Tuesday, February 15, 2011

अलिप्तता कितपत शक्य?

इजिप्तचे अध्यक्ष होस्नी मुबारक यांच्या तीन दशकांच्या राजवटीला कंटाळून तेथील जनतेने सुरू केलेल्या उठावानानंतर मुबारक यांना पद सोडावे लागले. गंमत म्हणजे सरकारविरोधी उठावात जनतेची मुस्कटदाबी करण्याचे काम करणा-या इजिप्तमधील लष्करानेच या उठावाला अप्रत्यक्ष रूपात का होईना पाठिंबा दिल्याने इजिप्तमधील येत्या काळातील घडामोडी नक्कीच रंगतदार ठरणार यात संशय नाही.
दुस-या महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या पटावर अमेरिका आणि रशिया यांना मानणारे दोन गट तयार झालेले असताना, नुकत्याच स्वतंत्र झालेल्या भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, इजिप्ततचे तत्कालीन अध्यक्ष गमाल अब्दुल नासेर यांच्या पुढाकाराने आलिप्त राष्ट्र चळवळ सुरू करण्यात आली होती. भारताचा एक चांगला सहकारी म्हणूनच इजिप्तची ओळख कायम राहिली आहे. त्यामुळे इजिप्तला राष्ट्रकुलातून वगळण्यासाठी झालेल्या लढ्यात १९५६मध्ये भारताने इजिप्तला पाठिंबा दिला होता. अमेरिकेच्या पुढाकाराने अरब राष्ट्रांतून वेगळा भूभाग काढून इस्रायलची निर्मिती झाल्यानंतर संपूर्ण अरब राष्ट्रांत निर्माण झालेल्या असंतोषाची परिणती १९६७च्या अरब-इस्रायल यांच्यातील लढ्यात झाली. त्यावेळीही भारताने इजिप्तची बाजू घेतली.
आफ्रिका खंडाच्या उत्तरेला असलेला इजिप्त केवळ पश्चिम आशियाच नव्हे जागतिक स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक घडामोडींत नेहमीच मोलाची भूमिका बजावत आलेला आहे. त्यामुळेच तेथील सध्याच्या घडामोडींमध्ये सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. भारताने सध्या तरी हा इजिप्तचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून हात झटकले आहेत.
भारताशी नेहमीच सौहार्दाचे संबंध असलेल्या इजिप्तमध्ये अनेक भारतीय कंपन्यांचे प्रकल्प सध्या कार्यान्वीत आहेत. मात्र, सध्याच्या अशांततेमुळे काही प्रकल्प बंद करण्याची वेळ या कंपन्यांवर आली आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय समुदायाशी होणारा व्यापार प्रामुख्याने सुएझ कालव्यातून होतो. हा व्यापार जवळपास ४० अब्ज डॉलरच्या घरात आहे. त्यामुळे हा व्यापार धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर भारताचे इजिप्तशी व्यापारी संबंधही चांगले आहेत. इजिप्त तसा मोठ्या प्रमाणावर खनिज तेल उत्पादक देश नसला तरी तेथील घडामोडींचा परिणाम लगतच्या अरब राष्ट्रांवरही होताना दिसतोय. त्यामुळेच दोन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खनिज तेलाच्या किमती प्रति बॅरल १०० डॉलरच्या दिशेने जात आहेत. त्याचा परिणाम भारतावर होणार, हे सांगायला कोणत्याही भविष्यवेत्त्याची गरज नाही. कारण भारतात पेट्रोलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किमतीशी सुसंगत केल्याचा परिणाम म्हणून गेल्या महिन्यातच पेट्रोलच्या किमती दोनदा वाढल्यात आणि इजिप्तमधला हा पेच कायम राहिल्यास भारतातही पेट्रोलचे दर प्रति लिटर १०० रुपयांच्या घरात जाण्याची भीती वर्तवली जातेय. डिझेल, गॅसच्या किमती अद्यापही सरकारच्या नियंत्रणात असल्या तरी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्या वाढत राहिल्यास सरकारलाही त्यात वाढ करणे भागच पडेल आणि त्याचा परिणाम म्हणून एकंदरच महागाईत वाढ होण्याची शक्यता आहे.
ट्युनिशियात सुरू झालेल्या या क्रांतीचे लोण इजिप्तमध्ये पसरले आणि तेथून पुढे ते संपूर्ण अरब राष्ट्रांत, पश्चिम आशियात पसरताना दिसत आहे. ही राष्ट्रे प्रामुख्याने मुस्लिमबहुल आहेत. इजिप्तला लागूनच इस्रायलसारखा अरब राष्ट्रांचा कट्टर शत्रू आहे. इस्रायलला पोसणारा देश अमेरिका आहे, हे जगजाहीर आहे. पण इजिप्तमधील तिढा वाढला आणि त्या प्रक्षोभातून इस्रायलविरोधात वणवा पेटला तर ते अमेरिकेसाठी घातक ठरेल, यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने आता इजिप्तमधील प्रक्षोप शमवण्याचे काम सुरू झाले आहे.
इजिप्तमधील सध्याच्या जनप्रक्षोभाचा परिणाम भारतासह अन्य देशांवर सामाजिक, राजकीय अंगाने काय होतो, हे पाहणेही उद्बोधक ठरेल. इजिप्तमध्ये झाली त्याप्रमाणे भारतातही क्रांतीही व्हायला हवी, असे मत अनेक उत्साही मंडळी व्यक्त करत आहेत. इजिप्तमध्ये होस्नी मुबारक यांच्या तीन दशकांच्या कारकिर्दीत मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी, महागाई आणि विशेष म्हणजे पोलिसी दडपशाही तिथे होत होती. त्या विरोधात जनतेने हे बंड पुकारले. भारतात कितीही नाकारले तरी अशाच प्रकारचे जनतेला बंड करायला उद्युक्त करणारे वातावरण दिसत आहे. पण भारत आणि इजिप्तमधला सर्वात मोठा फरक म्हणजे इथे लोकशाही मार्गाने हे बंड पुकारले जाते. थोडक्यात काय तर निवडणूक घेऊन आपला प्रतिनिधी निवडण्याची संधी राज्यघटनेने देशवासीयांना दिलेली आहे. इजिप्तमधील बंडाळीला सर्वात मोठे कारण ठरल्या ते सोशल नेटवर्किंग साइट्स. भारतातही गेल्या काही दिवसांपासून फेसबुक, ट्विटरवर अशाच प्रकारचे संदेश फिरताना दिसत आहेत. अरब राष्ट्रांची संघटना अरब लीगचे मुख्यालय इजिप्तची राजधानी कैरोमध्येच आहे. त्याचा पदसिद्ध प्रमुखही इजिप्तचाच नेता असतो. एकीकडे सर्व अरब देश इस्रायलवर खार खात असताना इजिप्तनेच पुढाकार घेऊन इस्रायलशी १९८९मध्ये सामंजस्य करार केला. त्यांच्याशी धोरणात्मक संबंध प्रस्थापित केले. पण आता अरब देशांत या क्रांतीच्या या फोफावलेल्या वणव्याला जगभरातील मुस्लिम समुदायाची पाठिंबा मिळताना दिसत आहे. मुस्लिम ब्रदरहूडसारख्या संघटनेवर आज इजिप्तमध्ये बंदी असली तर बहुसंख्य मुस्लिम देशांत या संघटनेबद्दल सहानुभूती आहे. इजिप्तमध्येही सरकारकडून जनतेला जे मिळत नाही, ते या संघटनेकडून सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले जाते. इजिप्तचे भावी अध्यक्ष म्हणून ज्यांचे नाव घेतले जाते, ते मोहम्मद अलबदाई हे देखील मुस्लिम ब्रदरहूडचे काही अंशी सहानुभूतीदार आहेत.

