध्ये झालेली मोटोक्रॉस स्पर्धा जिंकून सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहेच. ही स्पर्धा जिंकली तेव्हा तो अवघा 17 वर्षांचा होता.

कॅलिफोर्नियातील एका संस्थेने काही काळापूर्वी तेथील फूटबॉलपटू, रग्बी खेळाडू, धावपटू यांच्या तुलनेत मोटोक्रॉसमध्ये सहभागी होणा-यांची क्षमता तपासणारी चाचणी घेतली होती. त्यात हृदय, स्नायू यांच्या कार्यक्षमतेत मोटोक्रॉसमध्ये सहभागी होणारे खेळाडू सर्वाधिक फिट ठरले. 35 मिनिटांच्या या स्पर्धेदरम्यान त्यांच्या हृदयाचे ठोके तब्बल 180 ते 190 पर्यंत पोहोचलेले असतात. 160 किलो वजनाच्या बाइकचे ओझे सांभाळत त्यांना पूर्ण वेगात ही स्पर्धा पार पाडायची असते. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणे हे काही ये-यागबाळ्याचे काम नाही, हेच दाखवून देते.


Saturday, September 11, 2010

जुनी बाइक, नवा लुक..

आपली बाइक इतरांपेक्षा वेगळी दिसावी अशी क्रेझ तरुणांमध्ये खूप असते. पण त्यासाठी बाइक ‘सजवण्या’चा मार्ग आत्ताच्या तरुणांना गावंढळ वाटू लागलाय. आता क्रेझ आलीय अलॉय व्हील्स, ओपन चेन आणि ‘स्पोर्टस बाइक’च्या लुकची! मात्र एखादं वाहन ओळखू न येण्याइतकं त्याचं रूप पालटणं हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो..

एखादी ललना जशी तरुणांचं लक्ष वेधून घेते, तसंच तरुणांचं लक्ष वेधून घेण्याचं काम बाइक्स करत असतात. मुळात बाइक वापरणा-यांचा वयोगट सहसा पस्तिशीतल्या आतला असतो. विशेषत: कॉलेजकुमारांमध्ये आपली बाइक सर्वापेक्षा वेगळी दिसावी, अशी एक क्रेझ असते. त्यांच्या या क्रेझची‘दखल’ दुचाकींचं उत्पादन करणा-या कंपन्या घेतात आणि दरवर्षी नवनवी मॉडेल्स बाजारात आणत असतात. त्यामुळे अगदी गेल्या वर्षी घेतलेली बाइकही या वर्षी जुनी झाली, असंच ब-याच जणांचं म्हणणं असतं. घरून भरभक्कम पॉकेटमनी मिळत असेल तर अनेक जण दरवर्षी नवी बाइक खरेदी करणारेही आहेत. कॉलसेंटरमध्ये काम करणारेही नवनव्या‘स्किमां’तून दरवर्षी बाइक बदलताना दिसतील. पण जुनीच बाइक नव्या स्वरूपात मांडणारीही अनेक हौशी मंडळी दिसून येतात.

या वेळच्या ‘बाइझिंग’मध्ये आपण बाइक्सचं मॉडिफिकेशन या विषयावरच चर्चा करणार आहोत. मुख्यत: आपली बाइक इतरांपेक्षा वेगळी दिसावी, म्हणून अनेक जण आपल्या बाइक्समध्ये बदल घडवत असतात. मॉडिफिकेशनमध्ये गाडीचं रंगरूप बदलणं आणि गाडीचा परफॉर्मन्स वाढवणं, असे दोन भाग येतात. आपल्या देशात प्रामुख्यानं गाडीचं बाह्यरूप बदलण्यावरच भर दिला जातो.

गावाकडच्या जुन्या बुलेट अनेकांच्या लक्षात असतील. या गाड्यांच्या हँडलला सोनेरी रंगाच्या कागदाच्या, कपड्यांच्या झिरमिळ्या सोडलेल्या असायच्या. गाडीला चकचकीत आरसे, आरशांवर चित्रं (मुख्यत: तरुणींच्या, लिपस्टिक लावलेल्या ओठांची), पाठीमागच्या मडगार्डखालच्या रबर शीटला लावलेले लाइट, वेगळा आवाज करणारे हॉर्न आणि जमेल तशी सजावट केलेली असायची. (‘राजाबाबू’ गोविंदाची बुलेट आठवून पाहा.)

पण, आजच्या तरुणाईच्या दृष्टीने अशी सजावट गावंढळपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे आपल्या जुन्या बाइकच्या सजावटीसाठी ही मंडळी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. यातली महत्त्वाची म्हणजे, गाडीचा मूळ रंग बदलणं. अनेक जण गाडीचा मूळ रंग बदलून नवीन रंग देतात. गाडीचे मूळ स्टिकर काढून तिच्यावर फॅन्सी स्टिकर चिकटवले जातात. (अंगावर टॅटू गोंदावे त्याप्रमाणे) मोटारसायकलचा मागचा टायर बदलण्यासही अनेकांची पसंती असते. (रुंद टायरमुळे गाडीला अधिक चांगली पकड मिळते.) अधिक रुंद टायर गाडी जुनी झाली की बसवले जातात. हल्ली नवी गाडी घेताना पूर्वीप्रमाणे स्पोक असणारी व्हील मिळत नाहीत तर अलॉय व्हील मिळतात. त्यामुळे जुनी चाके बदलून त्या जागी अलॉय व्हील बसवण्याची फॅशनही हल्ली ‘इन’ आहे. काहीशी महागडी असली तरी ही व्हील अधिक टिकतात. गंजण्याचीही फारशी धास्ती नसते. बाइकची चेनदेखील गाडी सजवण्याचा एक भाग असतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कव्हरमध्ये चेन ठेवण्यापेक्षा ती खुली ठेवून बाइकला अधिक ‘बोल्ड’ लूक देण्याचा प्रयत्न करणारेही अनेक जण आहेत.

दुसरा एक प्रकार म्हणजे, गाडीची दर्शनी बाजू बदलणं. त्यात हँडल अधिक खाली झुकवून स्पोर्ट्स बाइक्सचा फील आणला जातो. सस्पेन्शन बदललं जातं. गाडीची हेडलाइट बदलली जाते. जरा अधिक पैसा हातात असेल तर दर्शनी भाग अधिक आकर्षक केला जातो.

दुसरा प्रकार म्हणजे, गाडीचा परफॉर्मन्स बदलणं. त्यासाठी इंजिनची क्षमता वाढवली जाते, पेट्रोल कमी वापरलं जावं,म्हणूनही इंजिनात बदल केले जातात. अनेक हौशी मंडळी आपल्या बाइकचे मडगार्ड्स काढून टाकतात. इंधनाची टाकी बदलतात. त्यातूनही गाडीचं एक वेगळंच रूप समोर येतं. गाडीला वेगळे सायलेन्सर लावले जातात. त्यातले काही कर्णकर्कश्श आवाज करणारे असतात तर काही दिसायला आकर्षक असतात. अशा प्रकारे सायलेन्सर बदललेल्या गाड्या आपल्याला सर्रास दिसतात.

बजाज पल्सर 200 सीसीची बाइक पूर्णपणे मॉडिफाय करून तिला महागड्या यामाहा आर-वनचं रुपडं द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे किमान महिनाभराचा वेळ आणि खिशातही 50 हजार रुपयांपर्यंतची रोकड हवी. हीरो होंडा सीबीझी,पल्सर, युनिकॉर्न, टीव्हीएस अपॅची अशा मोठ्या गाड्यांना स्पोर्ट्स बाइक्सचं रूप देण्यासाठी देशात अनेक ठिकाणी अनेक जण कार्यरत आहेत.

मात्र, आपल्या गाडीचं रुपडं बदलण्याआधी तशी परवानगी आरटीओ, वाहतूक पोलिसांकडून मिळते की नाही, याची शहानिशा करणंही गरजेचं आहे. गाडीचा रंग बदलणं, तिच्या आहे त्या स्वरूपात बदल करणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊनच हे मॉडिफिकेशन करावं.


Monday, September 6, 2010

अपघातांच्या गमतीजमती!..

बाइकवर ‘प्रेझेन्स ऑफ माइन्ड’ नसेल, तर अपघात होणार हे नक्की. पण हे अपघात नेहमीच दुखापत करणारे आणि गंभीर असले पाहिजेत असं कुठेय? काही गमतीशीर अपघातही होतातच, अशा अपघातांचे हे काही किस्से..

बाइक्सचे अपघात नेहमी अतिवेगामुळे किंवा पावसाळ्यातल्या निसरड्या/ एरवीही धोकादायक असलेल्या रस्त्यांमुळेच होतात असं नाही. प्रेझेन्स ऑफ माइन्ड हा बायकिंगमधला महत्त्वाचा भाग, त्यामुळे तुमचं चित्तच था-यावर नसेल, मेंदू न वापरताच तुम्ही गाडीवर असाल, तर अपघात होणारच. पण अशा बिनमेंदूच्या अपघातांपैकी सगळेच गंभीर असतात असं नाही.. काही गमतीशीर अपघातही होतात!

