Sunday, September 19, 2010

शिळांपासून शाळांकडे...


थ्री कप्स ऑफ टी’मध्ये ग्रेग मॉर्टेनसन या ध्येयवेडय़ा माणसानं त्याला आश्रय देणा-या कोरफे गावातील रहिवाशांना शाळा बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण केलं पण या पुस्तकात त्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीर (या पुस्तकात त्याचा उल्लेख आझाद काश्मीर), पाकिस्तानचा दुर्गम भाग, अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील भागात मुलींसाठी शाळा उभारण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचा उल्लेख आहे.

अमेरिकेतला एक हौशी गिर्यारोहक हिमालयात गिरीभ्रमणासाठी येतो.. त्याची मोहीम फसते.. पाकिस्तानातल्या एका गावात त्याला आसरा मिळतो.. आणि तिथल्या ग्रामस्थांनी दिलेल्या प्रेमाची परतफेड करण्यासाठी या भागात शाळा सुरू करण्याचे वचन देतो आणि ते पाळतोही.. ही कथा आपण ग्रेग मॉर्टेनसनच्या थ्री कप्स ऑफ टी मुळे ठाऊक झालीच आहे. या पुस्तकानं विक्रीचे अनेक आकडे मोडले. बेस्टसेलर ठरलेल्या या पुस्तकानं केवळ एक इतकंच साध्य केलं असं नाही तर पाकिस्तान, अफगाणिस्तानसारख्या भागातील शिक्षणाच्या समस्येवरही प्रकाशझोत टाकला.

याच पुस्तकाचा पुढील भाग म्हणजे स्टोन्स इन्टू स्कूल्स हे पुस्तक! थ्री कप्स ऑफ टीमध्ये ग्रेग मॉर्टेनसन या ध्येयवेडय़ा माणसानं त्याला आश्रय देणा-या कोरफे गावातील रहिवाशांना शाळा बांधून देण्याचं आश्वासन पूर्ण केलं पण या पुस्तकात त्याने पाकिस्तानव्याप्त काश्मीर (या पुस्तकात त्याचा उल्लेख आझाद काश्मीर), पाकिस्तानचा दुर्गम भाग,अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील भागात मुलींसाठी शाळा उभारण्यासाठी केलेल्या यशस्वी प्रयत्नांचा उल्लेख आहे. त्याने स्थापन केलेल्या सेंट्रल एशिया इन्स्टिटय़ूट (सीएआय) या संस्थेच्या माध्यमातून त्याने या भागात तब्बल 130 शाळा उभारल्या. यातल्या बहुतांश शाळा मुलींच्या आहेत.

मुळात पाकिस्तानचा डोंगराळ भाग आणि अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील भागात तालिबानींचं मोठं वर्चस्व आहे. संपूर्ण पाकिस्तानातही परिस्थिती वेगळी आहे, असे आपण म्हणू शकणार नाही. त्यातच पाकिस्तान, अफगाणिस्तानातल्या तालिबान्यांचं वर्चस्व मोडून काढून तिथं शाळा सुरू करणं, तेही मुलींसाठी हे एकप्रकारे जिवावरचं संकट होतं. पण मॉर्टेनसन यांनी स्थानिकांच्या मनात स्वत:बद्दल एक जागा निर्माण केली होती. त्यांच्या संस्कृतीशी समरस होऊन आपण कुणी वेगळे आहोत, हे कधी जाणवूच दिलं नाही. म्हणूनच तिथले टोळीवाले त्यांचा माग काढत येतात. त्यांच्या कोरफे आणि अन्य गावांतल्या शाळांची ओळख पाकिस्तान, अफगाणिस्तानात पसरल्यानं, हे टोळीवाले थेट त्यांना आपल्या गावातही अशी शाळा सुरू करण्याचं निमंत्रण देतात, हे विस्मयकारक आहे.

उल्लेखनीय म्हणजे, काश्मीर खो-याला 2005 मध्ये प्रलयंकारी भूकंपाचा धक्का बसला होता. त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी तर झालीच पण वित्तहानीही मोठी झाली होती. या भूकंपानं मॉर्टेनसन यांनी बांधलेल्या शाळांचंही नुकसान झालं,पण त्यांनी तिथं तंबू उभारून शाळा चालवल्या.