इजिप्तमधील घडामोडींची काश्मीरशीही सांगड घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या माध्यमातून ही चळवळ मुस्लिम देशांत पसरण्याची शक्यता विश्लेषकांनी वर्तवली आहे. काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांत झालेली निदर्शने आणि इजिप्तमधील आताची निदर्शने दोन्ही सरकारविरोधातील रोष व्यक्त करणारी आहेत, असे म्हटले जाते. पण दोन्ही ठिकाणची राजकीय, सामाजिक परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे काश्मीरमधील फुटिरतावादी लगेचच पेटून उठतील, असे समजणे चुकीचे असले तरी नेहमीच आलिप्ततावादी भूमिका घेणा-या भारताला सध्या ठाम भूमिका घेणे भाग पडणार आहे.

Friday, December 31, 2010

'साहित्य संमेलनाध्यक्षपद दोन वर्षांचे करण्यास हरकत नाही'

संमेलनाध्यक्ष म्हणून एक वर्ष कमी पडतं आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारे ठराव प्रत्यक्षात आणणंही अध्यक्षांना शक्य होत नाही, या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष आणि प्रख्यात समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी मात्र समाधानी आहेत. धोरणात्मक भूमिका आणि दिशादर्शन ही अध्यक्षाची प्राथमिक जबाबदारी असल्यामुळे हा कालावधी अपुरा नाही, असे ते सांगतात. मात्र, त्याचवेळी ‘संमेलनाचा कालावधी एकाऐवजी दोन वर्षांचा असावा,' असं मत कुसुमाग्रजांनी व्यक्त केलं होतं, तो धागा पकडून ‘असे प्रयोग करायला काहीच हरकत नाही,' असं स्पष्ट करण्यास द. भि. विसरत नाहीत!

‘लोकमत ऑनलाइन'शी बोलताना डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीचा लेखाजोखा मांडला. संमेलनाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत मराठी संस्कृतीचा उभा-आडवा छेद घेता आल्याचे समाधान व्यक्त करताना, ‘गावागावांतील सामान्य माणसांनी, शेतकèयांनी, कष्टकèयांनी आणि छोट्या खेड्यांमधील शाळा-वाचनालयांनी मराठी साहित्य आजवर सांभाळले आहे. शहरांतील उच्चभ्रूंच्या नव्हे, तर या सर्वसामान्य माणसांच्या खांद्यावर मराठी साहित्य दिमाखात-सुरक्षितपणे उभं आहे,' असं निरीक्षण त्यांनी नोंदवलं.

मराठी साहित्यसंस्कृती-वाचनसंस्कृती जोपासण्याचे काम बड्या शहरांच्या तुलनेत गावोगावची वाचनालये मोठ्या तळमळीने करत आहेत, अशा शब्दांत कुलकर्णी यांनी या वाचनालयांचा गौरव केला. .

साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून वर्षभराचा काळ आपल्याला खूप काही शिकवणारा होता. या काळात राज्यात आणि राज्याबाहेरही फिरलो... तेथील वाचनसंस्कृतीचा, साहित्यसंस्कृतीचा आढावा घेता आला. संमेलनाध्यक्ष म्हणून संमेलनाचे केवळ तीन दिवसच जबाबदारी राहते असे नाही, तर या काळात निर्माण होणारी ऊर्जा वर्षभर साहित्यप्रेमी समाजाला व्यापून असते, असे ते म्हणाले.

मराठी भाषेत निर्माण होणारं साहित्य दर्जेदार तर आहेच, पण ते समाजाभिमुखही आहे. या साहित्यात वैश्विक जाणिवा व्यक्त झालेल्या दिसून येतात. निबंधासारख्या वैचारिक साहित्याची देणगी मराठी साहित्याने दिली आहे. त्यामुळेच अनेक नवनवे लेखक- कवी उत्साहाने पुढे येत आहेत. आसाराम लोमटे, अनुराधा पाटील अशी निवडक नावे येथे घेता येतील, असे त्यांनी सांगितले.

