Sunday, September 19, 2010

अंतराळ-ज्ञानाच्या खजिन्याची लूट!

जॉर्ज, अ‍ॅनी आणि इमेट या चिमुरड्यांनी थेट मंगळ, टायटन ग्रहावर स्वारी करून अवकाशातील खजिना लुटला.. त्याची गोष्ट रंगून सांगताना शाळकरी मुलांपासून त्यांच्या आजी-आजोबांपर्यंत सा-यांना अंतराळाची ‘खरीखुरी’ माहिती स्टीफन हॉकिंग आणि ल्युसी हॉकिंग यांनी दिली आहे.

मंगळावरील वातावरण कसे आहे..शनीचा सर्वात मोठा उपग्रह टायटनवर मानव वस्ती करू शकतो का..आपल्या सौरमालेशिवाय इतर सौरमालांमध्ये जीवन असू शकते का.. या प्रश्नांचा शोध शतकानुशतके मानव घेत आला आहे. त्यासाठी गेल्या काही दशकांत तर विविध अवकाश मोहिमाही राबवल्या आहेत. मात्र, या अवकाश मोहिमांच्या बातम्या आणि त्याबाबतच्या जुजबी माहितीशिवाय सर्वसामान्यांना अंतराळाची फारशी माहिती नाही. मात्र, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि त्यांची कन्या ल्युसी हॉकिंग यांनी त्यांच्या जॉर्जस कॉस्मिक ट्रेजर हंटया पुस्तकातून आपल्याला ज्ञात-अज्ञात अंतराळाची अत्यंत साध्या-सोप्या भाषेत ओळख करून दिली आहे. जगभरातील सध्याच्या बेस्टसेलर पुस्तकांच्या यादीत हे पुस्तक आहे.

मंगळावरील वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेला रोबोटचा पृथ्वीशी अचानक संपर्क तुटतो. त्याच्याकडून असंबद्ध असे संदेश येऊ लागतात. त्याचवेळी अमेरिकेतील अंतराळ संशोधन केंद्रात काम करणा-या एरिक या शास्त्रज्ञाच्या सुपर कॉम्प्युटरवर येणारे परग्रहावरील मानवाचे संदेश.. त्यातच पृथ्वीचा विनाश करणारी धमकीही.. या सर्व गोष्टींचा छडा लागवण्यसाठी या शास्त्रज्ञाची मुलगी अ‍ॅनी, तिचा मित्र जॉर्ज आणि इमेट थेट अंतराळात जाण्याची मोहीम आखतात..पुढे काय होते, हे समजून घेण्यासाठी हे पुस्तकच वाचायला हवे.

अ ब्रीफ हिस्टरी ऑफ टाइमयासारखे प्रचंड गाजलेले पुस्तक लिहिलेल्या स्टीफन हॉकिंग यांनी जॉर्जस कॉस्मिक ट्रेझर हंटहे खास मुलांसाठी लिहिलेले पुस्तक आहे. मात्र, कोणत्याही वयोगटाला हे पुस्तक नक्कीच आवडेल. अत्यंत सोप्या भाषेत दिलेली अंतराळाची माहिती वाचता वाचता जॉर्ज आणि अ‍ॅनीसोबत आपणही कधी मंगळावर, तेथून टायटनवर जातो, हेच कळत नाही.

पुस्तक काल्पनिक आहे. मात्र, त्यातील सर्व संदर्भ वैज्ञानिकच आहेत. उदाहरणार्थ मंगळावरील वादळे, तेथील जमीन, मंगळ ग्रह पृथ्वीवरून आपल्याला लाल का दिसतो, हे सर्व खुद्द जॉर्ज आणि अ‍ॅनी अनुभवतात.

