Monday, September 6, 2010

बाइझिंग..

मोटरसायकल आली की जगणंच बदलतं.. बाइकमुळे सोय, वेळ वाचणं वगैरे शहरात ठीक; पण बाइक चालवण्याची झिंग तुम्हाला निसर्गाकडेही नेते त्यासाठी मग बायकर मित्र शोधले जातात, बायकिंग क्लब्जही जुळतात आणि टिकतातही..

अरे बस कर आता बाइक चालवणं, पाठीचा खुळखुळा करून घेशील..

कशी काय बरं चालवता तुम्ही या ट्रॅफिकमध्ये बाइक..

अरे परवडतं तरी कसं तुम्हाला बाइकचा हत्ती पोसणं.. सांभाळून चालव रे बाबा..

हे प्रश्न/सल्ले बाइकस्वारांना नवे नाहीत. पण साळसूदपणे या प्रश्नांकडे-सल्ल्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या बाइकिंगची झिंग प्रत्येक बाइकवाला अनुभवतो. बाइक म्हणा, दुचाकी म्हणा, मोटरसायकल म्हणा, पण पायडल न मारता चालणाऱ्या या मशिनने अवघी तरुणाई गेल्या अनेक पिढय़ांपासून क्रेझी झाली आहे. झिप-झ्ॉप-झूम म्हणत गल्लीतून, हायवेवरून सुसाट निघण्याचा आनंद काय असतो, तो बाइकच्या पुढच्या सीटवर बसल्याशिवाय कोणालाच अनुभवता येणार नाही.

बाइकची झिंग तशी प्रत्येकालाच असते, असं म्हणता येणार नाही. त्यासाठी मुळातून ऊर्मी असावी लागते. पुण्यासारख्या शहरात घरोघरी बाइक्स असतात. पण त्यांचा वापर मजबुरी म्हणून होतो. त्यातल्या कोणालाच पुण्यातल्या ट्राफिक जाममध्ये उतरून ती चालवायची इच्छा नसते. मुंबईसारख्या शहरात तर बाइक चालवणं बंपर टू बंपर ट्राफिकमुळे कठीण. तरीही मुंबईत गेल्या काही वर्षात त्यांचं प्रमाण वाढलं आहे. मुळात बाइक चालवणं ही एक कला आहे, असं ‘जातिवंत’बाइकचालक सांगतात. केवळ कॉलेजला, ऑफिसला जाण्यासाठी बाइक चालवणं वेगळं आणि आनंद म्हणून बाइक चालवणं वेगळं, असं या मंडळींचं म्हणणं असतं.

अनेकदा कॉलेजात एफवायला गेल्यावर (लायसन्स मिळण्याचं वय झाल्यावर) बहुतेक तरुणांना हल्ली बाइक हवी असते. त्यासाठी बाबांकडे लकडा लावला जातो. हल्ली कॉल सेंटर्स आल्यामुळे पालकांच्या मागे भुणभुण करण्याचे दिवसही सरलेत. बाइक घेण्यामागचा उद्देश हाच असतो की, कॉलेजात आपली आयडेंटिटी वेगळी असावी! त्यातच कोणाला दिल वगैरे दिलं असेल तर आपल्या दिलाची मालकीण आपल्यामागे खेटून बसण्यासाठी स्वत:ची बाइक असावीच, मित्रांकडे सारखं-सारखं मागणं बरोबर दिसत नाही. ही भावनाही त्यामागे असते. त्यामुळे नवी कोरी बाइक घरी येताच, ती कधी एकदा मित्रांना दाखवतो असं होतं. हात साफ झाला असेल तर दुस-याच दिवशी ती सक्काळी सक्काळी कॉलेजच्या पार्किंग लॉटमध्ये उभी असते.

चकचकीत रंग, घराजवळच्या साईबाबांच्या मंदिरातला हार, हळदीकुंकवानं काढलेलं स्वस्तिक पाहूनच पोरांनाही कळतं,कॉलेजात नवी बाइक आल्याचं. बाइक मालकाचा तोरा काही औरच असतो. त्यातच मित्रांनी तारीफ सुरू केल्यावर तर विचारायलाच नको. 150 सीसीची आहे. 220 सीसी घेणार होतो, पण मायलेज मिळत नाही, म्हणून नाही घेतली. जॉब मिळाला की ती घेणारच, असं वर सांगूनही टाकलं जातं. जुन्याजाणत्या बाइकचालकांचे सल्ले येतात. वन हँड ठेव, कोणाला देऊ नकोस. कोणी मागितली तर रिक्षाला जाण्या-येण्याचे पैसे दे, पण बाइक देऊ नकोस. पण हा सल्ला पुढच्या सहा महिन्यांतच धुडकावला जातो. आपली बाइक कधी सार्वजनिक झाली ते आपल्यालाही कळत नाही.

बाइक आली की सुरुवातीला तिला चकचकीत ठेवण्यासाठी दररोज पुसणं, पॉलिश मारणं हे उद्योग सुरू होतात. आपण दुस-यांपेक्षा (बाइक नसलेल्यांपेक्षा) कोण तरी वेगळे आहोत, असं वाटायला लागतं. त्यामुळे काही दिवस तरी नवीन बाइक मालक आणि त्याची बाइक दोघेही जमिनीपासून दोन इंच उंचावरूनच चाललेले असतात. प्रत्येक कामासाठी बाइकचाच वापर व्हायला लागतो. (तसा तो परवडतोही म्हणा.) कॉलेजला जाण्यासाठी बस स्टॉप, रिक्षा स्टँडवर ताटकळत उभं राहा, खचाखच भरलेल्या लोकलमध्ये शिरण्याची सर्कस यांच्यापासून सुटका झालेली असते आणि महत्त्वाचं म्हणजे मोठाच वेळ वाचलेला असतो. बाइक जसजशी जुनी होते, तसतशी दूरवर रपेट मारण्याची इच्छा होते आणि इथंच बाइकवेडाला सुरुवात होते. सुरुवातीला 50-60 किलोमीटरच्या परिसरात मारलेली रपेट नंतरच्या काळात कोकणची सफर, ट्रेकच्या ठिकाणांना भेट, गड-किल्ले फिरणं इथपर्यंत सुरू होते. त्यातूनच मग खरा बाइकस्वार समोर येतो. केवळ कॉलेजला किंवा ऑफिसला जाण्यासाठी बाइक चालवणारे त्यातून आपसूकच बाजूला पडतात. फिरस्ते समविचारी बाइकप्रेमी मग दूरवरच्या सफरींवर निघतात. त्या ठिकाणी आलेल्या अशाच मंडळींच्या चर्चातून मग नवनवे क्लब तयार होतात. अशा प्रकारच्या क्लबची संकल्पना प्रामुख्याने अमेरिकेत, युरोपांतील देशांत आहे. बऱ्याचदा तर अशा क्लब्जशिवायही नोकरदार मंडळींसाठीही वेळ वाचणं बाइकमुळे साध्य झालेलं असतं!


No comments:

Post a Comment