Monday, September 6, 2010

जग फिरू या रेन्टेड बाइकवर

बाइझिंगच्या या भागात आपण जरा वेगळ्या विषयाची माहिती घेऊ. हा विषय म्हणजे ‘रेन्टल बाइक’. गोव्यात फिरायला जाणा-यांसाठी ही बाब तशी नवी नाही. पण केवळ गोव्यातच नव्हे तर उत्तर भारतात दिल्लीसह, मनाली आदी ठिकाणीही भाड्याने मोटारसायकली उपलब्ध आहेत.बाइझिंगच्या या भागात आपण जरा वेगळ्या विषयाची माहिती घेऊ. हा विषय म्हणजे ‘रेन्टल बाइक’. गोव्यात फिरायला जाणा-यांसाठी ही बाब तशी नवी नाही. पण केवळ गोव्यातच नव्हे तर उत्तर भारतात दिल्लीसह, मनाली आदी ठिकाणीही भाड्याने मोटारसायकली उपलब्ध आहेत. उत्तर भारतात साहसी सफरींसाठी जाणा-यांचं प्रमाण मोठं आहे. विशेषत: लेह, लडाख, कारगिलला भेट देणा-यांचं प्रमाण कारगिल युद्धानंतर प्रचंड वाढलंय. मात्र हा भाग इतका दुर्गम आहे की, तिथं जायचं तर सार्वजनिक वाहनावर भिस्त ठेवताच येत नाही. त्यामुळे कार, जीप किंवा मिनीबस या ठिकाणच्या प्रवासासाठी उपयोगी पडतात. मुंबईसारख्या ठिकाणांहून जाणारे बरेच जण स्वत:च्या बाइक्स घेऊन जातात. बहुधा दिल्लीपर्यंत त्या बाइक्स रेल्वेने पाठवल्या जातात. तिथं उतरवून घेतल्यावर पुढचा प्रवास सुरू होतो. पण भारताला भेट देणा-यांना स्वत:च्या बाइक्स घेऊन येणं शक्य नसतं. अशा मंडळींसाठी या बाइक्स उपलब्ध असतात. भारतातील पर्यटकांचीही या बाइक्सना पसंती असते. त्यांचं भाडं काय असतं याची कल्पना नसली तरी अशा प्रकारे बाइक्स घेणं, तसं महागच पडतं. त्यातच या गाड्या सतत वापरलेल्या असल्यानं, त्या घेताना जरा पारखूनच घेणं आवश्यक आहे. कारण सतत बिघडल्यानं संपूर्ण प्रवासाचं मातेरं होऊ शकतं. या गाडय़ांची आगाऊ बुकिंगही करता येऊ शकते. पण हा पर्याय धोकादायक ठरू शकेल. कारण एकदा का गाडी निश्चित केली की, ती वापरणं मग गरजेचं ठरतं. त्याचबरोबर बुकिंगच्या वेळी ठरलेली रक्कम मग कमी करणंही शक्य होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे गाडी भाडय़ाने देणा-या व्यावसायिकांशी घासाघीस करणं अधिक फायद्याचा व्यवहार ठरेल. दुसरी गोष्ट म्हणजे लेह, लडाखसारख्या दुर्गम भागात पेट्रोलपंप सुमारे 200 किमी अंतरावरच सापडतात. (लडाख भागात तर 350 किमीपेक्षा अधिक) या भागात जायचं म्हणजे एलफिल्डसारख्या (बुलेट) गाड्याच हव्यात. या गाड्यांना आधीच इंधन अधिक लागतं. त्यात हा भाग अति उंचावर असल्यानं टाक्या ‘फुल्ल’ करणं अत्यंत गरजेचं ठरतं. त्याचबरोबर अतिरिक्त पेट्रोलचा साठा ठेवणंही महत्त्वाचं ठरेल. अशा ठिकाणी गाडय़ा बिघडण्याचं प्रमाणही अधिक असल्यानं गाडीच्या दुरुस्तीची जुजबी माहिती करून घेऊनच प्रवासाला सुरुवात करायला हवी. त्याचबरोबर हेडलाइटचे बल्ब, स्पार्क प्लग, महत्त्वाच्या तारा, पुरेशा ट्यूबही सोबत बाळगायला हव्यात. शेवटी महत्त्वाचं, या ठिकाणी प्रवास करताना, पायात साध्या चप्पल घालणं कटाक्षानं टाळावं. पायात मजबूत बूटच असायला हवे. साध्या ट्राउजरऐवजी जीन्स अत्यावश्यक. अंगावर सुटसुटीत कपडे, थंडीपासून वाचण्यासाठीची उपाययोजना आणि जॅकेटही गरजेचं असतं. हातात ग्लोव्ह्ज घातल्यास ग्रीप चांगली राहते व सनबर्नपासूनही रक्षण होतं. हेल्मेटबद्दल सांगायलाच नको, ते तर हवंच. ही सर्व काळजी घेतली आणि सावधानतेनं गाडी चालवली तर ही साहसी सफर नक्कीच यशस्वी ठरेल

No comments:

Post a Comment