Monday, September 6, 2010

स्लिपरी मिस्टेक

पावसाळ्यात बाइक स्लिप होण्याचे प्रसंग प्रत्येक बाइकस्वारांनी अनुभवलेले असतीलच.. आपल्यावर अशी वेळ आली की आपण दोष रस्त्यात सांडलेल्या ऑइलला देतो किंवा समोरच्या वाहनाला! पण आपण आपल्या गाडीची काळजी घेतली नसेल, वेगात असताना ‘टायमिंग’ चुकलं असेल किंवा धोक्याच्या खड्डय़ांचा आपल्याला अंदाजच नसेल, तर जिवावरही बेतू शकतं..

बाइकमुळे कामं खूप कमी वेळात होतात, खर्चही फारसा येत नाही.. बाइक चालवणा-याकडून नेहमी देण्यात येणारी ही कारणं असतात. ती खरीही आहेत. पण रस्ते अपघातांचा विचार केला तर आपल्या देशात बहुतांश अपघात बाइकस्वारांचेच होत असल्याचं दिसून येतं. बाइकच्या मोठय़ा अपघातांत कार वा इतर वाहनांप्रमाणे चालक वाचण्याची शक्यता फारशी नसतेच,चालक वाचला तरी आयुष्यभराचं अपंगत्व येतं. त्यामुळे ‘बाइझिंग’ कितीही आनंददायी असली तरी त्याचा आनंद काळजीपूर्वकच घ्यायला हवा.

बाइक्सचा सर्रास होणारा अपघात म्हणजे, गाडी स्लिप होणं, निसरडय़ा रस्त्यावरून बाइक्स हमखास घसरतात. ब-याचदा तर चालवणा-यालाही आपली गाडी कधी घसरली तेही कळत नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. अशा दिवसांत तर हे अपघात जागोजागी होतात. त्याला जबाबदारही बाइकस्वारच असतात. हल्ली मोठय़ा ताकदीच्या बाइक्स बाजारात आल्यात. त्या कशाही दामटल्या जातात. इतर वाहनं आरामात जात असताना, हे बाइकस्वार मात्र कानात वारं शिरल्याप्रमाणे जाणा-या या गाडय़ा पावसामुळे निसरडय़ा झालेल्या रस्त्यावर हमखास घसरतात. प्रचंड वेगातली ही गाडी घसरली की हातपाय अगदी सोलून निघतात. डोक्यावर हेल्मेट नसेल तर बोलायलाच नको.

पावसाळ्याला सामोरं जाण्याआधी आपल्या गाडीचं संपूर्ण सव्‍‌र्हिसिंग करून घेणं गरजेचं असतं. गाडीतलं ऑइल बदललेलं हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडीचे ‘टकलू’ झालेले टायर बदलायलाच हवेत. कारण अशा गुळगुळीत टायर्सना पावसाने निसरड्या झालेल्या रस्त्यांवर हवी तशी ग्रिप मिळत नाही. ऑइल बदलण्यावरून सुचलं, गाडी घसरण्यात या ऑइलचा मोठा वाटा असतो. एखाद्या गाडीतून झालेली ऑइलची गळती तिच्या मागच्या अनेक दुचाकींना घसरवण्यासाठी पुरेशी असते. ऑइलचा एखादा मोठा थेंबही, बाइक रस्त्यात आडवी करू शकतो. त्यामुळे ऑइल सांडलेलं आहे, असं दिसताच, बाइकचा वेग कमी करण्याबरोबरच त्या ठिकाणापासून दूर जाणं गरजेचं ठरतं.

दुसरा एक प्रकार म्हणजे घाई. ‘अति घाई अपघाताला निमंत्रण देई’ हे वाक्य एसटीच्या गाडय़ा, ट्रकवर ठळक अक्षरांत लिहिलेलं असतं, मात्र त्याकडे बाइकस्वार दुर्लक्ष करतात. क्षणाक्षणाला लेन बदलत वेडीवाकडी वळणं घेत जाणा-या गाडीच्या चालकाचं जरा जरी टायमिंग चुकलं की अपघात होणार, ही काळ्या दगडावरची रेघ. पावसाळ्याच्या दिवसांतही अशा प्रकारे वेडीवाकडी गाडी दामटणारे अनेक महाभाग असतात. त्यामुळे कितीही घाई असली तरी बाइकस्वारानं लेनचे नियम पाळायलाच हवेत. वेगाने जाणाऱ्या बाइकवर पाठीमागे बसलेल्या महिलेचा दुपट्टा किंवा साडीचा पदर हमखास चाकाजवळ येतो. तो येऊ नये, याची काळजी घेतली नाही तर ते जिवावर बेतू शकतं. एक प्रकार सर्वच बाइकस्वारांनी पावसाळ्यात अनुभवला असेल. पुढे चारचाकी गाडी असेल आणि तिच्या मागून जाताना, बाइक्सही खड्डय़ात गेल्याच्या. चारचाकी वाहनं,लीलया हे खड्डे चुकवतात आणि सुरळीत निघून जातात. बाइकस्वारालाही पुढचा रस्ता स्वच्छ आहे, असं वाटतं, तो त्या खड्डय़ांत अडकतो.

त्यामुळे, बाइक चालवताना, पराकोटीची काळजी तर घ्यायलाच हवी. पण गाडीचीही कंडिशन व्यवस्थित ठेवणं महत्त्वाचं आहे. दारू पिऊन गाडी न चालवणं, हेल्मेट वापरणं, शक्य असल्यास जीन्स, जॅकेट आणि ग्लोव्ह्ज वापरणं, अशी काळजी घेतली तर या बाइकिंगची झिंग आणखी वाढेल.


1 comment:

  1. Khupach chann... Ananda zala ugichahch kahitari blog baghun... Keep it up

    Regards
    Trupti S

    ReplyDelete