Tuesday, September 14, 2010

निःस्वार्थी महत्त्वाकांक्षा


‘गांधी : नेकेड अँबिशन’ हे जॅड अडॅम्स लिखित पुस्तक अलीकडेच भारतात मिळू लागले, अगदी ‘बुकस्ट्रीट’वरही! ‘सत्याचे प्रयोग’ हे महात्मा गांधींनीच लिहिलेले आत्मकथावजा पुस्तक अनेकांनी वाचले असेल, पण ते वाचल्यावरही काही गोष्टींचा उलगडा होत नाही. गांधीजींचे लैंगिक जीवनाबद्दलचे विचार आणि आचरण कसे होते, ब्रह्मचर्याबद्दल त्यांचा आग्रह कसा पराकोटीचा होता आणि त्याबद्दल त्या काळातल्या अन्य नेत्यांची वा अधिका-यांनी या आग्रहांबद्दल कोणती मते व्यक्त केली होती, याचा धांडोळा तर आजवर कुणीच साकल्याने घेतलेला नाही. जॅड अडॅम्स यांनी ते काम केले आणि हे करताना संशोधकाची- नवे प्रश्न उपस्थित करून त्यांची उत्तरे उपलब्ध साधनांनिशी शोधण्याचे पथ्यही कसोशीने पाळले. या पुस्तकाबद्दल वाद झाले नाहीत, ते बहुधा याच संशोधकी पथ्यामुळे. पुस्तक इंग्रजीपेक्षा ‘ब्रिटिश भाषे’त असल्याचेही वाचताना जाणवेल, कारण नेमस्तपणाची पातळी न सोडता लेखकाने, सर्व आक्षेपांना विचारीपणाचा शास्त्रकाटा लावला आहे. महत्त्वाकांक्षी नसण्याचीच महत्त्वाकांक्षा गांधीजींना होती, असा निष्कर्ष अडॅम्स यांनी आधारांविना काढला असता, तरीही ते निरीक्षण एक चमकदार विधान म्हणून लक्षात राहिले असतेच! पण गांधीजींमधला हा मोठा अंतर्विरोध, आणि त्या अंतर्विरोधाची बांधणी ज्यांमुळे झाली असे अनेक अंतर्विरोध, यांचा पट मांडण्याचे काम अडॅम्स यांनी एखाद्या शास्त्रज्ञाने प्रयोगशाळेतला प्रयोग करावा, तशा असोशीने केले आहे. त्यांचा भर दुय्यम संशोधनावर अधिक आहे हे खरे, पण जुन्या साधनांनिशी केलेला नवा प्रयोग कमी मोलाचा ठरत नाही! हे पुस्तक मुळातून वाचावे की नाही, या निर्णयाप्रत येण्यासाठी कदाचित लेखकाची प्रस्तावनाच उपयोगी पडेल. म्हणून तिचा हा अनुवाद, ‘बुकमार्क’च्या वाचकांसाठी..

आपल्याच मायभूमीत ब्रिटिशांनी कर लादलेल्या मिठाचा कायदा मोडून गांधीजींनी चिमूटभर मीठ हातात घेतले.. 1930च्या या घटनेला जगभरातील सर्वच प्रसारमाध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली होतीच, पण या घटनेने संपूर्ण जगाच्या इतिहासालाच एक कलाटणी मिळाली. सभोवार पसरलेल्या विशाल पांढ-याशुभ्र मिठागरात पांढ-या कपडय़ांतील गांधीजी हे चित्र बलाढय़ ब्रिटिश साम्राज्याला आव्हान दिल्याचे प्रतीक ठरले. या घटनेच्या साक्षी असलेल्या कवयित्री सरोजिनी नायडूंना अश्रूंचा बांध आवरेनासा झाला आणि त्यांनी देशाच्या उद्धारकर्त्यांचा जयजयकार केला.

मात्र, एक प्रतीक ठरलेले हे चित्रच बनावट आहे.

काही पत्रकार, चरित्रकार, चित्रपट निर्मात्यांनी त्याचा विपर्यास केला. गांधीजी दांडीला गेले होते; पण गांधीजींचे ते छायाचित्र आणि त्यामागचा घटनाक्रम काळजीपूर्वक अभ्यासल्यास वेगळेच चित्र समोर येते. मीठ उचलतानाचे गांधीजींचे सुप्रसिद्ध छायाचित्र प्रत्यक्षात भामराड येथील असून त्यांच्या आगमनानंतरच्या तीन दिवसांनंतरचे आहे. समुद्रकिना-यापासून सुमारे 10 किमी व दांडीपासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर हे स्थळ आहे. गांधीजी दांडी येथे पोहोचले तेव्हा सरोजिनी नायडूही त्यांच्यासोबत होत्या. पण त्या तेथे रडल्याचे वृत्त खोटे आहे. सुप्रसिद्ध छायाचित्र कॅमेरामनच्या सोयीसाठी तयार करण्यात आले. कारण गांधीजींनी सत्याग्रह केला त्या ठिकाणी चिखल होता. प्रत्यक्षात मीठ दिसत नव्हते. त्यामुळे त्या छायाचित्राचे महत्त्व आपसूक कमी होते.

