
काहीतरी वेगळं करून दाखवणा-या मंडळींना नाकासमोर चालणारी मंडळी वेडं म्हणतात मात्र हे वेडच त्यांची पॅशन असते. सरळ, गुळगुळीत रस्ता सोडून ऑफरोड बाईक चालवणाऱ्यांच्या स्पर्धा नियमित घेतल्या जातात.याचं प्रमाण पश्चिमेकडील देशांत जास्त आहे.भारतातही त्याची सुरुवात झाली आहे. या स्पर्धासाठीचे ट्रॅक, स्पर्धकांसमोरची आव्हानं पाहताना काळजाचा ठोका चुकतो.
काही जणांना कायमच जगापेक्षा वेगळं काहीतरी करून दाखवायचं असतं. आपणही आपल्या आजूबाजूला अशी मंडळी नेहमी बघत असतो. या मंडळींना ‘नाकासमोर’ चालणारी मंडळी विक्षिप्त किंवा वेडे वगैरे म्हणतात. पण हे वेडच त्यांची पॅशन असते. नाहीतर साधे, सरळ, गुळगुळीत रस्ते सोडून चिखलात भरधाव बाइक्स चालवणारे जन्माला आले असते का? परदेशात अशा प्रकारे ‘रस्ता सोडून’ बाइक चालवणा-यांच्या स्पर्धा नियमित घेतल्या जातात आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळतो. या स्पर्धासाठीचे ट्रॅक, स्पर्धकांसमोरची आव्हानं इतकी अचंबित की विविध क्रीडावाहिन्यांवर या स्पर्धा पाहत असतानाही काळजाचा ठोका चुकतो.
बाइक्सचा वापर दैनंदिन व्यवहारात करण्यासह विविध क्रीडा प्रकारांसाठी नियमित करण्याचं प्रमाण पश्चिमेकडील देशांत जास्त आहे. सतत नाविण्याच्या शोधात असणा-या या देशांमध्ये ‘मोटोक्रॉसची’ स्पर्धा तर प्रचंड लोकप्रिय आहे. मोटारसायकल आणि सायकलींची क्रॉस कंट्री स्पर्धा या दोन स्पर्धाचा मेळ साधून हा शब्द तयार करण्यात आला आहे. बाइकच्या नियमित शर्यतींपेक्षा ही स्पर्धा पूर्णत: वेगळी असते. ही स्पर्धा पूर्णत: नैसर्गिक ट्रॅकवर किंवा त्यासाठी खास तयार केलेल्या चिखल, मातीच्या ट्रॅकवर घेतली जाते. त्यात काही अंतरावर उंचवटे तयार केलेले असतात. चिखलातून जाताना गाडी घसरण्याची भीती असते. त्यामुळे संतुलन साधत, गाडीचा कमाल वेग अजिबात कमी न करता ठरवून दिलेलं अंतर पूर्ण करायचं असतं. शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी स्पर्धा म्हणून मोटोक्रॉसकडे पाहिलं जातं.
या स्पर्धेसाठी दणकट इंजिनाच्या पण कमी वजनाच्या बाइक्स लागतात. प्रचंड धक्के सहन करावे लागत असल्याने या गाड्यांचं सस्पेंशनही मजबूत ठेवावं लागतं. ब्रिटनमधील बीएसए कंपनी अशा प्रकारच्या मोटारसायकल बनवण्यात दुस-या महायुद्धाच्या काळात आघाडीवर होती. वास्तविक पाहता 1924 पासून अशा स्पर्धाना औपचारिक सुरुवात झाली असली तरी दुस-या महायुद्धानंतर त्यांना लोकप्रियता मिळू लागली. बीएसए कंपनीच्या मोटारसायकल या स्पर्धामध्ये निर्विवाद वर्चस्व राखून होत्या. 1952 मध्ये एफआयएमने युरोपियन विजेतेपद स्पर्धा घेण्यात आली. 1957 मध्ये या स्पर्धेला जागतिक दर्जाची स्पर्धा म्हणून मान्यता देण्यात आली. ग्रँड प्रिक्स म्हणून ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेसाठी 450 सीसी, 250सीसीच्या गाडय़ांसह खुल्या वर्गातही ही स्पर्धा घेतली जाते. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी 16 फे-या घेतल्यानंतर तिची अंतिम फेरी होते. अंतिम फेरीची स्पर्धा 35 मिनिटांची असते. त्या शिवाय स्पर्धकाला दोन लॅप्स पूर्ण करायचे असतात.
