Monday, December 9, 2013

एक नवीन सुरुवात?



चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल लागलेत..भुईसपाट हा शब्दही अपुरा पडेल, अशी काँग्रेसची वाताहत झालीय...ती अपेक्षितही होती..पण उल्लेखनीय म्हणजे आम आदमी पार्टीचा उदय..लोकपाल विधेयकासाठी प्रतिगांधी असं म्हणवून घेणा-या अण्णा हजारेंनी उपोषणांचा सपाटा लावला होता..तेव्हापासून अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण वगैरे मंडळी चर्चेत आली..त्यावेळी त्यांनी इथल्या सगळ्याच राजकीय नेत्यांचा यथेच्छ उद्धार केला..त्यावेळी त्यांच्यावर टीका करणा-यांनी व्यवस्थेत उतरा आणि मग टीका करा, असे सल्ले दिले..आमच्यासारखी स्वतःला पत्रपंडित म्हणवणारी मंडळी त्यात आघाडीवर होती..खरं तर ती एका बदलाची चाहूल होती...उदारीकरणानंतर उदयाला आलेला मध्यमवर्ग, संगणक क्रांती अनुभवणारा तरुणवर्ग सगळेच अण्णांच्या लाटेवर स्वार झाले होते..मै अण्णा हूँ च्या टोप्या सगळीकडे फिरत होत्या..खरं तर त्याची चेष्टा करणा-यांत मी देखील होतो..खरं तर एक चांगली संधी चालून आलेली असताना,अण्णा हजारेंनी राजकारणात प्रवेश करायला नको म्हणून पळ काढला आणि राळेगणसिद्धी गाठली..
अरविंद केजरीवाल यांनी मात्र, राजकारणात प्रवेशाची घोषणा केली..त्यावेळीही यांना कोण विचारणार, किती जागा मिळणार, म्हणून हेटाळणी केली गेली..आम्हीही त्यात होतो..पण दिल्लीनं या हेटाळणीखोरांचे दात घशात घातलेत..आता तटस्थपणे विचार करता, ही एक क्रांती म्हणावी लागेल..कोणत्याही प्रकारची हिंसा न करता, कोणत्याही प्रकारचं जातीय कार्ड न वापरता, कोणत्याही प्रकारची सनसनीखेज वक्तव्ये न करता, फक्त स्वच्छ कारभाराचं आश्वासन देऊन, नवे चेहरे देऊन सत्ता स्थापन करता येते, याचं उदाहरण अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टीनं घालून दिलंय..
भाजपच्या विजयाचा एक वेळ काँग्रेसला धक्का बसला नसेल, पण आम आदमी पार्टीचं हे यश काँग्रेसला चांगलंच झोंबलं असेल..पूर्ण विजय मिळाला नाही, पण काँग्रेसला चारीमुंड्या चीत करून आम आदमी पार्टीनं आपली दखल घ्यायला लावली..भारतीयांना एक सशक्त राजकीय पर्याय अशाही प्रकारे उभा राहू शकतो, हे दाखवून दिलंय..आणि तेच काँग्रेससाठी धोकादायक ठरलंय..
भाजपचं बोलायचं झालं तर आम आदमी पार्टीचं यश भाजपच्या चाणक्यांपेक्षा नरेंद्र मोदींना चांगलंच झोंबलं असेल..एकच टेप सगळीकडे वाजवून वाजवून घसेफोड भाषणे करूनही जे शक्य झालं नाही ते शांतपणे, जनतेत जाऊन, लोकांच्या हिताची आश्वासनं देऊन केजरीवालांनी करून दाखवलंय..भाजपला घवघवीत यश मिळालं..पण त्यासाठी मोदींची चर्चा होण्याऐवजी आम आदमी पार्टीचीच चर्चा झाली, हे मोदींसाठी नक्कीच धोक्याचं लक्षण आहे..महत्त्वाचं म्हणजे लोकसभा ज्यांच्या पाठबळावर लढायची, ते मध्यमवर्गीय, संगणकसाक्षर तरुण आम आदमी पार्टीच्या मागे उभं राहिल्याचं चित्र दिसलंय..भाजपसाठी आणि विशेषतः नमोंसाठी ही धोक्याची घंटा आहे..
लोकसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आहेत..आम आदमी पार्टीनं त्या निवडणुकीत आपले उमेदवार उभे केले तर भाजप आणि काँग्रेस दोघांसाठीही धोकादायक ठरू शकेल...महाराष्ट्रात मनसेनं जे केलं, ते इथं हा पक्ष करू शकेल..आधीच आगामी लोकसभा त्रिशंकू असल्याची चर्चा होत असताना, आम आदमी पार्टीचा उदय हा सगळ्याच प्रस्थापितांसाठी एक इशारा ठरू शकतो..
जाता जाता, काँग्रेसनं खूप चांगले निर्णय घेतलेत..पण त्यांची हवी तशी प्रसिद्धी करण्यात ते अजूनही अपयशी ठरलेत..काही निवडक नेते सोडले तर एकही नेता विश्वासपात्र नाही...भाकरी वेळेवर उलटवण्याऐवजी आहे ती करपलेली भाकरी बाजूला ठेवून नव्याने पीठ मळून भाकरी करावी लागेल, नाहीतर सत्तेच्या भुकेने कायमच तडफडत रहावे लागणार आहे..भाजपबद्दल बोलावे असे काहीच नाही..

