Saturday, September 11, 2010

काय होणार रिपब्लिकन पक्षाचे?

महाराष्ट्रातील कोणत्याच पक्षाचे राजकारण रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) या पक्षाकडे दुर्लक्ष करून पूर्ण होऊच शकत नाही. रिपब्लिकन पक्षाची ही ताकत राजकारणाच्या मुख्य प्रवाहातील अन्य पक्षांनी ओळखली असली तरी खुद्द रिपब्लिकन नेत्यांना आपल्यातील या शक्तीची जाणीव झालेली दिसत नाही..महाराष्ट्रातील कोणत्याच पक्षाचे राजकारण रिपब्लिकन पक्ष (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया) या पक्षाकडे दुर्लक्ष करून पूर्ण होऊच शकत नाही. रिपब्लिकन पक्षाची ही ताकत राजकारणाच्या मुख्य प्रवाहातील अन्य पक्षांनी ओळखली असली तरी खुद्द रिपब्लिकन नेत्यांना आपल्यातील या शक्तीची जाणीव झालेली दिसत नाही.. आजघडीला रिपब्लिकन पक्षाचे तब्बल ४४ गट-तट अस्तित्वात आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी यातील अनेक गटांनी डावे, समाजवादी यांना एकत्र आणून‘रिडालोस’ नावाची एक मोळी बांधण्याचा प्रयत्न केला, पण या प्रयोग फसला.आताचा रिपब्लिकन पक्ष हा पूर्वाश्रमीच्या दलित पँथरची राजकीय आवृत्ती किंवा आवृत्त्या आहेत, असे दिसते.. महाराष्ट्राच्या प्रत्यक्ष राजकारणात नसूनही ७०च्या दशकाच्या सुरुवातीस समाजात एखाद्या वादळासारखा घोंघावणारी दलित पँथर ही संघटना आधीच्या रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीच्या राजकारणाला कंटाळून स्थापन झाली होती; पण पुढे तीही फुटली आणि आज महाराष्ट्राच्या राजकीय बाजारपेठेतील सध्याच्या रिपब्लिकन पक्षात, पूर्वाश्रमीचे अनेक ‘पँथर’ राजकीय सौदेबाजीत गुंतलेले दिसू लागले आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष आणि आजचा रिपब्लिकन पक्ष यांचा (केवळ नामसाधम्र्य सोडले तर) तसा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशन हा बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला पक्ष निवडणुकीच्या राजकारणात फारसा यशस्वी ठरला नाही. भविष्याची फार आधीपासून चाहूल असणाऱ्या बाबासाहेबांनी त्यामुळे सर्व समाजगटांना, वंचितांना सोबत घेऊन जाता येईल, अशा पक्षाची संकल्पना मांडली होती. पण त्यांच्या हयातीत हे साध्य झाले नाही. बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात दीन-दलित, वंचितांच्या उद्धारासाठी बौद्ध धम्म आणि रिपब्लिकन पक्ष हे धार्मिक व राजकीय शक्ती म्हणून उभे करायचे होते. शेडय़ूल्ड कास्ट फेडरेशनपेक्षा व्यापक दृष्टिकोन असणारा रिपब्लिकन पक्ष असावा, अशी बाबासाहेबांची संकल्पना होती. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर अवघ्या दीड महिन्यात त्यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यानंतर रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. पण येथेही बाबासाहेबांना अपेक्षित असलेल्या सर्वहारा वर्गाऐवजी रिपब्लिकन पक्ष पुन्हा एकदा जातीच्या चौकटीत अडकला. केवळ अनुसूचित जातीतील महारांचा पक्ष म्हणून त्याची ओळख प्रस्थापित झाली. रिपब्लिकन पक्ष राष्ट्रीय पक्ष असावा, ही बाबासाहेबांची इच्छा मात्र, त्या वेळी पूर्ण झाली. बाबासाहेबांच्या दलितोद्धाराच्या चळवळीत त्यांना उत्तरेकडील राज्यांचेही मोठे योगदान होते. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रातील महार तर उत्तरेकडील विखुरलेल्या चांभार किंवा ‘चमार’ समाजाने आपला पक्ष म्हणून स्वीकारले.सुरुवातीच्या रिपब्लिकन पक्षावर ब-याच मोठय़ा प्रमाणात मार्क्‍सवादी विचारसरणीचा पगडा होता. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्यक्ष राजकारणाला सुरुवात केली तो काळही पहिल्या महायुद्धाच्या नंतरचा किंवा रशियन राज्यक्रांतीदरम्यानचा होता. त्यामुळे त्यांनाही या विचारांनी प्रभावित केले असावे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने दादासाहेब गायकवाडांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनांत समाजवादी तसेच मार्क्‍सवाद्यांचाही सहभाग लाभला. दादासाहेब गायकवाडांनी वनजमिनी तसेच सामूहिक जमिनी मागासवर्गीयांना कसण्यासाठी मिळाव्यात, यासाठी १९५६ व १९६५ मध्ये यशस्वी आंदोलन केले.