Sunday, November 25, 2012

वपुंच्या ‘पार्टनर’ने पछाडले- सतीश पुळेकर आणि समीर सुर्वेंनी उलगडली चित्रनिर्मितीची कथा

ज्येष्ठ साहित्यिक व कथाकथनकार व. पु. काळे म्हटले की आपल्या डोळ्यांसमोर सर्वसामान्य माणसांच्या खोली-दोन खोलीतल्या व्यथा मांडणार्‍या असंख्य कथा येतात आणि ओघानेच या व्यथांवर रामबाण उपाय सुचवणारी पार्टनर ही व्यक्तिरेखा मनाचा ताबा घेते. जगात खरेच असतील का पार्टनरसारख्या व्यक्ती, का आपला पार्टनर आपल्याच मनात दडलेला असतो, अशा अनेक प्रश्नांनी मनात काहुर उठते. अशा या पार्टनर नावाच्या वपुंनी अमर केलेल्या पात्रावर श्री पार्टनर नावाने चित्रपट आलाय. या चित्रपटाचे दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे आणि पार्टनर रंगवणारे सतीश पुळेकर यांनी ‘लोकमत’ कॉफी टेबलमध्ये रुपेरी पडद्यावरील पार्टनरचा प्रवास उलगडला..
------------------------------------
१) आर्थिक स्थिती बेताची आहे म्हणून पैसे वाचवताना आम्ही कधीही दर्जाशी तडजोड केली नाही. वेगवेगळे शॉट घ्यायचे नि टेबलावर जोडायचे हा उद्योग केला नाही. एकदा तर तीन संपूर्ण दिवसांचे शूटिंग मनासारखे झाले नव्हते, म्हणून ते पुन्हा केले नि पैशाचा विचार नाही केला.
२)इंग्रजीमध्ये ८0 टक्के सिनेमे कादंबर्‍यांवरून बनवले जातात. आपल्याकडे हा प्रकार रुजलेला नाही. परंतु मराठीत इतके दज्रेदार साहित्य आहे की अनेक चित्रपट बनू शकतात. पर्व क्रिएशन्स या संस्थेची निर्मितीच या उद्देशाने झालेली आहे.
३) सुरुवातीला फायनान्ससाठी अनेकांना भेटलो. अनेक अटी घालत, बदल सुचवत लोकांनी पैसे देऊ केले.
त्यास नकार दिल्यावर फायनान्सरांनी पाठ दाखवली. आज हात आखडता घेतलेल्या त्याच लोकांनी भविष्यात एकत्र काम करू असे बोलायला सुरुवात केली आहे.
------------------------------------
३५ वर्षांमध्ये चित्रपट निर्मात्यांनी हात न लावलेल्या पार्टनरवर सिनेमा बनवावा हे कधी वाटलं?
समीर सुर्वे - सात-आठ वर्षांपूर्वी पार्टनर वाचली आणि अक्षरश: सुन्न झालो. चित्रपट बघून, नाटक बघून आपण बधिर होतो, सुन्न होतो.. पण, पुस्तक वाचून असे कधी होत नाही. परंतु, पार्टनर ही कादंबरी अपवाद होती. मी दोन दिवस या विश्‍वातच नव्हतो. ज्या वेळी भानावर आलो, त्या क्षणीच ठरवले या कादंबरीवर चित्रपट बनवायचा. ३५ वर्षे झालेल्या या कादंबरीमधली प्रत्येक गोष्ट आजही तंतोतंत लागू आहे, यापुढेही लागू राहील हे उमगले आणि मी कादंबरीकडे चित्रपटाची स्क्रिप्ट यादृष्टीनेच बघायला लागलो.

पण, चित्रपट वास्तवात यायला आठ वर्षे का लागली? आणि हे शिवधनुष्य तुम्ही नक्की कसे पेलले?
सतीश पुळेकर - याचे सर्व श्रेय जाते ते समीरला.. या कादंबरीवर चित्रपट करायचाच या विचाराने तो इतका पछाडला होता की त्याच्या डोक्यात कायम तोच विचार असायचा. त्यासाठी त्याने या कादंबरीचा सखोल अभ्यास केला. या कादंबरीची ताकदच इतकी जबरदस्त आहे की त्यासाठी वेगळ्या संवादांची गरजच नव्हती. पण, इतका प्रचंड आवाका असलेला विषय दोन-अडीच तासांत मांडणे हे प्रचंड कठीण काम होते. समीरने तब्बल १४ वेळा या पटकथेचा मसुदा लिहिला. इतकी मेहनत घेतली म्हणूनच आज इतका दज्रेदार चित्रपट तयार करता आला.