- नितीन सावंत

Sunday, November 25, 2012

वपुंच्या ‘पार्टनर’ने पछाडले



- सतीश पुळेकर आणि समीर सुर्वेंनी उलगडली चित्रनिर्मितीची कथा

ज्येष्ठ साहित्यिक व कथाकथनकार व. पु. काळे म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सर्वसामान्य माणसांच्या खोली-दोन खोलीतल्या व्यथा मांडणार्‍या असंख्य कथा येतात आणि ओघानेच या व्यथांवर रामबाण उपाय सुचवणारी पार्टनर ही व्यक्तिरेखा मनाचा ताबा घेते. जगात खरेच असतील का पार्टनरसारख्या व्यक्ती, का आपला पार्टनर आपल्याच मनात दडलेला असतो, अशा अनेक प्रश्नांनी मनात काहुर उठते. अशा या पार्टनर नावाच्या वपुंनी अमर केलेल्या पात्रावर श्री पार्टनर नावाने चित्रपट आलाय. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि पार्टनर रंगवणारे सतीश पुळेकर यांनी ‘लोकमत’ कॉफी टेबलमध्ये रुपेरी पडद्यावरील पार्टनरचा प्रवास उलगडला..
------------------------------------
१) आर्थिक स्थिती बेताची आहे म्हणून पैसे वाचवताना आम्ही कधीही दर्जाशी तडजोड केली नाही. वेगवेगळे शॉट घ्यायचे नि टेबलावर जोडायचे हा उद्योग केला नाही. एकदा तर तीन संपूर्ण दिवसांचे शूटिंग मनासारखे झाले नव्हते, म्हणून ते पुन्हा केले नि पैशाचा विचार नाही केला.
२)इंग्रजीमध्ये ८0 टक्के सिनेमे कादंबर्‍यांवरून बनवले जातात. आपल्याकडे हा प्रकार रुजलेला नाही. परंतु मराठीत इतके दज्रेदार साहित्य आहे की अनेक चित्रपट बनू शकतात. पर्व क्रिएशन्स या संस्थेची निर्मितीच या उद्देशाने झालेली आहे.
३) सुरुवातीला फायनान्ससाठी अनेकांना भेटलो. अनेक अटी घालत, बदल सुचवत लोकांनी पैसे देऊ केले.
त्यास नकार दिल्यावर फायनान्सरांनी पाठ दाखवली. आज हात आखडता घेतलेल्या त्याच लोकांनी भविष्यात एकत्र काम करू असे बोलायला सुरुवात केली आहे.
------------------------------------
३५ वर्षांमध्ये चित्रपट निर्मात्यांनी हात न लावलेल्या पार्टनरवर सिनेमा बनवावा हे कधी वाटलं?
समीर सुर्वे - सात-आठ वर्षांपूर्वी पार्टनर वाचली आणि अक्षरश: सुन्न झालो. चित्रपट बघून, नाटक बघून आपण बधिर होतो, सुन्न होतो.. पण, पुस्तक वाचून असे कधी होत नाही. परंतु, पार्टनर ही कादंबरी अपवाद होती. मी दोन दिवस या विश्‍वातच नव्हतो. ज्या वेळी भानावर आलो, त्या क्षणीच ठरवले या कादंबरीवर चित्रपट बनवायचा. ३५ वर्षे झालेल्या या कादंबरीमधली प्रत्येक गोष्ट आजही तंतोतंत लागू आहे, यापुढेही लागू राहील हे उमगले आणि मी कादंबरीकडे चित्रपटाची स्क्रिप्ट यादृष्टीनेच बघायला लागलो.

पण, चित्रपट वास्तवात यायला आठ वर्षे का लागली? आणि हे शिवधनुष्य तुम्ही नक्की कसे पेलले?
सतीश पुळेकर - याचे सर्व श्रेय जाते ते समीरला.. या कादंबरीवर चित्रपट करायचाच या विचाराने तो इतका पछाडला होता की त्याच्या डोक्यात कायम तोच विचार असायचा. त्यासाठी त्याने या कादंबरीचा सखोल अभ्यास केला. या कादंबरीची ताकदच इतकी जबरदस्त आहे की त्यासाठी वेगळ्या संवादांची गरजच नव्हती. पण, इतका प्रचंड आवाका असलेला विषय दोन-अडीच तासांत मांडणे हे प्रचंड कठीण काम होते. समीरने तब्बल १४ वेळा या पटकथेचा मसुदा लिहिला. इतकी मेहनत घेतली म्हणूनच आज इतका दज्रेदार चित्रपट तयार करता आला.

पटकथा हे एकच आव्हान होते की आणखी काही आव्हानांचाही सामना करावा लागला?
समीर सुर्वे - वपुंच्या कथेला धक्का न लावता चित्रपटाच्या माध्यमाला अनुकूल असे बदल करणे हा एक भाग होता. पण, त्यापेक्षा मोठे आव्हान होते, ते म्हणजे आर्थिक भाराचे; आणि या जबरदस्त भूमिका पेलू शकतील अशा गुणी कलाकारांच्या निवडीचे. ज्या दिवशी मी पार्टनर करायचे ठरवले त्या दिवशीच पार्टनरची भूमिका सतीश पुळेकर आणि आईची भूमिका लालन सारंग करतील हे मी ठरवले होते. मला प्रचंड विरोध झाला, लोकांनी वेड्यात काढले, परंतु मी माझ्या निवडीवर ठाम राहिलो आणि आज त्याचा मला अजिबात पश्‍चात्ताप होत नाही. दुसर्‍या ज्या भूमिका आहेत, श्री आणि किरणच्या, त्यासाठी मात्र मी खूप मेहनत घेतली. बहुधा मराठीमध्ये प्रथमच मी कलाकारांच्या ऑडिशन घेतल्या. राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गुणी कलाकारांच्या ऑडिशन घेतल्या आणि शेकडो कलाकारांमधून पद्मनाभ भिंड व श्‍वेता पगार यांची निवड केली.
हे दोघेही नवोदित आहेत, त्यांना कुणी फारसे ओळखत नाहीत. पण, सिनेमा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की इतका मॅच्युअर अभिनय, आपल्या व्यक्तिरेखेची जाण फार कमी कलाकारांना असते. त्यांनी जीव तोडून काम केलेय आणि त्यामुळे हा सिनेमा वेगळी उंची गाठू शकला आणि वपुंच्या कलाकृतीला न्याय देऊ शकला.

पुळेकरजी, तुम्ही आज इतकी वर्षे या व्यवसायात आहात. स्वत: दिग्दर्शक आहात. तुमचा नवोदित दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी ज्या वेळी दुसर्‍या कप्तानाच्या टीममध्ये काम करत असतो, त्या वेळी कधी लुडबूड करत नाही आणि कप्तानाची म्हणजे दिग्दर्शकाची माझ्याकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. इथेही मी तेच केले आहे. पण एक गोष्ट आवर्जून सांगेन, समीरने जी मेहनत घेतली आहे त्याला काही तोड नाहीये. त्याने चित्रपटासाठी योग्य असे काम आमच्या सगळ्यांकडून करून घेतले आहे. पद्मनाभ आणि श्‍वेता यांच्यासाठी कॅमेरा नवा आहे, प्रणयदृश्यांमध्ये ते बुजतील असे लक्षात आल्यावर समीरने त्यांच्यासाठी १५ दिवसांचे वर्कशॉप घेतले. अक्षरश: सीन्सच्या रंगीत तालमी करून घेतल्या आणि त्याचा चांगला परिणाम शूटिंगच्या वेळी दिसला. अत्यंत प्रगल्भ व कसलेल्या कलाकारांप्रमाणे त्या दोघांनी ते अवघड प्रसंग लीलया पेलले. मला वाटते असा वर्कशॉपचा प्रकार मराठीत पहिल्यांदाच झालाय आणि या नव्या पायंड्यासाठी समीरचे कौतुक करायला हवे. अनेक निर्माते एका आठवड्यात नि दोन महिन्यांत सिनेमा बनवत असताना समीरने मनासारखा सिनेमा बनवण्याचा ध्यास घेतला आणि आर्थिक समस्यांचा विचार न करता एका सिनेमासाठी तीन वर्षे मेहनत केली.