एक अपघात आठवतो, म्हणजे त्यात कोणालाच दुखापत झाली नाही, पण तो बघणा-यांची मात्र चांगलीच करमणूक झाली होती. एक जोडपं, पार्क केलेली बाइक काढून निघण्याच्या तयारीत होतं. तरुण गाडीवर बसला, किक मारली आणि पाठीमागे मैत्रीण बसली असं समजून गाडीचा गियर टाकून पुढेही नेली. मात्र, टिपिकल महिला स्टाइलमध्ये गाडीवर बसण्याच्या तयारीत असलेली ती तरुणी मात्र, बाइकवर बसलीच नव्हती. बसण्याच्या तयारीत असतानाच, तिच्या मित्राने गाडी पुढे नेल्याने ती मात्र, दाण्णकन जमिनीवर आदळली. विचार करा, बाजूला असलेल्यांची हसून हसून काय वाट लागली असेल.

अजून एक किस्सा सांगतो, म्हणजे तो ऐकलेला आहे, पण हेल्मेटसक्ती झाली त्या सुरुवातीच्या काळात हे प्रकार खूप ठिकाणी झाले असतील. एक बाइकस्वार पानाच्या गादीजवळ गेला. आधीच पोटात थोडीफार ढकलली होती. त्यात त्याने एक पान घेतलं, अगदी थाटात त्याने ते तोंडात सरकवलं, मग हेल्मेट घातलं आणि गाडीला किक मारली. काही मीटर पुढे गेल्यावर तो आणि त्याची बाइक रस्त्यावर आडवी पडलेले दिसले.

परिसरातलाच असल्याने सर्व जण धावत त्याच्याकडे गेले. काय झालं, काय झालं, असं विचारू लागले. त्यानं सांगितलं. हेल्मेटची कधीच सवय नव्हती. त्यामुळे हेल्मेट घालून त्याची काच बंद केली आहे, हे ध्यानातच नव्हतं. हेल्मेट नाही, असं समजून पानाची पिंक टाकली आणि समोरचं दिसेनासं झालं..प्रत्यक्ष पाहिलेला एक अपघात आठवतो, तो मात्र हसावं की रडावं अशी आम्हा सर्वाचीच अवस्था करणारा होता. एकानं वडिलांची जुनी बुलेट सकाळी-सकाळी काढली होती. घरातून अगदी सुसाट वेगानं बाहेर पडला. नाक्यावर मित्रांनी त्याला पाहताच, हाक मारली आणि या महाभागानं मागं वळून पाहिलं,तोवर त्याची बुलेट रस्त्याच्या मधल्या डिव्हायडरवर चढलीही होती. पुढच्या क्षणाला तो रस्त्यात आडवा झाला.

स्लिपरी मिस्टेक

पावसाळ्यात बाइक स्लिप होण्याचे प्रसंग प्रत्येक बाइकस्वारांनी अनुभवलेले असतीलच.. आपल्यावर अशी वेळ आली की आपण दोष रस्त्यात सांडलेल्या ऑइलला देतो किंवा समोरच्या वाहनाला! पण आपण आपल्या गाडीची काळजी घेतली नसेल, वेगात असताना ‘टायमिंग’ चुकलं असेल किंवा धोक्याच्या खड्डय़ांचा आपल्याला अंदाजच नसेल, तर जिवावरही बेतू शकतं..

बाइकमुळे कामं खूप कमी वेळात होतात, खर्चही फारसा येत नाही.. बाइक चालवणा-याकडून नेहमी देण्यात येणारी ही कारणं असतात. ती खरीही आहेत. पण रस्ते अपघातांचा विचार केला तर आपल्या देशात बहुतांश अपघात बाइकस्वारांचेच होत असल्याचं दिसून येतं. बाइकच्या मोठय़ा अपघातांत कार वा इतर वाहनांप्रमाणे चालक वाचण्याची शक्यता फारशी नसतेच,चालक वाचला तरी आयुष्यभराचं अपंगत्व येतं. त्यामुळे ‘बाइझिंग’ कितीही आनंददायी असली तरी त्याचा आनंद काळजीपूर्वकच घ्यायला हवा.

बाइक्सचा सर्रास होणारा अपघात म्हणजे, गाडी स्लिप होणं, निसरडय़ा रस्त्यावरून बाइक्स हमखास घसरतात. ब-याचदा तर चालवणा-यालाही आपली गाडी कधी घसरली तेही कळत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा दिवसांत तर हे अपघात जागोजागी होतात. त्याला जबाबदारही बाइकस्वारच असतात. हल्ली मोठय़ा ताकदीच्या बाइक्स बाजारात आल्यात. त्या कशाही दामटल्या जातात. इतर वाहनं आरामात जात असताना, हे बाइकस्वार मात्र कानात वारं शिरल्याप्रमाणे जाणा-या या गाडय़ा पावसामुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्यावर हमखास घसरतात. प्रचंड वेगातली ही गाडी घसरली की हातपाय अगदी सोलून निघतात. डोक्यावर हेल्मेट नसेल तर बोलायलाच नको.

पावसाळ्याला सामोरं जाण्याआधी आपल्या गाडीचं संपूर्ण सव्‍‌र्हिसिंग करून घेणं गरजेचं असतं. गाडीतलं ऑइल बदललेलं हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीचे ‘टकलू’ झालेले टायर बदलायलाच हवेत. कारण अशा गुळगुळीत टायर्सना पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यांवर हवी तशी ग्रिप मिळत नाही. ऑइल बदलण्यावरून सुचलं, गाडी घसरण्यात या ऑइलचा मोठा वाटा असतो. एखाद्या गाडीतून झालेली ऑइलची गळती तिच्या मागच्या अनेक दुचाकींना घसरवण्यासाठी पुरेशी असते. ऑइलचा एखादा मोठा थेंबही, बाइक रस्त्यात आडवी करू शकतो. त्यामुळे ऑइल सांडलेलं आहे, असं दिसताच, बाइकचा वेग कमी करण्याबरोबरच त्या ठिकाणापासून दूर जाणं गरजेचं ठरतं.

दुसरा एक प्रकार म्हणजे घाई. ‘अति घाई अपघाताला निमंत्रण देई’ हे वाक्य एसटीच्या गाडय़ा, ट्रकवर ठळक अक्षरांत लिहिलेलं असतं, मात्र त्याकडे बाइकस्वार दुर्लक्ष करतात. क्षणाक्षणाला लेन बदलत वेडीवाकडी वळणं घेत जाणा-या गाडीच्या चालकाचं जरा जरी टायमिंग चुकलं की अपघात होणार, ही काळ्या दगडावरची रेघ. पावसाळ्याच्या दिवसांतही अशा प्रकारे वेडीवाकडी गाडी दामटणारे अनेक महाभाग असतात. त्यामुळे कितीही घाई असली तरी बाइकस्वारानं लेनचे नियम पाळायलाच हवेत. वेगाने जाणाऱ्या बाइकवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा दुपट्टा किंवा साडीचा पदर हमखास चाकाजवळ येतो. तो येऊ नये, याची काळजी घेतली नाही तर ते जिवावर बेतू शकतं. एक प्रकार सर्वच बाइकस्वारांनी पावसाळ्यात अनुभवला असेल. पुढे चारचाकी गाडी असेल आणि तिच्या मागून जाताना, बाइक्सही खड्डय़ात गेल्याच्या. चारचाकी वाहनं,लीलया हे खड्डे चुकवतात आणि सुरळीत निघून जातात. बाइकस्वारालाही पुढचा रस्ता स्वच्छ आहे, असं वाटतं, तो त्या खड्डय़ांत अडकतो.

त्यामुळे, बाइक चालवताना, पराकोटीची काळजी तर घ्यायलाच हवी. पण गाडीचीही कंडिशन व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे. दारू पिऊन गाडी न चालवणं, हेल्मेट वापरणं, शक्य असल्यास जीन्स, जॅकेट आणि ग्लोव्ह्ज वापरणं, अशी काळजी घेतली तर या बाइकिंगची झिंग आणखी वाढेल.


स्पोर्ट्स बाइकच्या वेगावर व्हा स्वार!

भारतीयांमधली बाइक्सची क्रेझ गेल्या काही काळात चांगलीच वाढली आहे. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला आणि हा चित्रपट रसिकांनी उचलूनही धरला. अगदी त्या चित्रपटांमध्ये टिपिकल बॉलिवूड मसाला ठासून भरलेला असला तरीही!

आतापर्यंत आपण सर्वसामान्यांना परवडणाऱ्या बाइकिंगची माहिती घेतली. अपवाद होता, तो केवळ क्रूझर बाइक्सचा. पण या भागात स्पेशलाइझ्ड बाइक्सची माहिती घेण्याचा प्रयत्न करू. ‘धूम’ किंवा ‘धूम टू’ चित्रपट सर्वानाच ठाऊक असतील. हे चित्रपट आतापर्यंतच्या सर्व चित्रपटांपेक्षा पूर्णत: वेगळे ठरले; कारण त्यात वेगळाच आणि धाडसी विषय हाताळण्याचा प्रयत्न केला होता. तो म्हणजे स्पोर्ट्स बाइक्सचा. भारतीयांमधली बाइक्सची क्रेझ गेल्या काही काळात चांगलीच वाढली आहे. त्याचाच फायदा घेण्याचा प्रयत्न या चित्रपटाने केला आणि हा चित्रपट रसिकांनी उचलूनही धरला. अगदी त्या चित्रपटांमध्ये टिपिकल बॉलिवूड मसाला ठासून भरलेला असला तरीही!