एकीकडे ग्रामीण भागात वाचनसंस्कृती जोर धरत असताना मुंबई, पुणे, नागपूरसारख्या बड्या शहरांत मात्र बदलती जीवनशैली, इंग्रजी माध्यमातील शिक्षण आणि रुपवाणी (आकाशवाणी, दूरचित्रवाणी) यांचा प्रभाव वाढताना दिसत आहे. रुपवाणीसारखी माध्यमं केवळ करमणुकीचं साधन म्हणूनच काम करतात. वाचनाने होते तशी बौद्धिक देवाणघेवाण या माध्यमातून होताना दिसत नाही. त्यामुळे मराठी साहित्य समाजाभिमुख असलं तरी आता समाजाने साहित्याभिमुख होणं गरजेचं आहे, असं आग्रही मत त्यांनी मांडलं.

मराठी साहित्यक्षेत्रातील एक मुख्य प्रवाह म्हणजे कविता. पण कवितेचा दर्जा गेल्या काही काळात घसरलेला वाटतो का, या प्रश्नावर, पूर्वीही सामान्य कविता लिहिल्या जायच्या. आजही लिहिल्या जातात. पण सकस साहित्य हे काळाच्या निकषावर पुरून उरते, असे त्यांनी स्पष्ट केले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडीच्या संदर्भात दरवर्षी होणा-या वादांच्या पाश्वर्भूमीवर त्यांना निवडणूक प्रक्रियेविषयी विचारलं असता, लोकशाहीत निवडणुकीला पर्याय नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, अखिल भारतीय साहित्य संमेलन हा साहित्यिकांचा मेळावा नव्हे तर मराठी समाजाचा एक सणच आहे. त्यामुळे त्याची निवडणूक प्रक्रिया स्वच्छ, पारदर्शक असावी. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटींच्या घरात असताना, मतदार मात्र अवघे ७०० असे चित्र दिसते. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरांना या निवडणूक प्रक्रियेत सहभागी करून घ्यायला हवे. विशेषतः बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषिक मराठी संस्कृतीच्या सरहद्दीचे संरक्षण करत आहेत. त्यामुळे येथील मंडळींना संमेलनाच्या निवड प्रक्रियेत योग्य स्थान मिळावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. या भागातील मराठी भाषिकांकडे अन्य भाषांचेही ज्ञान आहे. त्यामुळे त्यांच्याशी चर्चा करता यावी यासाठी चर्चा, परिसंवादांना त्यांना निमंत्रित करावं, तेथील मराठी विभागांना राज्य सरकारनं आर्थिक मदत पुरवावी, असे ते म्हणाले. विशेषतः साहित्य संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत साहित्यिक मंडळी हरण्याच्या भीतीने उतरत नाहीत. त्यांनी ही मनोभूमिका सोडून द्यावी, असे आवाहन कुलकर्णी यांनी या वेळी केले.

मराठीत एकाच वेळी अनेक साहित्य संमेलने भरताना दिसतात. ही संमेलने मराठी भाषेसाठी पूरक आहेत. ती व्हावीतच आणि त्या संमेलनांचं, प्रवाहांचं प्रतिनिधित्व करणा-यांचीही योग्य दखल घेतली जावी, असे ते म्हणाले. गेल्या दोन वर्षांत सॅन होजे आणि दुबई येथे विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. त्याबाबतही त्यांनी मत व्यक्त केलं. त्यांनी सांगितलं की, या संमेलनांना विश्व साहित्य संमेलन म्हणणं योग्य ठरणार नाही. त्या ऐवजी देशांतर संमेलन म्हणणं योग्य ठरेल. कारण या संमेलनात संमेलन होणारा देश आणि महाराष्ट्रातील काही निवडक मंडळी उपस्थित असतात. त्यामुळे या संमेलनांना दोन-तीनशे साहित्यप्रेमींचा स्नेहमेळावा, असंच रूप आलेलं दिसतं.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी लिहिलेल्या चोरांचे संमेलन या लेखाचा उल्लेख करून या पुढे कधी गुन्हेगारांचे संमेलन जरी आयोजित करण्यात आले तरी त्याला पाठिंबाच द्यायला हवा. कारण त्यातूनच त्या गुन्हेगारातील माणूस जागा होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

Thursday, October 7, 2010

भविष्याची गरज

गेल्या काही वर्षामध्ये बाइक्सची वेगवेगळी मॉडेल्स ग्राहकांना आकृष्ट करत आहेत. आजकाल सीएनजी, एलपीजीसारख्या पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर दुचाकी वाहनांसाठी कसा करता येईल, यावर प्रयोग होत आहेत. चार्जिगची सुविधा सर्वत्र उपलब्ध झाल्यास बॅटरीवर चालणाऱ्या बाइक्सही लोकप्रिय होतील..

‘धूम’ चित्रपटाने भारतातील प्रेक्षकांना मोटारसायकलींच्या एका वेगळ्या विश्वाची ओळख करून दिली. दुचाकी म्हणजे केवळ प्रवासाचं साधन इतकीच त्यांची ओळख होती. पण,मोठमोठी वाहनं जाणार नाहीत, अशा ठिकाणी वेगात जाण्याची तिची खुबी पाहून या वाहनाच्या प्रेमात सगळं जग पडलं आहे. गेल्या काही काळात तर बाइक्सच्या वेगवेगळ्या श्रेणी ग्राहकांना आकृष्ट करू लागल्या आहेत.

भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ वेगाने होत असताना, इथल्या तरुण ग्राहकांच्या हातात मोठय़ा प्रमाणावर पैसा खुळखुळू लागला आहे. त्यांना आकृष्ट करण्यासाठी देशातल्या अनेक दुचाकी बनवणा-या कंपन्यांसह चारचाकी किंवा मोठय़ा वाहनांच्या उत्पादक कंपन्यांनाही दुचाकीची ही वाढती बाजारपेठ खुणावू लागली आहे. या बाजारपेठेच्या वाढीचा वेग इतका आहे की गेल्या वर्षीच्या जागतिक मंदीच्या काळातही- सर्व उत्पादनांचा विक्रीचा आलेख घसरलेला असताना, ही बाजारपेठ मात्र दमदार वाटचाल करत होती.

