Monday, September 6, 2010

तुही बाइक कंची?

बाइक म्हणा, दुचाकी म्हणा, कि मोटरसायकल म्हणा पण पायडल न मारता चालणाऱ्या या मशीनने अवघी तरुणाई गेल्या अनेक पिढय़ांपासून क्रेझी झाली आहे. बाइकची झिंग प्रत्येक बाइकवाला अनुभवतो. गल्लीतून, हायवेवरून सुसाट निघण्याचा आनंद काय असतो हे बाइकच्या पुढच्या सीटवर बसल्याशिवाय कोणालाच अनुभवता येणार नाही. बाइक घेताना प्रत्येकालाच एक कुतूहल असतं. बाइकविषयी मनात असलेल्या असंख्य शंका, नवीन बाइक, त्यांची क्रेझ, अशी तुमच्या नव्या आणि जुन्या बाइकची?वैशिष्टय़ं, बाइकवाल्यांचे किस्से आणि?बायकिंगची झिंग यासाठी हे सदर..

काय यार, भन्नाट दिसते ना, मस्तच है यार, पळते काय विचारू नकोस, कॉलेजच्या कट्टय़ावर हमखास ऐकू येणारे हे डायलॉग. आपल्याकडच्या मोटरसायकलचं कौतुक करतानाच,समोर एखादी नवी कोरी बाइक दिसली की, तिचं कौतुकही तितकंच खुल्या दिलानं ही मंडळी करतात. गाडीचा मालक समोर नसला तर त्या गाडीची कॅपॅसिटी, तिचा मायलेज याच्यावरून पैजा लागतात.

गेल्या काही वर्षात, भारतातही चांगले रस्ते बनू लागल्यानं आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या कारबरोबरच दुचाकी उद्योगानंही भारताकडे लक्ष केंद्रित केलं आहे. आतापर्यंत भारतीय दुचाकींची बाजारपेठ तशी मर्यादितच होती. गेल्या दशकभरात तिचा प्रचंड वेगानं विस्तार झाला असला तरी लँब्रेटा, बजाजच्या स्कूटरसाठी सहा-सहा महिने वाट पाहावी लागायची, तो जमाना आजही जुन्या मंडळींना आठवत असेल. ठराविक आकाराच्या, ठोकळेबाज स्कूटरनाही ‘हमारा बजाज’ म्हणून घरात मानाचं स्थान होतं. पण त्याच वेळी वेगवान युग अवतरू लागलं होतं आणि शहरांतल्या ट्राफिकभरल्या रस्त्यावरून सुळकन निघण्यास या स्कूटर काहीशा अडचणीच्या ठरू लागल्या होत्या. येझदी, राजदूत यासारख्या मोटरसायकली तेव्हाही होत्या. पण तो वापरणारा वर्गच वेगळा होता. (चार-पाच दशकांपूर्वी वापरलेल्या या गाडय़ा आजही अनेकांच्या घराची शोभा वाढवत आहेत आणि विशेष म्हणजे वापरातही आहेत.) पण सुटसुटीत अशा हीरो होंडा, सुझुकीच्या गाडय़ा रस्त्यांवर 80 च्या दशकात आल्या आणि त्यांनी बाइकिंगचं स्वरूपच बदलून टाकलं. या गाडय़ा बहुतांश 100 सीसीच्या होत्या. (सीसी - क्युबिक सेंटिमीटर, वाहनाच्या इंजिनची क्षमता मोजण्याचे हे परिमाण आहे. इंजिन सुरू होण्यासाठी कम्बशन ज्या सिलिंडरमध्ये होते त्याची हवा/इंधन सामावण्याची क्षमता या परिमाणात मोजली जाते. उदा. 1 सीसी म्हणजे एक ग्राम पाणी सामावण्याची क्षमता. त्याचप्रमाणे 100 सीसी म्हणजे सिलिंडरमध्ये कम्बश्चन होण्याआधी आतील भागाचा पूर्ण विस्तार झाल्यावर पाणी आणि दाबयुक्त हवा यांचे 100 ग्राम मिश्रण सामावते.) अगदी गेल्या दशकापर्यंत 100 सीसीच्या बाइकची चलती होती. पण वाहतुकीचा वेग वाढल्यावर त्या वेगाच्या बरोबर राहण्यासाठी 110, 115, 125,135, 179,200, 220,250 सीसीच्या बाइक भारतात बनू लागल्या आहेत. सध्या तर 100 सीसीच्या बाइक केवळ कार्यालयात जाणा-यांकडेच पाहायला मिळतात. या गाडय़ा चांगल्या अवस्थेत ठेवल्या असतील तर एका लिटरमध्ये अगदी 60-70 किमी चालतात. मात्र सध्या चलती आहे ती 150 सीसीच्या बाइकची. कारण या बाइक तशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे मायलेजही चांगल्या देतात (50-55 किमी/प्रतिलिटर)आणि विकत घ्यायलाही फारशा खर्चिक नाहीत. (बँकांच्या वेगवेगळ्या ‘स्किमा’ तयारच असतात.) काही हौशी मंडळी 200 किंवा 220,250 सीसीच्या मोटरसायकलींना प्राधान्य देतात. मात्र या गाडय़ा प्रामुख्याने पॉकेटमनीवर अवलंबून असणा-यांच परवडतात. (नोकरी लागली की हीच मंडळी इमानदारीत लहान गाडी वापरतात किंवा आपल्या लोकलमार्गाला लागतात.)

येत्या काही दिवसांत परदेशांतल्या रस्त्यांवर धावणा-या आणि फक्त टीव्हीवर, इंग्रजी देमारपटांत पाहिलेल्या गाडय़ाही भारतात येण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. त्याची चर्चाही कट्टय़ांवर सुरू झाली आहे.


No comments:

Post a Comment