Sunday, September 19, 2010

थ्री कप्स ऑफ टी

पाकिस्तानातील सर्वात उंच आणि जगातील दुस-या क्रमांकाचं शिखर के टू सर करण्यात ग्रेग मॉर्टेनसन आणि पत्रकार डेव्हिड रेलिन अपयशी ठरले. मात्र बंदुकीऐवजी लेखणीच्या माध्यमातून शांतता कशी प्रस्थापित करता येऊ शकते, याचा धडा त्यांनी घालून दिला. ही मोहीम अयशस्वी ठरल्यानंतर मॉर्टेनसन पाकिस्तानच्या डोंगराळ भागात उतरला. तिथल्या एका गावातील जनतेने त्याची देखभाल केली. त्याच वेळी त्याला त्या गावात एकही शाळा नसल्याचं भीषण वास्तव जाणवलं. हे वास्तव बदलण्याची खूणगाठ त्याने मनाशी बांधली आणि त्यासाठी त्याने कसून प्रयत्न केले. युद्धाच्या खाईत लोटल्या गेलेल्या पाकिस्तानच्या वायव्येकडील आणि अफगाणिस्तानच्या दुर्गम भागात मॉर्टेनसनने तब्बल ५५ शाळा उभारल्या.

आयबीएमच्या टाइपरायटवरच्या की-बोर्डवरील कळा इतक्या जवळ जवळ होत्या की, आपण काय टाइप करतोय, हेही ग्रेग मॉर्टेनसनला कळत नव्हतं. प्रिय विंफ्रे, मला तुमच्या कार्यक्रमाचं कौतुक वाटतं. जनतेची काळजी घेणा-यांपैकी तुम्ही एक आहात, याबाबत मला विश्वास वाटतो. पाकिस्तानात हिमालयाच्या कुशीत वसलेल्या कोरफे या लहानशा खेडय़ात मला शाळा सुरू करायची आहे. या भागातील मुलांसाठी एकही शाळा नाही, हे वास्तव आहे.

यापुढे काय लिहायचं, हे त्याला सुचत नव्हतं. पैशांची मागणी कशी करायची, हा त्याच्यासमोरचा प्रश्न होता. तरीही त्याने सुरुवात केलीच. जगातील दुस-या क्रमांकाचं के टू शिखर सर करताना काही पाकिस्तानी रहिवाशांची भेट झाली. त्यांनी मला या शाळेसाठी १२ हजार डॉलर्स खर्च येईल, असं सांगितलं आहे. त्यामुळे यात तुमचाही काही सहभाग असेल तर तो माझ्यासाठी आशीर्वादच ठरेल, असं त्याने पत्रात नमूद केलं.मात्र नंतर पत्रातील स्पेलिंगची चूक लक्षात आली आणि त्याने ते पत्र तिथेच फाडून टाकलं.

त्यानंतर सॅन फ्रान्सिस्कोच्या एका वैद्यकीय केंद्रात रात्रपाळीवर असताना त्याने हे पत्र पुन्हा लिहिलं आणि सहा जणांना पाठवण्यासाठी तयार केलं. यात ख्यातनाम टीव्ही सूत्रसंचालक ओप्राह विंफ्रे, सीएनएन वाहिनीचे निवेदक आणि अभिनेत्री सुसान सॅरेंडन वगैरेंचा समावेश होता. या सहा जणांना त्याने घरी परतताना हे पत्र पाठवलं. मात्र आपलं लक्ष्य पाच हजार जणांना पत्र पाठवण्याचं आहे, याची त्याला आठवण झाली आणि तो अस्वस्थ झाला.

शाळा उभारायची, त्यासाठी निधी गोळा करायचा, त्याची सुरुवात स्वत:पासून करायची म्हणून त्याने आपल्या भाडय़ाच्या घराचाही त्याग करून स्वत:च्या ब्यूक कारमध्येच संसार थाटायचा निर्णय घेतला. रात्री दमूनभागून आल्यानंतर गाडी निर्जन जागी उभी करून त्यातच मागील सीटवर झोप काढायची व त्याच वेळी पुढील योजना ठरवायची, असा दिनक्रम बनला.

या काळात मॉर्टेनसनने शेकडो पत्रं लिहून काढली. प्रत्येक अमेरिकन सिनेटरला त्याने हे पत्र लिहिलं. आतापर्यंत कधीही न वाचलेली पॉप संस्कृतीची नियतकालिकं वाचून त्यातील नावं शोधण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे त्याने अमेरिकेतील १०० सर्वात श्रीमंत व्यक्तींची नावं शोधून काढली. मी काय करतोय हे मलाच कळत नाही,’ अशी त्याची प्रतिक्रिया होती. मॉर्टेनसन म्हणतो, ‘या काळात अमेरिकेतील जवळपास सर्वच बडय़ा मंडळींची यादी तयार केली होती. या प्रत्येकाला पत्र पाठवलं. त्या वेळी मी ३६ वर्षाचा होतो आणि मला संगणकाचं काहीही ज्ञान नव्हतं.

एका दिवशी त्याला त्याच्या नेहमीच्या कृष्णा कॉपी केंद्राचं दार बंद दिसलं आणि पत्र टाइप करण्यासाठी मोठा प्रश्नच त्याच्यासमोर उभा राहिला. नजीकच्या लेझर कॉपी केंद्रावर तो गेला. त्याचा मालक किश्वर सईद याने त्याला संगणक विकत घेण्याचा सल्ला दिला. संगणक कशासाठी हवा, ते कळल्यानंतर मात्र मूळच्या पाकिस्तानी असलेल्या सईदने मॉर्टेनसनला संगणकाचे धडे दिले. सईद म्हणतो, ‘ग्रेग करत असलेलं काम मोठं होतं. माझ्या गावातही शाळा नव्हती.