गांधीजींना या सत्याग्रहाच्या माध्यमातून केवळ ब्रिटिश सत्तेला आव्हान दिले नाही तर त्यातून त्यांनी कायदा तोडत असल्याचे आव्हान दिले. (त्यांच्या या आंदोलनाला कामगारांचीही साथ लाभली.) तब्बल 24 दिवसांची पदयात्रा त्यांनी केली. या 24 दिवसांत प्रसारमाध्यमांना या पदयात्रेवर मतप्रदर्शन करण्यास किंवा त्यांच्या संकल्पनेप्रमाणे तिची मांडणी करण्यास पुरेसा वेळ मिळाला.

गांधीजींच्या या पदयात्रेने त्यांच्या समकालीन राजकीय नेत्यांचीही मती कुंठीत झाली. त्यांनाही या चिमूटभर मिठाचे महत्त्व इतके मोठे असेल असे वाटले नाही. हीच गत ब्रिटिश प्रशासनाचीही झाली होती. दुसरीकडे गांधीजी प्रतिकात्मकतेचे महत्त्व चांगलेच ओळखून होते. गांधीजी स्वत: श्रद्धाळू होते. दिवसातून दोन वेळा ते प्रार्थना करत. आपल्या आहारात काय असावे,याकडेही त्यांचा कटाक्ष असे. महत्त्वाचे म्हणजे आपली प्रतिमा जपण्यास ते खूपच महत्त्व देत. लंडनमध्ये बॅरिस्टर म्हणून काम करत असताना वापरण्यात येणारा सूट, हॅट हा पोषाख ते नंतरच्या काळात केवळ हातमागावर विणलेले धोतर हा वेश त्यांची वेगळीच प्रतिमा जगभर घेऊन गेला. एक जवळपास अर्धनग्न माणूस बलाढय़ ब्रिटिश साम्राज्याशी लढा देतोय, हे चित्र संपूर्ण जगाने पाहिले. हे चित्र जणू जगासाठी एक श्रद्धास्थान ठरले. या काळात केवळ चार्ली चॅप्लीन आणि अ‍ॅडॉल्फ हिटलर या दोघांनाच इतकी जागतिक पातळीवर प्रसिद्धी मिळाली होती.

गांधीजींच्या आयुष्याचे इतके कंगोरे आहेत, की त्यांचे चरित्र रेखाटणे जगभरातील चरित्रकारांसमोर एक आव्हान ठरले. गांधीजींच्या आयुष्यातील प्रमुख दोन गोष्टी रेखाटण्यावर या चरित्रकारांचा प्रामुख्याने भर राहिला. त्यांचे तेजाने तळपत असलेले राजकीय चारित्र्य आणि दुसरीकडे त्यांचे लैंगिक आयुष्य. मात्र, दोन्हींवर टिप्पणी करता येणेही तितकेच अवघड आहे. सामाजिक परिवर्तनासाठी लढणा-याच्या आहाराबद्दल आणि त्याच्या धार्मिक जीवनाबद्दलच्या गुंतागुंतीबद्दल लिहिण्यास बऱ्याचदा चरित्रकारांचा कल असतो. अनेकदा सामाजिक जीवनात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांचे वैयक्तिक आयुष्य मात्र अस्थिर असते. गांधीजींच्या बाबतीत मात्र त्यांचे राजकीय जीवन, धार्मिक जीवन, कौटुंबिक जीवन आणि लैंगिक जीवन सर्वच अचंबित करणारे ठरले.

गांधीजींनी त्यांच्या जीवनकाळात विपुल लेखन केले होते. अनेक जागतिक व्यक्तिमत्त्वांच्या बाबतीत फारशी माहिती आता उपलब्ध नाही. मात्र, गांधीजींबाबत प्रचंड आहे. स्वत: गांधीजींनीही आपले सर्व लिखाण त्यांच्या देहासोबतच दहन करावे असे म्हटले होते. मी जे काही केले ते टिकून राहील. लिहिले किंवा भाषण केले ते नाही, असे त्यांचे मत होते.