एकीकडे पेट्रोलसारख्या इंधनाची टंचाई आणखी काही काळात भासणार असल्याचे इशारे दिले जात असताना, काही दुचाकी उत्पादकांनी थेट विजेवर चालणाऱ्या दुचाकी बाजारात आणल्या आहेत. सध्या या वाहनांची क्षमता कमी असली तरी भविष्यात त्यांच्या चार्जिगची सोय सर्वत्र उपलब्ध होऊ लागल्यावरच त्यांचा वापर वाढणार, हे स्पष्ट आहे. त्याचबरोबर पर्यावरणस्नेही सीएनजी, एलपीजीसारख्या इंधनांचा वापर दुचाकी वाहनांसाठी कसा करता येईल, याचीही चाचपणी केली जाऊ लागली आहे.

‘थ्री इडियट्स’ चित्रपटातील रांचो अर्थात फुनसुक वांगडूने स्कूटरच्या इंजिनाचा वापर करून दैनंदिन गरजेची अनेक उपकरणे चालवली होती. पण हे केवळ सिनेमापुरतेच मर्यादित नाही. ग्रामीण भागातही असे अनेक फुनसुक वांगडू आहेत, ज्यांनी त्यांच्या दुचाकींचा वापर अशा उपकरणांसाठी केला आहे. त्यामुळे या वाहनाला नाक मुरडण्यापेक्षा त्याचे उपयोग, त्याचे फायदे पाहणं ही काळाची गरज आहे. कारण लांबचलचक वाहतूक कोंडीत बडीबडी वाहनं अडकून पडलेली असताना हेच वाहन त्यातून लीलया बाहेर पडतं. पर्यावरणस्नेही इंधनांचा वापर केला आणि दुचाकींसाठी वेगळ्या लेन ठेवल्या तर नक्कीच हवामानबदलाच्या संकटावर काही अंशी तरी मात करता येणं शक्य होईल. (पर्यावरणाबरोबरच स्वत:च्या शरीराच्या संवर्धनात साध्या सायकलींना पर्याय नाही, हे मात्र तितकंच खरं आहे.)

गेल्या तीन महिन्यांच्या काळात आपण या दुचाकी वाहनांच्या विविध प्रकारांची, त्यांच्या उपयोगीतेची, त्यांच्यावरून केल्या जाणा-या सफरींची तसंच त्यांच्या सफरींबाबत चर्चा केली. पुरेशी काळजी घेतली, बाइक्सची योग्य देखभाल केली तर सर्वाचंच बाइझिंग आनंददायी ठरेल.

Saturday, October 2, 2010

बाइकसंगे उडा

घरोघरची मातृदैवतं ‘गाडी उडवणं कमी कर जरा’ असा सल्ला देतात, त्यातलं लाक्षणिक अर्थाचं हे ‘उडवणं’ नाही की बाइकला काही पंख लावून उडण्याचीही ही स्पर्धा नाही.. उंच टेकाडावरून बाइकसह हवेत स्वत:ला भिरकावून देण्याची ही स्पर्धा आहे!

मोटरसायकलवरच्या खेळांमध्ये धोकादायक रस्त्यांवर वा-याच्या वेगाने धावण्याच्या स्पर्धासह चिखलातून तोल सावरत मार्ग शोधणे किंवा अगदी गंमत म्हणून रानावनातून भटकण्याच्या स्पर्धाचाही- म्हणजेच ‘ऑफरोडिंग’चा समावेश होतो. पण या भागात आपण अगदी हवेत उड्डाण करण्याच्या स्पर्धाची माहिती घेत आहोत. घरोघरची मातृदैवतं ‘गाडी उडवणं कमी कर जरा’ असा सल्ला देतात, त्यातलं लाक्षणिक अर्थाचं हे ‘उडवणं’ नाही की बाइकला काही पंख लावून उडण्याचीही ही स्पर्धा नाही.. उंच टेकाडावरून बाइकसह हवेत स्वत:ला भिरकावून देण्याची ही स्पर्धा आहे!

फ्रीस्टाइल मोटोक्रॉस किंवा एफएमएक्स नावानं ही स्पर्धा ओळखली जाते. या स्पर्धेत एकेक स्पर्धक येऊन आपले बाइकवरचं संतुलन दाखवून समोरच्या पंचांसह जनतेकडून कौल आजमावतो.

बिग एअर आणि फ्री स्टाइल मोटोक्रॉस अशा दोन प्रकारांत ही स्पर्धा होते. त्यातल्या बिग एअर प्रकारात प्रत्येक स्पर्धकाला दोन जंप मारण्याची संधी दिली जाते. सुमारे 18 मीटर (60 फूट) लांबीच्या रॅम्पवरून हे स्पर्धक हवेत झेप घेतात. त्यात त्या स्पर्धकाच्या उडीतील नावीन्य, त्याचे कौशल्य, अवकाशात किती वेळ राहिला याच्या आधारे स्पर्धकाला 100 पैकी गुण दिले जातात.

फ्रीस्टाइल मोटोक्रॉस ही स्पर्धा या प्रकारातील जुनी स्पर्धा. त्यात सुमारे दोन हेक्टरच्या परिसरात तयार केलेल्या ट्रॅकवर 90 सेकंद ते 14 मिनिटांच्या कालावधीत विविध स्पर्धाप्रकार करून दाखवावे लागतात. त्यात विविध लांबीच्या उडय़ा घेण्यासह वेगवेगळ्या कठीण वळणांवरून त्यांना गाडी चालवावी लागते. या स्पर्धेतही पंचांचे एक पॅनेल असते आणि तेही 100 गुणांच्या आधारे स्पर्धकाला त्याचे कौशल्य पाहून गुणदान करतात.
  • बॅकलिफ्ट

या स्पर्धाप्रकारातील सर्वात अवघड भाग मानला जातो. त्यात गाडीच्या मागच्या सीटवर बसून किंवा उभे राहून विविध कौशल्याचे प्रकार केले जातात. तेही गाडी हवेत असताना. मात्र हा खेळ अत्यंत धोकादायक आहे.. त्यात स्पर्धकांच्या जिवावर बेतल्याचेही प्रकार घडले आहेतं.

Thursday, September 23, 2010

है दम?


