Sunday, September 19, 2010

काश्मिरी लेखन'कळा'

‘काश्मीर-द मिस्टरी’ नावाचे एक पुस्तक मात्र काश्मीरमधील सध्याची समस्या, बंडखोरी, तणाव या सर्वापासून फटकून काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करते. काश्मीरची समृद्ध परंपरा, जीवनपद्धती यांचा लेखाजोखा मांडणारे हे सचित्र पुस्तक एखाद्या दस्तऐवजाइतकाच मोलाचा ठेवा आहे.

जगातील सर्वात अस्वस्थ प्रदेशांच्या यादीत गेल्या दोन दशकांपासून काश्मीरचा समावेश झाला आहे. काश्मीरसंबंधीचं वृत्त नाही, असा एखादाही दिवस या काळात भारतीय, तसेच आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांचा गेला नसेल. धरतीवरचं नंदनवन अशी ख्याती असलेल्या या भागातील नागरिक अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुका आणि त्या पार्श्वभूमीवर तेथे शांतता नांदू लागल्याचे दावे केले जात असले तरी कुठून दहशतवादी हल्ला होईल,कधी पाकिस्तान चढाई करेल, दहशतवादी लपल्याच्या संशयावरून भारतीय सैन्य कधी घराची झडती घेईल, याचा नेम नाही. इतकी बिकट परिस्थिती असतानाही तेथील निसर्गसौंदर्याची भुरळ पडलेले जगभरातील पर्यटक जम्मू-काश्मीरला भेट द्यायला येतच असतात. मुस्लिम, हिंदू आणि बौद्ध धर्माची पाळेमुळे रुजलेल्या या प्रांताची अभ्यासकांनाही कायम ओढ लागलेली दिसून येईल. त्यामुळेच की काय, काश्मीरमधील परिस्थितीचे वर्णन चित्रपटांमधून येते, तसेच ते कथा-कादंब-यांतूनही कायम येत असते.

मनोज जोशी यांचे लॉस्ट रिबेलियन हे पुस्तकही काश्मीरमधील सध्याच्या परिस्थितीचे चपखल वर्णन करणारे पुस्तक आहे. फुटिरतावादाची चळवळ सुरू झाल्यानंतर १९८९ सालापासून आतापर्यंत तेथे सुमारे २० हजार बळी गेले आहेत. या पुस्तकात जोशी यांनी काश्मीरमधील बंडखोरांचा तपशीलात जाऊन अभ्यास केलेला दिसतो. भारतातील स्थैर्य कायम राहू नये, यासाठी सतत प्रयत्नशील असणाऱ्या पाकिस्तानच्या पाठिंब्यावर या चळवळीने कसे हिंसक वळण घेतले. सुरुवातीचीआझादीची चळवळ नंतर जिहादी कशी झाली, याचे त्यांनी या पुस्तकात वर्णन केले आहे. या संपूर्ण प्रकरणातील अमेरिकेची स्वार्थी भूमिका उघड करतानाच, दाबून टाकलेल्या अनेक प्रकरणांचाही पर्दाफाश केला आहे.

ही बंडखोरी निपटून काढण्यासाठी सरकारी पातळीवरून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा कसा उलटा परिणाम होतो आहे, हे सांगून त्यांनी काश्मीरमधील जनतेच्या दु:खाला एक प्रकारे वाचा फोडली आहे.

काश्मीर-द मिस्टरी नावाचे एक पुस्तक मात्र काश्मीरमधील सध्याची समस्या, बंडखोरी, तणाव या सर्वापासून फटकून काश्मीरच्या निसर्गसौंदर्याचे वर्णन करते. काश्मीरची समृद्ध परंपरा, जीवनपद्धती यांचा लेखाजोखा मांडणारे हे सचित्र पुस्तक एखाद्या दस्तऐवजाइतकाच मोलाचा ठेवा आहे. बुद्धिवंतांचा प्रदेश म्हणून ख्यात असलेल्या या भागाचे अलौकिक निसर्गसौंदर्य,तेथील थंडी, निळी हिमशिखरे, आकाशाला गवसणी घालणारी वृक्षराजी, पुष्पाच्छादित पर्वतशिखरे, लाकडी घरे.. यांची छायाचित्रे मनाला भावतात. मॅट ब्रँडन (छायाचित्रे) आणि मरियम रेशी यांचे हे पुस्तक संग्राह्य असेच आहे.

ख्यातनाम पत्रकार डेव्हिड देवदास यांच्या लेखणीतून उतरलेले इन सर्च ऑफ फ्यूचर हे पुस्तकदेखील काश्मीरमधील सध्याच्या समस्येवर काहीअंशी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते.

या पुस्तकात दोन सर्वसामान्य काश्मिरींच्या जीवनातील घडलेले बदल अधोरेखित करत काश्मीरमधील नंतरच्या काळात घडलेल्या घडामोडींची सांगड घातली आहे. १९३१ ते २००७ या काळात काश्मीरमध्ये घडलेले सामाजिक, राजकीय बदल टिपताना तेथील अंतर्गत कलह, विस्थापन, बंडखोरी या सर्वाचाच धांडोळा घेण्यात आला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतील काश्मीरशी संबंधित नेते, कार्यकर्ते, विचारवंत यांच्या मुलाखतींचाही आधार घेऊन वास्तव परिस्थिती मांडण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे.

No comments:

Post a Comment