मात्र, त्यांच्या निधनानंतर त्यांच्या जवळच्या मंडळींकडे उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे त्यांचे चरित्र रेखाटण्यात आले. 1917 ते 1942 या काळात त्यांचे स्वीय सचिव महादेव देसाई यांनी तब्बल नऊ खंडांची डायरी लिहिली होती. 1920पासून शेवटपर्यंत गांधीजींसोबत राहिलेले देसाई यांचे सहाय्यक प्यारेलाल यांनीही त्यासाठी माहिती दिली. त्यांची बहीण सुशीला नायर पेशाने डॉक्टर होत्या व त्या गांधीजींची देखभार करायच्या. त्यांच्या साहाय्याने प्यारेलाल यांनी 10 खंडांचे गांधीजींचे चारित्र्य लिहिले. या ठिकाणी सादर केलेले सर्व लिखाण गांधीजींसोबत राहिलेल्यांच्या, त्यांच्या साक्षीपुराव्यांच्या आधारे विशेषत: रोजनिशीच्या आधारे करण्यात आले आहे.

गांधीजींच्या चरित्राचे तसे दोन भाग पडतात. एक 1920पर्यंतचा आणि एक त्यांच्या दक्षिण आफ्रिकेतील अनुभवाचा. आफ्रिकेतील अनुभवामुळे आपल्याला फारसे मार्गदर्शन होत नसले तरी त्यांच्या जीवनाचे विविध कंगोरे समजण्यास मदत होते. लंडनमध्ये विद्यार्थी म्हणून वकिलीचे शिक्षण घेत असताना, ते शाकाहाराकडे वळले होते, याच काळात त्यांच्या राजकीय जीवनाचीही सुरुवात होत होती. दक्षिण आफ्रिकेत असतानाच त्यांनी भारतीयांची संघटना स्थापन केली. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा घटनाक्रम आहे. भारतीयांच्या हक्कांसाठी त्यांनी दिलेला लढा त्यांनी प्रत्यक्ष काय केले हे सांगणारा तर आपल्या लैंगिक आयुष्याबद्दलच्या त्यांच्या विचारातून ते कसे होते, हे सिद्ध होते. अन्य कोणत्याही महत्त्वाकांक्षी व्यक्तींप्रमाणे त्यांना लैंगिक सुखाचे प्रचंड आकर्षण होते व त्यांच्या चरित्रकारांनी गांधीजींनी हे आकर्षण कशा प्रकारे थोपवून धरले हे मांडण्यावर कटाक्ष ठेवला आहे.

गांधीजींनी स्वत: लिहिलेल्या लिखाणावरही त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. त्यांचे माझे सत्याचे प्रयोग वाचल्यास त्यांना सत्याचे कसले प्रयोग करायचे होते, हा प्रश्न पडतो. कोणताही राजकीय नेता अशा प्रकारे सत्याचे प्रयोग, मवाळ भाषेत असत्य सांगण्यासाठीच वापरेल, अशीही शंका मला आली होती.

गांधीजींच्या सुरुवातीच्या आयुष्यातील अनेक घटना मोठय़ा करून सांगण्यात आल्या आहेत. त्यांना नाटय़मय वळणे देण्यात आली आहेत. दक्षिण आफ्रिकेतील राजकारणात त्यांचे फारसे कर्तृत्व नाही, हे इतिहासकारांना नंतर आढळून आले. त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील सरकारशी केलेल्या करारामुळे त्यांचे समर्थकही नाराज झाले होते. गांधीजींनी सत्याचे प्रयोग सादर करताना त्यात निवडक घटनाच सादर केल्यात. आपल्याला ज्या गोष्टींची प्रसिद्धी द्यायची आहे, ते ठरवून त्यांनी आपला नैतिक विकास कसा झाला हे मांडले आहे. त्यांच्या चरित्रातही यंग इंडिया या वृत्तपत्रातील मार्गदर्शक लेख आहेत. यातील प्रत्येक लेख हा वैयक्तिक नीतीमत्तेचे वर्णन करणारा आहे.