या सिनेमाचे आणखी काय वैशिष्ट्य सांगाल?
अनेक आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला अनेकांनी केलेली मदत. वपुंच्या कन्या स्वाती चांदोरकर या पहिल्यापासून आमच्यासोबत आहेत. गाण्यांसाठी संगीतकार नीलेश मोहरीर, गीतकार अश्‍विनी शेंडे यांनी खूप मेहनत घेतली आहे. गाणी हा सिनेमातला ब्रेक न ठरता ती कथा पुढे घेऊन जातात, सिनेमाचा एका हिस्सा बनतात. गाण्यांचे या चित्रपटातील योगदान खूपच महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी नीलेश व अश्‍विनी यांचे आभार मानायला हवेत. ज्या वेळी गाण्यांच्या सीडीचे प्रकाशन झाले, त्या वेळी एकाच दिवसात अडीच का तीन हजार सीडी विकल्या गेल्या, यावरून तुम्हाला गाणी किती सुंदर आहेत याचा अंदाज येईल.

- शब्दांकन
नितीन सावंत

Sunday, March 13, 2011

रहस्य त्वचेचं!

नितीन सावंत

माणसाच्या ज्ञानेंद्रियांपैकी अत्यंत महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे त्वचा. केवळ स्पर्शज्ञानाचंच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वही सिद्ध करण्याचं काम त्वचा करत असते. नितळ, निकोप त्वचा हे निरोगीपणाचं लक्षण समजलं जातं. त्याचबरोबर त्वचेवरूनच वयाचा अंदाजही बांधता येतो. त्यामुळेत्वचा निरोगी कशी राखता येईल, याकडे केवळ स्त्रियाच नव्हे; तर पुरुषही अधिक लक्ष देतात. आपली आवडती नटी किंवा नट अगदी पन्नाशीतही त्वचेचं सौंदर्य कशा प्रकारे राखून आहेत, याची उत्सुकता तर प्रत्येकालाच असते. त्वचेचं तारुण्य अबाधित राखणारी सौंदर्यप्रसाधनं, शस्त्रक्रिया यांचाच तर हल्ली बाजारात सुळसुळाट झालाय.

पण ही त्वचा माणसाच्या वयानुसार बदलत कशी जाते? तरुणपणी ती तजेलदार कशी बनते? तर वार्धक्याबरोबर तिच्यावर सुरकत्यांचं जाळं कसं पसरतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधनं तिला खरोखरच नवचैतन्य मिळवून देतात काय? हे सगळं जाणून घ्यायचं तर त्वचेसंबंधीचं विज्ञान समजून घेणं महत्त्वाचं आहे.

मानवी शरीराच्या एकंदर वजनाच्या १२ ते १६ टक्के वजन त्वचेचं असतं. वाढत्या वयोमानानुसार त्वचेखाली असणाऱ्या मेदांचं प्रमाण कमी होतं आणि त्वचेवर त्याचा परिणाम घडून यायला सुरुवात होते. त्वचेतील मुख्य घटक पाणी असून त्याचं प्रमाण ७० टक्के, त्याखालोखाल प्रथिनं २५.५ टक्के, मेद दोन टक्के, खनिजं ०.५ टक्के तर इतर घटक २.० टक्के आहेत. त्वचा तीन भागांत विभागलेली असते. डर्मिस म्हणजे सर्वसाधारणपणे ज्याला त्वचा म्हटलं जाते, तो भाग मध्ये असतो. एपिडर्मिस म्हणजे बाह्मत्वचा आणि सबक्युटीस म्हणजे अंतर्त्वचा. त्वचेचे हे प्रमुख तीन भाग.

त्वचेचं मुख्य कार्य बाह्म आघातांपासून शरीराचं रक्षण करणं, हे आहे. त्वचेचे विविध स्तर त्वचेवर जंतुसंसर्ग होऊ नये किंवा ती कोरडी पडू नये, यासाठी सतत कार्यरत असतात. त्वचेला अकाली वार्धक्य आणणाऱ्या घटकांमध्ये सूर्यकिरणांचा मोठा वाटा असतो. त्यातील अतिनील किरणांचा त्वचेवर विपरित परिणाम होत असतो. त्याचबरोबर धूम्रपानही त्वचेला वार्धक्य आणण्यात आपला वाटा उचलत असतं.

त्वचेतील ग्लायकोसोयामिनोग्लायकान्स (गॅग) आणि प्रोटेओग्लायकान्स हे घटक त्वचेत पाणी धरून ठेवण्याचं काम करतात. थोडक्यात, स्कीन मॉयश्चरायझर म्हणता येईल. त्वचा तजेलदार दिसण्यामागील हा एक मुख्य घटक आहे. कॉस्मेटिक मॉयश्चरायझरही हेच काम करतात. मात्र त्यांच्यात पेट्रोलियम किंवा जड तेलाचा वापर केला जातो. त्यांच्यामार्फत त्वचेतील पाण्याचा अंश कमी होण्याचा वेग मंदावण्याची क्रिया घडते. मात्र ही प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपाची असते.

त्वचेला ताकद आणि दीर्घायुष्य देण्याचं काम कोलाजीन हे शरीरात विपुल प्रमाणात आढळणारं प्रथिन करतं. वय वाढतं तसं हे प्रथिन कमी होत जातं आणि त्वचा पातळ होते. त्याचबरोबर त्वचेतील इलास्टीन (त्वचा सैल पडू नये म्हणून असणाऱ्या तंतूंचे) या कोलाजीनसारख्याच प्रथिनाचं काम त्वचेचा घट्टपणा कायम राखणं, हे आहे. इलास्टीनमध्ये डेस्मोसिन आणि आयसोडेस्मोसिन नावाची दोन अमिनो आम्लं असतात. कोलाजीन आणि इलास्टीन या दोन घटकांवरच त्वचेचं सौंदर्य अवलंबून आहे. त्यामुळे हे घटक वापरून अनेक सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती केली जाते. मात्र त्यातील कोलाजीन आणि इलास्टीन हे घटक दुभती जनावरं किंवा पक्ष्यांपासून मिळवलेले असतात. हे घटक मानवी त्वचेत शिरकाव करू शकत नाहीत, उलट त्यामुळे मॅड काऊसारखे रोग होण्याची शक्यताच अधिक.

