Sunday, September 19, 2010

केरळचा ‘मुस्लिमहृदयसम्राट’?

मुस्लिमांचा तारणहार ही अब्दुल नासर मदानीची इमेज आणखीच पक्की होत गेली आणि अनेक राजकीय पक्षही या इमेजला भुलले.. पण राजकारणाच्या मुखवटय़ाआडून देशविरोधी कृत्ये सुरूच ठेवल्याचा आरोप असणाऱ्या या नेत्याला गेल्याच आठवडय़ात बंगळूरु बाँबस्फोटांबद्दल अटक झाल्यानंतर, त्याची सद्दी संपणार की नाही, हाच एक प्रश्न आहे.

काही मंडळी आपल्या भोवती कायम वादाचे वलय ठेवतात. अशाच मंडळींपैकी एक म्हणजे पीडीपीचा (पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी) नेता अब्दुल नासर मदानी. केरळमध्ये त्याच्या कारवाया कायम सुरू असतात, असा त्याच्यावर आरोप आहे. आताही तो चर्चेत आलाय, त्याच्या अटकेमुळे. एखाद्या बडय़ा राजकीय नेत्याची अटक गाजणार नाही, इतकी त्याची अटक गाजली. 2008 मध्ये बंगळूरु इथं झालेल्या बाँबस्फोटांप्रकरणी त्याला कर्नाटक पोलिसांनी गेल्या मंगळवारीच- 17 ऑगस्टला अटक केली. पण ही अटक करण्यासाठी त्यांना केरळमध्ये चक्क तळ ठोकावा लागला होता. त्याला अटक झाली असती तर केरळमधली परिस्थिती चिघळली असती. त्यानं पोलिसांसमोर शरणागती पत्करण्याची तयारीही दर्शवली होती. पण या शरणागतीमुळे त्याला आपसूकच हिरो बनण्याची संधी मिळाली असती व त्याचे परिणामही अत्यंत वाईट झाले असते,त्यामुळे तब्बल आठ दिवसांच्या मुक्कामानंतर अतिशय सावधगिरी बाळगून ही कारवाई करण्यात आली.

याआधी मदानीला 1998 मध्ये कोइम्बतूर येथे झालेल्या बाँबस्फोटांप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याच्यावर अभियोग पक्षानं जातीयवाद पसरवणं, गुन्हेगारी स्वरूपाचा कट रचणं आणि सत्ता उलथवून टाकण्याचा कट रचणं, अशा प्रकारचे आरोप ठेवले. यातला एकही आरोप सिद्ध झाला नाही. पण तब्बल साडेनऊ वर्षे त्यानं कोणत्याही न्यायालयीन कारवाईविना आणि जामिनाविना न्यायालयात काढले. मात्र सुरुवातीला मुख्य राजकारणापासून तो दूर जाऊ लागला. तुरुंगातून बाहेर पडल्यावर त्यानं आपल्या भूतकाळात केलेल्या चुकांसाठी दिलगिरी व्यक्त करून पुन्हा मुख्य प्रवाहात येण्याची इच्छा बोलून दाखवली. मात्र उघडपणे त्याला कोणच पाठिंबा देत नव्हतं. पण गेल्या वर्षी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माकपप्रणीत एलडीएफने मदानीच्या पीडीपीशी समझोता केला होता. मुस्लिमबहुल भाग असणाऱ्या पोन्नानी येथील जागेसाठी हा समझोता झाला होता. एकंदर 20 जागांसाठी हा समझोता झाला असला तरी या आघाडीला अवघ्या चारच जागा मिळाल्या. सुरुवातीला काँग्रेसप्रणीत यूडीएफही काही प्रमाणात पीडीपीची सहानुभूतीदार होती. मात्र कोइम्बतूर स्फोटानंतर काँग्रेसने पीडीपीपासून चार हात दूर राहणे पसंत केले. आताही त्याचे अटकनाटय़ तब्बल आठवडाभर रंगल्यावर कर्नाटकातील भाजप सरकारने त्याचं खापर केरळमधील डाव्या पक्षांवर फोडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या अटकेनंतर मात्र कोणत्याच राजकीय पक्षाने त्याच्या अटकेबद्दल काहीही मत व्यक्त करण्याचं टाळून त्याच्याशी संबंध नसल्याचं दाखवून दिलं. पण हाच मदानी तुरुंगातून बाहेर आल्यावर एलडीएफच्या अनेक मंडळींनी त्याच्या स्वागतासाठी मोठमोठय़ा रॅली काढल्या होत्या.

केरळमधील ब-याच मोठय़ा मुस्लिम समुदायात त्याची मसीहा अशीच इमेज आहे. मदानीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला (आरएसएस) तोडीस तोड म्हणून इस्लामिक सेवक संघ (आयएसएस) नावाची संघटना स्थापन केली होती. पण 1992 च्या शेवटी बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली आणि या संघटनेवर बंदी घालण्यात आली. त्याच्यावर 1992 मध्ये प्राणघातक हल्लाही झाला होता. त्यातून तो थोडक्यात बचावला. पण उजव्या पायाला मुकला. या हल्ल्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याची चर्चा होती, मात्र या घटनेनंतर मुस्लिमांचा तारणहार ही त्याची इमेज आणखीच पक्की झाली. आजही जणू केरळचा मुस्लिमहृदयसम्राटअसल्याच्या थाटात मदानी वावरू शकतो. मात्र, त्याच्या अटकेच्या निषेधार्थ केरळ बंदवगैरे करण्याची योजना नाही, असं सांगून त्याच्या पीडीपीनं एक पाऊल मागे घेतलं आहे. मदानी मुस्लिमांचा नेता, म्हणून त्याच्या जवळ आलेले सर्वच पक्ष आता मात्र दुरावले आहेत आणि मदानी व त्याचा पक्ष एकटा पडला. आहे.

अब्दुल नासर मदानी ऊर्फ मदौनी अशी ओळख असणारा हा नेता तसा तरुणच म्हणता येईल. 1965 मध्ये जन्म झालेला मदानी सुरुवातीपासूनच राजकारणात बऱ्यापैकी सक्रिय असला तरी पडद्याआडून त्याची देशविरोधी कृत्ये सुरू असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे. लष्कर-ए-तय्यबा या पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनेचा भारतातील दक्षिण विभागाचा म्होरक्या थाडियान्तविडे नझीरशी संबंध असल्याचा आरोप आहे. याच नझीरने बंगळूरु इथं झालेल्या बाँबस्फोटांत मदानीचाही सहभाग असल्याची कबुली दिली आणि पुन्हा एकदा मदानी गोत्यात आला. मदानीने मात्र त्याच्यावरचे आरोप अमान्य केले आहेत. आपल्याला या प्रकरणात अडकवण्याचा कट असल्याचा प्रत्यारोपही त्यानं केला आहे!

No comments:

Post a Comment