गांधीजींच्या सत्याच्या प्रयोगातून प्रत्यक्ष सत्य सिद्ध करण्यापेक्षा आध्यात्मिकदृष्टय़ा आपला विकास करण्यावर भर दिला आहे. त्यांच्या मते सत्य हे अनादि आहे. त्यांनी आपल्या लेखनातून सत्य आणि देवाला एकाच पातळीवर तोलले आहे. गांधीजींची आणखी एक ओळख आहे ते त्यांच्या जातिभेदविषयक विचारांविषयी. त्यांनी 1920 मध्येच आंतरजातीय विवाहासारख्या क्लिष्ट आणि स्फोटक विषयावर भाष्य केले. हिंदू धर्मात आंतरजातीय विवाहाला मान्यता नाही, असे कुठेच म्हटलेले नाही, असे त्यांनी सांगितले. 1940नंतर तर त्यांनी सजातीय विवाहांना मानणारच नाही, असे सांगून आपले आशीर्वाद केवळ आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनाच मिळतील, अशी भूमिका घेतली होती. त्यासाठी त्यांनी ब्राह्मण प्राध्यापक आणि अस्पृश्य महिलेच्या विवाहाला मान्यता देऊन त्यांना आशीर्वाद दिला. त्यांच्या विचारांनी संभ्रमात पडलेल्यांना त्यांचे सांगणे होते की, माझे सत्याचे प्रयोग सुरू असताना,अनेक जुन्या गोष्टींना तिलांजली देऊन नव्या गोष्टींचा स्वीकार करत असल्याचे त्यांनी सांगितले. मला माझ्याच जुन्या विचारांवर ठाम राहण्याऐवजी सत्यावर ठाम राहण्यावर मी भर देतो, असे त्यांनी या संदर्भात स्पष्ट केले.

त्यांच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानातही अशा प्रकारे दोन टोके दिसून येतात. त्यांनी 1930 मध्ये सहकाराची चळवळ मागे घेतली कारण सरकारने त्यांच्या अनेक मागण्यांना संमती दिली होती. त्यात नागरिकांना शस्त्र वापरण्याची परवानगी मिळावी,अशीही एक मागणी होती. त्याबाबत त्यांनी दुस-या महायुद्धाच्या सुरुवातीला पोलंडचे उदाहरण दिले. आपल्यावरील आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी पोलंडने दाखवलेल्या बहादुरीचे त्यांनी कौतुक केले. स्वयंसंरक्षणासाठी केलेली हिंसा अहिंसाच ठरते, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या जीवनात धार्मिक अधिष्ठानाला मोठे महत्त्व होते. प्रार्थनेदरम्यान ख्रिस्तीधर्मातील भजने गात, कुराणातील वचने उद्धृत करत. मात्र, तरीही त्यांचे विचार पूर्णत: हिंदू धर्माकडेच वळलेले होते. त्यांनी पुनर्जन्मावरही विश्वास व्यक्त केला होता. त्यासाठी त्यांनी टॉलस्टॉय यांना 1908 मध्ये लिहिलेल्या पत्रात या संबंधीचे विचार मांडले आहेत. देवाला प्रत्यक्ष पाहणे आणि मोक्ष प्राप्त करणे हे व्यक्तिगत धारणेवर अवलंबून आहे, असेही त्यांचे मत होते. मोक्ष प्राप्त करण्यासाठी सध्या मी राष्ट्रसेवा करत असून त्यातूनच मला जीवनमरणाच्या चक्रातून मुक्ती मिळेल, असे त्यांचे मत होते. त्यामुळे माझी ही सेवाही स्वार्थभावनेने प्रेरित आहे, असे सांगून त्यांनी येथील नश्वर जगापेक्षा शाश्वत मोक्षाचा मार्गच मोठा वाटतो, असे त्यांनी म्हटले आहे.

गांधीजींच्या जीवनात त्यामुळेच वेळोवेळी अंतर्विरोध दिसून येतो. एकीकडे ते स्वत:ला महत्त्वाकांक्षी मानत नव्हते. मात्र,हीच बाब त्यांना महत्त्वाकांक्षी ठरवत होती. त्यांच्या आहारातून मीठ जवळपास हद्दपार होते. पण त्यांनी मिठाचा सत्याग्रह केला. एकीकडे त्यांना रंगवलेले कपडे आवडत नव्हते. पण त्यांनी नीळ कामगारांसाठी संघर्ष केला. यंत्रमागावरील कपडय़ांना त्यांचा विरोध होता पण त्यांनी या कामगारांसाठी लढा दिला. भारतावर भारतीयांचेच राज्य असावे, ही त्यांची भूमिका होती पण स्वत: कधीही निवडणुकीच्या फंदात पडले नाहीत. गरिबीचा पुरस्कार करणाऱ्या गांधीजींना समाजातील श्रीमंत वर्गाचा मोठा पाठिंबा होता. त्यांना भौतिक गोष्टींऐवजी आध्यात्मिक समाधान मोठे वाटत होते. त्यामुळेच त्यांनी माझे आयुष्यच एक संदेश आहे, असे म्हटले.

  • गांधीः नेकेड अँबिशन- जॅड अडॅम्स
  • क्युअरकस्, लंडन
  • पाने- ३२३,
  • किंमत- रुपये ६९९, बुकस्ट्रीटवर- रुपये २००

No comments:

Post a Comment