स्वयंचलित दुचाकी म्हणजे सायकलपेक्षा वेगवान प्रवासाचे साधन इतकीच या वाहनाची सुरुवातीला ओळख होती. त्यामुळे 1950 पर्यंत त्यात फारसे बदल झाले नाहीत. पण नंतरच्या काळात दुचाकीची संरचना बदलत गेली. अनेक नावीन्यपूर्ण मॉडेल्स उदयाला आली. त्यातलाच एक भाग म्हणजे स्पोर्ट्स बाइक. सर्वसाधारण बाइकपेक्षा दिसायला अगदी दणकट असणा-या या बाइक्सना पाहताच आपण त्यांच्या प्रेमात पडतो. बाइकचा समोरचा भाग, पाय ठेवण्याची जागा, इंधनाची टाकी, सायलेन्सर अशा प्रत्येक बाबतीत या गाडय़ांनी आपलं वेगळेपण जपलेलं दिसतं. त्यांच्या तांत्रिक बाबींचा ऊहापोह आपल्याला इथे करायचा नाही. पण थोडक्यात सांगायचं तर अतिवेगाने दौडण्यासाठी या गाडय़ांमध्ये अत्यंत शक्तिशाली इंजिन बसवलेलं असतं. वेगाने धावण्यासाठी हवेचा रोध कमी व्हावा, अशी त्यांची संरचना केलेली असते. त्यामुळे अशी गाडी चालवताना अगदी इंधनाच्या टाकीवर झुकून ती चालवावी लागते. गाडीचे अनावश्यक वजन कमी करण्याचा प्रयत्नही केलेला असतो. त्यामुळे त्यात अतिउच्च दर्जाची साधनसामग्री वापरली जाते. अतिवेगाने धावणा-या या गाडीवर तातडीनं नियंत्रण मिळावं, यासाठी त्यांच्यात शक्तिशाली डिस्क ब्रेक्सचा वापर केला जातो. डिस्क ब्रेक्स हल्ली सर्वच बाइक्समध्ये मिळतात. पण स्पोर्ट्स बाइक्समध्ये क्षणात गाडी थांबवण्यासाठी दुहेरी डिस्क ब्रेक्स असतात. त्याचबरोबर रस्त्याची घट्ट पकड मिळावी आणि चांगलं नियंत्रण मिळावं, यासाठी त्यांचे टायरही सर्वसामान्य बाइक्सच्या तुलनेत चांगलेच रुंद असतात.

स्पोर्ट्स बाइक्स असे या श्रेणीतील गाडय़ांना म्हटलं जात असलं तरी प्रत्यक्षात या गाडय़ांच्या स्पर्धा केवळ युरोप,अमेरिकेतच होतात. बाकी या गाडय़ांचा वापर खेळांसाठी फारसा होत नाही. पण या गाडय़ांच्या स्पर्धा पाहणं हादेखील एक थरारक अनुभव असतो. वळणांवर या गाडय़ांच्या चालकांचे गुडघे अक्षरश: जमिनीशी घासत जातात. अशा वेळी या गाडय़ांचं चांगलं नियंत्रण राहावं, यासाठीचीही खास यंत्रणा स्पोर्ट्स बाइक्समध्ये असते.

आजघडीला बाजारात उपलब्ध असलेल्या स्पोर्ट्स बाइक आणि प्रत्यक्ष स्पर्धांमध्ये वापरल्या जाणा-या बाइक्समध्ये फरक असतो. बाजारात उपलब्ध असणा-या या बाइक्स स्पोर्ट्स बाइक्सच्या प्रतिकृती (रीप्लिका) असतात. पण तरीही एखादी स्पोर्ट्स बाइक बघितली तरीही आपली नजर हटकून तिकडे वळतेच.

काही आघाडीच्या स्पोर्ट्स बाइक्स

  • सुझुकी हायाबुसा जीएसएक्स 1300 आर
  • कावासाकी निन्जा झेडएक्स 14 मॉन्स्टर एनर्जी
  • एमव्ही ऑगस्टा
  • डुकाटी
  • यामाहा वायझेडएफ आर वन
  • बिमोटा डीबीसेव्हन ओरनेरो
  • होंडा सीबीआर 1000 आरआर
  • अ‍ॅप्रिलिया आरएसव्ही 1000
  • बीएमडब्ल्यू के 1300 एस
  • ब्यूएल 1325 सीआर

लोकल बाइकिंग

शहरातल्या गर्दीत सराईतपणे बाइक चालवणा-यांचं मोठंच कौतुक होतं. पण लांबलचक ट्रॅफिकमध्ये एकीकडे कार्सची रांग लागलेली असताना बाइक मात्र वाट काढत निघतात. त्यामुळे शहरात बाइक चालवण्याचा आनंद काही औरच असतो. त्यातच मुंबईसारख्या शहराजवळच्या निसर्गरम्य परिसरातील बाइकिंग तर अवर्णनीयच!

बाइकचा उपयोग प्रामुख्यानं तरुणाईकडूनच होतो, हा समज गेल्या काही वर्षात मोडीत निघाला आहे. मुंबईसारख्या शहरांत बस, उपनगरी रेल्वेगाडय़ांना असलेली मरणाची गर्दी, त्यातच अनियमितता, यामुळे अनेक जणांनी सार्वजनिक वाहतुकीवरील भिस्त सोडून दिली आहे. ब-यापैकी वेतनमान असणारी मंडळी स्वत:ची कार वगैरे बाळगतात. पण एकदा का कार ट्रॅफिक जॅममध्ये फसली की, किमान तासाभराची तरी लटकंती ठरलेली असते. त्यामुळेच, शहरी नोकरदारांनी बाइक्सना मोठी पसंती दिली आहे. मंदीच्या काळातही या वाहनांच्या विक्रीच्या वेगाला फारसा लगाम बसला नव्हता, हे बाइक्सच्या वाढत्या लोकप्रियतेचं द्योतक आहे. पुण्यासारख्या शहरात तर दुचाकी वाहनांची स्वत:ची एक वेगळी संस्कृती आहे. (त्यांचे नियमही वेगळे आहेत. अर्थात दुचाकीस्वारांनीच तयार केलेले!)

मुंबईत बोरिवली ते चर्चगेट किंवा ठाणे ते बोरीबंदर असा बाइकवरून प्रवास करणारे असले तरी त्यांचं प्रमाण फारसं नाही. पण बोरिवली, कांदिवली, मालाड पट्टय़ातील मंडळींना अंधेरीच्या साकीनाका किंवा पश्चिमेकडील औद्योगिक वसाहतींत जायचं असलं तर दुचाकी प्रचंड सोयीची ठरते. कारण हे रस्ते कायम वाहनांच्या गर्दीनं ओसंडून वाहत असतात. बाइकवरून अध्र्या तासात जाण्याच्या अंतरासाठी बेस्ट बस किंवा रिक्षा तासभर वेळ घेते. (येत्या काळात येथे मेट्रो येतेय. पण त्याचा फारसा परिणाम होईल, असं वाटत नाही.) दुसरं म्हणजे दादर, माहीम, सायन भागात राहणा-या मध्यमवर्गीयांनाही बाइकचाच पर्याय कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरीच्या पूर्व-पश्चिमेकडील भागातील औद्योगिक वसाहतींत जाण्यासाठी परवडतो.

मात्र पश्चिम उपनगरांत राहणा-या आणि नवी मुंबई, ठाण्याकडे नोकरी करणा-या किंवा त्या विरुद्ध परिस्थितीत बाइकचाच पर्याय सोयीचा ठरतो. हा पर्याय काहीसा खर्चिक असला तरी किती तरी कमी वेळात आपल्याला निश्चित ठिकाणी जाता येतं. कांदिवली ते महापे हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत होतो. याच प्रवासाला बेस्टची बस किमान अडीच तास घेते. महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास अत्यंत रंजक असा आहे. ठाण्यातून पश्चिम उपनगरांत येताना किंवा कांदिवली, बोरिवली भागातून ठाण्याकडे जाताना अत्यंत गजबजलेल्या शहरातून आपल्याला घोडबंदर रोड लागतो. या मार्गावर मन अगदी प्रसन्न होतं. एकाच वेळी शहर आणि गावाचा ‘फिल’ या प्रवासात येतो. दोन्ही बाजूला नॅशनल पार्कचं जंगल, घोडबंदरची खाडी यातला प्रवास डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारा ठरतो. त्यामुळे तब्बल 35 ते 40 किलोमीटरचा हा प्रवास फारसा थकवत नाही. पाऊस पडत असेल तर आणखीच मौज मात्र काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे. रात्रीच्या वेळी मात्र अवजड वाहनांची वर्दळ पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर असल्यानं सावधगिरी बाळगणं गरजेचं ठरतं. पण इथं मध्येच कुठं गाडी बंद पडली किंवा पंक्चर झाली तर मात्र खैर नाही. ‘दे धक्का’चा पर्यायच तिथं उरतो. रात्रीच्या वेळी तर गाडी आहे तिथंच सोडून जाणं बरीच मंडळी पसंत करतात. एखादा ट्रक मिळाला तर नशीब. पण आपल्यासारख्यांचं नशीब नेहमीच वाईट असतं. त्यामुळे तशी मदत मिळण्याची काही शाश्वती नाही.