भाषावादामागचं विज्ञान


नितीन सावंत
एखादी नवी भाषा शिकायला किती वेळ लागतो
? ती केवळ लहानपणीच शिकता येते? एकदा विशिष्ट वय सरलं की, नवी भाषा शिकणं अशक्यच असतं?

हे खरं तर भाषेशी संबंधित साधे सरळ प्रश्न. पण त्याला राजकीय रंग लागला की ते एकदम गंभीर होऊन जातात. म्हणजे असं की, ‘मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच एक फतवा काढला की, समाजवादी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अबू हसन आझमी यांनी विधानसभेत मराठीत शपथ घ्यायला हवी. तर आझमी हट्टाला चिकटून बसले की, मी हिंदीतच शपथ घेणार. त्यातून बराच वाद निर्माण झाला. प्रकरण आझमींना विधानसभेत मारहाण करण्यापर्यंत गेलं. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही, असा सवालही उभा राहिला. भाषेचा मुद्दा, जो आधीपासून वादग्रस्त होता, तो पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला.

मुंबईत-महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी अस्मितेचं पेव फुटलं आहे. स्वत:ची मुलं, नातवंडं इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालणा-यांना अचानक मराठी भाषेचा प्रचंड पुळका आला आहे. महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येकाने मराठी बोलायलाच हवं, असा आग्रह ही मंडळी करत आहेत. (त्यांच्या मुलांना कविता मात्र इंग्रजी भाषेतच स्फुरतात ही बाब अलाहिदा) एका पक्षाने लोकशाहीचं पवित्र मंदिर मानल्या जाणा-या विधानसभेत या मराठी भाषेवरूनच राडा करून मराठी भाषकांची पंचाईत करून टाकली. तर दुसरीकडे जाणीवपूर्वक राजकारण करून मराठी भाषेला विरोध करणा-या प्रवृत्तींनीही निगरगट्टपणाचं दर्शन घडवून हा वाद कसा चिघळेल, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं. त्यानंतर आता या राजकारणाचाच भाग म्हणून मराठी भाषा शिकूनच दाखवतो, असा पवित्रा काहींनी आणला आहे.

भाषेवरून हा सगळा गदारोळ होणं हे राजकीयदृष्टय़ा सोयीचं असलं तरी भाषेचंही एक विज्ञान असतं. या विज्ञानानुसार कुठली भाषा कधी शिकायची याचंही गणित ठरलेलं आहे. म्हणजे विशिष्ट वय सरल्यावर नवी भाषा शिकणं शक्य आहे का,असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर नाईलाजाने नाहीअसं आहे. कारण भाषाशास्त्रच तसं सांगतं. भाषाशास्त्रानुसार कोणतीही भाषा आत्मसात करण्यासाठी वयाची पहिली दहा वर्ष अतिशय महत्त्वाची ठरतात. मुलं सर्वप्रथम आपली मातृभाषा शिकतात. उदा. मराठी कुटुंबातील मुलं मराठीत किंवा इतर भाषक कुटुंबातील मुलं त्या-त्या भाषेत सहजपणे संवाद साधू शकतात. याच वयात प्राथमिक शाळेत शिक्षणाची सुरुवात होते. त्यामुळे हा विद्यार्थी ज्या माध्यमाच्या शाळेत जातो आहे, ती भाषाही त्याला आत्मसात होते. मुंबईसारख्या महानगरात तर परभाषक शेजा-यामुळे लहान मुलंही आणखी एखादी भाषा सहज बोलताना दिसतात. ही भाषिक गुंतागुंत जाणून घेण्यासाठी मुळात भाषा शिकण्याची प्रक्रिया कशी घडते ते जाणून घ्यायला हवं.

भाषाशास्त्राच्या नियमाप्रमाणे कोणतीही व्यक्ती त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत एक किंवा अधिक भाषा अगदी अस्खलितपणे बोलायला शिकू शकते. त्या दृष्टीने मानवी मेंदूची रचनाही केलेली असते. मेंदूच्या डावीकडील दोन भागांत भाषा शिकण्याचे कप्पेअसतात. डावीकडील प्रमष्तिकातील ब्रोकानावाच्या भागात भाषा तयारहोते. तर या भाषेवरील प्रक्रिया आणि भाषा ग्रहण करण्याचं काम व्हेर्निकेनावाच्या भागात होतं. अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, प्रत्येक बालक भाषेतील मूलभूत तत्त्वं ग्रहण करण्याचं ज्ञान घेऊनच जन्माला येत असतं. शब्दाचा अर्थ समजणं, वाक्यरचना करणं,आवाजाचे चढउतार ओळखणं, हे त्याला उपजतच ठाऊक असतं. त्यामुळे मुलांना त्यांच्या पहिल्या १० वर्षात आपण शिकवू ती भाषा शिकणं फारसं अवघड जात नाही.

वय वाढत जातं तसं आपल्या मेंदूत आपण बोलत असलेल्या भाषेची जागा पक्की होत जाते. लहान मुलांना त्यांच्या कानांवर पडणारे शब्द, आवाजाचे चढ-उतार कळून त्याप्रमाणे त्या शब्दांचा अर्थ निश्चित करणं शक्य होतं. मात्र वय वाढल्यावर माणूस त्याला ठाऊक असलेल्या भाषेशी नवीन भाषेतील शब्द, त्यांचे उच्चार, त्यांची पडताळणी करण्यास सुरुवात करतो. या प्रक्रियेतच खूप मोठा कालावधी जात असल्याने वय वाढल्यावर नवीन भाषा शिकणं कठीण होऊन बसतं. थोडक्यात, लिहिलेल्या पाटीवर नव्याने लिहिण्यासारखा हा प्रकार आहे. नवी भाषा शिकण्यासाठी अधी पाटी कोरी करणं गरजेचं ठरतं, पण ते शक्य होत नाही. काही जण वय वाढल्यावरही नवी भाषा शिकतात. पण त्यामुळे ब-याचदा त्यांना आपली पहिली भाषा किंवा त्या भाषेतील चपखल शब्द ऐनवेळी आठवत नाहीत. मराठी क्रिकेटपटू किंवा अभिनेत्यांचं उदाहरणच देता येईल. पुढे इंग्रजीचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडतो की त्यांचं मराठीही अगदी इंग्रजाळलेलं होतं आणि मराठी बोलताना नेमके शब्द आठवत नाहीत.

