Saturday, September 18, 2010

सतत वादाच्या भोव-यात

सध्या भारतात आयपीएल (इंडियन प्रिमिअर लीग) नावाच्या क्रिकेटच्या तमाशात अब्जावधी रुपयांचा आणि या संपत्तीच्या बळावर बडय़ाबडय़ांचा जणू नंगानाच चाललाय. क्रिकेटच्या या नशेचा अंमल इतका जालीम आहे की त्यापुढे शेतक-यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई अशा अक्राळविक्राळ संकटांचीही पर्वा कुणाला राहिलेली नाही. आयपीएलसाठी नवे संघ या बाजारात उतरत आहेत. (रेसचे घोडे आणि क्रिकेटपटू यांच्यात बरंच साम्य आहे.) त्यातल्याच एका, कोची संघाची बोली नुकतीच लागली. या संघावरूनच प्रचंड गदारोळ सुरू असून त्यातूनच शशी थरूर यांचं नाव नव्या वादाशी जोडलं गेलंय.

काही मंडळींच्या पाठीशी वादाचं शुक्लकाष्ठ कायमच असतं. काही वेळेस ते वाद जन्माला घालतात तर कधी ते लोखंडाला चुंबक येऊन चिकटावं, त्याप्रमाणे त्यांना येऊन चिकटतात. वादातून बाहेर पडताना या मंडळींची चांगलीच भंबेरी उडते, पण पुन्हा त्याच जोमाने नव्या वादांसाठी ते सिद्धही होतात. असंच एक नाव म्हणजे सध्याचे आपले परराष्ट्र व्यवहार खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर.
सध्या भारतात आयपीएल (इंडियन प्रिमिअर लीग) नावाच्या क्रिकेटच्या तमाशात अब्जावधी रुपयांचा आणि या संपत्तीच्या बळावर बडय़ाबडय़ांचा जणू नंगानाच चाललाय. क्रिकेटच्या या नशेचा अंमल इतका जालीम आहे की त्यापुढे शेतक-यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, महागाई अशा अक्राळविक्राळ संकटांचीही पर्वा कुणाला राहिलेली नाही. आयपीएलसाठी नवे संघ या बाजारात उतरत आहेत. (रेसचे घोडे आणि क्रिकेटपटू यांच्यात बरंच साम्य आहे.) त्यातल्याच एका, कोची संघाची बोली नुकतीच लागली. या संघावरूनच प्रचंड गदारोळ सुरू असून त्यातूनच शशी थरूर यांचं नाव नव्या वादाशी जोडलं गेलंय.
सुमारे दीड हजार कोटींची ही रक्कम अदा करून शैलेंद्र गायकवाड यांनी हा संघ ताब्यात घेतला. मात्र, त्यानंतर आयपीएलचे कमिशनर (इतके दिवस पोलिस किंवा सनदी अधिका-यांसाठी वापरल्या जाणा-या शब्दानं पैशापुढे घातलेलं हे लोटांगण?) ललित मोदी यांनी या संघाच्या निविदा प्रक्रियेची माहितीच उघड केली आणि शशी थरूरांना नवा वाद येऊन चिकटला. गायकवाड यांच्या रांदेव्हू स्पोर्ट्स वर्ल्डने (आरएसडब्ल्यू) ही बोली जिंकल्यानंतर आरएसडब्ल्यूतील सहभागीदारांची नावे मोदी यांनी जाहीर केली. त्यात थरूर यांची मैत्रिण सुनंदा पुष्कर यांचंही नाव आलं. त्यामुळे कोचीच्या संघाला आयपीएलमध्ये खेळता येण्यासाठी थरूर यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप सध्या चर्चेत आहे. शुक्रवारी त्यावरून संसदेतही गदारोळ झाला. थरूर यांनी पुष्कर यांच्याशी मैत्री असल्याचे कबूलही केले आहे. पुष्कर यांनीही या या बोलीत आरएसडब्ल्यूतील हिश्श्यापैकी 5 टक्के हिस्सा या बोलीसाठी वापरल्याचे मान्य केलं. मात्र, सुनंदा पुष्कर यांच्याआडून थरूर यांनीच ही बोली लावली. या निविदा प्रक्रियेत पदाचा गैरवापर केला, अशी आरोपबाजी सध्या होत आहे.