आपण नेहमीच लांब पल्ल्याच्या सफरींत आनंद असतो, असं म्हणतो. पण बाइकनं भर पावसात गोरेगावच्या आरे कॉलनीत किंवा मुंबई-अहमदाबाद मार्गानं विरापर्यंत जरी प्रवास केला तरी लांबच्या सफरींतला निसर्गसौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो.

जग फिरू या रेन्टेड बाइकवर

बाइझिंगच्या या भागात आपण जरा वेगळ्या विषयाची माहिती घेऊ. हा विषय म्हणजे ‘रेन्टल बाइक’. गोव्यात फिरायला जाणा-यांसाठी ही बाब तशी नवी नाही. पण केवळ गोव्यातच नव्हे तर उत्तर भारतात दिल्लीसह, मनाली आदी ठिकाणीही भाड्याने मोटारसायकली उपलब्ध आहेत.बाइझिंगच्या या भागात आपण जरा वेगळ्या विषयाची माहिती घेऊ. हा विषय म्हणजे ‘रेन्टल बाइक’. गोव्यात फिरायला जाणा-यांसाठी ही बाब तशी नवी नाही. पण केवळ गोव्यातच नव्हे तर उत्तर भारतात दिल्लीसह, मनाली आदी ठिकाणीही भाड्याने मोटारसायकली उपलब्ध आहेत. उत्तर भारतात साहसी सफरींसाठी जाणा-यांचं प्रमाण मोठं आहे. विशेषत: लेह, लडाख, कारगिलला भेट देणा-यांचं प्रमाण कारगिल युद्धानंतर प्रचंड वाढलंय. मात्र हा भाग इतका दुर्गम आहे की, तिथं जायचं तर सार्वजनिक वाहनावर भिस्त ठेवताच येत नाही. त्यामुळे कार, जीप किंवा मिनीबस या ठिकाणच्या प्रवासासाठी उपयोगी पडतात. मुंबईसारख्या ठिकाणांहून जाणारे बरेच जण स्वत:च्या बाइक्स घेऊन जातात. बहुधा दिल्लीपर्यंत त्या बाइक्स रेल्वेने पाठवल्या जातात. तिथं उतरवून घेतल्यावर पुढचा प्रवास सुरू होतो. पण भारताला भेट देणा-यांना स्वत:च्या बाइक्स घेऊन येणं शक्य नसतं. अशा मंडळींसाठी या बाइक्स उपलब्ध असतात. भारतातील पर्यटकांचीही या बाइक्सना पसंती असते. त्यांचं भाडं काय असतं याची कल्पना नसली तरी अशा प्रकारे बाइक्स घेणं, तसं महागच पडतं. त्यातच या गाड्या सतत वापरलेल्या असल्यानं, त्या घेताना जरा पारखूनच घेणं आवश्यक आहे. कारण सतत बिघडल्यानं संपूर्ण प्रवासाचं मातेरं होऊ शकतं. या गाडय़ांची आगाऊ बुकिंगही करता येऊ शकते. पण हा पर्याय धोकादायक ठरू शकेल. कारण एकदा का गाडी निश्चित केली की, ती वापरणं मग गरजेचं ठरतं. त्याचबरोबर बुकिंगच्या वेळी ठरलेली रक्कम मग कमी करणंही शक्य होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे गाडी भाडय़ाने देणा-या व्यावसायिकांशी घासाघीस करणं अधिक फायद्याचा व्यवहार ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे लेह, लडाखसारख्या दुर्गम भागात पेट्रोलपंप सुमारे 200 किमी अंतरावरच सापडतात. (लडाख भागात तर 350 किमीपेक्षा अधिक) या भागात जायचं म्हणजे एलफिल्डसारख्या (बुलेट) गाड्याच हव्यात. या गाड्यांना आधीच इंधन अधिक लागतं. त्यात हा भाग अति उंचावर असल्यानं टाक्या ‘फुल्ल’ करणं अत्यंत गरजेचं ठरतं. त्याचबरोबर अतिरिक्त पेट्रोलचा साठा ठेवणंही महत्त्वाचं ठरेल. अशा ठिकाणी गाडय़ा बिघडण्याचं प्रमाणही अधिक असल्यानं गाडीच्या दुरुस्तीची जुजबी माहिती करून घेऊनच प्रवासाला सुरुवात करायला हवी. त्याचबरोबर हेडलाइटचे बल्ब, स्पार्क प्लग, महत्त्वाच्या तारा, पुरेशा ट्यूबही सोबत बाळगायला हव्यात. शेवटी महत्त्वाचं, या ठिकाणी प्रवास करताना, पायात साध्या चप्पल घालणं कटाक्षानं टाळावं. पायात मजबूत बूटच असायला हवे. साध्या ट्राउजरऐवजी जीन्स अत्यावश्यक. अंगावर सुटसुटीत कपडे, थंडीपासून वाचण्यासाठीची उपाययोजना आणि जॅकेटही गरजेचं असतं. हातात ग्लोव्ह्ज घातल्यास ग्रीप चांगली राहते व सनबर्नपासूनही रक्षण होतं. हेल्मेटबद्दल सांगायलाच नको, ते तर हवंच. ही सर्व काळजी घेतली आणि सावधानतेनं गाडी चालवली तर ही साहसी सफर नक्कीच यशस्वी ठरेल

आरामदायी सफरीची सम्राज्ञी

अगदी क्षितीजापर्यंत दिसणाऱ्या मोकळ्या रस्त्यावर सुसाट वेगानं बाइक चालवणं, हे जातिवंत बाइकस्वाराचं स्पप्न असतं आणि अशी मिळालेली संधी त्याच्यासाठी आनंदसोहळा ठरते. अमेरिकेत अशा भटक्यांची संख्या कमी नाही. त्यांच्या भटकण्याच्या छंदाला वेग प्राप्त करून देण्याचं काम हार्ले-डेव्हिडसन कंपनीच्या बाइक गेली अनेक वर्ष इमानेइतबारे निभावत आहेत. या बाइक आता भारतीयांच्याही दिमतीला लवकरच सज्ज होत आहेत.

बाइकिंगची क्रेझ तरुणाईत असली तरी एका विशिष्ट टप्प्यानंतर ही क्रेझ हळूहळू कमी होत जाते. भारतासारख्या देशात तर अत्यंत वाईट रस्ते, त्यात वाहतूक कोंडी,भस्सकन रस्त्यात येणारी माणसं, जनावरं यामुळे बाइक कुठे दूरवर घेऊन जाणं म्हणजे जिवावर येतं. पण अमेरिकेसारख्या खंडप्राय देशात मात्र आपली बाइक घेऊन दूर कुठं तरी भटकून येणा-यांचं प्रमाण मोठं आहे. लांब म्हणजे आपल्याकडे गावाला जाणं किंवा जवळपासच्या ट्रेकला जाणं असं समजलं जातं. ते अंतरही बाइकनं कापायचं असलं तर जास्तीत जास्त 100 किमी असेल. अमेरिकेत मात्र हेच अंतर 100 किमीच्या पुढे असतं. अशा लांबच्या प्रवासाला लागणारी बाइकही तशीच दणकट हवी. अमेरिकनांची ही गरज पूर्ण केलीय हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलनं. किमान 750 सीसीची असणारी ही बाइक जगातील सर्वच बाइकप्रेमींचं मोठं आकर्षण आहे.

हार्ले डेव्हिडसनची लोकप्रियता अमेरिकेत इतकी होती की, काही काळ 70 च्या दशकात तेथील चित्रपटांतही या गाडय़ांचीच धूम होती. विशेषत: गुन्हेगारी जगताशी संबंधित हे चित्रपट असल्याने या बाइकही वादाच्या भोव-यात सापडल्या होत्या. सर्व बाइकपेक्षा वेगळी रचना आणि ‘फायरिंग’चं वेगळेपण या खुबी या बाइकनं आतापर्यंत जपल्या आहेत. या बाइकला प्रेमाने‘हार्ले’ किंवा ‘एचडी’ असंही बोललं जातं. ‘क्रूझ’ बाइक म्हणून ओळखली जाणारी ही बाइक लांबच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद प्रवाशाला देते. आकाराने लांबलचक, बुटकी, उंच हँडल आणि बसण्यासाठी आरामदायक सीट अशी तिची सर्वसाधारण रचना. गाडीवर बसताना अगदी आरामात रेलून बसावे लागते, म्हणजे तिची रचनाच तशी असते. त्यामुळे लांबच्या प्रवासात पाठीला त्रास होण्याचा काही चान्सच नाही.

