Wednesday, September 8, 2010

सायबर गुन्हेगारी आणि आपण...

नितीन सावंत
मुंबई पोलिसांचा ‘सायबर सुरक्षा सप्ताह’ 24 ते 28 मे पर्यंत सुरू राहील, पण ते कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचलेच नाहीत किंवा ‘सप्ताह’ संपलाच; म्हणून आपण काळजी घेणं सोडू नये! तेवढ्याचसाठी, आपल्या टेबलावरच घडू शकणा-या सायबरगुन्ह्यांची ही ओळख..मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणा-या श्रेयसला अचानक त्याच्या खासगी ई-मेलवर एक मेल आला. पाठवणा-याचं नाव आफ्रिकन वाटत होतं. एका आघाडीच्या सॉफ्टवेअर कंपनीच्या ऑनलाइन लॉटरीत श्रेयसला 10 मिलिअन (एक कोटी) डॉलरचं बक्षीस लागल्याचं या मेलमध्ये म्हटलं होतं. बक्षिसाची रक्कम तातडीनं मिळण्यासाठी ‘प्रोसेसिंग फी’ म्हणून या कंपनीचा प्रतिनिधी श्रेयसला मुंबईत भेटणार होता. ठरलेल्या जागी श्रेयस गेला, पण कुणीच आलं नाही. त्याला दुसरा मेल मात्र आला, त्यातल्या खातेक्रमांकावर ही रक्कम वळती करण्यास सांगितलं होतं. यात काळंबेरं असल्याची शंका आल्यानं श्रेयसने पोलिसांकडे तक्रार नोंदवली. त्यामुळे ऑनलाइन लॉटरीच्या नावानं फसवणूक करणारं रॅकेटच उघड झालं. दुसरी घटना.. श्रद्धाला गेल्या काही दिवसांपासून सतत वेगवेगळ्या क्रमांकांवरून फोन येत होते. तिच्याशी अत्यंत अश्लील भाषेत वेगवेगळे लोक बोलायचे, वेगवेगळ्या मागण्या करायचे. शेवटी तिनं आईवडिलांना सांगितलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना या प्रकाराची माहिती दिली. तपासांती निष्पन्न झालं की, श्रद्धाच्या नावानं एका कम्युनिटी साइटवर अश्लील प्रोफाइल तयार झालं होतं. त्यावर तिची सर्व माहिती, दूरध्वनी क्रमांक होते. पोलिसांनी ते प्रोफाइल योग्य मार्गाने नष्ट केलं. श्रद्धानं मोबाइल क्रमांक बदलून, घरातलाही फोन काढून टाकल्यावर शेवटी हा त्रास थांबला. पण झाल्या प्रकारानं संपूर्ण कुटुंबाचं मन:स्वास्थ्यच हिरावलं होतं.तिसरी घटना .. राजूचं अपरेझल झालं होतं. त्याला ऑफिसमध्ये वरची जागा मिळाली होती. त्या पदाला साजेसा रुबाब म्हणून त्यानं कार घ्यायचं ठरवलं. त्यानं बँकेचं स्टेटमेंट पाहायला संगणक सुरू केला. पण.. पण घडलं भलतंच. गेली 10 वर्ष जमा केलेली पुंजी त्याच्या खात्यातून नाहीशी झाली होती. अगदी वेडापिसा झालेल्या राजूनं शेवटी पोलिसांकडे धाव घेतली, पण त्याला उशीर झाला होता.संगणक क्रांतीमुळे मोठमोठी कामं काही क्षणांत घरबसल्या करता येणं शक्य झालं. मात्र संगणक आणि इंटरनेटच्या पाठोपाठ ऑनलाइन आर्थिक घोटाळे, कॉपीराइट उल्लंघन, फसवणूक, हॅकिंग, पोर्नोग्राफी यासारख्या गुनंचंही पेव फुटलं. या गुन्ह्यांचा आपल्याला काहीही त्रास होणार नाही, असा छातीठोक दावा करणारेही फसू शकतात, इतक्या हुशारीनं ही फसवणूक केली जाते. फसवणारी मंडळी इतकी चलाख, की त्यांना शोधणं, महामुश्कील. ‘सायबर क्राइम’ नावानं या गुन्ह्यांची नोंद आता होऊ लागली आहे. हे गुन्हे कोणते? सायबर स्टॉकिंग- एखाद्या व्यक्तीची इंटरनेटद्वारे माहिती मिळवून पाठलाग केला जातो. कधी ई-मेल पाठवले जातात तर कधी धाडस वाढलं तर थेट घरीच दूरध्वनी करून मानसिक त्रास दिला जातो. महिल;च्या