Thursday, September 23, 2010

है दम?


बाइक चालवण्याचे गट्स कुणाकडे कसे असावेत, हे त्याची ‘परिस्थिती’ ठरवते.. ग्रामीण भारतातल्या रगेल गडय़ांप्रमाणे बाइक हाकणं शहरातल्या बाइकस्वार सेल्समनना शक्य होणार नाही आणि युरोपातल्या निर्धोक रस्त्यांवरून एरवी बाइक चालवणारे सारेच जण ‘ट्रेल रायडिंग’ किंवा ‘एंडय़ूरो’सारख्या खेळांमध्ये, बाइक आणि हातपाय धड ठेवू शकणार नाहीत.. आपल्या नेहमीच्या गट्सपेक्षा वेगळे गट्स या स्पर्धासाठी हवेच..

बाइक्स चालवायला गट्स लागतात, हे आता पुन्हा नव्यानं सांगायला नकोच. पुण्यातल्या बेशिस्त ट्रॅफिकमध्ये मुंबईकरानं किंवा मुंबईतल्या गर्दीतल्या पण शिस्तबद्ध (खरोखर आहे हो!) ट्रॅफिकमध्ये पुणेकरानं व्यवस्थित गाडी चालवून दाखवावी, हादेखील गट्सचाच एक भाग होईल!

हल्ली चांगल्या रस्त्यावर गाडी चालवणं धोकादायक ठरत असताना, अनेक वल्ली सरळधोपट रस्त्यांचा मार्ग सोडून, ‘चुकीच्यामार्गाने गाडी चालवणं पसंत करतात. मोटोक्रॉसशर्यत तर आपल्याला माहीत आहेच, पण त्यापेक्षाही अनेक अचाट प्रकार मोटारसायकलींवर करणारे आहेत. भारतात हे फॅड नसलं तरी युरोपात, अमेरिकेत अशा वेडय़ांपैकी सर्वाधिक वेडा कोण, हे ठरवणाऱ्या स्पर्धाही नियमित आयोजित केल्या जातात.

म्हणजे, केवळ चिखलातून गाडी चालवणं, या चिखलातून आपल्याला पायी चालणं शक्य होणार नाही, असा हा चिखल असतो. त्यातही वेळ पाळायची. गाडी हवेत भिरकावून द्यायची. पण त्या वेळी आपणही गाडीवर असायलाच हवं. म्हणजे सीटवर बसलेलो नसलो तरी चालेल, पण गाडीसोबत चालकानं असणं आवश्यक. कुठल्यातरी एखाद्या शोधमोहिमेवर निघाल्याप्रमाणे गटागटाने ट्रेल राइडकरायच्या. असं आणखी बरंच काही या अचाट स्पर्धा प्रकारांत मोडतं. म्हणजे केवळ प्रवासासाठी वापरली जाणारी दुचाकी आणखी कशाकशासाठी वापरली जाते ते कळून येईल. (गावाकडे गुरांच्या चाऱ्याचे मोठमोठे भारे, जळणाच्या मोळ्या, अख्ख्या महिन्याचा बाजारहाट एकाच मोटारसायकलवरून आणला जातो. त्यातच गाडीवर डबलसीट प्रवास करणं जणू गुन्हाच असं समजून गाडीवर किमान तिघांना नेलं जातं.) असो हे सगळं सांगण्याचा उद्देश हाच की, आपल्याकडेही बाइकस्वार कमी कसरती करत नाहीत. मुंबईतल्या खड्डेभरल्या रस्त्यांवरून बाइक चालवणंसुद्धा, त्या चिखलांच्या रस्त्यांवरून गाडी चालवण्याच्या स्पर्धेइतकंच कठीण असतं.

परदेशात मात्र, अशा खड्डय़ांच्या, वाईट रस्त्यांच्या, ट्रॅफिकच्या सोयीसरकारनं करून दिलेल्या नसल्यानं त्यांना नाइलाजानं आपलं कौशल्य अशा स्पर्धामधून दाखवावं लागतं. त्यातला एक प्रकार म्हणजे, ट्रेल रायडिंग. यात गटाने किंवा वैयक्तिकरीत्या सहभागी होता येतं. सुरुवातीला घोडय़ांवरून आपल्याला हव्या त्या लक्ष्यापर्यंत जाण्याचा हा खेळ खेळला जायचा. पण आता घोडय़ांव्यतिरिक्त बाइक्स, सायकली अशा- रानावनातून धावू शकणाऱ्या-वाहनांनी हा खेळ खेळला जातो. या खेळात अनेक अडथळे असतात. ते पार करत पुढे लक्ष्यापर्यंत सरकायचं असतं. यात तुम्ही किती वेगाने गाडी चालवायची, याचं काही बंधन नसतं. रस्त्यात येणारे अडथळे, नदी, नाले ओलांडताना, समोरच्या निसर्गाचा, सोबत्यांचा सहभाग यांचा आनंद घ्यायचा असतो. पण ही स्पर्धा चाकोरीबद्ध मार्गाने होणारी नसल्याने स्पर्धकांना त्यातील धोके आधीच सांगितलेले असतात. स्पर्धेदरम्यान अनेक इव्हेंटही होतात. पण या स्पर्धेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, यासकट अनेक आरोप होत असतात. तर, रानात गेल्यामुळेच आमची पर्यावरणनिष्ठा वाढते, असं उत्तर बाइकवाल्यांकडे तयार असतं!

एंडय़ूरो हादेखील असाच एक साहसी मोटारसायकल स्पर्धेचा प्रकार. हीदेखील नेहमीच्या रस्त्याबाहेरची - ऑफरोडस्पर्धा मानली जाते. मात्र, या स्पर्धेसाठीचे नियम फार कठोर असतात. ही स्पर्धा दोन प्रकारे होते. एकात नेहमीप्रमाणे ठरल्या वेळेत अंतर कापायचं असतं, तर दुसरा प्रकार म्हणजे या अंतरावर ठरवून दिलेल्या टप्प्यांवर ठरलेल्याच मार्गावरून ठरलेल्या वेळेत पोहोचत हे टप्पे पार करायचे असतात. ठरलेल्या वेळेत ठरलेल्या टप्प्यावर स्पर्धक आला नाही तर त्याला दंड होतो. थोडक्यात, हा प्रकार म्हणजे नेहमीची स्पर्धा न मानता वेळ पाळण्याची स्पर्धा म्हणता येईल. या स्पर्धेची सुरुवात गटागटाने होते. त्याला रोम्हणतात. प्रत्येक रोची निघण्याची वेळ ठरलेली असते. त्यानुसार त्याला पुढचं सर्व वेळापत्रक पाळावं लागतं. या स्पर्धकांना मार्गात अनेक अडथळे उभारलेले असतात. काही त्यांना ठाऊक असतात, काहींची त्यांना कल्पना नसते. त्यातही या स्पर्धकांना एक स्पेशल टेस्टद्यावी लागते. त्यात स्पर्धक मोटारसायकलवरून नव्हे तर चालत हा टप्पा पार करतात. या स्पर्धेत स्पर्धकाच्या शारीरिक आणि मानसिक कौशल्याचा कस लागतो.

Marathi Online News

No comments:

Post a Comment