लवकरच मॉर्टेनसनने संगणकाचं जुजबी ज्ञान मिळवलं आणि त्याचं काम पहिल्यापेक्षा किती तरी प्रचंड वेगात होऊ लागलं. सईदनेही त्याला आणखी काही सेलिब्रिटींची यादी दिली. या सर्वाना मेल पाठवण्यास त्याने सुरुवात केली. पाकिस्तानातील मुलांना साक्षर करण्याचा प्रयत्न करणा-या मला एका पाकिस्तानी व्यक्तीने संगणक साक्षर केलं, असं हृदगत मॉर्टेनसनने नंतर व्यक्त केलं. ही पत्रं पाठवल्यानंतर त्याने १६ बडय़ा व्यक्तींकडे पाकिस्तानातील कोरफे गावात शाळा उभारण्यासाठी मदतीसाठी याचना करणारे अर्ज पाठवले.

या कामात त्याला त्याच्या आईने जेरेन मॉर्टेनसन यांनीही मदत केली. पीएच.डी. पूर्ण केल्यानंतर त्यांना एका शाळेत मुख्याध्यापकाची नोकरी मिळाली होती. तेथे त्यांनी ग्रेगने तयार केलेल्या पाकिस्तानातील गावांच्या स्लाईड्स दाखवल्या. आपल्यासारखी मुलं तिथे शाळेत जात नाहीत. गोठवणा-या थंडीत उघडय़ावरच शिक्षकांशिवायच शिकतात, हे पाहून त्यांच्या शाळेतील चिमुरडय़ांना आश्चर्य वाटलं.

या मुलांनीच नंतर पेन्स फॉर पाकिस्तानही मोहीम सुरू केल्याचं जेरेन यांनी मुलाला ग्रेगला सांगितलं. या मुलांनी तब्बल ६२३४५ पेन्स जमा केली. त्याचा ६२४ डॉलर्सचा धनादेश त्यांनी जेरेनला पाठवला आणि त्यांना ग्रेगच्या मोहिमेसाठी हा जणू शुभ संकेतच वाटला.

त्यानंतर त्याने पाठवलेल्या ५८० पत्रांपैकी एका पत्राला टॉम ब्रोकॉ यांनी उत्तर पाठवलं. फुटबॉलपटू म्हणून ग्रेग आणि ते दोघं विद्यापीठात एकत्र खेळले होते. त्यांनी १०० डॉलर्सची मदत ग्रेगला पाठवून सुयश चिंतलं. त्याच वेळी ग्रेगने आर्थिक मदतीसाठी पाठवलेले १६ अर्ज फेटाळल्याचंही ऐकावं लागलं.

त्यानंतरही मॉर्टेनसनचे प्रयत्न सुरूच होते. एके दिवशी कामावर असताना त्याचा सहकारी टॉम वॉन याने एक कागदाचा चिटोरा त्याच्याकडे दिला. त्याच्यावर नाव लिहिलेल्या माणसाने ग्रेगच्या प्रयत्नांबद्दल वाचलं होतं व त्याबाबत वॉनकडे विचारणा केली होती. तो भौतिकशास्त्रज्ञ होता, तसंच तो गिर्यारोहकही होता. डॉ. जेन होर्नी हे त्याचं नाव. या व्यक्तीबद्दल लायब्ररीत बसल्या बसल्या मिळालेली माहिती वाचून ग्रेगलाही आश्चर्य वाटलं. एव्हरेस्टसह अनेक शिखरांवर चढाया केलेल्या या मनस्वी माणसाने अनेक नोक-या सोडल्या होत्या. मात्र त्याच्या बुद्धिमत्तेची कदर म्हणून अनेक कंपन्यांमध्ये तो उच्चपदावर होता. एके दिवशी त्यानेच ग्रेगला स्वत: दूरध्वनी करून त्याच्या या मोहिमेची माहिती जाणून घेतली. त्याबद्दल खातरजमा केली आणि थेट मदतच पाठवून दिली. मात्र हा धनादेश स्वीकारण्यासाठीही ग्रेगकडे स्वत:चा अधिकृत पत्ता नव्हता. हा धनादेश त्याने कसा तरी मिळवला. त्याने आपली लाडकी ब्यूक कार ५०० डॉलरला विकून ग्रेग आपल्या जीवनाच्या एका नव्या टप्प्याचा प्रवास करण्यासाठी विमानतळावर पोहोचला.

आपल्या उद्दिष्टस्थळी जाऊन त्याने गावक-यांशी बोलायला सुरुवात केली. शाळेसाठी आवश्यक ते सर्व साहित्य आणलं आहे. माझं वचन मी पूर्ण करणारच. लवकरच कामाला आपण सुरुवात करू.त्याने हा विश्वास व्यक्त केला. पण गावक-यांनी सांगितलं, ‘कोरफेगावात शाळा बांधण्याआधी तिथल्या नदीवर पूल बांधणं गरजेचं आहे. हे ऐकलं आणि त्याच्या डोक्यात पुन्हा विचारचक्र सुरू झालं..

No comments:

Post a Comment