Monday, September 6, 2010

अपघातांच्या गमतीजमती!..

बाइकवर ‘प्रेझेन्स ऑफ माइन्ड’ नसेल, तर अपघात होणार हे नक्की. पण हे अपघात नेहमीच दुखापत करणारे आणि गंभीर असले पाहिजेत असं कुठेय? काही गमतीशीर अपघातही होतातच, अशा अपघातांचे हे काही किस्से..

बाइक्सचे अपघात नेहमी अतिवेगामुळे किंवा पावसाळ्यातल्या निसरड्या/ एरवीही धोकादायक असलेल्या रस्त्यांमुळेच होतात असं नाही. प्रेझेन्स ऑफ माइन्ड हा बायकिंगमधला महत्त्वाचा भाग, त्यामुळे तुमचं चित्तच था-यावर नसेल, मेंदू न वापरताच तुम्ही गाडीवर असाल, तर अपघात होणारच. पण अशा बिनमेंदूच्या अपघातांपैकी सगळेच गंभीर असतात असं नाही.. काही गमतीशीर अपघातही होतात!

एक अपघात आठवतो, म्हणजे त्यात कोणालाच दुखापत झाली नाही, पण तो बघणा-यांची मात्र चांगलीच करमणूक झाली होती. एक जोडपं, पार्क केलेली बाइक काढून निघण्याच्या तयारीत होतं. तरुण गाडीवर बसला, किक मारली आणि पाठीमागे मैत्रीण बसली असं समजून गाडीचा गियर टाकून पुढेही नेली. मात्र, टिपिकल महिला स्टाइलमध्ये गाडीवर बसण्याच्या तयारीत असलेली ती तरुणी मात्र, बाइकवर बसलीच नव्हती. बसण्याच्या तयारीत असतानाच, तिच्या मित्राने गाडी पुढे नेल्याने ती मात्र, दाण्णकन जमिनीवर आदळली. विचार करा, बाजूला असलेल्यांची हसून हसून काय वाट लागली असेल.

अजून एक किस्सा सांगतो, म्हणजे तो ऐकलेला आहे, पण हेल्मेटसक्ती झाली त्या सुरुवातीच्या काळात हे प्रकार खूप ठिकाणी झाले असतील. एक बाइकस्वार पानाच्या गादीजवळ गेला. आधीच पोटात थोडीफार ढकलली होती. त्यात त्याने एक पान घेतलं, अगदी थाटात त्याने ते तोंडात सरकवलं, मग हेल्मेट घातलं आणि गाडीला किक मारली. काही मीटर पुढे गेल्यावर तो आणि त्याची बाइक रस्त्यावर आडवी पडलेले दिसले.

परिसरातलाच असल्याने सर्व जण धावत त्याच्याकडे गेले. काय झालं, काय झालं, असं विचारू लागले. त्यानं सांगितलं. हेल्मेटची कधीच सवय नव्हती. त्यामुळे हेल्मेट घालून त्याची काच बंद केली आहे, हे ध्यानातच नव्हतं. हेल्मेट नाही, असं समजून पानाची पिंक टाकली आणि समोरचं दिसेनासं झालं..प्रत्यक्ष पाहिलेला एक अपघात आठवतो, तो मात्र हसावं की रडावं अशी आम्हा सर्वाचीच अवस्था करणारा होता. एकानं वडिलांची जुनी बुलेट सकाळी-सकाळी काढली होती. घरातून अगदी सुसाट वेगानं बाहेर पडला. नाक्यावर मित्रांनी त्याला पाहताच, हाक मारली आणि या महाभागानं मागं वळून पाहिलं,तोवर त्याची बुलेट रस्त्याच्या मधल्या डिव्हायडरवर चढलीही होती. पुढच्या क्षणाला तो रस्त्यात आडवा झाला.

No comments:

Post a Comment