Monday, September 6, 2010

आरामदायी सफरीची सम्राज्ञी

अगदी क्षितीजापर्यंत दिसणाऱ्या मोकळ्या रस्त्यावर सुसाट वेगानं बाइक चालवणं, हे जातिवंत बाइकस्वाराचं स्पप्न असतं आणि अशी मिळालेली संधी त्याच्यासाठी आनंदसोहळा ठरते. अमेरिकेत अशा भटक्यांची संख्या कमी नाही. त्यांच्या भटकण्याच्या छंदाला वेग प्राप्त करून देण्याचं काम हार्ले-डेव्हिडसन कंपनीच्या बाइक गेली अनेक वर्ष इमानेइतबारे निभावत आहेत. या बाइक आता भारतीयांच्याही दिमतीला लवकरच सज्ज होत आहेत.

बाइकिंगची क्रेझ तरुणाईत असली तरी एका विशिष्ट टप्प्यानंतर ही क्रेझ हळूहळू कमी होत जाते. भारतासारख्या देशात तर अत्यंत वाईट रस्ते, त्यात वाहतूक कोंडी,भस्सकन रस्त्यात येणारी माणसं, जनावरं यामुळे बाइक कुठे दूरवर घेऊन जाणं म्हणजे जिवावर येतं. पण अमेरिकेसारख्या खंडप्राय देशात मात्र आपली बाइक घेऊन दूर कुठं तरी भटकून येणा-यांचं प्रमाण मोठं आहे. लांब म्हणजे आपल्याकडे गावाला जाणं किंवा जवळपासच्या ट्रेकला जाणं असं समजलं जातं. ते अंतरही बाइकनं कापायचं असलं तर जास्तीत जास्त 100 किमी असेल. अमेरिकेत मात्र हेच अंतर 100 किमीच्या पुढे असतं. अशा लांबच्या प्रवासाला लागणारी बाइकही तशीच दणकट हवी. अमेरिकनांची ही गरज पूर्ण केलीय हार्ले डेव्हिडसन या मोटरसायकलनं. किमान 750 सीसीची असणारी ही बाइक जगातील सर्वच बाइकप्रेमींचं मोठं आकर्षण आहे.

हार्ले डेव्हिडसनची लोकप्रियता अमेरिकेत इतकी होती की, काही काळ 70 च्या दशकात तेथील चित्रपटांतही या गाडय़ांचीच धूम होती. विशेषत: गुन्हेगारी जगताशी संबंधित हे चित्रपट असल्याने या बाइकही वादाच्या भोव-यात सापडल्या होत्या. सर्व बाइकपेक्षा वेगळी रचना आणि ‘फायरिंग’चं वेगळेपण या खुबी या बाइकनं आतापर्यंत जपल्या आहेत. या बाइकला प्रेमाने‘हार्ले’ किंवा ‘एचडी’ असंही बोललं जातं. ‘क्रूझ’ बाइक म्हणून ओळखली जाणारी ही बाइक लांबच्या प्रवासाचा पुरेपूर आनंद प्रवाशाला देते. आकाराने लांबलचक, बुटकी, उंच हँडल आणि बसण्यासाठी आरामदायक सीट अशी तिची सर्वसाधारण रचना. गाडीवर बसताना अगदी आरामात रेलून बसावे लागते, म्हणजे तिची रचनाच तशी असते. त्यामुळे लांबच्या प्रवासात पाठीला त्रास होण्याचा काही चान्सच नाही.

या गाडीचं इंजिनही तितकंच दणकट असतं. ‘व्ही ट्विन’ प्रकारच्या या इंजिनात दोन पिस्टन असतात. कमीत कमी जागेत अधिकाधिक शक्ती मिळावी, अशी रचना केलेल्या या इंजिनमधून गाडी चालू केल्यावर सर्वसामान्य गाडय़ांपेक्षा काहीसा वेगळा आवाज येतो. जाणकार नसेल तर त्याला हा गाडीतील बिघाडही वाटू शकतो. पण ‘हार्ले डेव्हिडसन’ला ओळखणारा केवळ तिच्या या आवाजावरूनच ही गाडी ओळखू शकतो, इतका आवाजही या ब्रँडशी एकरूप झाला आहे.

भारतातही गेल्या काही काळात या गाडीच्या पावलावर पाऊल टाकून बजाजनं सुरुवातीला ‘एलिमिनेटर’ आणि नंतर‘अ‍ॅव्हेंजर’ तर यामाहानं ‘एण्टायसर’ या गाडय़ा आणल्या. गावठी हार्ले डेव्हिडसन मानल्या जाणा-या या गाडय़ांनीही येथेप्रचंड लोकप्रियता मिळवली. पण जगभरातील रस्त्यांवरून दिमाखात दौडणा-या ‘हार्ले’नं आता भारतातही प्रवेश केला असून भारतीयांच्या दिमतीलाही ती सज्ज झाली आहे. स्पोर्ट्स्टर, सॉफ्टेल, डायना, व्ही रॉड, टुरिंग या लोकप्रिय श्रेणीतील बाइक भारतात उपलब्ध होत आहेत. पण इतक्यात हुरळून जायची गरज नाही. भारतात या गाडीचं सर्वात कमी किमतीचं मॉडेल तब्बल 6 लाख 95 हजार रुपयांना उपलब्ध असून सर्वात महागडी गाडी 34 लाख 95 हजार रुपयांना आहे.


No comments:

Post a Comment