Saturday, September 18, 2010

शिरगणतीनं घडवलेला इतिहास

शिरगणती करणे, ही काही साधी सोपी गोष्ट नाही. भारतासारख्या महाकाय खंडप्राय देशात तर हे साधेसुधे आव्हान नाही. पण दर १० वर्षानी येणारे, हे आव्हान लीलया पेलण्यात आपल्या- भारतीय यंत्रणेला यश आले आहे.

शाळेत असताना शंकर पाटील यांची एक कथा आम्हाला मराठीतला धडा म्हणून होती, त्यात सरकारी आदेशातील काही शब्दांची गल्लत झाल्यामुळे ग्रामपंचायतीच्या सदस्यांवर माकडांची शिरगणती करण्याची वेळ येते. त्यामुळे गावक-यांची काय त्रेधा उडते, त्याचे वर्णन होते. कशी तरी ती शिरगणती आटोपल्यावर खरा आदेश हातात येतो आणि सर्व गावकरी डोक्याला हात लावतात. विनोद बाजूला राहू द्या, पण शिरगणती करणे, ही काही साधी सोपी गोष्ट नाही. भारतासारख्या महाकाय खंडप्राय देशात तर हे साधेसुधे आव्हान नाही. पण दर १० वर्षानी येणारे, हे आव्हान लीलया पेलण्यात आपल्या- भारतीय यंत्रणेला यश आले आहे. यंदाच्या शिरगणतीलाही नुकतीच सुरुवात झाली आहे.

मुळात शिरगणती करायची कशाला, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होऊ शकतो. पण, शिरगणती केल्याशिवाय गावाची, शहराची, राज्याची, देशाची खरीखुरी परिस्थिती समोर येणे शक्य नाही. आपल्यासारख्या विविध जाती-धर्म-पंथाच्या देशात तर विविध कल्याणकारी योजना राबवण्यासाठी ही जनगणना उपयुक्त ठरते. आपल्या देशात इंग्रजांच्या काळापासून शास्त्रशुद्ध पद्धतीने शिरगणती करण्यास सुरुवात झाली आहे. पण शिरगणतीचा इतिहास पाहिला तर अगदी मोहेंजोदडो-हडप्पाच्या सिंधू संस्कृतीपर्यंत मागे जावे लागेल. या शहरांच्या उत्खननादरम्यान अतिप्रगत अशी संस्कृती त्या काळी वस्ती करून होती, असे दिसून आले आहे. या शहरांची रचना, बांधकाम, सांडपाण्याचे व्यवस्थापन यांचे उत्तम नियोजन दिसून येते आणि हे नियोजन त्या-त्या ठिकाणच्या लोकसंख्येची माहिती घेतल्याशिवाय करता येणेच शक्य नाही, हे कोणीही सांगू शकेल. या संस्कृतीनंतर भारतात आर्याचे आगमन झाले. शेतीआधारित जीवनपद्धती असणाऱ्या आर्यानी भारतात त्यांची संस्कृती रुजवली. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करू शकेल, अशा तंत्रज्ञानाचा त्यांच्या काळात विकास झाला.ग्वेदातही भारतातील लोकसंख्या काही भागात दाट होती तर काही भागांत विखुरलेली होती, याचे उल्लेख आले आहेत. ब्राह्मणा साहित्यातही ८०० ते ख्रिस्तपूर्व काळात काही गावांची भरभराट होऊन त्यांना राजधानीचे स्वरूप आले होते व त्यांनी शहरी जीवनपद्धतीचा स्वीकार केला होता, असे उल्लेख आहेत, याचाच अर्थ त्या काळातही जनगणना किंवा तत्सम प्रकार झाले असावेत. त्याशिवाय ही माहिती येणे शक्य नाही. बुद्धकालीन साहित्यातही ख्रिस्तपूर्व ७ ते ४ शतकांच्या काळात भारतीय शहरांची भरभराट झाली होती व मध्ययुगीन युरोपच्या तुलनेत ती संपन्न होती, असे उल्लेख आहेत. सम्राट अशोकाचा काळ या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाईल. कारण या काळात, प्रभावी प्रशासन, लेखी आज्ञा, वाणिज्याचा प्रचंड विकास झाला होता. या सर्व बाबींचा विचार करता, ख्रिस्तपूर्व काळात भारतीय लोकसंख्या विकसित होती व या लोकसंख्येची माहिती घेण्याचा प्रयत्न झाला होता, हे दिसून येते. भारतीय राज्यव्यवस्थेचे नियमन करणाऱ्या कौटिल्याच्या अर्थशास्त्रात तर त्या काळात शिरगणती केली जायचे, याचे ठसठशीत उदाहरण मिळते. जनतेवर कर किती लादावा, यासाठी लोकसंख्येची माहिती असणे गरजेचे आहे, असे कौटिल्याने त्या काळात लिहून ठेवले होते.