वय वाढल्यावर दुसरी भाषा शिकणं का शक्य होत नाही, याची इतर अनेक कारणं आहेत. आपल्या स्थानिक भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळे उच्चार, व्याकरण, शब्दरचना असलेली भाषा शिकणं कधीही अवघडच असतं. मराठी मंडळी गुजराती भाषा लवकर शिकू शकतात, पण त्यांना दक्षिणेकडील भाषा शिकणं फारच अवघड जातं. कारण दाक्षिणात्य भाषांचे पूर्णपणे अनोळखी शब्द आणि व्याकरण. त्यामुळेच पश्चिमेकडील मंडळींना चिनी, जपानी भाषा शिकणं तुलनेनं अवघड जातं.

पण दुसरी भाषा शिकणं खरोखरच अवघड आहे का, याचं उत्तर ठामपणे नाहीअसंही देता येणार नाही. काही जण अगदी भाषाप्रभू असतात. त्यामुळे कुठल्याही वयात कोणतीही भाषा शिकणं त्यांच्यासाठी अवघड नसतं. नवीन भाषा शिकणं म्हणजेपोरखेळआहे, असं म्हटलं जात असलं तरी वयस्कांनाही नवीन भाषा शिकता यावी, यासाठी आता संशोधनही सुरू आहे. त्यामुळे अबू आझमींना मराठी शिकणं, तसं अवघड ठरणार नाही, असा विश्वास व्यक्त करू या. जमल्यास आपणही एखादी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न तरी करून पाहायला काय हरकत आहे?

सूक्ष्मतेकडून अतिसूक्ष्मतेकडे

नितीन सावंत


मानवाच्या प्रगतीत मैलाचा दगड ठरलेल्या शोधांपैकी एक महत्त्वाचा शोध सूक्ष्मदर्शकाचा म्हणता येईल. सतराव्या शतकात पहिल्यांदा सूक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून काही पेशी व जिवाणू पाहिले गेले. मानवाला जडणारे विविध रोग हे अशाच सूक्ष्म जिवाणू आणि विषाणूंची देणगी असते, हे सिद्ध करण्याचं काम सूक्ष्मदर्शक तेव्हापासून आतापर्यंत चोखपणे करत आला आहे.

सुरुवातीला ज्याला सूक्ष्मदर्शक म्हटलं गेलं ते एक साधं साधन होतं. एक नळकांडी..तिच्या पलिकडील बाजूला ऑब्जेक्ट आणि दुसरीकडे त्याची मोठी प्रतिमा दाखवणारी काच.. असं या सूक्ष्मदर्शकाचं ढोबळ स्वरूप होतं. अठराव्या शतकात अधिक बाक असलेल्या भिंगांच्या शोधामुळे सूक्ष्मदर्शकांमध्ये आमूलाग्र बदल झाले. या भिंगांच्या माध्यमातून अधिक सुस्पष्ट चित्र मिळणं शक्य झालं. त्याचबरोबर अधिकाधिक अचूकता आणण्यासाठी एकापेक्षा अधिक भिंगं एकाच वेळी जोडणंही शक्य झालं. त्यानंतर सूक्ष्मदर्शकांचे विविध प्रकार तयार झाले. नवीन तंत्रज्ञान आणि प्रकाश उत्सर्जनाच्या विविध पद्धतींचा सखोल अभ्यास यामुळे पेशीविज्ञान समजणं अधिक सुलभ झालं. कर्करोगासारख्या आजाराची कारणं तसंच उपचारपद्धतींचा शोध लावण्यातही सूक्ष्मदर्शकाने मोलाची भूमिका निभावली आहे. या सूक्ष्मदर्शकांच्या साहाय्याने २० ते २५ नॅनोमीटर इतक्या सूक्ष्म आकाराच्या प्रतिमा पाहणं अगदीच सोपं झालं.

पण त्याचवेळी या सूक्ष्मदर्शकांच्या अनेक मर्यादाही स्पष्ट होऊ लागल्या होत्या. बहुतेक सूक्ष्मदर्शक हे ऑप्टिकलप्रणालीवर आधारित होते. तपासणीसाठी ठेवलेल्या नमुन्यावर प्रकाशकिरण िभंगामार्फत पडल्यानंतर त्यांचं परावर्तन होतं व त्यांची मोठी प्रतिमा आपल्याला दिसते, असं सूक्ष्मदर्शकाचं सामान्यत: स्वरूप असतं. मात्र, प्रकाशाचे वहन तरंगांप्रमाणे होत असल्यामुळे एकाच प्रकाशकिरणातील विविध तरंग एकमेकांमध्ये मिसळले जातात. थोडक्यात, त्यांचं डिफ्रॅक्शनहोतं. म्हणजे ते एकमेकांपासून विखुरले जातात. त्यामुळे भिंगामार्फत एखाद्या ऑब्जेक्टवर हा किरण सोडला जातो, तेव्हा प्रकाशकिरणांच्या तरंगलांबीप्रमाणे (वेव्हलेंग्थ) क्ष आणि य दिशेला २०० नॅनोमीटर रुंदीचा तर र दिशेला ५०० नॅनोमीटर लांबीचा ठिपका तयार होतो.

१९३०नंतर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक तयार करण्यात आले. मात्र त्यांची किंमत प्रचंड असल्याने ते सर्वाच्याच आवाक्यात येऊ शकत नव्हते. या सूक्ष्मदर्शकांमध्ये प्रकाशकिरणाऐवजी इलेक्ट्रॉनच्या किरणांचा वापर केला जात होता. त्याच्यामुळे मिळणारी प्रतिमा उच्च दर्जाची प्रतिमा होती. फोटॉनएवजी इलेक्ट्रॉन किरणांच्या तुलनेने लहान तरंगलांबीचा वापर केल्यामुळे हे साध्य होत होते. (फोटॉन नावाच्या कणांपासून प्रकाशाची निर्मिती होते.)

