
सक्काळी सक्काळी बोरिवलीहून मुंबईला जाण्यासाठी आनंदात निघालो. पण विसरूनच गेलो, मालाड पार केलं तरी गोरेगाव, अंधेरी आहेच ना! अंधेरीच्या ट्रॅफिक जॅममुळे भर दिवसा डोळ्यांसमोर ‘अंधेरी’ आल्याशिवाय राहत नाही. या वाहतूक कोंडीमुळे होणा-या उद्वेगाला सध्या तरी कोणाकडेच उत्तर नाही. राज्य सरकारनं जनतेला ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चे धडे देण्यासाठी केलेली उपाययोजना असा बोध घेऊन गप्प बसणंच योग्य, असं वाहनचालक म्हणतात
मालाडचा उड्डाणपूल खुला झाला. व्वा! ही बातमीच इतकी भन्नाट आहे की आमच्या काही मित्रांनी हा आनंद चक्क‘साजरा’ केला. एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या नावाने दोन थेंबही उडवले. व्वा, क्या बात है। बोरिवली, कांदिवली,मालाडला राहणाऱ्यांच्या मुखी हेच एक वाक्य होतं. पण, हाय रे कर्मा, हे काय?
सक्काळी सक्काळी बोरिवलीहून मुंबईला जाण्यासाठी आनंदात निघालो. पण विसरूनच गेलो, मालाड पार केलं तरी गोरेगाव,अंधेरी आहेच ना! अंधेरीच्या ट्रॅफिक जॅममुळे भर दिवसा डोळ्यांसमोर ‘अंधेरी’ आल्याशिवाय राहत नाही. या वाहतूक कोंडीमुळे होणा-या उद्वेगाला सध्या तरी कोणाकडेच उत्तर नाही. राज्य सरकारनं जनतेला ‘स्ट्रेस मॅनेजमेंट’चे धडे देण्यासाठी केलेली उपाययोजना असा बोध घेऊन गप्प बसणंच योग्य, असं वाहनचालक म्हणतात.
राज्य सरकारनं मोठय़ा उत्साहात मुंबईतल्या रस्त्यांवर उड्डाणपूल बांधले. ट्रॅफिक वेगानं व्हायला हवी. सर्वसामान्यांना, सॉरी चुकलो, आपल्या मंत्र्यासंत्र्यांना भुर्रकन आपल्या ताफ्यासह निघून जाता यावं, हा त्यामागचा उदात्त हेतू होता. उड्डाणपूल बांधताना आजूबाजूच्या लोकांचं दूरवर विस्थापन केलं. मस्त झोकात झालं हे काम. सुरुवातीला गाडय़ा वेगात जायच्या. उड्डाणपुलावरून वेगात जाताना खाली ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या गाडय़ांना वाकुल्या दाखवताना मजा वाटायची. पण काय माहीत पुढे हेच ट्रॅफिक आपल्याही गळ्याशी येणार आहे.
००
गेल्या काही काळात विशेषत: पश्चिम द्रुतगती महामार्गावरचे हे उड्डाणपूल तोकडे पडत असल्याचं दिसून येतंय. मुंबईकडे येताना, गोरेगावचा आरे रोडवरच्या उड्डाणपुलाजवळ नेहमीच गाडय़ांची रांग असते. आरे कॉलनीत किंवा गोरेगाव स्थानकाकडे जाणाऱ्या गाडय़ांची रांग मागे दिंडोशीच्या उड्डाणपुलापर्यंत आलेली असते. संध्याकाळच्या वेळी उलटय़ा दिशेला तर ही वाहतूक अगदी जोगेश्वरी ओलांडून अंधेरीकडे गेलेली असते. हा दोन किलोमीटरचा प्रवास तुमचा अर्धा-पाऊण तास घेऊन संपतो. (या वाहतूक कोंडीचं ‘प्रहार’ने वृत्तही दिलं आहे. वाहतूक पोलिसांनी ही आमच्या आवाक्याबाहेरची वाहतूक कोंडी असल्याचं सांगून हात वर केले आहेत.) असो!
मुंबईकडे जाताना ही वाहतूक कोंडी सध्या तरी काही प्रमाणात सुसह्य आहे. पण वाट लागते ती अंधेरीकडे जाताना. इस्माइल युसुफ कॉलेज ओलांडलं की, छातीत धडधड व्हायला सुरुवात होते. समोर हळूहळू धावणा-या गाडय़ा दिसू लागतात. आपल्याही गाडीचा वेग नकळत कमी झालेला असतो. आपण कधी या वाहतूक कोंडीत पोहोचलो ते कळतही नाही इतक्या‘वेगात’ आपण पुढे सरकलेलो असतो.
घाटकोपर-वर्सोवा मेट्रो रेल्वेच्या कामामुळे अंधेरीच्या उड्डाणपुलाखाली प्रचंड कोंडी असते. ही कोंडी जोगेश्वरीपर्यंत पोहोचलेली असते. त्यातच मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांचा लोंढा या कोंडीला येऊन मिळतो. पण या कोंडीतल्या वाहनांनी अगदी दुसरी लेनही व्यापलेली असल्यानं, मुंबईकडे जाणाऱ्या गाडय़ा त्यात अडकून पडतात. त्यात काँट्रॅक्टर कृपेनं या उड्डाणपुलाच्या दोन्ही दिशांना प्रचंड खड्डे पडले असून त्यात वाहतुकीचा वेग आणखी मंदावतो. गंमत म्हणजे दर दोन दिवसांनी हे खड्डे बुजवण्याचं काम इमानेइतबारे चाललेलं असतं. (काँट्रॅक्टरची आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची कार्यतत्परता पाहा!) पण त्यांची तरी काय चूक? वाहनंच एवढी आहेत की हे खड्डे पुन्हा होतात. प्रचंड आकाराची खडी, डांबर, पेव्हर ब्लॉक, चिखल,माती, सिमेंट अशा सर्व साधनांचा वापर केल्यानं या खड्डय़ांना एक प्रेक्षणीय रूप आलं आहे. नव्याको-या कारचं सस्पेन्शन खराब झालं नाही तर हवं ते हरायला आपण तयार आहोत. बाइकस्वारांचं तर काही बोलायलाच नको. सर्कसमध्ये करतात त्यापेक्षा धोकादायक कसरती अंधेरीचा पूल दोन्ही ठिकाणी उतरताना त्यांना कराव्या लागतात. गावाकडचे कच्चे रस्तेही इतके सुंदर खड्डेमय नसतात. त्यामुळे एमएमआरडीए, काँट्रॅक्टर या सर्वाचंच कौतुक करावं तेवढं कमी आहे.
००
त्यामुळे अवघ्या पाच मिनिटांच्या प्रवासासाठी तुमचा तास मोडत असला तरी अजिबात उद्वेग होऊ देऊ नका. ही तुमच्या सहनशीलतेची परिसीमा पाहण्यासाठी राज्य सरकारने केलेली सोय आहे. येणारा काळ आणखी खडतर असेल, त्याची तयारी आतापासूनच व्हावी, हाच सरकारचा या मागचा उद्देश आहे, हा बोध तुम्ही घ्यावा.
No comments:
Post a Comment