Thursday, October 7, 2010

भविष्याची गरज

गेल्या काही वर्षामध्ये बाइक्सची वेगवेगळी मॉडेल्स ग्राहकांना आकृष्ट करत आहेत. आजकाल सीएनजी, एलपीजीसारख्या पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर दुचाकी वाहनांसाठी कसा करता येईल, यावर प्रयोग होत आहेत. चार्जिगची सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्यास बॅटरीवर चालणाऱ्या बाइक्सही लोकप्रिय होतील..

धूमचित्रपटाने भारतातील प्रेक्षकांना मोटारसायकलींच्या एका वेगळ्या विश्वाची ओळख करून दिली. दुचाकी म्हणजे केवळ प्रवासाचं साधन इतकीच त्यांची ओळख होती. पण,मोठमोठी वाहनं जाणार नाहीत, अशा ठिकाणी वेगात जाण्याची तिची खुबी पाहून या वाहनाच्या प्रेमात सगळं जग पडलं आहे. गेल्या काही काळात तर बाइक्सच्या वेगवेगळ्या श्रेणी ग्राहकांना आकृष्ट करू लागल्या आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने होत असताना, इथल्या तरुण ग्राहकांच्या हातात मोठय़ा प्रमाणावर पैसा खुळखुळू लागला आहे. त्यांना आकृष्ट करण्यासाठी देशातल्या अनेक दुचाकी बनवणा-या कंपन्यांसह चारचाकी किंवा मोठय़ा वाहनांच्या उत्पादक कंपन्यांनाही दुचाकीची ही वाढती बाजारपेठ खुणावू लागली आहे. या बाजारपेठेच्या वाढीचा वेग इतका आहे की गेल्या वर्षीच्या जागतिक मंदीच्या काळातही- सर्व उत्पादनांचा विक्रीचा आलेख घसरलेला असताना, ही बाजारपेठ मात्र दमदार वाटचाल करत होती.

एकीकडे पेट्रोलसारख्या इंधनाची टंचाई आणखी काही काळात भासणार असल्याचे इशारे दिले जात असताना, काही दुचाकी उत्पादकांनी थेट विजेवर चालणाऱ्या दुचाकी बाजारात आणल्या आहेत. सध्या या वाहनांची क्षमता कमी असली तरी भविष्यात त्यांच्या चार्जिगची सोय सर्वत्र उपलब्ध होऊ लागल्यावरच त्यांचा वापर वाढणार, हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर पर्यावरणस्नेही सीएनजी, एलपीजीसारख्या इंधनांचा वापर दुचाकी वाहनांसाठी कसा करता येईल, याचीही चाचपणी केली जाऊ लागली आहे.

थ्री इडियट्सचित्रपटातील रांचो अर्थात फुनसुक वांगडूने स्कूटरच्या इंजिनाचा वापर करून दैनंदिन गरजेची अनेक उपकरणे चालवली होती. पण हे केवळ सिनेमापुरतेच मर्यादित नाही. ग्रामीण भागातही असे अनेक फुनसुक वांगडू आहेत, ज्यांनी त्यांच्या दुचाकींचा वापर अशा उपकरणांसाठी केला आहे. त्यामुळे या वाहनाला नाक मुरडण्यापेक्षा त्याचे उपयोग, त्याचे फायदे पाहणं ही काळाची गरज आहे. कारण लांबचलचक वाहतूक कोंडीत बडीबडी वाहनं अडकून पडलेली असताना हेच वाहन त्यातून लीलया बाहेर पडतं. पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर केला आणि दुचाकींसाठी वेगळ्या लेन ठेवल्या तर नक्कीच हवामानबदलाच्या संकटावर काही अंशी तरी मात करता येणं शक्य होईल. (पर्यावरणाबरोबरच स्वत:च्या शरीराच्या संवर्धनात साध्या सायकलींना पर्याय नाही, हे मात्र तितकंच खरं आहे.)

गेल्या तीन महिन्यांच्या काळात आपण या दुचाकी वाहनांच्या विविध प्रकारांची, त्यांच्या उपयोगीतेची, त्यांच्यावरून केल्या जाणा-या सफरींची तसंच त्यांच्या सफरींबाबत चर्चा केली. पुरेशी काळजी घेतली, बाइक्सची योग्य देखभाल केली तर सर्वाचंच बाइझिंग आनंददायी ठरेल.

No comments:

Post a Comment