याच पुस्तकातल्या काही भागाचा स्वैरानुवाद सोबत आहे..
  • स्टोन्स इन्टू स्कूल्स- प्रमोटिंग पीस विथ बुक्स, नॉट बाँब्स, इन अफगाणिस्तान अँड पाकिस्तान
  • लेखक- ग्रेग मॉर्टेनसन (सोबत माइक ब्रायन)
  • पाने- 420
  • प्रकाशन : पेंग्विन इंडिया
  • किंमत : 399 (बुकस्ट्रीटवर 150 पर्यंत)

पुढचा दीड महिना मी, सर्फराज आणि आमच्या सहका-यांची नीलम खो-याच्या दिशेनं वाटचाल सुरू होती. रस्ता प्रचंड खडतर होता. यातला काही प्रवास गाढवावर बसून तर बहुतांश प्रवास पायीच करावा लागत होता. काही शेवया आणि तसंच काहीतरी खाऊन आणि आयोडिनच्या गोळ्या घालून नदीचं पाणी पिऊन आमचा प्रवास सुरू होता. प्रवासाचा शीण इतका होता की मला आणि सर्फराजला वेदनाशामक गोळ्या आणि चहावरच दिवस काढावा लागत होता. या भागात भूकंपानं झालेल्या हानीची तशी सुरुवातीला कल्पना येत नव्हती.

भूकंप होऊन दोन महिने उलटून गेले तरी अद्यापही कित्येक हजार लोक बेपत्ता होते. त्यांची काहीच माहिती मिळत नव्हती. त्यातच शोधपथकांना सतत नवनव्या ठिकाणी मृतदेह सापडत होते. येथील लोकांनी आता छावण्यांमध्ये आश्रय घेतला होता. आम्हालाही अशाच एका छावणीत आश्रय घ्यावा लागला. या छावण्यांना मिळणारी मदत कमी झाली की तिथं आलेल्यांची वाटचाल पुन्हा पुढच्या छावणीकडं व्हायची. या छावण्यांमध्ये आलेल्यांना आम्हीही ते कुठल्या गावाचे, त्यांचं किती नुकसान झालंय, मुलं कशी आहेत, गावातल्या शाळा वाचल्यात का, हे प्रश्न विचारायचो, पण शेवटच्या प्रश्नाला प्रत्येकाकडून नकारार्थीच उत्तर यायचं. नीलम खो-याच्या वरच्या भागातल्या 50 ते 60 गावांत एकही शाळा उरली नव्हती. यातल्या प्रत्येक शाळेत 150 ते 160 विद्यार्थी होते, त्यातले बरेचसे विद्यार्थी भूकंपात मरण पावले होते. या शाळांच्या दुरवस्थेसाठी कंत्राटदारांनी केलेलं कामच जबाबदार होतं. भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीनं या शाळा कोसळल्या होत्या. त्यातच ही गावं अत्यंत दुर्गम भागात असल्यानं तिथं अन्न पुरवण्यासाठी किंवा इतर मदत देण्यासाठी सरकारी संस्था आणि सेवाभावी संस्थांची उपस्थितीही नगण्यच होती. पाकिस्तानी सैन्यानं काही ठिकाणी तंबू उभारून त्यात शाळा सुरू करण्यास सांगितलं. मात्र, ते अत्यंत अपुरं होतं.

अशा वातावरणात शिकवण्यासाठी कोणीला तरी शोधणं, शिकवण्यासाठी लागणारं साहित्य जमा करणं आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या पगाराची तजवीज करणं महत्त्वाचं होतं. आम्ही ज्या भागात आता लक्ष केंद्रित केलं होतं, त्या ठिकाणी सर्फराज चालवत असलेल्या भागातील तंबूशाळांत काहीतरी जिवंतपणा दिसून येत होता. संपूर्ण डिसेंबर आणि जानेवारीत आम्ही त्या भागातील सर्व तंबूशाळांना भेट दिली. या भागात दोघे-तिघे समर्पण वृत्तीनं काम करणाऱ्या शिक्षकांचा आम्हाला शोध घ्यायचा होता. काही शाळांमध्ये तर एकेका वर्गात 100 पेक्षा अधिक विद्यार्थी होते. त्या ठिकाणी तीन-चार तासांची वेगवेगळी दोन सत्रे भरवण्यास सुरुवात केली. त्यात मुलांसाठी एक व मुलींसाठी एक असे हे सत्र होते. यात वरच्या वर्गातले विद्यार्थी खालच्या वर्गाना शिकवण्यासाठी तयार झाले होते. यातल्या काही शाळांत तर दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थी होते.

या काळात पुनर्बाधणीच्या कामालाही वेग येत होता. पण या शाळांच्या कामाकडेही लक्ष देण्यासाठी आमच्यातला प्रत्येक जण शाळांना भेट देत होता. तिथं मदत पुरवत होता. त्यांना पगार मिळतो की नाही हे पाहात होता. तिथं कोणतीही सरकारी मदत पुरवली जात नसतानाही त्यांना केवळ आमच्या संस्थेचाच आधार होता. आमच्या या प्रयत्नांमुळे स्थानिकांमध्येही आमच्याबद्दल विश्वासाचं वातावरण तयार होऊ लागलं होतं.

No comments:

Post a Comment