Sunday, September 19, 2010

मैदाने वाचवा...

मुंबईत काही मंडळी ‘मैदान बचाव समिती’च्या नावाने गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत काम करत आहेत. मुंबईतील मैदाने वाचावीत, त्यांच्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी ही मंडळी झटत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मैदाने अतिक्रमणांपासून वाचवली आहेत.

गेल्या काही वर्षात निसर्गचक्र बदलल्याचे आपल्या ध्यानात येत आहे. ग्रामीण भागावर त्याचा अधिक परिणाम होतो, त्याचे आपल्याला काय, असा उलटा प्रश्न विचारून निसर्गाच्या प्रकोपाकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती मुंबई, पुण्यासारख्या बडय़ा शहरांत राहणा-यांमध्ये दिसून येते. मात्र, या मंडळींच्या हे लक्षात येत नाही की, अगदी थोडा जरी पाऊस पडला तरी मुंबईसारखे शहर लुळेपांगळे होते. सर्व व्यवहार थंडावतात. काही मंडळी यालाही प्रतिवाद करताना, मुंबईतील सांडपाणी व्यवस्थेवर खापर फोडतील. पण डोळसपणे पाहणारे फारच कमी आहेत.

काही मंडळी मैदान बचाव समितीच्या नावाने गेल्या ३५ वर्षापासून मुंबईत काम करत आहेत. मुंबईतील मैदाने वाचावीत,त्यांच्यावर अतिक्रमण होऊ नये यासाठी ही मंडळी झटत आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक मैदाने अतिक्रमणांपासून वाचवली आहेत.

मुंबई शहराची लोकसंख्या दीड कोटींच्या आसपास आहे. आणि मैदाने आहेत अवघी ८६५. या शहराला विस्तारासाठी आधीच जागा नाही. त्यामुळे लोकवस्ती अतिशय दाटीवाटीची आहे. त्यातच वाहनांच्या प्रचंड संख्येने शहरातील प्रदूषण वाढलेले आहे. लोकांना मोकळा श्वास घेण्याची सोय उरलेली नाही, असे असताना मुंबईतील मैदाने शहराच्या फुफ्फुसाप्रमाणे काम करतात. मात्र, आता सरकारी पातळीवरून आणि काही ठिकाणी बांधकाम व्यावसायिकांच्या दबावाखाली या मैदानांचाच गळा घोटण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. अनेक ठिकाणी मैदानांचे आरक्षण रद्द केल्याच्या बातम्या येत असतातच. मात्र, आहे त्या मैदानात वेगवेगळ्या प्रकारे अतिक्रमण करून त्या मैदानाचे स्वरूपच बदलले जात आहे. वास्तविक पाहता मैदान मातीचेच असायला हवे. त्यावर मुक्तपणे खेळता यायला हवे. आता या मैदानांच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली पेव्हर ब्लॉक बसवले जातात,मैदानात जागोजागी ग्रेनाइटचे, संगमरवराचे बाक बसवले जातात. यात मैदानाचे क्षेत्रफळ कमी होते. त्याचबरोबर कधी-कधी मैदानात व्यायामशाळा, बालवाडीसाठी जागा मिळवली जाते. त्यानंतर हळूहळू ही मंडळी हातपाय पसरायला सुरुवात करतात,आणि मैदान त्याला बळी पडते. मैदानांना अशा प्रकारच्या अतिक्रमणांपासून वाचवण्यासाठी ही समिती काम करते.

दुसरा धोका आपण २६ जुलैच्या पावसानंतर अनुभवला आहेच. मुंबईतील मैदाने कमी झाल्यामुळे किंवा मैदानातील मातीच नष्ट झाल्यामुळे पावसाच्या पाण्याच्या निच-याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मुंबईत हल्ली अगदी तुरळक पाऊस पडला तरी पूरस्थिती निर्माण होते. त्याचबरोबर नेहमीपेक्षा अधिक प्रखर उन्हाळा किंवा न जाणवणारा हिवाळा अशी परिस्थिती सध्या मुंबईत निर्माण होत आहे. ही परिस्थिती टाळण्यासाठी मैदानांचे मूळ रूप कायम ठेवावे, यासाठी ही समिती भांडत आहे. मुंबईतील सध्या १,८८६ महापालिका आणि तीन हजार खासगी शाळांमध्ये सुमारे पावणे आठ लाख विद्यार्थी शिकत आहेत. त्यांचा बौद्धिक विकास होत असताना शारीरिक विकासासाठी आवश्यक अशा मैदानांचे प्रमाण कमी होत आहे. भविष्यात मैदाने नष्ट झाली तर या मुलांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, हा धोका टाळण्यासाठी समितीने अनेक आंदोलने केली आहेत, आणि त्याला यशही मिळाले आहे. समितीच्या आकडेवारीनुसार मुंबई शहरात उद्याने,मनोरंजनासाठीच्या बागा, खेळांची मैदाने, पार्क अशी मिळून अवघी २३४ ठिकाणे आहेत. पश्चिम उपनगरात त्यांची संख्या ४३३ आणि पूर्व उपनगरांत १९८ आहे. त्यामुळे आहेत ती मैदाने नष्ट करण्यापेक्षा मुंबईच्या लोकसंख्येचा विचार करून अधिक मैदाने निर्माण व्हावी, अशी भूमिका समितीने घेतल्याचे समितीचे भास्कर सावंत सांगतात. समितीने आतापर्यंत वेळोवेळी आंदोलने करून माटुंग्याचे दडकर मैदान, विक्रोळीचे संभाजी मैदान, कुर्ला येथील गांधी मैदान वाचवले आहे. मलबार हिल येथील एस. एम. जोशी मैदानासाठी सध्या मैदान बचाव समिती लढत आहे.

No comments:

Post a Comment