या सूक्ष्मदर्शकांमुळे अधिकाधिक सूक्ष्म प्रतिमा मिळू लागल्या तरी त्यांचा फायदा जैविक नमुन्यांसाठी होत नसल्याचं नंतरच्या काळात निष्पन्न झाले. इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकातून प्रतिमा पाहण्यासाठी त्या निर्वात पोकळीत ठेवणं गरजेचं होतं. त्याचबरोबर हे नमुने बऱ्याचदा कापावे लागत. (स्लाइस तयार करणे) युरेनियम, शिसे किंवा इतर धातूंसारख्या आवरणांचा मुलामाही त्यावर द्यावा लागे. त्यामुळे अशा सूक्ष्मदर्शकातून पाहण्यात येणारे नमुने जिवंत राहण्याची शक्यताच उरत नव्हती.

जीवशास्त्र किंवा औषधनिर्माण शास्त्रात इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाचा वापर करणं काही प्रमाणात शक्य होतं. मानव किंवा इतर प्राण्यांच्या पेशींचा आकारही प्रकाशाचा वापर केल्या जाणाऱ्या सूक्ष्मदर्शकातून पाहण्यासाठी पुरेसा होता.

मुळात प्रत्येक पेशी ही जिवंत असते..तिच्यात काहीतरी कार्य सुरू असतं..पेशींतील प्रथिनांचं वहन किंवा एकीकरण सुरू असतं. आपल्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी किंवा बाह्य घटकांशी लढण्यासाठी प्रथिनांची निर्मिती करण्याचे काम पेशींमध्ये होत असते. त्याचबरोबर किती पेशी मृत पावणं गरजेचं आहे, हेदेखील प्रथिनंच ठरवत असतात. (कर्करोगात अनियंत्रित पद्धतीने पेशी मृत पावत असतात.) मात्र साध्या प्रकाशाचे सूक्ष्मदर्शक (२०० नॅनोमीटर प्रतिमा) प्रथिनं कशा प्रकारे जवळ येत आहेत, पेशींच्या कोणत्या भागांकडे त्यांचं वहन होतं आहे व त्यांची तिथे काय गरज आहे, हे सांगण्यास अपुरे पडतात. वैद्यकीय संशोधन आणि नवीन उपचारपद्धतींच्या शोधांसाठी हे आवश्यक आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला फ्लुरोसेंस सूक्ष्मदर्शकांच्या वापरास सुरुवात झाली. आपण एखाद्या वस्तूचा रंग ओळखतो तो त्यावरून परावर्तित झालेल्या तरंगलांबीच्या आकारावरून. फ्लुरोसेंस पद्धतीत ठराविक तरंगलांबीचा प्रकाशकण एखाद्या कणाकडून शोषला जातो व त्याचं अधिक तरंगलांबीच्या प्रकाशकिरणात परावर्तन होतं.

जैविक घटकांमध्ये मोठय़ा प्रमाणात विविध तरंगलांबीचे प्रकाशकण परावर्तित होत असल्याने पेशीच्या पृष्ठभागापलिकडे जाऊन पाहणं शक्य होत नाही. या ठिकाणी फ्लुरोसेंस पद्धतीचा वापर होतो. या पद्धतीत बाहेर पडणा-या प्रकाशाच्या तरंगलांबीपेक्षा परावर्तित झालेल्या प्रकाशाची तरंगलांबी अधिक असते. त्यामुळे अशा सूक्ष्मदर्शकातून डायक्रोइक आरशांच्या मदतीने सोडलेल्या किरणांपासून परावर्तित झालेले प्रकाशकण इतर प्रकाशकणांपासून वेगळे करून त्यांचा अभ्यास करणं शक्य होऊ शकतं.

प्रकाशावर आधारित असणाऱ्या सूक्ष्मदर्शकाचं काम तरंगलांबीवर अवलंबून असल्याने प्रतिमा अधिक स्पष्ट दिसण्यासाठी तरंगलांबी कमी करणं गरजेचं असतं. आपण दृश्य वर्णपटांपासून अतिनील वर्णपटांपर्यंत जसजशी वाटचाल करू लागतो,तसतसा प्रकाश विषारी बनू लागतो. अतिनील किरणांमुळे ब-याचदा डीएनएचे बंधही तुटू शकतात. त्यामुळे पेशींचं नियमित कामही बिघडू शकतं.

प्रतिमा अधिक सुस्पष्ट दिसण्यासाठी दोन परस्परविरोधी दिशांना लावलेल्या भिंगांचा वापर केला जाऊ शकतो. त्यामाध्यमातून १०० नॅनोमीटपर्यंतचे रेझोल्युशन आपल्याला मिळू शकते. मात्र, त्यासाठी आपल्याला ज्याची प्रतिमा घ्यायची आहे, तो ऑब्जेक्ट योग्य रीतीनं ठेवणं गरजेचं ठरतं.

एकीकडे सर्व जग मुठीत घेण्यासाठी मानवाची धडपड सुरू असतानाच, आहे ते जग आपल्या डोळ्यांनी सूक्ष्म रूपाने पाहण्याचीही इच्छा सूक्ष्मदर्शक पूर्ण करत आहे. त्यात गेल्या तीन शतकांत बदल झाले, प्रगती झाली असली तरी भविष्यात त्यात आणखी सुधारणा घडणारच..आणि सूक्ष्माकडून अतिसूक्ष्मतेकडची मानवी वाटचाल पुढेही सुरूच राहणार, हे नक्की!


Tuesday, February 15, 2011

अलिप्तता कितपत शक्य?

इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या तीन दशकांच्या राजवटीला कंटाळून तेथील जनतेने सुरू केलेल्या उठावानानंतर मुबारक यांना पद सोडावे लागले. गंमत म्हणजे सरकारविरोधी उठावात जनतेची मुस्कटदाबी करण्याचे काम करणा-या इजिप्तमधील लष्करानेच या उठावाला अप्रत्यक्ष रूपात का होईना पाठिंबा दिल्याने इजिप्तमधील येत्या काळातील घडामोडी नक्कीच रंगतदार ठरणार यात संशय नाही.
दुस-या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर अमेरिका आणि रशिया यांना मानणारे दोन गट तयार झालेले असताना, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इजिप्ततचे तत्कालीन अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर यांच्या पुढाकाराने आलिप्त राष्ट्र चळवळ सुरू करण्यात आली होती. भारताचा एक चांगला सहकारी म्हणूनच इजिप्तची ओळख कायम राहिली आहे. त्यामुळे इजिप्तला राष्ट्रकुलातून वगळण्यासाठी झालेल्या लढ्यात १९५६मध्ये भारताने इजिप्तला पाठिंबा दिला होता. अमेरिकेच्या पुढाकाराने अरब राष्ट्रांतून वेगळा भूभाग काढून इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण अरब राष्ट्रांत निर्माण झालेल्या असंतोषाची परिणती १९६७च्या अरब-इस्रायल यांच्यातील लढ्यात झाली. त्यावेळीही भारताने इजिप्तची बाजू घेतली.
आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेला इजिप्त केवळ पश्चिम आशियाच नव्हे जागतिक स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक घडामोडींत नेहमीच मोलाची भूमिका बजावत आलेला आहे. त्यामुळेच तेथील सध्याच्या घडामोडींमध्ये सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारताने सध्या तरी हा इजिप्तचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून हात झटकले आहेत.
भारताशी नेहमीच सौहार्दाचे संबंध असलेल्या इजिप्तमध्ये अनेक भारतीय कंपन्यांचे प्रकल्प सध्या कार्यान्वीत आहेत. मात्र, सध्याच्या अशांततेमुळे काही प्रकल्प बंद करण्याची वेळ या कंपन्यांवर आली आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय समुदायाशी होणारा व्यापार प्रामुख्याने सुएझ कालव्यातून होतो. हा व्यापार जवळपास ४० अब्ज डॉलरच्या घरात आहे. त्यामुळे हा व्यापार धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर भारताचे इजिप्तशी व्यापारी संबंधही चांगले आहेत. इजिप्त तसा मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्पादक देश नसला तरी तेथील घडामोडींचा परिणाम लगतच्या अरब राष्ट्रांवरही होताना दिसतोय. त्यामुळेच दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या दिशेने जात आहेत. त्याचा परिणाम भारतावर होणार, हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. कारण भारतात पेट्रोलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीशी सुसंगत केल्याचा परिणाम म्हणून गेल्या महिन्यातच पेट्रोलच्या किमती दोनदा वाढल्यात आणि इजिप्तमधला हा पेच कायम राहिल्यास भारतातही पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांच्या घरात जाण्याची भीती वर्तवली जातेय. डिझेल, गॅसच्या किमती अद्यापही सरकारच्या नियंत्रणात असल्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या वाढत राहिल्यास सरकारलाही त्यात वाढ करणे भागच पडेल आणि त्याचा परिणाम म्हणून एकंदरच महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे.
ट्युनिशियात सुरू झालेल्या या क्रांतीचे लोण इजिप्तमध्ये पसरले आणि तेथून पुढे ते संपूर्ण अरब राष्ट्रांत, पश्चिम आशियात पसरताना दिसत आहे. ही राष्ट्रे प्रामुख्याने मुस्लिमबहुल आहेत. इजिप्तला लागूनच इस्रायलसारखा अरब राष्ट्रांचा कट्टर शत्रू आहे. इस्रायलला पोसणारा देश अमेरिका आहे, हे जगजाहीर आहे. पण इजिप्तमधील तिढा वाढला आणि त्या प्रक्षोभातून इस्रायलविरोधात वणवा पेटला तर ते अमेरिकेसाठी घातक ठरेल, यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने आता इजिप्तमधील प्रक्षोप शमवण्याचे काम सुरू झाले आहे.
इजिप्तमधील सध्याच्या जनप्रक्षोभाचा परिणाम भारतासह अन्य देशांवर सामाजिक, राजकीय अंगाने काय होतो, हे पाहणेही उद्बोधक ठरेल. इजिप्तमध्ये झाली त्याप्रमाणे भारतातही क्रांतीही व्हायला हवी, असे मत अनेक उत्साही मंडळी व्यक्त करत आहेत. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, महागाई आणि विशेष म्हणजे पोलिसी दडपशाही तिथे होत होती. त्या विरोधात जनतेने हे बंड पुकारले. भारतात कितीही नाकारले तरी अशाच प्रकारचे जनतेला बंड करायला उद्युक्त करणारे वातावरण दिसत आहे. पण भारत आणि इजिप्तमधला सर्वात मोठा फरक म्हणजे इथे लोकशाही मार्गाने हे बंड पुकारले जाते. थोडक्यात काय तर निवडणूक घेऊन आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी राज्यघटनेने देशवासीयांना दिलेली आहे. इजिप्तमधील बंडाळीला सर्वात मोठे कारण ठरल्या ते सोशल नेटवर्किंग साइट्स. भारतातही गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटरवर अशाच प्रकारचे संदेश फिरताना दिसत आहेत. अरब राष्ट्रांची संघटना अरब लीगचे मुख्यालय इजिप्तची राजधानी कैरोमध्येच आहे. त्याचा पदसिद्ध प्रमुखही इजिप्तचाच नेता असतो. एकीकडे सर्व अरब देश इस्रायलवर खार खात असताना इजिप्तनेच पुढाकार घेऊन इस्रायलशी १९८९मध्ये सामंजस्य करार केला. त्यांच्याशी धोरणात्मक संबंध प्रस्थापित केले. पण आता अरब देशांत या क्रांतीच्या या फोफावलेल्या वणव्याला जगभरातील मुस्लिम समुदायाची पाठिंबा मिळताना दिसत आहे. मुस्लिम ब्रदरहूडसारख्या संघटनेवर आज इजिप्तमध्ये बंदी असली तर बहुसंख्य मुस्लिम देशांत या संघटनेबद्दल सहानुभूती आहे. इजिप्तमध्येही सरकारकडून जनतेला जे मिळत नाही, ते या संघटनेकडून सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले जाते. इजिप्तचे भावी अध्यक्ष म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते, ते मोहम्मद अलबदाई हे देखील मुस्लिम ब्रदरहूडचे काही अंशी सहानुभूतीदार आहेत.

इजिप्तमधील घडामोडींची काश्मीरशीही सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून ही चळवळ मुस्लिम देशांत पसरण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेली निदर्शने आणि इजिप्तमधील आताची निदर्शने दोन्ही सरकारविरोधातील रोष व्यक्त करणारी आहेत, असे म्हटले जाते. पण दोन्ही ठिकाणची राजकीय, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे काश्मीरमधील फुटिरतावादी लगेचच पेटून उठतील, असे समजणे चुकीचे असले तरी नेहमीच आलिप्ततावादी भूमिका घेणा-या भारताला सध्या ठाम भूमिका घेणे भाग पडणार आहे.

