Sunday, March 13, 2011

रहस्य त्वचेचं!

नितीन सावंत

माणसाच्या ज्ञानेंद्रियांपैकी अत्यंत महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे त्वचा. केवळ स्पर्शज्ञानाचंच नव्हे, तर व्यक्तिमत्त्वही सिद्ध करण्याचं काम त्वचा करत असते. नितळ, निकोप त्वचा हे निरोगीपणाचं लक्षण समजलं जातं. त्याचबरोबर त्वचेवरूनच वयाचा अंदाजही बांधता येतो. त्यामुळेत्वचा निरोगी कशी राखता येईल, याकडे केवळ स्त्रियाच नव्हे; तर पुरुषही अधिक लक्ष देतात. आपली आवडती नटी किंवा नट अगदी पन्नाशीतही त्वचेचं सौंदर्य कशा प्रकारे राखून आहेत, याची उत्सुकता तर प्रत्येकालाच असते. त्वचेचं तारुण्य अबाधित राखणारी सौंदर्यप्रसाधनं, शस्त्रक्रिया यांचाच तर हल्ली बाजारात सुळसुळाट झालाय.

पण ही त्वचा माणसाच्या वयानुसार बदलत कशी जाते? तरुणपणी ती तजेलदार कशी बनते? तर वार्धक्याबरोबर तिच्यावर सुरकत्यांचं जाळं कसं पसरतं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाजारात मिळणारी सौंदर्यप्रसाधनं तिला खरोखरच नवचैतन्य मिळवून देतात काय? हे सगळं जाणून घ्यायचं तर त्वचेसंबंधीचं विज्ञान समजून घेणं महत्त्वाचं आहे.

मानवी शरीराच्या एकंदर वजनाच्या १२ ते १६ टक्के वजन त्वचेचं असतं. वाढत्या वयोमानानुसार त्वचेखाली असणाऱ्या मेदांचं प्रमाण कमी होतं आणि त्वचेवर त्याचा परिणाम घडून यायला सुरुवात होते. त्वचेतील मुख्य घटक पाणी असून त्याचं प्रमाण ७० टक्के, त्याखालोखाल प्रथिनं २५.५ टक्के, मेद दोन टक्के, खनिजं ०.५ टक्के तर इतर घटक २.० टक्के आहेत. त्वचा तीन भागांत विभागलेली असते. डर्मिस म्हणजे सर्वसाधारणपणे ज्याला त्वचा म्हटलं जाते, तो भाग मध्ये असतो. एपिडर्मिस म्हणजे बाह्मत्वचा आणि सबक्युटीस म्हणजे अंतर्त्वचा. त्वचेचे हे प्रमुख तीन भाग.

त्वचेचं मुख्य कार्य बाह्म आघातांपासून शरीराचं रक्षण करणं, हे आहे. त्वचेचे विविध स्तर त्वचेवर जंतुसंसर्ग होऊ नये किंवा ती कोरडी पडू नये, यासाठी सतत कार्यरत असतात. त्वचेला अकाली वार्धक्य आणणाऱ्या घटकांमध्ये सूर्यकिरणांचा मोठा वाटा असतो. त्यातील अतिनील किरणांचा त्वचेवर विपरित परिणाम होत असतो. त्याचबरोबर धूम्रपानही त्वचेला वार्धक्य आणण्यात आपला वाटा उचलत असतं.

त्वचेतील ग्लायकोसोयामिनोग्लायकान्स (गॅग) आणि प्रोटेओग्लायकान्स हे घटक त्वचेत पाणी धरून ठेवण्याचं काम करतात. थोडक्यात, स्कीन मॉयश्चरायझर म्हणता येईल. त्वचा तजेलदार दिसण्यामागील हा एक मुख्य घटक आहे. कॉस्मेटिक मॉयश्चरायझरही हेच काम करतात. मात्र त्यांच्यात पेट्रोलियम किंवा जड तेलाचा वापर केला जातो. त्यांच्यामार्फत त्वचेतील पाण्याचा अंश कमी होण्याचा वेग मंदावण्याची क्रिया घडते. मात्र ही प्रक्रिया तात्पुरत्या स्वरूपाची असते.

त्वचेला ताकद आणि दीर्घायुष्य देण्याचं काम कोलाजीन हे शरीरात विपुल प्रमाणात आढळणारं प्रथिन करतं. वय वाढतं तसं हे प्रथिन कमी होत जातं आणि त्वचा पातळ होते. त्याचबरोबर त्वचेतील इलास्टीन (त्वचा सैल पडू नये म्हणून असणाऱ्या तंतूंचे) या कोलाजीनसारख्याच प्रथिनाचं काम त्वचेचा घट्टपणा कायम राखणं, हे आहे. इलास्टीनमध्ये डेस्मोसिन आणि आयसोडेस्मोसिन नावाची दोन अमिनो आम्लं असतात. कोलाजीन आणि इलास्टीन या दोन घटकांवरच त्वचेचं सौंदर्य अवलंबून आहे. त्यामुळे हे घटक वापरून अनेक सौंदर्यप्रसाधनांची निर्मिती केली जाते. मात्र त्यातील कोलाजीन आणि इलास्टीन हे घटक दुभती जनावरं किंवा पक्ष्यांपासून मिळवलेले असतात. हे घटक मानवी त्वचेत शिरकाव करू शकत नाहीत, उलट त्यामुळे मॅड काऊसारखे रोग होण्याची शक्यताच अधिक.

No comments:

Post a Comment