या गाडीचं इंजिनही तितकंच दणकट असतं. ‘व्ही ट्विन’ प्रकारच्या या इंजिनात दोन पिस्टन असतात. कमीत कमी जागेत अधिकाधिक शक्ती मिळावी, अशी रचना केलेल्या या इंजिनमधून गाडी चालू केल्यावर सर्वसामान्य गाडय़ांपेक्षा काहीसा वेगळा आवाज येतो. जाणकार नसेल तर त्याला हा गाडीतील बिघाडही वाटू शकतो. पण ‘हार्ले डेव्हिडसन’ला ओळखणारा केवळ तिच्या या आवाजावरूनच ही गाडी ओळखू शकतो, इतका आवाजही या ब्रँडशी एकरूप झाला आहे.

भारतातही गेल्या काही काळात या गाडीच्या पावलावर पाऊल टाकून बजाजनं सुरुवातीला ‘एलिमिनेटर’ आणि नंतर‘अ‍ॅव्हेंजर’ तर यामाहानं ‘एण्टायसर’ या गाडय़ा आणल्या. गावठी हार्ले डेव्हिडसन मानल्या जाणा-या या गाडय़ांनीही येथेप्रचंड लोकप्रियता मिळवली. पण जगभरातील रस्त्यांवरून दिमाखात दौडणा-या ‘हार्ले’नं आता भारतातही प्रवेश केला असून भारतीयांच्या दिमतीलाही ती सज्ज झाली आहे. स्पोर्ट्स्टर, सॉफ्टेल, डायना, व्ही रॉड, टुरिंग या लोकप्रिय श्रेणीतील बाइक भारतात उपलब्ध होत आहेत. पण इतक्यात हुरळून जायची गरज नाही. भारतात या गाडीचं सर्वात कमी किमतीचं मॉडेल तब्बल 6 लाख 95 हजार रुपयांना उपलब्ध असून सर्वात महागडी गाडी 34 लाख 95 हजार रुपयांना आहे.


तुही बाइक कंची?

बाइक म्हणा, दुचाकी म्हणा, कि मोटरसायकल म्हणा पण पायडल न मारता चालणाऱ्या या मशीनने अवघी तरुणाई गेल्या अनेक पिढय़ांपासून क्रेझी झाली आहे. बाइकची झिंग प्रत्येक बाइकवाला अनुभवतो. गल्लीतून, हायवेवरून सुसाट निघण्याचा आनंद काय असतो हे बाइकच्या पुढच्या सीटवर बसल्याशिवाय कोणालाच अनुभवता येणार नाही. बाइक घेताना प्रत्येकालाच एक कुतूहल असतं. बाइकविषयी मनात असलेल्या असंख्य शंका, नवीन बाइक, त्यांची क्रेझ, अशी तुमच्या नव्या आणि जुन्या बाइकची?वैशिष्टय़ं, बाइकवाल्यांचे किस्से आणि?बायकिंगची झिंग यासाठी हे सदर..

काय यार, भन्नाट दिसते ना, मस्तच है यार, पळते काय विचारू नकोस, कॉलेजच्या कट्टय़ावर हमखास ऐकू येणारे हे डायलॉग. आपल्याकडच्या मोटरसायकलचं कौतुक करतानाच,समोर एखादी नवी कोरी बाइक दिसली की, तिचं कौतुकही तितकंच खुल्या दिलानं ही मंडळी करतात. गाडीचा मालक समोर नसला तर त्या गाडीची कॅपॅसिटी, तिचा मायलेज याच्यावरून पैजा लागतात.

गेल्या काही वर्षात, भारतातही चांगले रस्ते बनू लागल्यानं आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या कारबरोबरच दुचाकी उद्योगानंही भारताकडे लक्ष केंद्रित केलं आहे. आतापर्यंत भारतीय दुचाकींची बाजारपेठ तशी मर्यादितच होती. गेल्या दशकभरात तिचा प्रचंड वेगानं विस्तार झाला असला तरी लँब्रेटा, बजाजच्या स्कूटरसाठी सहा-सहा महिने वाट पाहावी लागायची, तो जमाना आजही जुन्या मंडळींना आठवत असेल. ठराविक आकाराच्या, ठोकळेबाज स्कूटरनाही ‘हमारा बजाज’ म्हणून घरात मानाचं स्थान होतं. पण त्याच वेळी वेगवान युग अवतरू लागलं होतं आणि शहरांतल्या ट्राफिकभरल्या रस्त्यावरून सुळकन निघण्यास या स्कूटर काहीशा अडचणीच्या ठरू लागल्या होत्या. येझदी, राजदूत यासारख्या मोटरसायकली तेव्हाही होत्या. पण तो वापरणारा वर्गच वेगळा होता. (चार-पाच दशकांपूर्वी वापरलेल्या या गाडय़ा आजही अनेकांच्या घराची शोभा वाढवत आहेत आणि विशेष म्हणजे वापरातही आहेत.) पण सुटसुटीत अशा हीरो होंडा, सुझुकीच्या गाडय़ा रस्त्यांवर 80 च्या दशकात आल्या आणि त्यांनी बाइकिंगचं स्वरूपच बदलून टाकलं. या गाडय़ा बहुतांश 100 सीसीच्या होत्या. (सीसी - क्युबिक सेंटिमीटर, वाहनाच्या इंजिनची क्षमता मोजण्याचे हे परिमाण आहे. इंजिन सुरू होण्यासाठी कम्बशन ज्या सिलिंडरमध्ये होते त्याची हवा/इंधन सामावण्याची क्षमता या परिमाणात मोजली जाते. उदा. 1 सीसी म्हणजे एक ग्राम पाणी सामावण्याची क्षमता. त्याचप्रमाणे 100 सीसी म्हणजे सिलिंडरमध्ये कम्बश्चन होण्याआधी आतील भागाचा पूर्ण विस्तार झाल्यावर पाणी आणि दाबयुक्त हवा यांचे 100 ग्राम मिश्रण सामावते.) अगदी गेल्या दशकापर्यंत 100 सीसीच्या बाइकची चलती होती. पण वाहतुकीचा वेग वाढल्यावर त्या वेगाच्या बरोबर राहण्यासाठी 110, 115, 125,135, 179,200, 220,250 सीसीच्या बाइक भारतात बनू लागल्या आहेत. सध्या तर 100 सीसीच्या बाइक केवळ कार्यालयात जाणा-यांकडेच पाहायला मिळतात. या गाडय़ा चांगल्या अवस्थेत ठेवल्या असतील तर एका लिटरमध्ये अगदी 60-70 किमी चालतात. मात्र सध्या चलती आहे ती 150 सीसीच्या बाइकची. कारण या बाइक तशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे मायलेजही चांगल्या देतात (50-55 किमी/प्रतिलिटर)आणि विकत घ्यायलाही फारशा खर्चिक नाहीत. (बँकांच्या वेगवेगळ्या ‘स्किमा’ तयारच असतात.) काही हौशी मंडळी 200 किंवा 220,250 सीसीच्या मोटरसायकलींना प्राधान्य देतात. मात्र या गाडय़ा प्रामुख्याने पॉकेटमनीवर अवलंबून असणा-यांच परवडतात. (नोकरी लागली की हीच मंडळी इमानदारीत लहान गाडी वापरतात किंवा आपल्या लोकलमार्गाला लागतात.)

येत्या काही दिवसांत परदेशांतल्या रस्त्यांवर धावणा-या आणि फक्त टीव्हीवर, इंग्रजी देमारपटांत पाहिलेल्या गाडय़ाही भारतात येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्याची चर्चाही कट्टय़ांवर सुरू झाली आहे.


हमारा कल..हमारा आज..

बजाजचं उत्पादन सुरू होण्याआधी जगभरात लँब्रेटा आणि व्हेस्पा या इटालियन कंपन्यांच्या स्कूटरची धूम होती. लँब्रेटा (नंतरच्या काळात लँबी) या स्कूटरचं उत्पादन भारतात ऑटोमोबाइल प्रॉडक्ट ऑफ इंडिया या कंपनीच्या सहकार्यानं सुरू होतं. 1972 मध्ये स्कूटर्स इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीनं या स्कूटरचं उत्पादन सुरू केलं.