मुघलांच्या काळातही जमीन, उत्पादन, लोकसंख्या, दुष्काळ यांची माहिती असलेली दस्तऐवज ठेवले जात. अकबराची राज्यकारभाराची प्रणाली असणाऱ्या ऐन-ए-अकबरीत तर लोकसंख्या, उद्योगधंदे, संपत्ती आणि इतर बाबींची इत्थंभूत माहिती ठेवली जात होती.

इंग्रज कालखंड

मध्ययुगात भारतासह अन्यत्रही मोठी अशांतता होती. पण नंतरच्या काळात प्रत्यक्ष मानवी लोकसंख्येची गणना आवश्यक वाटू लागली व त्या दृष्टीने भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर प्रयत्न झाले. ब्रिटिशांचे भारतात व्यापारी म्हणून आगमन झाले. पण येथील कारभार स्वत:च्या हातात घेण्याचे त्यांचे छुपे धोरण होते व येथील जनतेची माहिती घेण्याच्या उद्देशाने आगमन झाले त्याच वर्षी त्यांनी भारतातील पहिली जनगणना केली. १६००मध्ये झालेल्या जनगणनेचे मुख्य सूत्रधार प्रख्यात इतिहाससंशोधक मोरलँड हे होते. त्यांनी दक्षिणेकडील भागाच्या लोकसंख्येच्या गणनेसाठी तेथील तैनाती फौजेच्या संख्येचा आधार घेतला तर उत्तरेकडील लोकसंख्या तेथील किती जमीन लागवडीखाली आहे, याच्या आधारे मोजण्याचा प्रयत्न त्याने केला होता.

पण ब्रिटिशांच्या काळात भारतावरील मुघलांचा एकछत्री अमल बऱ्याच अंशी नाहीसा झाला होता व विखुरलेल्या प्रांतांची गणना करणे तसे कठीण काम होते. १७१६मध्ये मुंबई प्रांताची शिरगणती झाल्याची नोंद आहे. पण ही नोंद केवळ किल्ल्याच्या (फोर्ट) आत राहणाऱ्या रहिवाशांची व नजीकच्या बेटांवरील रहिवाशांची झाली होती.

नमुना पाहणी (सँपल सव्‍‌र्हे) जनगणनेसाठी महत्त्वाची मानली जाते. अशा प्रकारच्या पाहणीचे श्रेय ब्रिटिश अधिकारी एच. टी. कोलब्रूक यांना जाते. त्यासाठी त्यांनी स्वत:ची पद्धत विकसित केली होती. या पाहणीसाठी त्यांनी विभाग, लोकसंख्येची घनता, प्रत्येक घरातील किती जण नोकरी करतात, आहार यांचा आधार त्यांनी घेतला होता.

इंग्रजांनी प्रत्यक्ष जनगणनेला १८०१ मध्ये सुरुवात केली. मात्र या जनगणनेच्या अहवालावर किती अवलंबून राहायचे या बाबत संसद साशंक होती. १८२० ते ३० या काळात झालेल्या जनगणनेचे आकडे आजच्या गणनेच्या तुलनेत मागास वाटले तरी तत्कालीन देशाच्या परिस्थितीबाबत पुरेसे होते. त्या काळात त्रावणकोर व कोचीन या प्रांतांची झालेली शिरगणती एक उत्तम उदाहरण मानले जात होते. त्याशिवाय रिचर्ड जेनकिनचा माळवा व त्या निकटच्या भागांचा अहवाल, थॉमस मार्शलचा दक्षिण मराठा प्रांताचा १८२२चा अहवालही उत्तम होते. भारतीय शहरांची अचूक शिरगणती करण्याचा मान मात्र हेन्री वॉल्टर्सला जातो. त्याने ढाका शहराची केलेली पाहणी उत्तम होती. त्यानंतर दुसरी पाहणी १८३६ ते ३७ या काळात फोर्ट सेंट जॉर्ज प्रेसिडंसीची झाली. त्यानंतर भारत सरकारने १८४९ मध्ये सर्व महसूल अधिकाऱ्यांना त्यांच्या अखत्यारितील लोकसंख्येची माहिती जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही हे अहवाल सर्वसमावेशक ठरत नव्हते. पण भारताची र्सवकष शिरगणती पहिल्यांदा १८८१मध्ये करण्यात आली. या वेळी देशातील प्रत्येक भागातील जनतेची र्सवकष माहिती एकाच वेळी गोळा करण्यात आली व त्यानंतर दर १० वर्षानी अशा प्रकारे शिरगणती करण्याची प्रथा पडली.


No comments:

Post a Comment