बाइक चालवण्याचे गट्स कुणाकडे कसे असावेत, हे त्याची ‘परिस्थिती’ ठरवते.. ग्रामीण भारतातल्या रगेल गडय़ांप्रमाणे बाइक हाकणं शहरातल्या बाइकस्वार सेल्समनना शक्य होणार नाही आणि युरोपातल्या निर्धोक रस्त्यांवरून एरवी बाइक चालवणारे सारेच जण ‘ट्रेल रायडिंग’ किंवा ‘एंडय़ूरो’सारख्या खेळांमध्ये, बाइक आणि हातपाय धड ठेवू शकणार नाहीत.. आपल्या नेहमीच्या गट्सपेक्षा वेगळे गट्स या स्पर्धासाठी हवेच..

बाइक्स चालवायला गट्स लागतात, हे आता पुन्हा नव्यानं सांगायला नकोच. पुण्यातल्या बेशिस्त ट्रॅफिकमध्ये मुंबईकरानं किंवा मुंबईतल्या गर्दीतल्या पण शिस्तबद्ध (खरोखर आहे हो!) ट्रॅफिकमध्ये पुणेकरानं व्यवस्थित गाडी चालवून दाखवावी, हादेखील गट्सचाच एक भाग होईल!

हल्ली चांगल्या रस्त्यावर गाडी चालवणं धोकादायक ठरत असताना, अनेक वल्ली सरळधोपट रस्त्यांचा मार्ग सोडून, ‘चुकीच्या’ मार्गाने गाडी चालवणं पसंत करतात. ‘मोटोक्रॉस’ शर्यत तर आपल्याला माहीत आहेच, पण त्यापेक्षाही अनेक अचाट प्रकार मोटारसायकलींवर करणारे आहेत. भारतात हे फॅड नसलं तरी युरोपात, अमेरिकेत अशा वेडय़ांपैकी सर्वाधिक वेडा कोण, हे ठरवणाऱ्या स्पर्धाही नियमित आयोजित केल्या जातात.

म्हणजे, केवळ चिखलातून गाडी चालवणं, या चिखलातून आपल्याला पायी चालणं शक्य होणार नाही, असा हा चिखल असतो. त्यातही वेळ पाळायची. गाडी हवेत भिरकावून द्यायची. पण त्या वेळी आपणही गाडीवर असायलाच हवं. म्हणजे सीटवर बसलेलो नसलो तरी चालेल, पण गाडीसोबत चालकानं असणं आवश्यक. कुठल्यातरी एखाद्या शोधमोहिमेवर निघाल्याप्रमाणे गटागटाने ‘ट्रेल राइड’ करायच्या. असं आणखी बरंच काही या अचाट स्पर्धा प्रकारांत मोडतं. म्हणजे केवळ प्रवासासाठी वापरली जाणारी दुचाकी आणखी कशाकशासाठी वापरली जाते ते कळून येईल. (गावाकडे गुरांच्या चाऱ्याचे मोठमोठे भारे, जळणाच्या मोळ्या, अख्ख्या महिन्याचा बाजारहाट एकाच मोटारसायकलवरून आणला जातो. त्यातच गाडीवर डबलसीट प्रवास करणं जणू गुन्हाच असं समजून गाडीवर किमान तिघांना नेलं जातं.) असो हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच की, आपल्याकडेही बाइकस्वार कमी कसरती करत नाहीत. मुंबईतल्या खड्डेभरल्या रस्त्यांवरून बाइक चालवणंसुद्धा, त्या चिखलांच्या रस्त्यांवरून गाडी चालवण्याच्या स्पर्धेइतकंच कठीण असतं.

परदेशात मात्र, अशा खड्डय़ांच्या, वाईट रस्त्यांच्या, ट्रॅफिकच्या ‘सोयी’ सरकारनं करून दिलेल्या नसल्यानं त्यांना नाइलाजानं आपलं कौशल्य अशा स्पर्धामधून दाखवावं लागतं. त्यातला एक प्रकार म्हणजे, ट्रेल रायडिंग. यात गटाने किंवा वैयक्तिकरीत्या सहभागी होता येतं. सुरुवातीला घोडय़ांवरून आपल्याला हव्या त्या लक्ष्यापर्यंत जाण्याचा हा खेळ खेळला जायचा. पण आता घोडय़ांव्यतिरिक्त बाइक्स, सायकली अशा- रानावनातून धावू शकणाऱ्या-वाहनांनी हा खेळ खेळला जातो. या खेळात अनेक अडथळे असतात. ते पार करत पुढे लक्ष्यापर्यंत सरकायचं असतं. यात तुम्ही किती वेगाने गाडी चालवायची, याचं काही बंधन नसतं. रस्त्यात येणारे अडथळे, नदी, नाले ओलांडताना, समोरच्या निसर्गाचा, सोबत्यांचा सहभाग यांचा आनंद घ्यायचा असतो. पण ही स्पर्धा चाकोरीबद्ध मार्गाने होणारी नसल्याने स्पर्धकांना त्यातील धोके आधीच सांगितलेले असतात. स्पर्धेदरम्यान अनेक इव्हेंटही होतात. पण या स्पर्धेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, यासकट अनेक आरोप होत असतात. तर, रानात गेल्यामुळेच आमची पर्यावरणनिष्ठा वाढते, असं उत्तर बाइकवाल्यांकडे तयार असतं!