अमेरिकेत अग्निबाण उड्डाण केंद्रावर एक रॉकेट काही केल्या उडत नव्हतं. तिथं काम करणा-या एका भारतीयाने हे रॉकेट उडवून दाखवतो, असं आव्हान दिलं. सर्व अमेरिकी मंडळींनी त्याची खिल्ली उडवली. आमचं इतकं प्रगत तंत्रज्ञान आहे,तुमच्यासारखा मागास देशातला माणूस काय हे रॉकेट उडवणार, अशी त्याची फिरकी घेतली. पण आपल्या निर्धारावर ठाम असलेल्या त्या भारतीयानं तिथल्या तंत्रज्ञांना रॉकेट एका बाजूला झुकवायला सांगितलं. त्यानंतर सरळ करून पुन्हा उडवा, असा सल्ला दिला आणि रॉकेटनं आकाशात झेप घेतली. हा विनोद सर्वानाच चांगला माहीत आहे. भारतात अगदी पाच-सात वर्षापूर्वीपर्यंत डौलानं दौडणा-या स्कूटर्स या विनोदाचं प्रेरणास्थान होत्या. या स्कूटर सुरू झाल्या नाहीत, की त्या इंजिनाच्या बाजूनं झुकवल्या जात. पुन्हा सरळ केल्यानंतर कीक मारली की सुरू होत.

समोर हँडलला धरून उभं असणारं एखादं मूल. पाठीमागे वडील आणि आईच्या मध्ये आणखी एखादं मूल. हँडलला खरेदी केलेल्या विविध वस्तूंच्या पिशव्या लटकवलेल्या स्कूटरचं चित्र आपण गेल्या दशकापर्यंत पाहिलं. दोन मुलं असणा-या कुटुंबांसाठी या स्कूटर म्हणजे प्रवासासाठी सोयीचं साधन होतं. सर्वसाधारण बाइकच्या तुलनेत स्कूटरची रचना वेगळी असते. स्कूटरमध्ये चालकाला पाय ठेवण्यासाठी गाडीच्या आतल्या बाजूलाच जागा केलेली असते. समोरूनही ही गाडी बंदिस्त असते. त्यामुळे चालकाचे पाय सुरक्षित असतात. विशेषत: महिलांसाठी या स्कूटर खूपच सुरक्षित आणि चालवायलाही सुटसुटीत होत्या. त्यामुळेच आजही स्कुटी किंवा अ‍ॅक्टिव्हासारख्या स्कूटर खास महिलांच्या म्हणून ओळखल्या जातात. बहुतांश स्कूटरमध्ये इंजिन एका बाजूला कललेलं असल्यानंच तिथं इंधन पोहोचवण्यासाठी गाडी झुकवावी लागायची.

स्कूटरच्या उत्पादनाला जगभरात 1914 च्या सुमारास सुरुवात झाली. स्वातंत्र्योत्तर काळात भारतीयांनाही स्वत:च्या मालकीच्या वाहनाचं सुख मिळावं, या संकल्पनेतून इथं स्कूटर आल्या. विशेष म्हणजे, महाराष्ट्र या स्कूटरची पंढरी म्हणता येईल. आघाडीची दुचाकी उत्पादक कंपनी ‘बजाज’चा मोठा प्लान्ट चाकण इथं होता. त्याशिवाय औरंगाबादजवळच्या वाळूज इथंही एक प्रकल्प होता. आकुर्डी इथला सर्वाधिक जुना प्लान्ट आता कंपनीचं संशोधन आणि विकासकेंद्र बनलाय. सुरुवातीला तरी बजाज कंपनी परदेशातून स्कूटर आयात करून त्या भारतीय बाजारात विकायची. 1959 मध्ये उत्पादनांचा परवाना मिळवल्यानंतर भारतात या स्कूटरच्या उत्पादनाला सुरुवात झाली.

मात्र, बजाजचं उत्पादन सुरू होण्याआधी जगभरात लँब्रेटा आणि व्हेस्पा या इटालियन कंपन्यांच्या स्कूटरची धूम होती. लँब्रेटा (नंतरच्या काळात लँबी) या स्कूटरचं उत्पादन भारतात ऑटोमोबाइल प्रॉडक्ट ऑफ इंडिया या कंपनीच्या सहकार्यानं सुरू होतं. 1972 मध्ये स्कूटर्स इंडिया लिमिटेड या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीनं या स्कूटरचं उत्पादन सुरू केलं. त्या शिवाय व्हेस्पा या कंपनीच्या स्कूटरचंही भारतात उत्पादन सुरू होतं. पण मक्तेदारी निर्माण केली होती ती बजाजच्या स्कूटरनी. सुपर, चेतक, प्रिया अशा वेगवेगळ्या नावांच्या स्कूटर भारतात धावत होत्या. त्यांच्या बरोबरीनंच 80 च्या दशकात एम 50 आणि एम 80 या वेगळ्या ढंगाच्या स्कूटरही आल्या. त्यातली एम 80 ही स्कूटर कष्टकरी वर्गासाठी जणू वरदान ठरली होती. मात्र, जमाना बदलला तसा या स्कूटर मागे पडू लागल्या. वेगवान जमान्यात त्यांची गती मंदावली. मात्र,स्कूटरची रचना असणा-या अनेक दुचाकी त्याच वेळी मार्केट काबीज करू लागल्या. आता तर मोटारसायकल उत्पादन करणा-या आघाडीच्या कंपन्याही गीअर नसलेल्या स्कूटरच्या उत्पादनाकडे गांभार्यानं पाहू लागल्या आहेत. अशा स्कूटरची सुरुवात कायनेटिक होंडा या स्कूटरनं करून दिली होती. तिच्या पावलावर पाऊल टाकून अ‍ॅक्टिव्हा, अ‍ॅव्हिएटर, डय़ुरो अशा अनेक स्कूटर भारतीयांना आकर्षित करून घेत आहेत.


शान की सवारी..

‘बुलेट’ मोटरसायकल भारतात आली लष्करासाठी.. पण शिपाईगडय़ांची ही गाडी सर्वच भारतीय मर्दाचं आवडतं वाहन ठरली, बॉलिवुडच्या सिनेमांतही गाजली.. आजच्या साउंड पोल्युशन- कॉन्शस जमान्यातही बुलेटचं ‘फायरिंग’ काळजाची धडधड वाढवतं.. ती दिसली, की नजर तिच्याकडेच वळते.. नवी गाडी घेता येईल, इतका पैसा सेकण्डहॅण्ड बुलेटवर खर्च करणारे आजही आहेत, ते बुलेटची शान कायम असल्यामुळेच!

क्या दिखती है यार.. मस्त मेंटेन ठेवलीय.. अशी वाक्यं कॉलेजच्या आवारात, ऑफिसबाहेर.. किंवा कोणत्याही ठिकाणच्या तरुणांच्या घोळक्यातून ऐकू आली तर दचकू नका. ही वाक्यं एखाद्या मुलीला उद्देशून नसून ती एखाद्या जुन्या ‘बुलेट’लाही उद्देशून असू शकतात. बाइक चालवणा-याचं खरं प्रेम त्याची बाइक असली तरी ‘जातिवंत’ बाइकराचं स्वप्न त्याच्याकडेही एखादी बुलेट असावी हेच असतं. पण बुलेट चालवायला वाघाचं काळीज पाहिजे. अवजड धूड.. किक मारण्याची खास पद्धत.. (समोरच्या मीटरमधला काटा अचूक जागी आला तरच किक मारायची.. आगाऊपणा केला तर उलट आलेल्या किकने पाय मोडून घ्यायला लागतो.) चालवतानाही बुलेटचा मान राखून चालवायची.. उगीचच लहान बाइकप्रमाणे आडवीतिडवी करत चालवायची नाही, ही पथ्यं पाळूनच बुलेट चालवायला लागते आणि त्यामुळेच कॉलेजातली पोरं या गाडय़ांच्या नादाला लागत नाहीत.

पण एकदा का बुलेट चालवली (व्यवस्थित आणि सांभाळून) की तब्येत एकदम खूश. अगदी फाटक्या अंगाच्या माणसालाही या गाडीवर बसलं की रुबाबदार असल्यासारखं वाटतं. (हे खरं आहे. बुलेटवर बसलेली प्रत्येक व्यक्ती रुबाबदार वाटते.) या गाडीच्या फायरिंगचा आवाज अनेकांना कानठळ्या बसवणारा वाटतो. पण तीच तर या गाडीची खरी ओळख. ही फायरिंग सेट करण्याचीही एक पद्धत असते. (पाठच्या मडगार्डला लावलेल्या रबरी पुठ्ठय़ाच्या साह्याने हे सेटिंग केलं जातं.) त्यामुळेच‘ध्वनिप्रदूषण’ करणा-या या गाडय़ांना अनेक जण नाकं मुरडत असले तरी हे प्रदूषणच गाड्यांची ओळख ठरत असल्यानं नव्या, कमी आवाज करणा-या गाड्या पसंत पडत नाहीत. जरा जास्त पैसे खर्च करायची तयारी असली की या गाड्या घेण्याकडेच मंडळींचा कल असतो. पण जाणकार मंडळींना आजही दुकानातून ‘पेटीपॅक’ गाडी खरेदी करण्यापेक्षा सेकंडहँड बुलेट खरेदी करणं योग्य वाटतं. त्यासाठी एखादा हौशी नव्या गाडीएवढेच पैसे मोजायचीही तयारी ठेवतो.

