हे खरं तर भाषेशी संबंधित साधे सरळ प्रश्न. पण त्याला राजकीय रंग लागला की ते एकदम गंभीर होऊन जातात. म्हणजे असं की, ‘मनसे’प्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच एक फतवा काढला की, समाजवादी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार अबू हसन आझमी यांनी विधानसभेत मराठीत शपथ घ्यायला हवी. तर आझमी हट्टाला चिकटून बसले की, मी हिंदीतच शपथ घेणार. त्यातून बराच वाद निर्माण झाला. प्रकरण आझमींना विधानसभेत मारहाण करण्यापर्यंत गेलं. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे की नाही, असा सवालही उभा राहिला. भाषेचा मुद्दा, जो आधीपासून वादग्रस्त होता, तो पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला.
मुंबईत-महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी अस्मितेचं पेव फुटलं आहे. स्वत:ची मुलं, नातवंडं इंग्रजी माध्यमांच्या शाळांत घालणा-यांना अचानक मराठी भाषेचा प्रचंड पुळका आला आहे. महाराष्ट्रात राहणा-या प्रत्येकाने मराठी बोलायलाच हवं, असा आग्रह ही मंडळी करत आहेत. (त्यांच्या मुलांना कविता मात्र इंग्रजी भाषेतच स्फुरतात ही बाब अलाहिदा) एका पक्षाने लोकशाहीचं पवित्र मंदिर मानल्या जाणा-या विधानसभेत या मराठी भाषेवरूनच राडा करून मराठी भाषकांची पंचाईत करून टाकली. तर दुसरीकडे जाणीवपूर्वक राजकारण करून मराठी भाषेला विरोध करणा-या प्रवृत्तींनीही निगरगट्टपणाचं दर्शन घडवून हा वाद कसा चिघळेल, याकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं. त्यानंतर आता या राजकारणाचाच भाग म्हणून मराठी भाषा शिकूनच दाखवतो, असा पवित्रा काहींनी आणला आहे.
भाषेवरून हा सगळा गदारोळ होणं हे राजकीयदृष्टय़ा सोयीचं असलं तरी भाषेचंही एक विज्ञान असतं. या विज्ञानानुसार कुठली भाषा कधी शिकायची याचंही गणित ठरलेलं आहे. म्हणजे विशिष्ट वय सरल्यावर नवी भाषा शिकणं शक्य आहे का,असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचं उत्तर नाईलाजाने ‘नाही’ असं आहे. कारण भाषाशास्त्रच तसं सांगतं. भाषाशास्त्रानुसार कोणतीही भाषा आत्मसात करण्यासाठी वयाची पहिली दहा वर्ष अतिशय महत्त्वाची ठरतात. मुलं सर्वप्रथम आपली मातृभाषा शिकतात. उदा. मराठी कुटुंबातील मुलं मराठीत किंवा इतर भाषक कुटुंबातील मुलं त्या-त्या भाषेत सहजपणे संवाद साधू शकतात. याच वयात प्राथमिक शाळेत शिक्षणाची सुरुवात होते. त्यामुळे हा विद्यार्थी ज्या माध्यमाच्या शाळेत जातो आहे, ती भाषाही त्याला आत्मसात होते. मुंबईसारख्या महानगरात तर परभाषक शेजा-यामुळे लहान मुलंही आणखी एखादी भाषा सहज बोलताना दिसतात. ही भाषिक गुंतागुंत जाणून घेण्यासाठी मुळात भाषा शिकण्याची प्रक्रिया कशी घडते ते जाणून घ्यायला हवं.भाषाशास्त्राच्या नियमाप्रमाणे कोणतीही व्यक्ती त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत एक किंवा अधिक भाषा अगदी अस्खलितपणे बोलायला शिकू शकते. त्या दृष्टीने मानवी मेंदूची रचनाही केलेली असते. मेंदूच्या डावीकडील दोन भागांत भाषा शिकण्याचे ‘कप्पे’ असतात. डावीकडील प्रमष्तिकातील ‘ब्रोका’ नावाच्या भागात भाषा ‘तयार’ होते. तर या भाषेवरील प्रक्रिया आणि भाषा ग्रहण करण्याचं काम ‘व्हेर्निके’ नावाच्या भागात होतं. अनेक शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, प्रत्येक बालक भाषेतील मूलभूत तत्त्वं ग्रहण करण्याचं ज्ञान घेऊनच जन्माला येत असतं. शब्दाचा अर्थ समजणं, वाक्यरचना करणं,आवाजाचे चढउतार ओळखणं, हे त्याला उपजतच ठाऊक असतं. त्यामुळे मुलांना त्यांच्या पहिल्या १० वर्षात आपण शिकवू ती भाषा शिकणं फारसं अवघड जात नाही.