अज्ञात स्थळी लपवलेल्या खजिन्याचा शोध घेण्यासाठी खेळला जाणारा ट्रेझर हंट’- खजिन्याची लूट हा युरोपातील आवडता खेळ. या खेळाचे वैशिष्टय़ म्हणजे हा खजिना शोधण्यासाठी तुम्हाला काही क्ल्यूदिलेले असतात. एखादा संदर्भ सापडला की त्याच्या आधारे दुसरा संदर्भ शोधायचा.. मग तिसरा.. आणि मग शेवटी खजिना सापडतो, असे या खेळाचे स्वरूप. अ‍ॅनीच्या वडिलांच्या कॉसमॉसया सुपरकॉम्प्युटरवर अशाच प्रकारचे काही सांकेतिक संदेश येतात. हा संकेतांची उकल करताना अनेक धक्कादायक गोष्टी अ‍ॅनी आणि जॉर्जच्या ध्यानात येऊ लागतात. कोट्यावधींचा खर्च करून मंगळावर पाठवलेला रोबोहोमोरनादुरुस्त झाल्याने तिच्या वडिलांच्या भवितव्यावरच परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाले असताना हे दोघे आणि त्यांचा मित्र इमेट याच्यासह कॉसमॉसच्या मदतीने थेट मंगळावर जाण्याचे निश्चित करतात.

मात्र, मंगळावर जाणे हे कुठेही फिरायला जाण्याइतके सोपे नसल्याचे ध्यानात आल्याने फ्लोरिडातील अंतराळयान प्रक्षेपण केंद्रातून अंतराळयानाचे प्रक्षेपण होत असतानाची वेळ निवडतात. या दोघांचा ब्रिलियंटआणि अ‍ॅनीच्या दृष्टीने बावळट मित्र इमेटला घेतल्याशिवाय ही कादंबरी पूर्ण होणारच नाही. कारण हे दोघे प्रत्यक्ष अंतराळात असताना हा पठ्ठा त्यांच्या मोहिमेचे पृथ्वीवरून सूत्रसंचालन करतो!या कादंबरीत सर्व काही आहे. बालकांमधील राग, लोभ, द्वेष या सर्व भावना यातही आहेत. पण त्याचवेळी एकमेकांबद्दल असणारा जिव्हाळाही त्यात आहे. जॉर्ज आणि अ‍ॅनी पृथ्वीपासून ४१ दशलक्ष प्रकाशवर्ष दूर जातात, आणि त्याचवेळी कॉसमॉसहट्टीपणाने काम करायला नकार देतो. त्यावेळी झालेली इमेटची अवस्था, पृथ्वीपेक्षा अधिक गुरुत्वाकर्षण असलेल्या ग्रहावर स्वत:चेच वजन पेलवताना अ‍ॅनीची बिकट अवस्था झाल्यानंतर तिला सांभाळणारा जॉर्ज, त्याच ग्रहावर नंतर अ‍ॅनीचे वडील एरिक यांची झालेली एंट्री’, पृथ्वीवर इमेट भांबावलेला असताना जॉर्जला शोधत आलेल्या त्याच्या आजीने इमेटला आपल्या मित्रांना कोणालाही न सांगता अंतराळात पाठवल्याबद्दल न रागावता, त्याच्या बुद्धिमत्तेचे कौतुक करून, ‘कॉसमॉसनक्कीच दुरुस्त करशील,असा दिलेला दिलासा, एरिकचा शत्रू डॉक्टर रिपरचे उपद्व्याप हे सर्व मनाला भिडते. स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाने अगदी लहान मुलांच्या भावविश्वात शिरून हे पुस्तक लिहिले आहे. मात्र, या कादंबरीतील रहस्य समजून घेण्यासाठी ती वाचणेच गरजेचे आहे. * जॉर्जस् कॉस्मिक ट्रेझर हंट डॉ. स्टीफन आणि ल्यूसी हॉकिंगप्रकाशक- रँडम हाउस चिल्ड्रन्स बुक्सपाने- ३०० + १६ रंगीत चित्रांची पानेकिंमत- स्ट्रॅण्ड बुक स्टॉलमध्ये ३०० रुपयांत.

No comments:

Post a Comment