नावाचे बोगस प्रोफाइल तयार करून त्यावर तिचा खरा दूरध्वनी क्रमांक, पत्ता त्यावर दिला जातो. तिचं छायाचित्रंही लावलं जातं. अशा प्रकारे गुन्हे करणारी व्यक्ती परिचित, वा चॅटिंगद्वारे ओळख झालेली असते. त्यांच्या काही मागण्या मान्य न केल्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे केले जातात. त्यामुळे चॅटिंग करताना गोपनीय माहिती, दूरध्वनी क्रमांक समोरच्या व्यक्तीची खातरजमा झाल्याशिवाय देणं योग्य ठरणार नाही किंवा असे क्रमांक न देणंच इष्ट. ऑनलाइन फ्रॉड- आपलं खातं असलेल्या बँकेतून एखाद्या दिवशी तुम्हाला अचानक मेल येतो आणि तुमची सर्व माहिती,तुमच्या क्रेडिट, डेबिट कार्डाचे क्रमांक, पासवर्ड सर्व काही बँकेने पडताळणीसाठी मागवल्याचं या मेलमध्ये म्हटलेलं असतं. त्यासाठी बँकेचं संकेतस्थळही दिलं जातं आणि इथेच बरेच जण फसतात. हे संकेतस्थळ (वेबसाइट) ख-या वेबसाइटसारखंच हुबेहूब तयार केलेलं असतं. इतकं बेमालूम की, आपल्याला कल्पनाही येत नाही. खासगीच नव्हे; तर सरकारी बँकांचीही अशी फसवी संकेतस्थळं तयार करण्यात आली आहेत. त्यावर माहिती भरली की संपलंच. तुमचं खातं पुढच्या काही क्षणांत रिकामं झालेलं असतं. कोणतीही बँक तुमची गोपनीय माहिती कधीच मागत नाही. त्यामुळे अशी माहिती मागणारा मेल आला की थेट बँकेत संपर्क साधणं गरजेचं ठरतं. घबाडाचं आमीष- लॉटरी घोटाळा आहेच, शिवाय एखाद्याने त्याच्या निधनानंतर तुम्हाला वारस केलं असून या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी काही कार्यवाही करावी लागेल, त्यासाठी काही रक्कम भरावी, अशी सूचना असते. या ई-मेलला भुलणारेही कमी नसतात. व्हायरस- संगणकात येणारे व्हायरस हेदेखील उच्च दर्जाचे संगणकीय प्रोग्राम असतात. एखादा ई-मेल, संकेतस्थळ यांच्यामार्फत ते पसरतात. संशयास्पद मेल, संकेतस्थळाच्या वाटेला न जाणंच चांगलं. सूचनेचाच धोका- तुमच्या संगणकाला व्हायरसचा धोका असल्याचा ई-मेल आलेला दिसतो. हा धोका दूर करण्यासाठी तुम्हाला काही सूचना केलेल्या असतात. या सूचना पाळल्यानंतर काही क्षणांत संगणक यंत्रणाच बाद होते. विशेषत: कंपन्यांचं काम बंद पाडण्यासाठी असे व्हायरस पाठवण्याचे प्रकार केले जातात. स्पूफिंग- एखाद्या संगणक यंत्रणेत परवानगीविना प्रवेश करणं म्हणजे स्पूफिंग. अशा प्रकारे एखादं संकेतस्थळ हॅक करून तेथील संपूर्ण माहिती उडवली जाते किंवा हॅकरला वाट्टेल तो संदेश प्रसिद्ध केला जातो. ही हॅकर मंडळी प्रचंड बुद्धिमान असतात, त्यांच्यातले काही स्वत:ची क्षमता जोखण्यासाठी हॅकिंग करतात; तर काही जण कोणाच्या तरी सांगण्यावरून. संकेतस्थळ विकसित करणा-या डेव्हलपरच्या पुढच्या टप्प्याची माहिती या हॅकर मंडळींकडे असते. (काही वेळा या हॅकरचा वापर गुन्ह्यांची उकल करण्यासाठीही होतो.) चाइल्ड पोर्नोग्राफी- लहान मुलांशी, मुलींशी संपर्क साधून, त्यांचा विश्वास संपादन करून त्यांची अश्लील छायाचित्रं काढली जातात. हे गुन्हे करणारी मंडळी इंटरनेटवर सावजांच्या शोधात असतात. त्यामुळे पालकांनीही आपली मुलं काय पाहतात,कोणाशी बोलतात, यावर बारीक लक्ष ठेवायला हवं.


No comments:

Post a Comment