वय वाढत जातं तसं आपल्या मेंदूत आपण बोलत असलेल्या भाषेची जागा पक्की होत जाते. लहान मुलांना त्यांच्या कानांवर पडणारे शब्द, आवाजाचे चढ-उतार कळून त्याप्रमाणे त्या शब्दांचा अर्थ निश्चित करणं शक्य होतं. मात्र वय वाढल्यावर माणूस त्याला ठाऊक असलेल्या भाषेशी नवीन भाषेतील शब्द, त्यांचे उच्चार, त्यांची पडताळणी करण्यास सुरुवात करतो. या प्रक्रियेतच खूप मोठा कालावधी जात असल्याने वय वाढल्यावर नवीन भाषा शिकणं कठीण होऊन बसतं. थोडक्यात, लिहिलेल्या पाटीवर नव्याने लिहिण्यासारखा हा प्रकार आहे. नवी भाषा शिकण्यासाठी अधी पाटी कोरी करणं गरजेचं ठरतं, पण ते शक्य होत नाही. काही जण वय वाढल्यावरही नवी भाषा शिकतात. पण त्यामुळे ब-याचदा त्यांना आपली पहिली भाषा किंवा त्या भाषेतील चपखल शब्द ऐनवेळी आठवत नाहीत. मराठी क्रिकेटपटू किंवा अभिनेत्यांचं उदाहरणच देता येईल. पुढे इंग्रजीचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडतो की त्यांचं मराठीही अगदी इंग्रजाळलेलं होतं आणि मराठी बोलताना नेमके शब्द आठवत नाहीत.वय वाढल्यावर दुसरी भाषा शिकणं का शक्य होत नाही, याची इतर अनेक कारणं आहेत. आपल्या स्थानिक भाषेपेक्षा पूर्णपणे वेगळे उच्चार, व्याकरण, शब्दरचना असलेली भाषा शिकणं कधीही अवघडच असतं. मराठी मंडळी गुजराती भाषा लवकर शिकू शकतात, पण त्यांना दक्षिणेकडील भाषा शिकणं फारच अवघड जातं. कारण दाक्षिणात्य भाषांचे पूर्णपणे अनोळखी शब्द आणि व्याकरण. त्यामुळेच पश्चिमेकडील मंडळींना चिनी, जपानी भाषा शिकणं तुलनेनं अवघड जातं.
पण दुसरी भाषा शिकणं खरोखरच अवघड आहे का, याचं उत्तर ठामपणे ‘नाही’ असंही देता येणार नाही. काही जण अगदी भाषाप्रभू असतात. त्यामुळे कुठल्याही वयात कोणतीही भाषा शिकणं त्यांच्यासाठी अवघड नसतं. नवीन भाषा शिकणं म्हणजे‘पोरखेळ’ आहे, असं म्हटलं जात असलं तरी वयस्कांनाही नवीन भाषा शिकता यावी, यासाठी आता संशोधनही सुरू आहे. त्यामुळे अबू आझमींना मराठी शिकणं, तसं अवघड ठरणार नाही, असा विश्वास व्यक्त करू या. जमल्यास आपणही एखादी नवीन भाषा शिकण्याचा प्रयत्न तरी करून पाहायला काय हरकत आहे?
No comments:
Post a Comment