रिपब्लिकन पक्षाची स्थापना बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर ऑक्टोबर १९५७ मध्ये झाली. त्यानंतर १९७५ सालापर्यंत या पक्षाची देशभरात विविध ठिकाणी सात अधिवेशने झाली. या पक्षाचे बी. के. गायकवाड, बी. सी. कांबळे, दिघे, जी. के. माने, हरिहरराव सोनुले, दत्ता कट्टी, एन. शिवराज, के. यू. परमार, बी. डी. खोब्रागडे यांसारखे नेते १९५७ मध्ये संसदेवर निवडून गेले होते. या संघटनेची सुरुवातीची दोन वर्षे सुवर्णकाळ म्हणून गणली जातात. पण ६०च्या दशकात काँग्रेसशी हातमिळवणी केल्यानंतर या पक्षाचे जणू अस्तित्वच नष्ट झाले. दरम्यानच्या काळात आंबेडकरी विचारांनी भारून उठलेल्यांनी त्यांचा विद्रोह साहित्याच्या माध्यमातून अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला व दलित साहित्य नावाचा भारतीय साहित्यक्षेत्रात प्रचंड उलथापालथ घडवणारा साहित्यप्रकार जन्मास आला.पण केवळ साहित्यातून क्रांती होणार नाही, हे लक्षात आल्यानंतर ‘ब्राह्मणांच्या बोळात आम्हाला कोनाडा नको तर आम्हाला या जमिनीवरच राज्य करायचे आहे. विजेच्या कल्लोळाप्रमाणे आमची क्रांती चमकेल,’ अशी घोषणा देत दलित पँथरचा जन्म झाला. मुंबईतल्या झोपडपट्टीत जन्माला आलेली ही संघटना काही काळातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली व जातीयवादी गावगुंडांना या काळात पळता भुई थोडी झाली. काँग्रेसचा पराभव करणे आणि रस्त्यावरील लढाईत शिवसेनेला नामोहरम करणे, ही या संघटनेची ध्येयधोरणे होती. उल्लेखनीय बाब म्हणजे याच काळात नक्षलवादी चळवळीचाही उदय होत होता. त्यामुळे या दोन्ही संघटना विद्रोहाचे प्रतीक बनून समोर येत होत्या. जातीसंघर्षाचा लढा वर्गसंघर्षात तर परावर्तीत होणार नाही, अशी भीती त्या वेळी उजव्या विचारसरणीच्या तर आशा डाव्या विचारसरणीच्या पत्रकारांनी त्या वेळी व्यक्त केली होती. दलित पँथरने केवळ महाराष्ट्रातील राजकारण बदलले असे नाही तर देशभरातच तिची प्रतिक्रिया उमटू लागली होती. दलित आणि हिंदूंमध्ये कर्नाटकात जोरदार संघर्ष पेटला. त्यातून १९७४ मध्ये राजव्यापी दलित संघर्ष समितीची स्थापना झाली. बिहार आणि आंध्र प्रदेशात दलित तरुणांच्या या लढय़ाला नक्षलवादी चळवळीचाही पाठिंबा लाभत होता.दलित पँथरची चळवळ जोर धरतेय ना धरतेय तोच तिच्यात पुन्हा एकदा फूट पडली. आंबेडकरवादी (बौद्ध धम्मवादी)आणि मार्क्‍सवादी असे दोन गट पडले. त्यामुळे बाबासाहेबांना अपेक्षित दलितांच्या उद्धाराचे लक्ष्य साध्य करण्याचे स्वप्न अपुरेच राहिले. त्याच काळात पँथरवर हिंसाचाराचे आरोपही झाले. पँथरमधील सहभागी तरुण बहुतांशी झोपडपट्टीतील होते. मार्क्‍सवादी जाहीरनाम्याच्या धर्तीवर दलित पँथरचा जाहीरनामा त्यांना मान्य नव्हता. ‘आमच्या बहिणींच्या अंगावर हात टाकणा-यांचे हात उखडून टाकायला हवेत,’ हा त्यांचा रोकडा सवाल होता. आर्थिक-सामाजिक कार्यक्रम देण्यात ही संघटना अपयशी ठरली. बाबासाहेब आंबेडकरांना मात्र दलितांची समग्र प्रगती अपेक्षित होती.त्यानंतरही बाबासाहेबांच्या संकल्पनेतील पक्ष स्थापन करण्यासाठी उत्तर प्रदेशात कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाच्या रूपात प्रयत्न सुरू केले. ‘जाती तोडो-समाज जोडो’ अशी घोषणा देत ही संघटना उभी राहिली. या संघटनेने आतापर्यंत तीन वेळा उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवली असून या वेळी तर कोणत्याही आघाडीविना मायावती यशस्वीपणे उत्तर प्रदेशचा कारभार चालवत आहेत. यातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे सुरुवातीच्या काळातील निवडणूक चिन्ह हत्ती आज बहुजन समाज पक्षाकडे आहे. आंबेडकरांनंतरच्या दलित चळवळीचा आढावा घेत असताना प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाला वगळून चालणार नाही. पँथरच्या मुशीतून तयार झाले नसले तरी त्यांचा दृष्टिकोन व्यापक होता. त्यातूनच त्यांची भारिप-बहुजन महासंघ ही संघटना उदयाला आली.या सर्व घटना घडत असतानाच, रिपब्लिकन पक्ष मात्र, स्वत:चे अस्तित्व हरवून बसला होता. पक्षाचे आमदार, खासदार प्रस्थापित पक्षांच्या पाठिंब्यावर निवडून येत होते व त्या बदल्यात या नेत्यांनी संपूर्ण समाजाला या पक्षांच्या दावणीला बांधून ठेवले. त्यातच बाबासाहेबांना अपेक्षित सर्व जातीधर्माना सोबत घेऊन चालणारा रिपब्लिकन पक्ष स्थापन करण्यात अपयश आल्याचे ढळढळीत सत्य समोर आहे व रिपब्लिकन पक्ष आजही आपल्या अस्तित्वाच्या शोधात अंधारात भरकटताना दिसतो आहे.

1 comment:

  1. Mi tumacha blog vachala. Chhan ahe. Republican pakshababat apan mandalele vichar yogy ahet.
    Prakash pol. www.prakashpol.blogspot.com

    ReplyDelete