Monday, September 6, 2010

शान की सवारी..

‘बुलेट’ मोटरसायकल भारतात आली लष्करासाठी.. पण शिपाईगडय़ांची ही गाडी सर्वच भारतीय मर्दाचं आवडतं वाहन ठरली, बॉलिवुडच्या सिनेमांतही गाजली.. आजच्या साउंड पोल्युशन- कॉन्शस जमान्यातही बुलेटचं ‘फायरिंग’ काळजाची धडधड वाढवतं.. ती दिसली, की नजर तिच्याकडेच वळते.. नवी गाडी घेता येईल, इतका पैसा सेकण्डहॅण्ड बुलेटवर खर्च करणारे आजही आहेत, ते बुलेटची शान कायम असल्यामुळेच!

क्या दिखती है यार.. मस्त मेंटेन ठेवलीय.. अशी वाक्यं कॉलेजच्या आवारात, ऑफिसबाहेर.. किंवा कोणत्याही ठिकाणच्या तरुणांच्या घोळक्यातून ऐकू आली तर दचकू नका. ही वाक्यं एखाद्या मुलीला उद्देशून नसून ती एखाद्या जुन्या ‘बुलेट’लाही उद्देशून असू शकतात. बाइक चालवणा-याचं खरं प्रेम त्याची बाइक असली तरी ‘जातिवंत’ बाइकराचं स्वप्न त्याच्याकडेही एखादी बुलेट असावी हेच असतं. पण बुलेट चालवायला वाघाचं काळीज पाहिजे. अवजड धूड.. किक मारण्याची खास पद्धत.. (समोरच्या मीटरमधला काटा अचूक जागी आला तरच किक मारायची.. आगाऊपणा केला तर उलट आलेल्या किकने पाय मोडून घ्यायला लागतो.) चालवतानाही बुलेटचा मान राखून चालवायची.. उगीचच लहान बाइकप्रमाणे आडवीतिडवी करत चालवायची नाही, ही पथ्यं पाळूनच बुलेट चालवायला लागते आणि त्यामुळेच कॉलेजातली पोरं या गाडय़ांच्या नादाला लागत नाहीत.

पण एकदा का बुलेट चालवली (व्यवस्थित आणि सांभाळून) की तब्येत एकदम खूश. अगदी फाटक्या अंगाच्या माणसालाही या गाडीवर बसलं की रुबाबदार असल्यासारखं वाटतं. (हे खरं आहे. बुलेटवर बसलेली प्रत्येक व्यक्ती रुबाबदार वाटते.) या गाडीच्या फायरिंगचा आवाज अनेकांना कानठळ्या बसवणारा वाटतो. पण तीच तर या गाडीची खरी ओळख. ही फायरिंग सेट करण्याचीही एक पद्धत असते. (पाठच्या मडगार्डला लावलेल्या रबरी पुठ्ठय़ाच्या साह्याने हे सेटिंग केलं जातं.) त्यामुळेच‘ध्वनिप्रदूषण’ करणा-या या गाडय़ांना अनेक जण नाकं मुरडत असले तरी हे प्रदूषणच गाड्यांची ओळख ठरत असल्यानं नव्या, कमी आवाज करणा-या गाड्या पसंत पडत नाहीत. जरा जास्त पैसे खर्च करायची तयारी असली की या गाड्या घेण्याकडेच मंडळींचा कल असतो. पण जाणकार मंडळींना आजही दुकानातून ‘पेटीपॅक’ गाडी खरेदी करण्यापेक्षा सेकंडहँड बुलेट खरेदी करणं योग्य वाटतं. त्यासाठी एखादा हौशी नव्या गाडीएवढेच पैसे मोजायचीही तयारी ठेवतो.

जुन्या चित्रपटांत तर बुलेटला एक वेगळंच स्थान होतं. अमिताभ बच्चन, धर्मेद्रचं ये दोस्ती हम नही तोडेंगे, हे गाणं जितकं अजरामर झालंय तितकीच त्याची बुलेट आणि बुलेटला जोडलेली साइडकार अजरामर झाली. ( साइडकार हा एक अनोखा प्रकार काही वर्षापूर्वीपर्यंत अस्तित्वात होता.) त्या गाण्याची कॉपी महेश कोठारेंनी त्यांच्या धडाकेबाज चित्रपटात केली. त्यासाठीही तशीच साइडकार असलेली बुलेट वापरली. संदेसे आते हैं, गाण्यात मिलिट्रीचा पोस्टमन पत्रं घेऊन राजस्थानच्या वाळवंटात येतो, त्यासाठीही तो बुलेटच वापरतो किंवा 26 जानेवारीला दिल्लीच्या राजपथावर बाइकवर होणा-या कसरतींसाठीही बुलेटच वापरल्या जातात. दोन-तीन बुलेट मिळून 15-20 जणांचा भार आरामात पेलतील, इतक्या त्या दणकट आहेत. विशेष म्हणजे हायवेवर प्रवास करताना सर्वसाधारण मोटरसायकली बाजूनं वेगात मोठं वाहन गेलं की हलतात. बुलेट मात्र रस्ता न सोडता ठामपणे स्थिर राहतें.

No comments:

Post a Comment