Saturday, September 11, 2010

जुनी बाइक, नवा लुक..

आपली बाइक इतरांपेक्षा वेगळी दिसावी अशी क्रेझ तरुणांमध्ये खूप असते. पण त्यासाठी बाइक ‘सजवण्या’चा मार्ग आत्ताच्या तरुणांना गावंढळ वाटू लागलाय. आता क्रेझ आलीय अलॉय व्हील्स, ओपन चेन आणि ‘स्पोर्टस बाइक’च्या लुकची! मात्र एखादं वाहन ओळखू न येण्याइतकं त्याचं रूप पालटणं हा कायद्याने गुन्हा ठरू शकतो..

एखादी ललना जशी तरुणांचं लक्ष वेधून घेते, तसंच तरुणांचं लक्ष वेधून घेण्याचं काम बाइक्स करत असतात. मुळात बाइक वापरणा-यांचा वयोगट सहसा पस्तिशीतल्या आतला असतो. विशेषत: कॉलेजकुमारांमध्ये आपली बाइक सर्वापेक्षा वेगळी दिसावी, अशी एक क्रेझ असते. त्यांच्या या क्रेझची‘दखल’ दुचाकींचं उत्पादन करणा-या कंपन्या घेतात आणि दरवर्षी नवनवी मॉडेल्स बाजारात आणत असतात. त्यामुळे अगदी गेल्या वर्षी घेतलेली बाइकही या वर्षी जुनी झाली, असंच ब-याच जणांचं म्हणणं असतं. घरून भरभक्कम पॉकेटमनी मिळत असेल तर अनेक जण दरवर्षी नवी बाइक खरेदी करणारेही आहेत. कॉलसेंटरमध्ये काम करणारेही नवनव्या‘स्किमां’तून दरवर्षी बाइक बदलताना दिसतील. पण जुनीच बाइक नव्या स्वरूपात मांडणारीही अनेक हौशी मंडळी दिसून येतात.

या वेळच्या ‘बाइझिंग’मध्ये आपण बाइक्सचं मॉडिफिकेशन या विषयावरच चर्चा करणार आहोत. मुख्यत: आपली बाइक इतरांपेक्षा वेगळी दिसावी, म्हणून अनेक जण आपल्या बाइक्समध्ये बदल घडवत असतात. मॉडिफिकेशनमध्ये गाडीचं रंगरूप बदलणं आणि गाडीचा परफॉर्मन्स वाढवणं, असे दोन भाग येतात. आपल्या देशात प्रामुख्यानं गाडीचं बाह्यरूप बदलण्यावरच भर दिला जातो.

गावाकडच्या जुन्या बुलेट अनेकांच्या लक्षात असतील. या गाड्यांच्या हँडलला सोनेरी रंगाच्या कागदाच्या, कपड्यांच्या झिरमिळ्या सोडलेल्या असायच्या. गाडीला चकचकीत आरसे, आरशांवर चित्रं (मुख्यत: तरुणींच्या, लिपस्टिक लावलेल्या ओठांची), पाठीमागच्या मडगार्डखालच्या रबर शीटला लावलेले लाइट, वेगळा आवाज करणारे हॉर्न आणि जमेल तशी सजावट केलेली असायची. (‘राजाबाबू’ गोविंदाची बुलेट आठवून पाहा.)

पण, आजच्या तरुणाईच्या दृष्टीने अशी सजावट गावंढळपणाचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे आपल्या जुन्या बाइकच्या सजावटीसाठी ही मंडळी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरतात. यातली महत्त्वाची म्हणजे, गाडीचा मूळ रंग बदलणं. अनेक जण गाडीचा मूळ रंग बदलून नवीन रंग देतात. गाडीचे मूळ स्टिकर काढून तिच्यावर फॅन्सी स्टिकर चिकटवले जातात. (अंगावर टॅटू गोंदावे त्याप्रमाणे) मोटारसायकलचा मागचा टायर बदलण्यासही अनेकांची पसंती असते. (रुंद टायरमुळे गाडीला अधिक चांगली पकड मिळते.) अधिक रुंद टायर गाडी जुनी झाली की बसवले जातात. हल्ली नवी गाडी घेताना पूर्वीप्रमाणे स्पोक असणारी व्हील मिळत नाहीत तर अलॉय व्हील मिळतात. त्यामुळे जुनी चाके बदलून त्या जागी अलॉय व्हील बसवण्याची फॅशनही हल्ली ‘इन’ आहे. काहीशी महागडी असली तरी ही व्हील अधिक टिकतात. गंजण्याचीही फारशी धास्ती नसते. बाइकची चेनदेखील गाडी सजवण्याचा एक भाग असतो. त्यामुळे पूर्वीप्रमाणे कव्हरमध्ये चेन ठेवण्यापेक्षा ती खुली ठेवून बाइकला अधिक ‘बोल्ड’ लूक देण्याचा प्रयत्न करणारेही अनेक जण आहेत.

दुसरा एक प्रकार म्हणजे, गाडीची दर्शनी बाजू बदलणं. त्यात हँडल अधिक खाली झुकवून स्पोर्ट्स बाइक्सचा फील आणला जातो. सस्पेन्शन बदललं जातं. गाडीची हेडलाइट बदलली जाते. जरा अधिक पैसा हातात असेल तर दर्शनी भाग अधिक आकर्षक केला जातो.

दुसरा प्रकार म्हणजे, गाडीचा परफॉर्मन्स बदलणं. त्यासाठी इंजिनची क्षमता वाढवली जाते, पेट्रोल कमी वापरलं जावं,म्हणूनही इंजिनात बदल केले जातात. अनेक हौशी मंडळी आपल्या बाइकचे मडगार्ड्स काढून टाकतात. इंधनाची टाकी बदलतात. त्यातूनही गाडीचं एक वेगळंच रूप समोर येतं. गाडीला वेगळे सायलेन्सर लावले जातात. त्यातले काही कर्णकर्कश्श आवाज करणारे असतात तर काही दिसायला आकर्षक असतात. अशा प्रकारे सायलेन्सर बदललेल्या गाड्या आपल्याला सर्रास दिसतात.

बजाज पल्सर 200 सीसीची बाइक पूर्णपणे मॉडिफाय करून तिला महागड्या यामाहा आर-वनचं रुपडं द्यायचं असेल तर त्यासाठी आपल्याकडे किमान महिनाभराचा वेळ आणि खिशातही 50 हजार रुपयांपर्यंतची रोकड हवी. हीरो होंडा सीबीझी,पल्सर, युनिकॉर्न, टीव्हीएस अपॅची अशा मोठ्या गाड्यांना स्पोर्ट्स बाइक्सचं रूप देण्यासाठी देशात अनेक ठिकाणी अनेक जण कार्यरत आहेत.

मात्र, आपल्या गाडीचं रुपडं बदलण्याआधी तशी परवानगी आरटीओ, वाहतूक पोलिसांकडून मिळते की नाही, याची शहानिशा करणंही गरजेचं आहे. गाडीचा रंग बदलणं, तिच्या आहे त्या स्वरूपात बदल करणं कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घेऊनच हे मॉडिफिकेशन करावं.


No comments:

Post a Comment