Friday, December 31, 2010

'साहित्य संमेलनाध्यक्षपद दोन वर्षांचे करण्यास हरकत नाही'

संमेलनाध्यक्ष म्हणून एक वर्ष कमी पडतं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारे ठराव प्रत्यक्षात आणणंही अध्यक्षांना शक्य होत नाही, या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष आणि प्रख्यात समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी मात्र समाधानी आहेत. धोरणात्मक भूमिका आणि दिशादर्शन ही अध्यक्षाची प्राथमिक जबाबदारी असल्यामुळे हा कालावधी अपुरा नाही, असे ते सांगतात. मात्र, त्याचवेळी ‘संमेलनाचा कालावधी एकाऐवजी दोन वर्षांचा असावा,' असं मत कुसुमाग्रजांनी व्यक्त केलं होतं, तो धागा पकडून ‘असे प्रयोग करायला काहीच हरकत नाही,' असं स्पष्ट करण्यास द. भि. विसरत नाहीत!

‘लोकमत ऑनलाइन'शी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मराठी संस्कृतीचा उभा-आडवा छेद घेता आल्याचे समाधान व्यक्त करताना, ‘गावागावांतील सामान्य माणसांनी, शेतकèयांनी, कष्टकèयांनी आणि छोट्या खेड्यांमधील शाळा-वाचनालयांनी मराठी साहित्य आजवर सांभाळले आहे. शहरांतील उच्चभ्रूंच्या नव्हे, तर या सर्वसामान्य माणसांच्या खांद्यावर मराठी साहित्य दिमाखात-सुरक्षितपणे उभं आहे,' असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

मराठी साहित्यसंस्कृती-वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम बड्या शहरांच्या तुलनेत गावोगावची वाचनालये मोठ्या तळमळीने करत आहेत, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी या वाचनालयांचा गौरव केला. .

साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभराचा काळ आपल्याला खूप काही शिकवणारा होता. या काळात राज्यात आणि राज्याबाहेरही फिरलो... तेथील वाचनसंस्कृतीचा, साहित्यसंस्कृतीचा आढावा घेता आला. संमेलनाध्यक्ष म्हणून संमेलनाचे केवळ तीन दिवसच जबाबदारी राहते असे नाही, तर या काळात निर्माण होणारी ऊर्जा वर्षभर साहित्यप्रेमी समाजाला व्यापून असते, असे ते म्हणाले.

मराठी भाषेत निर्माण होणारं साहित्य दर्जेदार तर आहेच, पण ते समाजाभिमुखही आहे. या साहित्यात वैश्विक जाणिवा व्यक्त झालेल्या दिसून येतात. निबंधासारख्या वैचारिक साहित्याची देणगी मराठी साहित्याने दिली आहे. त्यामुळेच अनेक नवनवे लेखक- कवी उत्साहाने पुढे येत आहेत. आसाराम लोमटे, अनुराधा पाटील अशी निवडक नावे येथे घेता येतील, असे त्यांनी सांगितले.

एकीकडे ग्रामीण भागात वाचनसंस्कृती जोर धरत असताना मुंबई, पुणे, नागपूरसारख्या बड्या शहरांत मात्र बदलती जीवनशैली, इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि रुपवाणी (आकाशवाणी, दूरचित्रवाणी) यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. रुपवाणीसारखी माध्यमं केवळ करमणुकीचं साधन म्हणूनच काम करतात. वाचनाने होते तशी बौद्धिक देवाणघेवाण या माध्यमातून होताना दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्य समाजाभिमुख असलं तरी आता समाजाने साहित्याभिमुख होणं गरजेचं आहे, असं आग्रही मत त्यांनी मांडलं.

मराठी साहित्यक्षेत्रातील एक मुख्य प्रवाह म्हणजे कविता. पण कवितेचा दर्जा गेल्या काही काळात घसरलेला वाटतो का, या प्रश्नावर, पूर्वीही सामान्य कविता लिहिल्या जायच्या. आजही लिहिल्या जातात. पण सकस साहित्य हे काळाच्या निकषावर पुरून उरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात दरवर्षी होणा-या वादांच्या पाश्वर्भूमीवर त्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी विचारलं असता, लोकशाहीत निवडणुकीला पर्याय नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, अखिल भारतीय साहित्य संमेलन हा साहित्यिकांचा मेळावा नव्हे तर मराठी समाजाचा एक सणच आहे. त्यामुळे त्याची निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, पारदर्शक असावी. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटींच्या घरात असताना, मतदार मात्र अवघे ७०० असे चित्र दिसते. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे. विशेषतः बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिक मराठी संस्कृतीच्या सरहद्दीचे संरक्षण करत आहेत. त्यामुळे येथील मंडळींना संमेलनाच्या निवड प्रक्रियेत योग्य स्थान मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या भागातील मराठी भाषिकांकडे अन्य भाषांचेही ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करता यावी यासाठी चर्चा, परिसंवादांना त्यांना निमंत्रित करावं, तेथील मराठी विभागांना राज्य सरकारनं आर्थिक मदत पुरवावी, असे ते म्हणाले. विशेषतः साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्यिक मंडळी हरण्याच्या भीतीने उतरत नाहीत. त्यांनी ही मनोभूमिका सोडून द्यावी, असे आवाहन कुलकर्णी यांनी या वेळी केले.

मराठीत एकाच वेळी अनेक साहित्य संमेलने भरताना दिसतात. ही संमेलने मराठी भाषेसाठी पूरक आहेत. ती व्हावीतच आणि त्या संमेलनांचं, प्रवाहांचं प्रतिनिधित्व करणा-यांचीही योग्य दखल घेतली जावी, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत सॅन होजे आणि दुबई येथे विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की, या संमेलनांना विश्व साहित्य संमेलन म्हणणं योग्य ठरणार नाही. त्या ऐवजी देशांतर संमेलन म्हणणं योग्य ठरेल. कारण या संमेलनात संमेलन होणारा देश आणि महाराष्ट्रातील काही निवडक मंडळी उपस्थित असतात. त्यामुळे या संमेलनांना दोन-तीनशे साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा, असंच रूप आलेलं दिसतं.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या चोरांचे संमेलन या लेखाचा उल्लेख करून या पुढे कधी गुन्हेगारांचे संमेलन जरी आयोजित करण्यात आले तरी त्याला पाठिंबाच द्यायला हवा. कारण त्यातूनच त्या गुन्हेगारातील माणूस जागा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.