एंडय़ूरो हादेखील असाच एक साहसी मोटारसायकल स्पर्धेचा प्रकार. हीदेखील नेहमीच्या रस्त्याबाहेरची - ‘ऑफरोड’ स्पर्धा मानली जाते. मात्र, या स्पर्धेसाठीचे नियम फार कठोर असतात. ही स्पर्धा दोन प्रकारे होते. एकात नेहमीप्रमाणे ठरल्या वेळेत अंतर कापायचं असतं, तर दुसरा प्रकार म्हणजे या अंतरावर ठरवून दिलेल्या टप्प्यांवर ठरलेल्याच मार्गावरून ठरलेल्या वेळेत पोहोचत हे टप्पे पार करायचे असतात. ठरलेल्या वेळेत ठरलेल्या टप्प्यावर स्पर्धक आला नाही तर त्याला दंड होतो. थोडक्यात, हा प्रकार म्हणजे नेहमीची स्पर्धा न मानता वेळ पाळण्याची स्पर्धा म्हणता येईल. या स्पर्धेची सुरुवात गटागटाने होते. त्याला ‘रो’ म्हणतात. प्रत्येक ‘रो’ची निघण्याची वेळ ठरलेली असते. त्यानुसार त्याला पुढचं सर्व वेळापत्रक पाळावं लागतं. या स्पर्धकांना मार्गात अनेक अडथळे उभारलेले असतात. काही त्यांना ठाऊक असतात, काहींची त्यांना कल्पना नसते. त्यातही या स्पर्धकांना एक ‘स्पेशल टेस्ट’ द्यावी लागते. त्यात स्पर्धक मोटारसायकलवरून नव्हे तर चालत हा टप्पा पार करतात. या स्पर्धेत स्पर्धकाच्या शारीरिक आणि मानसिक कौशल्याचा कस लागतो.

Marathi Online News

Wednesday, September 22, 2010

स्ट्रेस मॅनेजमेंट!


सक्काळी सक्काळी बोरिवलीहून मुंबईला जाण्यासाठी आनंदात निघालो. पण विसरूनच गेलो, मालाड पार केलं तरी गोरेगाव, अंधेरी आहेच ना! अंधेरीच्या ट्रॅफिक जॅममुळे भर दिवसा डोळ्यांसमोर ‘अंधेरी’ आल्याशिवाय राहत नाही. या वाहतूक कोंडीमुळे होणा-या उद्वेगाला सध्या तरी कोणाकडेच उत्तर नाही. राज्य सरकारनं जनतेला ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चे धडे देण्यासाठी केलेली उपाययोजना असा बोध घेऊन गप्प बसणंच योग्य, असं वाहनचालक म्हणतात

मालाडचा उड्डाणपूल खुला झाला. व्वा! ही बातमीच इतकी भन्नाट आहे की आमच्या काही मित्रांनी हा आनंद चक्क‘साजरा’ केला. एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या नावाने दोन थेंबही उडवले. व्वा, क्या बात है। बोरिवली, कांदिवली,मालाडला राहणाऱ्यांच्या मुखी हेच एक वाक्य होतं. पण, हाय रे कर्मा, हे काय?

सक्काळी सक्काळी बोरिवलीहून मुंबईला जाण्यासाठी आनंदात निघालो. पण विसरूनच गेलो, मालाड पार केलं तरी गोरेगाव,अंधेरी आहेच ना! अंधेरीच्या ट्रॅफिक जॅममुळे भर दिवसा डोळ्यांसमोर ‘अंधेरी’ आल्याशिवाय राहत नाही. या वाहतूक कोंडीमुळे होणा-या उद्वेगाला सध्या तरी कोणाकडेच उत्तर नाही. राज्य सरकारनं जनतेला ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चे धडे देण्यासाठी केलेली उपाययोजना असा बोध घेऊन गप्प बसणंच योग्य, असं वाहनचालक म्हणतात.

राज्य सरकारनं मोठय़ा उत्साहात मुंबईतल्या रस्त्यांवर उड्डाणपूल बांधले. ट्रॅफिक वेगानं व्हायला हवी. सर्वसामान्यांना, सॉरी चुकलो, आपल्या मंत्र्यासंत्र्यांना भुर्रकन आपल्या ताफ्यासह निघून जाता यावं, हा त्यामागचा उदात्त हेतू होता. उड्डाणपूल बांधताना आजूबाजूच्या लोकांचं दूरवर विस्थापन केलं. मस्त झोकात झालं हे काम. सुरुवातीला गाडय़ा वेगात जायच्या. उड्डाणपुलावरून वेगात जाताना खाली ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाडय़ांना वाकुल्या दाखवताना मजा वाटायची. पण काय माहीत पुढे हेच ट्रॅफिक आपल्याही गळ्याशी येणार आहे.

००

गेल्या काही काळात विशेषत: पश्चिम द्रुतगती महामार्गावरचे हे उड्डाणपूल तोकडे पडत असल्याचं दिसून येतंय. मुंबईकडे येताना, गोरेगावचा आरे रोडवरच्या उड्डाणपुलाजवळ नेहमीच गाडय़ांची रांग असते. आरे कॉलनीत किंवा गोरेगाव स्थानकाकडे जाणाऱ्या गाडय़ांची रांग मागे दिंडोशीच्या उड्डाणपुलापर्यंत आलेली असते. संध्याकाळच्या वेळी उलटय़ा दिशेला तर ही वाहतूक अगदी जोगेश्वरी ओलांडून अंधेरीकडे गेलेली असते. हा दोन किलोमीटरचा प्रवास तुमचा अर्धा-पाऊण तास घेऊन संपतो. (या वाहतूक कोंडीचं ‘प्रहार’ने वृत्तही दिलं आहे. वाहतूक पोलिसांनी ही आमच्या आवाक्याबाहेरची वाहतूक कोंडी असल्याचं सांगून हात वर केले आहेत.) असो!

मुंबईकडे जाताना ही वाहतूक कोंडी सध्या तरी काही प्रमाणात सुसह्य आहे. पण वाट लागते ती अंधेरीकडे जाताना. इस्माइल युसुफ कॉलेज ओलांडलं की, छातीत धडधड व्हायला सुरुवात होते. समोर हळूहळू धावणा-या गाडय़ा दिसू लागतात. आपल्याही गाडीचा वेग नकळत कमी झालेला असतो. आपण कधी या वाहतूक कोंडीत पोहोचलो ते कळतही नाही इतक्या‘वेगात’ आपण पुढे सरकलेलो असतो.

घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेच्या कामामुळे अंधेरीच्या उड्डाणपुलाखाली प्रचंड कोंडी असते. ही कोंडी जोगेश्वरीपर्यंत पोहोचलेली असते. त्यातच मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा लोंढा या कोंडीला येऊन मिळतो. पण या कोंडीतल्या वाहनांनी अगदी दुसरी लेनही व्यापलेली असल्यानं, मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा त्यात अडकून पडतात. त्यात काँट्रॅक्टर कृपेनं या उड्डाणपुलाच्या दोन्ही दिशांना प्रचंड खड्डे पडले असून त्यात वाहतुकीचा वेग आणखी मंदावतो. गंमत म्हणजे दर दोन दिवसांनी हे खड्डे बुजवण्याचं काम इमानेइतबारे चाललेलं असतं. (काँट्रॅक्टरची आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कार्यतत्परता पाहा!) पण त्यांची तरी काय चूक? वाहनंच एवढी आहेत की हे खड्डे पुन्हा होतात. प्रचंड आकाराची खडी, डांबर, पेव्हर ब्लॉक, चिखल,माती, सिमेंट अशा सर्व साधनांचा वापर केल्यानं या खड्डय़ांना एक प्रेक्षणीय रूप आलं आहे. नव्याको-या कारचं सस्पेन्शन खराब झालं नाही तर हवं ते हरायला आपण तयार आहोत. बाइकस्वारांचं तर काही बोलायलाच नको. सर्कसमध्ये करतात त्यापेक्षा धोकादायक कसरती अंधेरीचा पूल दोन्ही ठिकाणी उतरताना त्यांना कराव्या लागतात. गावाकडचे कच्चे रस्तेही इतके सुंदर खड्डेमय नसतात. त्यामुळे एमएमआरडीए, काँट्रॅक्टर या सर्वाचंच कौतुक करावं तेवढं कमी आहे.

००

त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तुमचा तास मोडत असला तरी अजिबात उद्वेग होऊ देऊ नका. ही तुमच्या सहनशीलतेची परिसीमा पाहण्यासाठी राज्य सरकारने केलेली सोय आहे. येणारा काळ आणखी खडतर असेल, त्याची तयारी आतापासूनच व्हावी, हाच सरकारचा या मागचा उद्देश आहे, हा बोध तुम्ही घ्यावा.

Sunday, September 19, 2010

थ्री कप्स ऑफ टी

पाकिस्तानातील सर्वात उंच आणि जगातील दुस-या क्रमांकाचं शिखर के टू सर करण्यात ग्रेग मॉर्टेनसन आणि पत्रकार डेव्हिड रेलिन अपयशी ठरले. मात्र बंदुकीऐवजी लेखणीच्या माध्यमातून शांतता कशी प्रस्थापित करता येऊ शकते, याचा धडा त्यांनी घालून दिला. ही मोहीम अयशस्वी ठरल्यानंतर मॉर्टेनसन पाकिस्तानच्या डोंगराळ भागात उतरला. तिथल्या एका गावातील जनतेने त्याची देखभाल केली. त्याच वेळी त्याला त्या गावात एकही शाळा नसल्याचं भीषण वास्तव जाणवलं. हे वास्तव बदलण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली आणि त्यासाठी त्याने कसून प्रयत्न केले. युद्धाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पाकिस्तानच्या वायव्येकडील आणि अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात मॉर्टेनसनने तब्बल ५५ शाळा उभारल्या.

आयबीएमच्या टाइपरायटवरच्या की-बोर्डवरील कळा इतक्या जवळ जवळ होत्या की, आपण काय टाइप करतोय, हेही ग्रेग मॉर्टेनसनला कळत नव्हतं. ‘प्रिय विंफ्रे, मला तुमच्या कार्यक्रमाचं कौतुक वाटतं. जनतेची काळजी घेणा-यांपैकी तुम्ही एक आहात, याबाबत मला विश्वास वाटतो. पाकिस्तानात हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कोरफे या लहानशा खेडय़ात मला शाळा सुरू करायची आहे. या भागातील मुलांसाठी एकही शाळा नाही, हे वास्तव आहे.’

यापुढे काय लिहायचं, हे त्याला सुचत नव्हतं. पैशांची मागणी कशी करायची, हा त्याच्यासमोरचा प्रश्न होता. तरीही त्याने सुरुवात केलीच. ‘जगातील दुस-या क्रमांकाचं के टू शिखर सर करताना काही पाकिस्तानी रहिवाशांची भेट झाली. त्यांनी मला या शाळेसाठी १२ हजार डॉलर्स खर्च येईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे यात तुमचाही काही सहभाग असेल तर तो माझ्यासाठी आशीर्वादच ठरेल, असं त्याने पत्रात नमूद केलं.’ मात्र नंतर पत्रातील स्पेलिंगची चूक लक्षात आली आणि त्याने ते पत्र तिथेच फाडून टाकलं.

त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या एका वैद्यकीय केंद्रात रात्रपाळीवर असताना त्याने हे पत्र पुन्हा लिहिलं आणि सहा जणांना पाठवण्यासाठी तयार केलं. यात ख्यातनाम टीव्ही सूत्रसंचालक ओप्राह विंफ्रे, सीएनएन वाहिनीचे निवेदक आणि अभिनेत्री सुसान सॅरेंडन वगैरेंचा समावेश होता. या सहा जणांना त्याने घरी परतताना हे पत्र पाठवलं. मात्र आपलं लक्ष्य पाच हजार जणांना पत्र पाठवण्याचं आहे, याची त्याला आठवण झाली आणि तो अस्वस्थ झाला.

शाळा उभारायची, त्यासाठी निधी गोळा करायचा, त्याची सुरुवात स्वत:पासून करायची म्हणून त्याने आपल्या भाडय़ाच्या घराचाही त्याग करून स्वत:च्या ब्यूक कारमध्येच संसार थाटायचा निर्णय घेतला. रात्री दमूनभागून आल्यानंतर गाडी निर्जन जागी उभी करून त्यातच मागील सीटवर झोप काढायची व त्याच वेळी पुढील योजना ठरवायची, असा दिनक्रम बनला.