दुसरीकडे काँग्रेस नेते सत्यजीत गायकवाड यांनी कोचीच्या संघाला आयपीएलमधून घालवण्यासाठीच हा बनाव रचण्यात आल्याचा आरोप केलाय. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना गुजरातचा संघ आयपीएलमध्ये हवा आहे, त्यासाठी हा सर्व खेळ सुरू असल्याचं, त्यांचं म्हणणं आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे कोचीच्या संघात मालकी असणारी बहुतांश मंडळी गुजरातशी संबंधित आहेत. त्यातला एक म्हणजे हिरे व्यापारी हर्षद मेहता. (आपले क्रिकेटमंत्री, माफ करा कृषिमंत्री) शरद पवार यांचे ते मित्र. आयपीएलला जन्म देणा-यांपैकी एक अशा पवारांचं नाव मात्र या वादापासून दूरच राहिलंय. दुबई आणि मुंबईतील या बडय़ा मंडळींपैकी आणखी एक म्हणजे विजेच्या बटनांचे उत्पादक अँकरचे अतुल शहा. पण या सगळ्यांत वादग्रस्त ठरले पुन्हा शशी थरूरच!
संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीपदाच्या निवडणुकीत उतरलेले शशी थरूर कुशाग्र बुद्धीमत्तेचे मुत्सद्दी म्हणून ओळखले जातात. अवघ्या 22 व्या वर्षी पीएच.डी. मिळवण्याचाही त्यांचा विक्रम आहे. मात्र, त्यांच्यावर अगदी संयुक्त राष्ट्रांतच काम करताना वशिलेबाजीचे आरोप झाले. थरूर यांनी पत्नीला बढती दिल्याची बाब उघड झाल्यानंतर हा आरोप झाला होता. या शिवाय संयुक्त राष्ट्रांतच असताना त्यांनी इस्रायलची बाजू घेऊन लिहिलेल्या लेखामुळे भारतात अनेक जण दुखावले होते. या लेखाचं भांडवल ते तिरुवनंतपुरममधून लोकसभेची निवडणूक लढवताना विरोधकांनी केलं, तरी ते विजयी झाले.
केंद्रीय मंत्रिमंडळात थरूर यांना परराष्ट्र राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर सरकारी घराची दुरुस्ती सुरू म्हणून त्यांनी चक्क पंचतारांकित हॉटेलात डेरा टाकला होता. त्यांचे ज्येष्ठ सहकारी एस. एम. कृष्णा यांनीही मौर्या शेरेटनमध्ये मुक्काम ठेवला होता. अमेरिका किंवा बडय़ा देशांच्या अध्यक्षांच्या मुक्कामासाठी वापर होतो, अशा आलिशान खोल्यांमध्ये राहण्याचा खर्च स्वत:चा खिशातून करतो, असं या दोघांचंही म्हणणं होतं. साधेपणाच्या वागणुकीची शिकवण देणा-या काँग्रेसचे नेते अशा आलिशान हॉटेलांमध्ये राहतात म्हणून टीकेचं मोहोळ उठल्यावर अखेर केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या विनंतीनंतर थरूर यांनी तिथला मुक्काम कधीच हलवला, अशी सारवासारव केली.