जुन्या चित्रपटांत तर बुलेटला एक वेगळंच स्थान होतं. अमिताभ बच्चन, धर्मेद्रचं ये दोस्ती हम नही तोडेंगे, हे गाणं जितकं अजरामर झालंय तितकीच त्याची बुलेट आणि बुलेटला जोडलेली साइडकार अजरामर झाली. ( साइडकार हा एक अनोखा प्रकार काही वर्षापूर्वीपर्यंत अस्तित्वात होता.) त्या गाण्याची कॉपी महेश कोठारेंनी त्यांच्या धडाकेबाज चित्रपटात केली. त्यासाठीही तशीच साइडकार असलेली बुलेट वापरली. संदेसे आते हैं, गाण्यात मिलिट्रीचा पोस्टमन पत्रं घेऊन राजस्थानच्या वाळवंटात येतो, त्यासाठीही तो बुलेटच वापरतो किंवा 26 जानेवारीला दिल्लीच्या राजपथावर बाइकवर होणा-या कसरतींसाठीही बुलेटच वापरल्या जातात. दोन-तीन बुलेट मिळून 15-20 जणांचा भार आरामात पेलतील, इतक्या त्या दणकट आहेत. विशेष म्हणजे हायवेवर प्रवास करताना सर्वसाधारण मोटरसायकली बाजूनं वेगात मोठं वाहन गेलं की हलतात. बुलेट मात्र रस्ता न सोडता ठामपणे स्थिर राहतें.

जमाना टू स्ट्रोकचा!

प्रदूषणाची मानकं अधिक कठोर झाल्यानंतर ‘राजदूत’ आणि ‘यामाहा आरएक्स 100’ या बाइक्सचं उत्पादन बंद झालं. पण आजही या गाडय़ांचं आकर्षण कायम आहे.. टू स्ट्रोकचा ज्ममाना गुजर गया, पण या बाइक कधीतरी नव्या रूपात परत येतील, अशी आशा अद्याप अनेकांना आहे!

कॉलेजात जायचं तर फुल्ल भाव खात जायला पायजे. त्यातही आपल्या दिलाची राणी कोणी असली तर तिच्यावर इंप्रेशन मारायला पाहिजे. इंप्रेशन मारायचं तर फिल्मिगिरी करून दोन-चार गुंडांना लोळवणं काय जमणार नाय. त्यापेक्षा कायतरी वेगळं करायचं तर बाइक पाहिजे. स्वत:ची कशाला,मित्राची असली तरी चालते बॉस आपल्याला. त्यातही यामाहासारखी बाइक असली तर बोलायलाच नको.. कॉलेजच्या समोरच्या रस्त्यावर भाव खात भन्नाट स्पीडनं जायचं तर यामाहाच उपयोगी पडते, हे 2010 मध्येही कॉलेजकुमारांना चांगलंच ठाऊक आहे.

गेल्या काही काळात भारतात दणकट, वेगवान, चांगल्या पिकअप असणा-या बाइक आल्या असल्या तरी जाणकार आणि दर्दी बाइकवाल्याचं खरं प्रेम हे टू स्ट्रोक बाइकवरच असतं. त्यातही यामाहाची आरएक्स 100 फेव्हरिट. किक मारल्यानंतर अवघ्या पाच सेकंदात 60 किलोमीटर प्रति तासाचा वेग गाठणारी ही बाइक गेल्या दशकापर्यंत कॉलेजच्या पार्किंग लॉटची शान बनली होती. पण प्रदूषणाची मानकं अधिक कठोर झाल्यानंतर या बाइकचं उत्पादन यामाहाला बंद करावं लागलं असलं तरी ही गाडी परत कधीतरी नव्या स्वरूपात आपल्या भेटीला येईल, या आशेनं ही गाडी बाळगणारे आणि आता चाळिशीच्या घरात गेलेले ज्या उत्सुकतेनं वाट पाहतात तशीच वाट नुकतेच कॉलेजला गेलेले कॉलेजकुमारही पाहतात. (एखाद्याकडं पोटच्या पोरासारखी जपून ठेवलेली यामाहा आरएक्स 100 त्यांनीही चालवलेली असते ना) वजनानं हलकी, चालवण्यास सोपी (तसं बाइक चालवणं सोप्पंय म्हणा!) आणि महत्त्वाचं म्हणजे फायरिंग.. या गाडीच्या फायरिंगची तुलना आतापर्यंतच्या कुठल्याच बाइकच्या फायरिंगशी होऊ शकणार नाही. या कारणांमुळे ही बाइक 1985 ते 1996 या काळात भारतातल्या रस्त्यांवर खरोखर राज्य करत होती. कुठल्याही रस्त्यावरून, कितीही गर्दीतून झटपट निघणं हा गाडीनं शक्य होतं. शहरी तरुणाई अक्षरश: या बाइकच्या प्रेमात होती. तिच्या बरोबरीनं बाजारात इंड सुझुकी, कावासाकी बजाज, हीरो होंडाच्या बाइक होत्या. पण यामाहाला मिळालेली लोकप्रियता या गाडय़ांना मिळू शकली नाही. हीरो होंडाची सीडी 100 ही बाइक लोकप्रियता मिळवून होती. या फोर स्ट्रोक या बाइकची रचना कॉलेजकुमारांपेक्षा पांढरपेशांना पसंत पडणारी होती. तिच्यात यामाहाचं अपील नव्हतं. मात्र, हीरो होंडाच्या या गाडीनंही तिच्या श्रेणीत लोकप्रियता मिळवली होतीच.

देशातलं ‘लायसन राज’ संपल्यावर इथल्या कंपन्यांना परदेशांतल्या नामांकित कंपन्यांच्या सहकार्यानं वाहनं तयार करण्याची संधी मिळाली. भारतातील एस्कॉर्ट्स या कंपनीनं जपानी यामाहाच्या सहकार्यानं ही ‘यामाहा आरएक्स 100’ ही बाइक बनवली पण त्याआधीपासून एस्कॉर्ट्सच्या राजदूतची भारतातल्या रस्त्यांवर घोडदौड सुरूच होती. ही गाडीही टू स्ट्रोक होती. बुलेट आणि येझदीला स्पर्धक म्हणून बाजारात आणलेली ही बाइक वापरायला बरीच खर्चिक होती. त्यातच तिची क्लिष्ट रचना रस्त्यावरच्या मेकॅनिकसाठी दुरुस्तीला मोठं आव्हान होतं. पण तरीही तिच्या जबरदस्त ताकदीनं तिनं आपला चाहतावर्ग तयार केला होता.

आजही देशात राजदूत क्लब आहेत. (आमच्या एका मित्राकडंही त्याच्या वडिलांची राजदूत आहे. पण या गाडीवरून तो,त्याचे मित्र अनेकदा पडल्यानं या गाडीला आम्ही गमतीनं यमदूत म्हणतो.) यामाहाचं उत्पादन सुरू झाल्यावर सुरुवातीला तिच्या इंजिनावर ‘मेड इन जपान’चा शिक्का होता तर तिच्या स्पीडोमीटरवर राजदूत हे नाव होतं. (मेड इन जपान शिक्का असणा-या गाडय़ा आजही चांगल्या अवस्थेत आहेत) ही बाइक 1996 पर्यंत विकली गेली. मात्र, त्यानंतर ती बंद करून या गाडीची सुधारित आवृत्ती यामाहा आरएक्स 135 बाजारात आणली. तिला प्रतिसाद मिळाला पण आरएक्स 100 इतका नाही. त्यानंतर पाच गियर असणारी यामाहा आरएक्सझेड बाजारात आली. 2003 पर्यंत ही गाडीही बाजारात होती. पण तिच्यातही आरएक्स 100 वाली बात नव्हती.

आरएक्स 100 ला स्पर्धक म्हणून बाजारात बजाजनं कावासाकी बजाज केबी 100 व केबी 135 या गाडय़ा आणल्या. त्यांच्याच बरोबरीनं नंतरच्या काळात सुझुकीच्या समुराइनंही बाजारात प्रवेश केला होता. पण ‘बॉर्न टू लीड’ हे घोषवाक्य असणा-या यामाहाच्या आरएक्स 100 नं आपलं हे घोषवाक्य सार्थ ठरवत, तत्कालीन तरुणपिढीवर आपला अमीट असा ठसा उमटवला आहे.
  • फोर आणि टू स्ट्रोकचे टेक्निकल फंडे

फोर स्ट्रोक इंजिनमध्ये इनटेक, काँप्रेशन, काँप्रेशन, एग्झॉस्ट हे चार स्ट्रोक असतात.

इनटेक स्ट्रोकमध्ये सिलिंडरमध्ये पिस्टन खाली येतं त्यावेळी पिस्टन व्हॉल्व्ह खुला होतो व त्यातून हवा व इंधनाचं मिश्रण कंबश्चन चेंबरमध्ये घेतलं जातं. काँप्रेशन स्ट्रोकमध्ये व्हॉल्व्ह बंद होतो व पिस्टन वरच्या बाजूला सरकून आतमध्ये जमलेल्या वायूला दाबलं जातं. कंबश्चन स्ट्रोकमध्ये या वायूचे स्पार्क प्लगमधील ठिणगीमुळे ज्वलन होऊन लहानसा स्फोट होतो व पिस्टन खाली येतो.एग्झॉस्ट स्ट्रोकमध्ये वॉल्व पुन्हा खुला होतो व टाकाऊ वायू बाहेर टाकले जातात व नव्याने प्रक्रिया सुरू होते. प्रत्येक वेळी पिस्टन खाली-वर होतो. पिस्टन चाकाला गती देणाऱ्या क्रँकशाफ्टला जोडलेला असतो. त्यामुळे त्याच्या वर-खाली येण्याच्या वेगावर चाकाची गती अवलंबून असते.