पटकथा हे एकच आव्हान होते की आणखी काही आव्हानांचाही सामना करावा लागला?
समीर सुर्वे - वपुंच्या कथेला धक्का न लावता चित्रपटाच्या माध्यमाला अनुकूल असे बदल करणे हा एक भाग होता. पण, त्यापेक्षा मोठे आव्हान होते, ते म्हणजे आर्थिक भाराचे; आणि या जबरदस्त भूमिका पेलू शकतील अशा गुणी कलाकारांच्या निवडीचे. ज्या दिवशी मी पार्टनर करायचे ठरवले त्या दिवशीच पार्टनरची भूमिका सतीश पुळेकर आणि आईची भूमिका लालन सारंग करतील हे मी ठरवले होते. मला प्रचंड विरोध झाला, लोकांनी वेड्यात काढले, परंतु मी माझ्या निवडीवर ठाम राहिलो आणि आज त्याचा मला अजिबात पश्‍चात्ताप होत नाही. दुसर्‍या ज्या भूमिका आहेत, श्री आणि किरणच्या, त्यासाठी मात्र मी खूप मेहनत घेतली. बहुधा मराठीमध्ये प्रथमच मी कलाकारांच्या ऑडिशन घेतल्या. राज्यातल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये गुणी कलाकारांच्या ऑडिशन घेतल्या आणि शेकडो कलाकारांमधून पद्मनाभ भिंड व श्‍वेता पगार यांची निवड केली.
हे दोघेही नवोदित आहेत, त्यांना कुणी फारसे ओळखत नाहीत. पण, सिनेमा बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल की इतका मॅच्युअर अभिनय, आपल्या व्यक्तिरेखेची जाण फार कमी कलाकारांना असते. त्यांनी जीव तोडून काम केलेय आणि त्यामुळे हा सिनेमा वेगळी उंची गाठू शकला आणि वपुंच्या कलाकृतीला न्याय देऊ शकला.

पुळेकरजी, तुम्ही आज इतकी वर्षे या व्यवसायात आहात. स्वत: दिग्दर्शक आहात. तुमचा नवोदित दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
मी ज्या वेळी दुसर्‍या कप्तानाच्या टीममध्ये काम करत असतो, त्या वेळी कधी लुडबूड करत नाही आणि कप्तानाची म्हणजे दिग्दर्शकाची माझ्याकडून जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. इथेही मी तेच केले आहे. पण एक गोष्ट आवर्जून सांगेन, समीरने जी मेहनत घेतली आहे त्याला काही तोड नाहीये. त्याने चित्रपटासाठी योग्य असे काम आमच्या सगळ्यांकडून करून घेतले आहे. पद्मनाभ आणि श्‍वेता यांच्यासाठी कॅमेरा नवा आहे, प्रणयदृश्यांमध्ये ते बुजतील असे लक्षात आल्यावर समीरने त्यांच्यासाठी १५ दिवसांचे वर्कशॉप घेतले. अक्षरश: सीन्सच्या रंगीत तालमी करून घेतल्या आणि त्याचा चांगला परिणाम शूटिंगच्या वेळी दिसला. अत्यंत प्रगल्भ व कसलेल्या कलाकारांप्रमाणे त्या दोघांनी ते अवघड प्रसंग लीलया पेलले. मला वाटते असा वर्कशॉपचा प्रकार मराठीत पहिल्यांदाच झालाय आणि या नव्या पायंड्यासाठी समीरचे कौतुक करायला हवे. अनेक निर्माते एका आठवड्यात नि दोन महिन्यांत सिनेमा बनवत असताना समीरने मनासारखा सिनेमा बनवण्याचा ध्यास घेतला आणि आर्थिक समस्यांचा विचार न करता एका सिनेमासाठी तीन वर्षे मेहनत केली.

या सिनेमाचे आणखी काय वैशिष्ट्य सांगाल?
अनेक आहेत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आम्हाला अनेकांनी केलेली मदत. वपुंच्या कन्या स्वाती चांदोरकर या पहिल्यापासून आमच्यासोबत आहेत. गाण्यांसाठी संगीतकार नीलेश मोहरीर, गीतकार अश्‍विनी शेंडे यांनी खूप मेहनत घेतली आहे. गाणी हा सिनेमातला ब्रेक न ठरता ती कथा पुढे घेऊन जातात, सिनेमाचा एका हिस्सा बनतात. गाण्यांचे या चित्रपटातील योगदान खूपच महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी नीलेश व अश्‍विनी यांचे आभार मानायला हवेत. ज्या वेळी गाण्यांच्या सीडीचे प्रकाशन झाले, त्या वेळी एकाच दिवसात अडीच का तीन हजार सीडी विकल्या गेल्या, यावरून तुम्हाला गाणी किती सुंदर आहेत याचा अंदाज येईल.

- शब्दांकन
नितीन सावंत

No comments:

Post a Comment