या स्पर्धेशिवाय ‘एएमए मोटोक्रॉस चँपियनशिप’ हीदेखील स्पर्धा प्रसिद्ध आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला या स्पर्धेच्या प्राथमिक फे-यांना सुरुवात होते व अंतिम फेरी सप्टेंबरच्या मध्यापर्यंत होते. या स्पर्धेच्याही 12 फे-या होतात व त्यातून अंतिम फेरीसाठीचे स्पर्धक निवडले जातात. 250 मोटोक्रॉस क्लास व 450 मोटोक्रॉस क्लास या दोन श्रेणींत ही स्पर्धा होते.
‘मोटोक्रॉस दे नेशन’ (मोटोक्रॉस ऑफ नेशन्स) ही स्पर्धा सर्व मोटोक्रॉस स्पर्धाचे हंगाम संपल्यानंतर वर्षअखेरीस होते. त्यात प्रत्येक देशाच्या तीन स्पर्धकांना सहभाग घेता येतो. या स्पर्धेचे ठिकाण दरवर्षी बदलते राहिलेले असले तरी बेल्जियम,अमेरिका, ब्रिटन या देशांचं या स्पर्धेवर ब-यापैकी वर्चस्व राहिलं आहे.- भारतातही सुरुवात
या स्पर्धेची लोकप्रियता भारतातही गेल्या काही काळात वाढू लागली असली तरी त्यासाठीचे खास ट्रॅक काही आपल्याकडे उपलब्ध नाहीत. स्टेडियममध्येच कृत्रिमरीत्या हे ट्रॅक तयार केले जातात. या स्पर्धेकडे देशातली तरुणाई हळूहळू वळू लागली असून स्पर्धेच्या ठिकाणी जमलेल्या गर्दीवरूनच त्याचा अंदाज येतो. सध्या तरी होंडा, सुझुकी आणि यामाहा या तीन बडय़ा कंपन्या भारतात या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तरीही प्रामुख्याने काही खासगी क्लब्जमार्फतच या स्पर्धेला चालना मिळते. पुण्यात दरवर्षी होणारी गल्फ डर्ट ट्रॅकवरची स्पर्धा तशी सर्वाच्याच परिचयाची असली तरी हैदराबाद,बडोदे, अहमदाबाद या ठिकाणीही आता या स्पर्धा आयोजित केल्या जाऊ लागल्या आहेत. वीर पटेल या बडोद्याच्या युवकाने दोन वर्षापूर्वी इराणमध्ये झालेली मोटोक्रॉस स्पर्धा जिंकून सगळ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहेच. ही स्पर्धा जिंकली तेव्हा तो अवघा 17 वर्षांचा होता.
कॅलिफोर्नियातील एका संस्थेने काही काळापूर्वी तेथील फूटबॉलपटू, रग्बी खेळाडू, धावपटू यांच्या तुलनेत मोटोक्रॉसमध्ये सहभागी होणा-यांची क्षमता तपासणारी चाचणी घेतली होती. त्यात हृदय, स्नायू यांच्या कार्यक्षमतेत मोटोक्रॉसमध्ये सहभागी होणारे खेळाडू सर्वाधिक फिट ठरले. 35 मिनिटांच्या या स्पर्धेदरम्यान त्यांच्या हृदयाचे ठोके तब्बल 180 ते 190 पर्यंत पोहोचलेले असतात. 160 किलो वजनाच्या बाइकचे ओझे सांभाळत त्यांना पूर्ण वेगात ही स्पर्धा पार पाडायची असते. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी होणे हे काही ये-यागबाळ्याचे काम नाही, हेच दाखवून देते.
No comments:
Post a Comment