Monday, September 6, 2010

लोकल बाइकिंग

शहरातल्या गर्दीत सराईतपणे बाइक चालवणा-यांचं मोठंच कौतुक होतं. पण लांबलचक ट्रॅफिकमध्ये एकीकडे कार्सची रांग लागलेली असताना बाइक मात्र वाट काढत निघतात. त्यामुळे शहरात बाइक चालवण्याचा आनंद काही औरच असतो. त्यातच मुंबईसारख्या शहराजवळच्या निसर्गरम्य परिसरातील बाइकिंग तर अवर्णनीयच!

बाइकचा उपयोग प्रामुख्यानं तरुणाईकडूनच होतो, हा समज गेल्या काही वर्षात मोडीत निघाला आहे. मुंबईसारख्या शहरांत बस, उपनगरी रेल्वेगाडय़ांना असलेली मरणाची गर्दी, त्यातच अनियमितता, यामुळे अनेक जणांनी सार्वजनिक वाहतुकीवरील भिस्त सोडून दिली आहे. ब-यापैकी वेतनमान असणारी मंडळी स्वत:ची कार वगैरे बाळगतात. पण एकदा का कार ट्रॅफिक जॅममध्ये फसली की, किमान तासाभराची तरी लटकंती ठरलेली असते. त्यामुळेच, शहरी नोकरदारांनी बाइक्सना मोठी पसंती दिली आहे. मंदीच्या काळातही या वाहनांच्या विक्रीच्या वेगाला फारसा लगाम बसला नव्हता, हे बाइक्सच्या वाढत्या लोकप्रियतेचं द्योतक आहे. पुण्यासारख्या शहरात तर दुचाकी वाहनांची स्वत:ची एक वेगळी संस्कृती आहे. (त्यांचे नियमही वेगळे आहेत. अर्थात दुचाकीस्वारांनीच तयार केलेले!)

मुंबईत बोरिवली ते चर्चगेट किंवा ठाणे ते बोरीबंदर असा बाइकवरून प्रवास करणारे असले तरी त्यांचं प्रमाण फारसं नाही. पण बोरिवली, कांदिवली, मालाड पट्टय़ातील मंडळींना अंधेरीच्या साकीनाका किंवा पश्चिमेकडील औद्योगिक वसाहतींत जायचं असलं तर दुचाकी प्रचंड सोयीची ठरते. कारण हे रस्ते कायम वाहनांच्या गर्दीनं ओसंडून वाहत असतात. बाइकवरून अध्र्या तासात जाण्याच्या अंतरासाठी बेस्ट बस किंवा रिक्षा तासभर वेळ घेते. (येत्या काळात येथे मेट्रो येतेय. पण त्याचा फारसा परिणाम होईल, असं वाटत नाही.) दुसरं म्हणजे दादर, माहीम, सायन भागात राहणा-या मध्यमवर्गीयांनाही बाइकचाच पर्याय कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरीच्या पूर्व-पश्चिमेकडील भागातील औद्योगिक वसाहतींत जाण्यासाठी परवडतो.

मात्र पश्चिम उपनगरांत राहणा-या आणि नवी मुंबई, ठाण्याकडे नोकरी करणा-या किंवा त्या विरुद्ध परिस्थितीत बाइकचाच पर्याय सोयीचा ठरतो. हा पर्याय काहीसा खर्चिक असला तरी किती तरी कमी वेळात आपल्याला निश्चित ठिकाणी जाता येतं. कांदिवली ते महापे हा प्रवास अवघ्या 45 मिनिटांत होतो. याच प्रवासाला बेस्टची बस किमान अडीच तास घेते. महत्त्वाचं म्हणजे हा प्रवास अत्यंत रंजक असा आहे. ठाण्यातून पश्चिम उपनगरांत येताना किंवा कांदिवली, बोरिवली भागातून ठाण्याकडे जाताना अत्यंत गजबजलेल्या शहरातून आपल्याला घोडबंदर रोड लागतो. या मार्गावर मन अगदी प्रसन्न होतं. एकाच वेळी शहर आणि गावाचा ‘फिल’ या प्रवासात येतो. दोन्ही बाजूला नॅशनल पार्कचं जंगल, घोडबंदरची खाडी यातला प्रवास डोळ्यांना आणि मनालाही सुखावणारा ठरतो. त्यामुळे तब्बल 35 ते 40 किलोमीटरचा हा प्रवास फारसा थकवत नाही. पाऊस पडत असेल तर आणखीच मौज मात्र काळजीपूर्वक गाडी चालवली पाहिजे. रात्रीच्या वेळी मात्र अवजड वाहनांची वर्दळ पूर्व आणि पश्चिम द्रूतगती महामार्गावर असल्यानं सावधगिरी बाळगणं गरजेचं ठरतं. पण इथं मध्येच कुठं गाडी बंद पडली किंवा पंक्चर झाली तर मात्र खैर नाही. ‘दे धक्का’चा पर्यायच तिथं उरतो. रात्रीच्या वेळी तर गाडी आहे तिथंच सोडून जाणं बरीच मंडळी पसंत करतात. एखादा ट्रक मिळाला तर नशीब. पण आपल्यासारख्यांचं नशीब नेहमीच वाईट असतं. त्यामुळे तशी मदत मिळण्याची काही शाश्वती नाही.

आपण नेहमीच लांब पल्ल्याच्या सफरींत आनंद असतो, असं म्हणतो. पण बाइकनं भर पावसात गोरेगावच्या आरे कॉलनीत किंवा मुंबई-अहमदाबाद मार्गानं विरापर्यंत जरी प्रवास केला तरी लांबच्या सफरींतला निसर्गसौंदर्याचा अनुभव घेऊ शकतो.

No comments:

Post a Comment