टू स्ट्रोक इंजिनमध्ये वर उल्लेख केलेल्या चारही स्ट्रोकचं एक वर जाणारा व एक खाली जाणारा स्ट्रोक असं एकत्रीकरण केलं जातं. म्हणजे, इन्टेक आणि एग्झॉस्ट हे दोन्ही स्ट्रोक काँप्रेशन आणि कंबश्चन स्ट्रोकमध्ये एकत्रित केले जातात. या प्रकारच्या इंजिनमध्ये पिस्टन खाली येताच, इंजिनचा एग्झॉस्ट भाग खुला होतो व इंजिनमधील निरुपयोगी वायू बाहेर फेकले जातात. त्याचवेळी पिस्टन खाली येताना बाहेरील हवा व इंधनाचं मिश्रणही आत खेचलं जातं. पिस्टन वर होताच हे मिश्रण दाबलं जातं व एग्झॉस्ट पोर्ट बंद होतात व स्पार्कमधून येणा-या ठिणगीनं हे मिश्रण पेट घेतं. ही प्रक्रिया अवघ्या दोन स्ट्रोकमध्ये होत असल्याने इंजिनला अधिक ताकद मिळते.

पण..

टू स्ट्रोक इंजिन असणा-या बाइकमध्ये इंधन भरताना त्यासोबत वेगळं ऑइल भरावं लागतं. या इंधन व त्यासोबत टाकाव्या लागणा-या टुटी ऑइलच्या मिश्रणाच्या ज्वलनातून धूर आणि प्रदूषण होतं, साध्या रचनेच्या इंजिनामुळे त्याच्या दुरुस्तीचं कामही निघतं. इंधन अधिक लागतं.


बाइझिंग..

मोटरसायकल आली की जगणंच बदलतं.. बाइकमुळे सोय, वेळ वाचणं वगैरे शहरात ठीक; पण बाइक चालवण्याची झिंग तुम्हाला निसर्गाकडेही नेते त्यासाठी मग बायकर मित्र शोधले जातात, बायकिंग क्लब्जही जुळतात आणि टिकतातही..

अरे बस कर आता बाइक चालवणं, पाठीचा खुळखुळा करून घेशील..

कशी काय बरं चालवता तुम्ही या ट्रॅफिकमध्ये बाइक..

अरे परवडतं तरी कसं तुम्हाला बाइकचा हत्ती पोसणं.. सांभाळून चालव रे बाबा..

हे प्रश्न/सल्ले बाइकस्वारांना नवे नाहीत. पण साळसूदपणे या प्रश्नांकडे-सल्ल्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या बाइकिंगची झिंग प्रत्येक बाइकवाला अनुभवतो. बाइक म्हणा, दुचाकी म्हणा, मोटरसायकल म्हणा, पण पायडल न मारता चालणाऱ्या या मशिनने अवघी तरुणाई गेल्या अनेक पिढय़ांपासून क्रेझी झाली आहे. झिप-झ्ॉप-झूम म्हणत गल्लीतून, हायवेवरून सुसाट निघण्याचा आनंद काय असतो, तो बाइकच्या पुढच्या सीटवर बसल्याशिवाय कोणालाच अनुभवता येणार नाही.

बाइकची झिंग तशी प्रत्येकालाच असते, असं म्हणता येणार नाही. त्यासाठी मुळातून ऊर्मी असावी लागते. पुण्यासारख्या शहरात घरोघरी बाइक्स असतात. पण त्यांचा वापर मजबुरी म्हणून होतो. त्यातल्या कोणालाच पुण्यातल्या ट्राफिक जाममध्ये उतरून ती चालवायची इच्छा नसते. मुंबईसारख्या शहरात तर बाइक चालवणं बंपर टू बंपर ट्राफिकमुळे कठीण. तरीही मुंबईत गेल्या काही वर्षात त्यांचं प्रमाण वाढलं आहे. मुळात बाइक चालवणं ही एक कला आहे, असं ‘जातिवंत’बाइकचालक सांगतात. केवळ कॉलेजला, ऑफिसला जाण्यासाठी बाइक चालवणं वेगळं आणि आनंद म्हणून बाइक चालवणं वेगळं, असं या मंडळींचं म्हणणं असतं.

अनेकदा कॉलेजात एफवायला गेल्यावर (लायसन्स मिळण्याचं वय झाल्यावर) बहुतेक तरुणांना हल्ली बाइक हवी असते. त्यासाठी बाबांकडे लकडा लावला जातो. हल्ली कॉल सेंटर्स आल्यामुळे पालकांच्या मागे भुणभुण करण्याचे दिवसही सरलेत. बाइक घेण्यामागचा उद्देश हाच असतो की, कॉलेजात आपली आयडेंटिटी वेगळी असावी! त्यातच कोणाला दिल वगैरे दिलं असेल तर आपल्या दिलाची मालकीण आपल्यामागे खेटून बसण्यासाठी स्वत:ची बाइक असावीच, मित्रांकडे सारखं-सारखं मागणं बरोबर दिसत नाही. ही भावनाही त्यामागे असते. त्यामुळे नवी कोरी बाइक घरी येताच, ती कधी एकदा मित्रांना दाखवतो असं होतं. हात साफ झाला असेल तर दुस-याच दिवशी ती सक्काळी सक्काळी कॉलेजच्या पार्किंग लॉटमध्ये उभी असते.

चकचकीत रंग, घराजवळच्या साईबाबांच्या मंदिरातला हार, हळदीकुंकवानं काढलेलं स्वस्तिक पाहूनच पोरांनाही कळतं,कॉलेजात नवी बाइक आल्याचं. बाइक मालकाचा तोरा काही औरच असतो. त्यातच मित्रांनी तारीफ सुरू केल्यावर तर विचारायलाच नको. 150 सीसीची आहे. 220 सीसी घेणार होतो, पण मायलेज मिळत नाही, म्हणून नाही घेतली. जॉब मिळाला की ती घेणारच, असं वर सांगूनही टाकलं जातं. जुन्याजाणत्या बाइकचालकांचे सल्ले येतात. वन हँड ठेव, कोणाला देऊ नकोस. कोणी मागितली तर रिक्षाला जाण्या-येण्याचे पैसे दे, पण बाइक देऊ नकोस. पण हा सल्ला पुढच्या सहा महिन्यांतच धुडकावला जातो. आपली बाइक कधी सार्वजनिक झाली ते आपल्यालाही कळत नाही.

बाइक आली की सुरुवातीला तिला चकचकीत ठेवण्यासाठी दररोज पुसणं, पॉलिश मारणं हे उद्योग सुरू होतात. आपण दुस-यांपेक्षा (बाइक नसलेल्यांपेक्षा) कोण तरी वेगळे आहोत, असं वाटायला लागतं. त्यामुळे काही दिवस तरी नवीन बाइक मालक आणि त्याची बाइक दोघेही जमिनीपासून दोन इंच उंचावरूनच चाललेले असतात. प्रत्येक कामासाठी बाइकचाच वापर व्हायला लागतो. (तसा तो परवडतोही म्हणा.) कॉलेजला जाण्यासाठी बस स्टॉप, रिक्षा स्टँडवर ताटकळत उभं राहा, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये शिरण्याची सर्कस यांच्यापासून सुटका झालेली असते आणि महत्त्वाचं म्हणजे मोठाच वेळ वाचलेला असतो. बाइक जसजशी जुनी होते, तसतशी दूरवर रपेट मारण्याची इच्छा होते आणि इथंच बाइकवेडाला सुरुवात होते. सुरुवातीला 50-60 किलोमीटरच्या परिसरात मारलेली रपेट नंतरच्या काळात कोकणची सफर, ट्रेकच्या ठिकाणांना भेट, गड-किल्ले फिरणं इथपर्यंत सुरू होते. त्यातूनच मग खरा बाइकस्वार समोर येतो. केवळ कॉलेजला किंवा ऑफिसला जाण्यासाठी बाइक चालवणारे त्यातून आपसूकच बाजूला पडतात. फिरस्ते समविचारी बाइकप्रेमी मग दूरवरच्या सफरींवर निघतात. त्या ठिकाणी आलेल्या अशाच मंडळींच्या चर्चातून मग नवनवे क्लब तयार होतात. अशा प्रकारच्या क्लबची संकल्पना प्रामुख्याने अमेरिकेत, युरोपांतील देशांत आहे. बऱ्याचदा तर अशा क्लब्जशिवायही नोकरदार मंडळींसाठीही वेळ वाचणं बाइकमुळे साध्य झालेलं असतं!