या काळात मॉर्टेनसनने शेकडो पत्रं लिहून काढली. प्रत्येक अमेरिकन सिनेटरला त्याने हे पत्र लिहिलं. आतापर्यंत कधीही न वाचलेली पॉप संस्कृतीची नियतकालिकं वाचून त्यातील नावं शोधण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने अमेरिकेतील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावं शोधून काढली. ‘मी काय करतोय हे मलाच कळत नाही,’ अशी त्याची प्रतिक्रिया होती. मॉर्टेनसन म्हणतो, ‘या काळात अमेरिकेतील जवळपास सर्वच बडय़ा मंडळींची यादी तयार केली होती. या प्रत्येकाला पत्र पाठवलं. त्या वेळी मी ३६ वर्षाचा होतो आणि मला संगणकाचं काहीही ज्ञान नव्हतं.’

एका दिवशी त्याला त्याच्या नेहमीच्या कृष्णा कॉपी केंद्राचं दार बंद दिसलं आणि पत्र टाइप करण्यासाठी मोठा प्रश्नच त्याच्यासमोर उभा राहिला. नजीकच्या लेझर कॉपी केंद्रावर तो गेला. त्याचा मालक किश्वर सईद याने त्याला संगणक विकत घेण्याचा सल्ला दिला. संगणक कशासाठी हवा, ते कळल्यानंतर मात्र मूळच्या पाकिस्तानी असलेल्या सईदने मॉर्टेनसनला संगणकाचे धडे दिले. सईद म्हणतो, ‘ग्रेग करत असलेलं काम मोठं होतं. माझ्या गावातही शाळा नव्हती.’

लवकरच मॉर्टेनसनने संगणकाचं जुजबी ज्ञान मिळवलं आणि त्याचं काम पहिल्यापेक्षा किती तरी प्रचंड वेगात होऊ लागलं. सईदनेही त्याला आणखी काही सेलिब्रिटींची यादी दिली. या सर्वाना मेल पाठवण्यास त्याने सुरुवात केली. पाकिस्तानातील मुलांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणा-या मला एका पाकिस्तानी व्यक्तीने संगणक साक्षर केलं, असं हृदगत मॉर्टेनसनने नंतर व्यक्त केलं. ही पत्रं पाठवल्यानंतर त्याने १६ बडय़ा व्यक्तींकडे पाकिस्तानातील कोरफे गावात शाळा उभारण्यासाठी मदतीसाठी याचना करणारे अर्ज पाठवले.

या कामात त्याला त्याच्या आईने जेरेन मॉर्टेनसन यांनीही मदत केली. पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर त्यांना एका शाळेत मुख्याध्यापकाची नोकरी मिळाली होती. तेथे त्यांनी ग्रेगने तयार केलेल्या पाकिस्तानातील गावांच्या स्लाईड्स दाखवल्या. आपल्यासारखी मुलं तिथे शाळेत जात नाहीत. गोठवणा-या थंडीत उघडय़ावरच शिक्षकांशिवायच शिकतात, हे पाहून त्यांच्या शाळेतील चिमुरडय़ांना आश्चर्य वाटलं.

या मुलांनीच नंतर ‘पेन्स फॉर पाकिस्तान’ ही मोहीम सुरू केल्याचं जेरेन यांनी मुलाला ग्रेगला सांगितलं. या मुलांनी तब्बल ६२३४५ पेन्स जमा केली. त्याचा ६२४ डॉलर्सचा धनादेश त्यांनी जेरेनला पाठवला आणि त्यांना ग्रेगच्या मोहिमेसाठी हा जणू शुभ संकेतच वाटला.

त्यानंतर त्याने पाठवलेल्या ५८० पत्रांपैकी एका पत्राला टॉम ब्रोकॉ यांनी उत्तर पाठवलं. फुटबॉलपटू म्हणून ग्रेग आणि ते दोघं विद्यापीठात एकत्र खेळले होते. त्यांनी १०० डॉलर्सची मदत ग्रेगला पाठवून सुयश चिंतलं. त्याच वेळी ग्रेगने आर्थिक मदतीसाठी पाठवलेले १६ अर्ज फेटाळल्याचंही ऐकावं लागलं.

त्यानंतरही मॉर्टेनसनचे प्रयत्न सुरूच होते. एके दिवशी कामावर असताना त्याचा सहकारी टॉम वॉन याने एक कागदाचा चिटोरा त्याच्याकडे दिला. त्याच्यावर नाव लिहिलेल्या माणसाने ग्रेगच्या प्रयत्नांबद्दल वाचलं होतं व त्याबाबत वॉनकडे विचारणा केली होती. तो भौतिकशास्त्रज्ञ होता, तसंच तो गिर्यारोहकही होता. डॉ. जेन होर्नी हे त्याचं नाव. या व्यक्तीबद्दल लायब्ररीत बसल्या बसल्या मिळालेली माहिती वाचून ग्रेगलाही आश्चर्य वाटलं. एव्हरेस्टसह अनेक शिखरांवर चढाया केलेल्या या मनस्वी माणसाने अनेक नोक-या सोडल्या होत्या. मात्र त्याच्या बुद्धिमत्तेची कदर म्हणून अनेक कंपन्यांमध्ये तो उच्चपदावर होता. एके दिवशी त्यानेच ग्रेगला स्वत: दूरध्वनी करून त्याच्या या मोहिमेची माहिती जाणून घेतली. त्याबद्दल खातरजमा केली आणि थेट मदतच पाठवून दिली. मात्र हा धनादेश स्वीकारण्यासाठीही ग्रेगकडे स्वत:चा अधिकृत पत्ता नव्हता. हा धनादेश त्याने कसा तरी मिळवला. त्याने आपली लाडकी ब्यूक कार ५०० डॉलरला विकून ग्रेग आपल्या जीवनाच्या एका नव्या टप्प्याचा प्रवास करण्यासाठी विमानतळावर पोहोचला.

आपल्या उद्दिष्टस्थळी जाऊन त्याने गावक-यांशी बोलायला सुरुवात केली. ‘शाळेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य आणलं आहे. माझं वचन मी पूर्ण करणारच. लवकरच कामाला आपण सुरुवात करू.’ त्याने हा विश्वास व्यक्त केला. पण गावक-यांनी सांगितलं, ‘कोरफे’ गावात शाळा बांधण्याआधी तिथल्या नदीवर पूल बांधणं गरजेचं आहे. हे ऐकलं आणि त्याच्या डोक्यात पुन्हा विचारचक्र सुरू झालं..