आलिशान राहणीची सवय असलेल्या थरूर यांना एका पत्रकाराने तुम्ही केरळला विमानाच्या कॅटल क्लासमधून (इकॉनॉमी क्लास) प्रवास करणार का, असा प्रश्न विचारला होता. त्यावर त्यांनी होय, पवित्र गायींसोबत प्रवास करण्यात काहीच अडचण नाही, असं उत्तर दिलं, तेही असंच वादग्रस्त ठरलं. ट्विटर या कम्युनिटी साइटवरील या पोस्टमुळे थरूर पुन्हा एकदा अडचणीत आले. हे वक्तव्य काँग्रेसमध्येही गदारोळ उडवून गेलं. काँग्रेस प्रवक्त्या जयंती नटराजन यांनी थरूर यांचे वक्तव्य स्वीकारार्ह नाही, असं थेट बजावलं. थरूर यांच्या वक्तव्यातून काँग्रेसच्या आत्मसंयमाच्या धोरणाची खिल्ली उडवली जात असल्याचाही आरोप होत होता. हे वक्तव्य खुद्द काँग्रेसनंच इतकं गंभीरपणे घेतलं, की थरूर यांना थेट माफीच मागावी लागली. त्यामुळे मंत्रिपदावरून होणारी गच्छंती टळली. तरी माफी मागताना त्यांनी भारतीयांच्या विनोदबुद्धीबद्दलच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंच.
महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त देशात सार्वजनिक सुट्टी देण्याच्या धोरणावरील टीकाही त्यांना भोवली होती. गांधीजींच्या जयंतीदिनी लोकांनी सुटी घेण्याऐवजी काम केले तर तीच खरी गांधीजींना आदरांजली ठरेल, असे ते म्हणाले होते. मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी डेव्हिड हेडली आणि तहव्वूर हुसेन राणा यांनी भारतीय यंत्रणेतील त्रुटी दाखवून दिल्यानंतर भारताने व्हिसाच्या मार्गदर्शक तत्त्वांत बदल करून ते कठोर केले होते. या निर्णयावर त्यांनी जाहीर टीका करून नियम कठोर करून हल्ले थांबतील का, असा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणीही टीका झाल्यानंतर त्यांनी परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा यांची भेट घेऊन सफाई दिली.
महात्मा गांधी आणि पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आखलेल्या परराष्ट्र धोरणांवरही त्यांनी टीका केल्याचं माध्यमांनी म्हटलं होतं. मात्र वक्तव्यांचा विपर्यास्त केल्याचं सांगत थरूर यांनी तेही निभावलं.
यंदाच्या फेब्रुवारीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह सौदी अरेबियाच्या दौ-यावर थरूर गेले होते. त्यावेळी त्यांनी भारत-पाकिस्तान संबंध बळकट करण्यासाठी सौदी अरेबिया पाकिस्तानचा खूप चांगला मित्र असल्याने मध्यस्थाची भूमिका बजावू शकतो, असा आशय निघणारं वक्तव्य केलं. या वक्तव्यावंतर त्यांच्यावर देशातून तसेच पाकिस्तानातूनही दबाव आला. पाकिस्तानने तर जणू सौदी अरेबियाला थरूर यांनी मध्यस्थ म्हणून प्रस्तावित केल्याचंच म्हटलं. या वादावरही थरूर यांनी ‘ट्विटरगिरी’ करून मी ज्यांच्याशी बोलतो, त्यांना मध्यस्थ म्हणून संबोधतो, अशा केविलवाण्या कोलांटउडय़ा मारल्या. महत्त्वाच्या, जबाबदार पदावर असूनही नवनवीन वादांना जन्म देण्याच्या या प्रवृत्तीनं त्यांच्या मंत्रिपदावरची तलवार कायमच टांगती राहिली. त्यांच्या ज्ञानसंपदेकडे पाहून कठोर कारवाई झाली नाही. आयपीएलचा वाद मात्र, थेट अब्जावधी रुपयांच्या व्यवहारांशी निगडित असल्यानं, पुढे काय हे प्रश्नचिन्ह कधी नव्हे इतक्या ठळकपणे उभं राहिलंय

No comments:

Post a Comment